अभ्यंगं आचरेत् नित्यम्

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


शरीराबरोबरच मनाचाही विचार प्रामुख्याने आयुर्वेदात आहे. शरीराच्या तीन दोषांनी जशी भिन्न भिन्न प्रकृती निर्माण होते, तसेच मानस भावांंमधूनही भिन्न भिन्न मानस प्रकृती निर्माण होते. म्हणजे अमूक प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अमूक ॠतुबदलांचा परिणाम प्रकर्षाने होतो व तो होऊ नये किंवा त्याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये, समत्व कायम राखले जावे म्हणून नित्य आचरणात यावेत असे काही नियम आयुर्वेदाने सविस्तर सांगितले आहेत. या नित्य पालन करणार्‍या गोष्टी म्हणजेच ‘दिनचर्या’ होय. यातील एक नित्य उपक्रम म्हणजे अभ्यंग. त्याबद्दल आज अधिक जाणून घेऊया.

आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद. वेद म्हणजे जाणणे. निरोगी, सुखी आयुष्य कसे जगावे, याबद्दल ज्या शास्त्रात सांगितले आहे, ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. यात फक्‍त आजारी पडल्यावर औषधोपचार सांगितले नाहीत, तर आजारी पडूच नये म्हणून काय खबरदारी घ्यावी आणि आजार बरा झाल्यावर पुन्हा तो होऊ नये, म्हणून काय करावे (शेवटच्या उपायांना ‘अपुनरोद्भव चिकित्सा’ म्हणतात.) असा आयुर्वेद हा ‘complete package’ आहे. स्वस्थ, निरोगी व्यक्तीने पाळावयाचे नियम, आजारी पडल्यास करायची चिकित्सा. जर बिघडलेले दोष थोड्या फार प्रमाणात असतील तर ते दोष शमविणे, शांत करणे (यालाच ‘शमन चिकित्सा’ म्हणतात) आणि जर दोष खूप बिघडले असतील, तर शरीराचे शोधन (शुद्धी करुन) ते दोष शरीराबाहेर काढणे. या शोधन चिकित्सेलाच ‘पंचकर्म चिकित्सा’ म्हणतात. या नंतर शरीरात संतुलन राहणे महत्त्वाचे. समता (Equilibrium) स्थापित राहिल्यास आरोग्य टिकते. यासाठी शोधनोपरान्न रसायन चिकित्सा आयुर्वेदाने सांगितली आहे. समता राखण्यासाठी ॠतुनुसार राहणीमानात बदल गरजेचा आहे. तो कसा असावा, याबद्दल ॠतुचर्येचे नियम आयुर्वेदात विस्तृत सांगितले आहेत.

अभ्यंग-म्हणजे, मसाज किंवा मॉलिश. लहान मुल अंघोळीनंतर शांत झोपतं, हे आपण सगळ्यांनी बघितलयं. तान्हुल्यांना अंघोळीपूर्वी रोज अंगाला तेल लावून मॉलिश केले जाते. काही काही घरातूंन दोन वेळा मॉलिश केले जाते. घरातले मोठे काय म्हणतात, तर हाडं बळकट होण्यासाठी मॉलिशचा फायदा होतो. शरीरकांती सुधारते. अधिक लव असल्यास ती रगडल्याने कमी होते. बाळाचे हात-पाय दुखत असल्यास मॉलिशने ते चेपल्यावर बरे वाटते. दुखणे थांबते आणि छान झोप लागते. इतके फायदे जर बाळाला मिळतात, तर मोठेपणी अभ्यंग का सोडले जाते? ‘वेळ नाही,’ या सबबीखाली आपले आरोग्य पणाला का लावावे?

‘अभ्यंंग’ म्हणजे ‘अभि-अंग’. याचा अर्थ, अजून एक अंग जन्माच्या वेळेस आपल्याला एक शरीर प्राप्त होते. त्यात दररोज थोडे थोडे बदल होत जातात. रोज काही पेशी उत्पन्न होतात, काही परिवर्तीत होतात आणि काही मृत होतात. या मनुष्य शरीरावर अजून एक अंग घालणे म्हणजे ‘अभ्यंग’ होय. ज्या पद्धतीत कवचकुंडले घातल्यावर शरीराचे बाह्य आघातापासून संरक्षण केले जाते, तसेच अभ्यंगाने शरीरावर चिलखत घातल्याप्रमाणे फायदा होतो. शरीराचे संरक्षण करणे हे त्वचेचे कार्य आहे. अभ्यंगाने या कार्यात मदत होते. ऊन-वारा-पाऊस या आघातांपासून अभ्यंगामुळे संरक्षण मिळते.

