मोहम्मद अली जिनांचा पुळका कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018   
Total Views |


देशाची फाळणी करणार्‍या मोहम्मद अली जिना यांचे चित्र इतकी वर्षे तेथे राहिले कसे ? ज्या माणसाने भारत खंडित केला, त्या माणसाबद्दल भारताचे नागरिक म्हणविणार्‍या या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या प्राध्यापकांना काहीच कसे वाटत नाही ? भारतात राहायचे आणि गोडवे पाकिस्तान निर्मात्याचे गायचे, हे आणखी किती काळ खपवून घेतले जाणार आहे? ही कीड वेळीच नष्ट न केल्याने तिने उग्र रूप धारण केल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी विचाराच्या मंडळींनी एखादी भूमिका घेतली की त्यास बेंबीच्या देठापासून विरोध करायचाच, असा निर्धार करून काही जण वागत असल्याचा प्रत्यय अधूनमधून येत असतोच. अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या सभागृहात विद्यमान असलेल्या पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांच्या चित्रावरून जो वाद निर्माण झाला आहे, त्यावरून त्याची पुन्हा प्रचिती आली. देशाच्या फाळणीस कारणीभूत असलेले मोहम्मद अली जिना यांचे चित्र सात दशकांपूर्वी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या सभागृहात लावण्यात आले आहे. देशाचे तुकडे करण्यास जबाबदार असलेल्या त्या व्यक्तीचे चित्र देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली तरी अजून तेथे कसे, असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडणे स्वाभाविक असले तरी काहींना तो मुळीच पडत नाही. जिनांच्या चित्रावरून जो वाद निर्माण झाला, त्यावरून अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना तर जिनांचा एकदम पुळका आला आहे. या चित्रास ज्यांनी आक्षेप घेतला, त्यांच्यावर फूट पाडण्यासाठी, ध्रुवीकरण करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

पण, नेमका हा वाद कसा काय निर्माण झाला ? भारतीय जनता पक्षाचे संसद सदस्य सतीश गौतम यांनी अलीकडेच अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सूर यांना पत्र लिहून, जिनांच्या चित्राबद्दल त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्या चित्राबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता. त्याच दरम्यान, ‘हिंदू युवा वाहिनी’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि चित्र हटविण्याच्या मागणीसाठी अलीगढ मुस्लीम विद्यापीठावर मोर्चा नेला. या मोर्चामुळे जिनांचा पुळका असलेले त्या विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापक खवळले. त्यांचे जिना प्रेम एकदम उफाळून आले आणि विद्यापीठात आलेल्या ‘हिंदू युवा वाहिनी’च्या कार्यकर्त्यांविरुद्ध त्यांनी आंदोलन चालू केले. त्यावेळी तेथील विद्यार्थी जिना यांच्या समर्थनाच्या घोषणा देत होते. यावेळी झालेल्या संघर्षात २८ विद्यार्थी आणि १३ पोलीस जखमी झाले. उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर, आपले खरे दात दाखविणारे हमीद अन्सारी एका कार्यक्रमासाठी त्या विद्यापीठात येणार होते, त्या आधी हा सगळा प्रकार घडला होता.

अलीगढ मुस्लीम विद्यापीठात घडलेल्या घटनेनंतर त्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तेथे कलम १४४ लावण्यात आले. विद्यापीठ परिसरात आलेल्या ‘हिंदू युवा वाहिनी’च्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे त्या विद्यापीठाच्या परीक्षा १२ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. खरे म्हणजे, जिना यांचे चित्र हटविण्याची मागणी करणार्‍यांच्या मागे सर्वांनी ठामपणे उभे राहायला हवे होते. पण, अलीगढ विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मात्र ते मान्य नाही. नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांचे जसे अफजल गुरुबद्दलचे प्रेम उफाळून आले होते, तशीच स्थिती आता अलीगढ मुस्लीम विद्यापीठात झाली आहे.

देशाची फाळणी करणार्‍या मोहम्मद अली जिना यांचे चित्र इतकी वर्षे तेथे राहिले कसे? ज्या माणसाने भारत खंडित केला, त्या माणसाबद्दल भारताचे नागरिक म्हणविणार्‍या या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या प्राध्यापकांना काहीच कसे वाटत नाही? भारतात राहायचे आणि गोडवे पाकिस्तान निर्मात्याचे गायचे, हे आणखी किती काळ खपवून घेतले जाणार आहे? ही कीड वेळीच नष्ट न केल्याने तिने उग्र रूप धारण केल्याचे दिसून येत आहे.

