कर्म म्हणजे धर्म, धर्म म्हणजे न्याय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018   
Total Views |


‘कानून के हात लंबे होते है’, पण त्या ‘कानून’ने न्याय कधी मिळेल, याची काही खात्री नाही. अशी लोकांमध्ये वंदता आहे. पण, लोकांची ही वंदता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शाहरूख काथावालांनी खोटी ठरवत इतिहास घडवला...
त्यांच्या इतकी कामाची ऊर्जा आणि निष्ठा मी कुठेही अनुभवली नाही. न्यायालयात आलेल्या कित्येक तक्रारींचे स्वरूप गंभीर असतेच. त्याचा अभ्यास करणे, विशेष पैलू विचारात घेऊन त्यांची नोंद करून, ती तक्रार व्यवस्थित लिहिणे आणि समजून घेणे हे काम तसे महत्त्वाचे. न्यायाधीश शाहरूख जे. काथावाला हे काम रविवारी रजेच्या दिवशी करायचे, म्हणजे आताही करतात,” न्यायाधीश काथावाला यांचे सचिव केपीपी नायर काथावालांबद्दल सांगत होते. खरेच आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश काथावाला यांची कामाप्रती निष्ठा आणि ऊर्जा यांचा अनुभव गेल्या शुक्रवारी अवघ्या उच्च न्यायालयात चर्चेचा विषय ठरला.

24 मार्च 1960 साली काथावाला कुटुंबात जन्मलेले शाहरूख. त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे गर्व्हमेंट लॉ महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी कायद्यासंबंधीचा स्वत:ची प्रॅक्टिस सुरू केली. 2009 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, तर जुलै 2011 मध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयात त्यांची नियुक्‍ती झाली. तसेही न्यायाधीश शाहरूख काथावाला यांचे नाव या ना त्या कारणाने सदोदित चर्चेतच राहिलेले. लवाद, बौद्धिक मालमत्ता अधिकार, व्यावसायिक वस्तू... अशा तीनही गोष्टी माणसाच्या मालमत्ता आणि संपत्तीशी संबंधित आणि बहुतांशी याचसाठी सर्वच गुन्ह्यांची-खटल्यांची मालिका मग सुरू होते. त्यासंबंधीचे न्यायनिवाडे करणे म्हणजे तसे जिकिरीचेच काम. लवादाचे काम जरी सामोपचाराने न्यायदान करणे असले तरी त्यामध्ये मानवी संबंधांचा, संस्थात्मक बांधणीचा अभ्यास असणे गरजेचे. तीच बाब बौद्धिक मालमत्तेचीही. याबाबत प्रचंड गुंतागुंत असते. न्यायाधीश शाहरूख काथावाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विषयासंबंधीच्या न्यायदानाचे काम करत असतात. अर्थात, वेळोवेळी जबाबदारीमध्ये बदलही होतो. पण, हे सगळे सांगण्याचे तात्पर्य हेच की, न्यायाधीश काथावाला यांच्याकडे सगळी अतिमहत्त्वाची प्रकरणे न्यायदानासाठी येतात, ज्यांच्या न्यायनिवाड्यासाठी प्रचंड अभ्यास आणि उर्जेची गरज असते. तो अभ्यास, ती ऊर्जा न्यायाधीश काथावालांकडे आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे चालणार्‍या सर्वच तक्रारींची विशेष बातमी होते आणि त्या विशेष बातमीमुळे न्यायाधीश काथावाला नेहेमीच चर्चेचे केंद्रबिंदू असतात.

आताही दि. 5 मे 2018 ची ‘ती’ रात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आजवरच्या दैदिप्यमान कारकिर्दीमधील कर्तव्यनिष्टेची सुवर्णकहाणी ठरली. कारण, मुंबई उच्च न्यायालयाचे 20 क्रमांकाचे कोर्ट पहाटे 3.30 पर्यंत जागे होते. ते नुसते जागे नव्हते, तर जागृत सद्सद् विवेकबुद्धीने घटनेने दिलेल्या कायद्याने न्यायदान करत होते. न्यायालयाचे न्यायाधीश होते, शाहरूख काथावाला. आदल्या दिवशी सकाळी 10 वाजता न्यायालयात हजर राहून दुसर्‍या दिवसाच्या पहाटे 3.30 पर्यंत न्यायनिवाडा करणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना सगळ्या जगाने गौरवले. जे मुंबई उच्च न्यायालयाच्या 156 वर्षाच्या इतिहासात घडले नव्हते, ते काथावालांनी अगदी सहजपणे करुन दाखवले. त्या दिवशी काथावालांनी चार-पाच नव्हे, तर तब्बल 135 खटले हाताळले. इतकेच नाही तर आदल्या रात्री 3.30 पर्यंत काम केले, म्हणून दुसर्‍या दिवशी त्यांनी रजा घेतली नाही, तर दुसर्‍या दिवशीही ते सकाळी 10 वाजता न्यायालयात पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी हजर झाले.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे एक प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे पद. न्यायालयाला उन्हाळ्याची सुटी असते. ती सुटी पडली की मग आपसुकच खटलेही रेंगाळतात. यामध्ये न्यायालयाकडे न्यायदानासाठी आशेने पाहणारे तक्रारदार मात्र पुन्हा न्यायदान लांबले म्हणून हवालदिल होतात. काही तक्रारी तर इतक्या गंभीर असतात की, त्यावर कुणाचे तरी भवितव्य अवलंबून असते. अशा तक्रारींचे काय? त्या तात्काळ सोडवल्या गेल्या पाहिजेत. न्यायाधीश काथावाला यांनी याच गोष्टीचा विचार करून उन्हाळ्याची सुटी पडण्याच्या आत रेंगाळलेली सर्व प्रकरणे तडीस नेली. या सर्व बाबींचा न्यायाच्या आणि त्याहीपेक्षा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करताना काथावाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक इतिहास घडवला, जो न्यायदानाच्या या पवित्र प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे.

उच्च न्यायालयाशी अन्य संबंधित सांगतात की, न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचे निवारण जलदगतीने व्हावे, म्हणून न्यायाधीश काथावाला कितीतरी वेळा मध्यरात्रीपर्यंत काम करत असत. त्यांच्यासोबत 20 क्रमांक रूमवरील सर्व मान्यवर कर्मचारीवर्गही कार्यरत होता. त्यामध्ये ‘बॉस’ काम करतोय म्हणून आम्हालाही नाईलाजाने काम करावे लागते, ही वृत्ती अजिबात नव्हती, तर आपले न्यायाधीश जर कामात इतके निष्ठावान असतील, इतक्या तळमळीने जर ते जनतेचा विचार करत असतील, तर आपणही या सत्कर्मामध्ये का सहभागी होऊ नये, हीच जाणीव कर्मचार्‍यांमध्ये होती. ‘कर्म म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजेच न्याय’ अशी संकल्पना आहे. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारे म्हणून न्यायाधीश शाहरूख काथावाला यांचे नाव सदैव इतिहासात घेतले जाईल.

- योगिता साळवी
@@AUTHORINFO_V1@@