अभ्यंगाचे विविध फायदे आहेत. पण, अभ्यंग रोज करणे गरजेचे आहे. नित्योपक्रमातील अभ्यंग हा उपक्रम आहे. यासाठी स्वतःच्या हाताने स्वतःच्या शरीराला तेल स्नेह लावणे अपेक्षित आहे. अन्य व्यक्तींनी लावणे दरवेळेस गरजेचे नाही. संपूर्ण शरीराला अभ्यंग करताना तो कसा करावा, याबद्दल थोडे सविस्तर सांगते. अभ्यंगासाठी तेल कोमट असल्यास ते शरीरात अधिक मुरते, म्हणून तेल कोमट करुन घ्यावे. सर्वप्रथम टाळूला तेल लावून जिरवावे. नंतर बेंबीत 2 थेंब घालावे. मग कानात 2-2 थेंब घालावेत. तसेच अन्य जे नैसर्गिक पोकळ्या, रंध्र आहेत जसे नाक, गुद, योनि इ.) इथे ही 2-2 थेंब तेल सोडावे. त्यानंतर हाता-पायांना, मग छाती-पोट आणि शेवटी मान, पाठ, कंबर असे अभ्यंगासाठी तेल लावावे. आधी सर्व अंग -अवयावांना तेल लावावे व मग थोडे मळावे-रगडावे. तेल जिरवण्यासाठी थोडे चोळणे अपेक्षित आहे. खुप रगडणे गरजेचे नाही. हाता-पायांना तेल लावतेवेळी खालून वरच्या दिशेला लावावे. अंगावरील लव ज्या दिशेने असते - वरून खाली त्या विपरीत दिशेने खालून वर तेल लावावे, म्हणजे ते फक्‍त केसांवरच न लागता रोमरंध्रांतूनही आत शिरते. सांध्यांना लावताना जसे कोपर, मनगट, गुडघे इ. वर्तुळकार मॉलिश करावे. पोटाला लावतानाही घड्याळाच्या दिशेने वर्तुळाकार लावावे. छाती, पाठ, कंबरेला लावताना आधी मध्यभागी लावून नंतर बाहेरच्या दिशेने तेल लावावे. नखशिकांत तेल लावायला वेळही जास्त लागत नाही आणि तेलही जास्त लागत नाही. 1-2 चमचे तेल म्हणजे 10-20 मि.ली. इतके तेल पुरते आणि 4-5 मिनीटांमध्ये संपूर्ण अंगाला तेल लावून चोळूनही होऊन जाते. सुरूवातीस शरीरात शुष्कता-रूक्षता असल्यास थोडा वेळ व तेल, दोन्हीही जास्त लागतं. पण, नंतर नित्य उपक्रम होऊ लागल्यावर एवढाच वेळ लागतो. थंडीत तर बादलीत पाणी भरेपर्यंत तेल लावून झालेले असते. म्हणजे ‘वेळ नाही’, ही फक्‍त सबबच असते. त्यात काही तथ्य नसते.

अभ्यंगाचे भिन्न भिन्न फायदे आहेत. शरीराच्या स्वाभाविक हालचालींवर एक नैसर्गिक सहजपणा असतो, लागतो. तो सहजपणा टिकवण्यासाठी स्निग्धता गरजेची आहे. नित्य हालचाली करणार्‍या सांध्यांची अधिक लवकर झीज होते. ती होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अभ्यंगाचा अत्यंत चांगला फायदा होतो. सांधेदुखी वेदनाशमन अभ्यंगाने होते हे पटते. पण, मग प्रतिरोधात्मक उपाय म्हणून का केले जात नाही? जे रोज अभ्यंग करतात, त्यांच्यामध्ये सांधेदुखी लवकर सुरू होत नाही. म्हणून काही विशिष्ट व्यवसाय असलेल्यांनी आवर्जुुन अभ्यंग करावे. जसे शिक्षक, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, सेल्समन, नर्तकी, पोस्टमन, खेळाडू इत्यादींना अभ्यंगाचा उत्तम फायदा होतो.

अभ्यंगाने वाताचा नाश होतो. शरीरात वात-पित्त-कफाचा समतोल स्थापला तर आरोग्य नांदते. पण, यात विषमता आली तर आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात. वात वाढवणे म्हणजे शरीरातील रूक्षता-शुष्कता खरखरीतपणा इ. वाढणे होय. या गुणांच्या विपरीत तेलाचे-तुपाचे गुण असतात. त्यामुळे रूक्षता-शुष्कता-कोरडेपणा-खरखरीतपणा नियंत्रित राहतो. वात वाढल्यावर केवळ सांधेदुखीचं उत्पन्न होते असं नाही, तर ढेकरांचे प्रमाणही वाढते. आचके अधिक येतात. उचक्या लागतात. पोट गुरगुरणे, मलबद्धता, निद्रानाश इ. असे साधे, तर काही खूप किचकट असे एकूण 80 रोग केवळ वाताच्या दृष्टीने बिघाडाने होतात. रोजच्या केवळ 5 मिनीटांच्या उपक्रमाने जर वातावर विजय मिळवता येतो, तर ती 5 मिनीटे कामी आली की वाया गेली म्हणावीत, हे स्वतः विचार करून बघावे.

वार्धक्य टाळता येते...


वार्धक्य म्हणजे शरीरातील धातूंची झीज अति प्रमाणात झालेली स्थिती. प्रत्येक धातू उत्पत्ती, स्थिती व लय या तीन अवस्थांमधून सतत सक्रिय असतो. लहानपणी उत्पत्तीचा वेग अधिक असतो, तर म्हातारपणी या विपरीत झीज अति प्रमाणात होत असते. त्याच्या गतीवर अवरोध अभ्यंगामुळे साधता येतो. वार्धक्य तर प्रत्येक जीवाची अंतिम स्थितीकडे जातानाची अवस्था आहे. पण, ती सुकर व्हावी व हळू व्हावी यासाठी अभ्यंग नित्य आचरावे. जेवढी झीज कमी, तेवढे संतुलन टिकवता येईल आणि तेवढेच आरोग्यदायी रोगमुक्‍त जीवन अनुभवता येईल.


(क्रमशः)


- डॉ. कीर्ती देव


(लेखिका आयुर्वेदिक
कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@