भाजप खासदार सतीश गौतम यांनी केलेले मागणी मुळीच चुकीची नाही. पण, अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ती चुकीची वाटते. जिना यांचे चित्र तेथे १९३८ पासून असताना आताच त्या चित्रास आक्षेप का घेतला जात आहे, असे काही मुस्लीम नेते विचारतात. पण, एखादी चूक उशिराने लक्षात आल्यावर ती दुरुस्त करण्याची मागणी केली गेल्यास त्याविरुद्ध एवढा आरडाओरडा कशासाठी? त्या मागणीला विरोध करण्यासाठी आंदोलने? आपण भारतात राहत आहोत, पाकिस्तानात नाही, हे सदर आंदोलक विसरून गेले की काय?

खासदार सतीश गौतम यांच्या या मागणी पाठोपाठ मुंबईमधील भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनीही मुंबईतील जिना हाऊस आणि जिना हॉल यांचे सांस्कृतिक केंद्रांमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी केली आहे. देशाची फाळणी करण्यास जबाबदार असलेले जिना या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. आता काहींनी जिना हे किती चांगले होते, हे सांगण्यास प्रारंभ केला आहे. जिनांनी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर ब्रिटिश सरकारने जो देशद्रोहाचा खटला गुदरला होता, त्यावेळी टिळकांचे वकीलपत्र घेतले होते. या माहितीस उजाळा देऊन जिना किती थोर होते, हे सांगण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी जिनांचा 1937 मध्ये बॉम्बे बार असोसिएशन सत्कार करण्याचा विचार करीत होती, अशी माहिती लोकांपुढे आणली. पण, देशाची फाळणी करण्याची घोडचूक ज्या व्यक्तीने केली त्याचे गोडवे गाऊन त्याने केलेल्या चुकांवर थोडेच पांघरूण घातले जाणार आहे?

मध्यंतरी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक, केरळमधील हिंदू समाजावर अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानाचा आपल्या भाषणात ‘टिपू सुलतान जी’ असा उल्लेख केल्याचे अनेकांना स्मरत असेल. टिपू सुलतान याचे एवढे प्रेम कशासाठी? जरा उघड्या डोळ्यांनी इतिहासाचे वाचन करा. केवळ मते हवीत म्हणून जुलूम करणार्‍या सुलतानास एकदम मखरात बसवू नका. जिनांच्या चित्रावरून वाद निर्माण झाला असतानाच तिकडे पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाची जयंती साजरी करण्यात आली, तर इकडे भारतात पाकिस्तानचा नेहमीच पुळका असणारे मणिशंकर अय्यर यांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठात असलेल्या जिनांच्या चित्राचे जोरदार समर्थन केले. पाकिस्तानमधील टिपू जयंती कार्यक्रम आणि लगेच दुसर्‍या दिवशी मणिशंकर अय्यर यांचे जिनांबद्दलचे वक्तव्य पाहता, काँग्रेस आणि पाकिस्तानमध्ये आश्चर्यकारक टेलीपथी असल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली. कर्नाटक वा गुजरातमधील निवडणुका असोत, काँग्रेस त्यात पाकिस्तानला का आणत आहे, असा प्रश्नही अमित शाह यांनी विचारला आहे. गुजरातमधील निवडणुकीच्यावेळी भाजपला पराभूत करण्याच्या हेतूसाठी पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत झालेल्या भोजन बैठका आणि आता टिपू आणि जिना यांचे उफाळून आलेले प्रेम! देशाच्या अंतर्गत राजकारणात विदेशी देशांना सहभागी करून घेऊ नका, असे आवाहनही अमित शाह यांनी काँग्रेसला केले आहे.

देश 1947 साली स्वतंत्र झाला. आता 2018 सालामध्ये या देशात काहींना जिना यांचा पुळका येतो, याला काय म्हणायचे? असली पिलावळ आणखी वाढण्याआधीच ती समूळ नष्ट करण्याची गरज आहे!


- दत्ता पंचवाघ
@@AUTHORINFO_V1@@