भारताची साधना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018   
Total Views |
 
रवींद्रनाथ आपल्या स्वदेशी समाज निबंधात लिहितात की, हिंदू-बौद्ध-मुस्लीम-ख्रिस्ती भारतीय भूमीत एकमेकांविरोधात लढून मरून जाणार नाहीत! येथे ते सौख्याने नांदायचे एक सामंजस्य शोधून काढतील. ते सामंजस्य अ हिंदू असणार नाही, ते विशेषभावे हिंदू असेल. त्यात हिंदुत्वाचा गंध दरवळेल. त्याचे अंग-प्रत्यंग इतर संस्कृतीतले असले तरी देखील त्यात आत्मा असेल तो भारतवर्षाचाच...
 
 
 
भारताचे हे सौभाग्य राहिले आहे की, जेव्हा जेव्हा याचा दिवा विझू लागला, वात मिणत गेली तेव्हा तेव्हा ती तेवत ठेवणारे महापुरुष या देशाला मिळत गेले. आंतरिक वादविवाद, कुप्रथा, जातीयता याने येथील समाज बेजार होत असताना, किंवा खोट्या मूल्यांचे बळ वाढत असताना, अथवा बाह्य आक्रमणांनी येथील समाज दुभांगण्याचा प्रयत्न होत असताना या देशाची आत्मज्योत तेवत ठेवणारे, समाजात पुन्हा प्राण फुंकून उभे करणारे या देशाला युगानुयुगे मिळत गेले. शतकानुशतके या देशावर जणू ईश्वराची कृपा राहिली आहे, त्याने कधीही या देशाला मृत होऊ दिले नाही.
 
 
उदाहरणार्थ आपल्या देशातील वाराणसी नगरी, या शहराची गणना जगातील प्राचीनतम शहरांमध्ये केली जाते. त्याच्या तोडीचे प्राचीन शहर शोधावयाचे असेल तर, आपल्याला इतिहासात खूप खोलवर जावे लागेल. ख्रिस्तपूर्व १८ व्या ते ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकापर्यंत असलेल्या बॅबिलोन राज्याची राजधानी निनेवेहसोबत वाराणसीच्या प्राचीनतेची तुलना केली जाऊ शकते. आज निनेवेह केवळ इतिहासाच्या अभ्यासाचा एक मुद्दा म्हणून शिल्लक राहिले आहे, तेव्हा वाराणसीत कालानुरूप बदल होऊन नवनवीन भरती होतच गेली आहे. प्रगौतिहासिक कालखंडानंतर इतिहासाची प्रथम किरणे भगवान तथागत गौतम बुद्धांमध्ये पाहायला मिळतात. त्यांनी देखील प्रज्ञा प्राप्तीनंतर आपली पाऊले सर्वप्रथम वाराणसीकडे वळवली होती. आद्य शंकराचार्यांची संस्कृत वाग्धरा, किंवा कबीर-तुलसीदासांचे दोहे या सर्वांनी वाराणसी नगरीत नवचैतन्य निर्माण केले आहे. एवढंच नव्हे तर आधुनिक इतिहासात देखील महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची पहिली भेट वाराणसीत घडली होती. गांधीजी यांनी जेव्हा आपले विचार विनोबांना सांगितले त्यानंतर त्यांच्यामनातून हिमालयात जाऊन संन्यास घेण्याचा विचार गळून पडला आणि भारताची अखंड सेवा करण्याचे नवअंकुर फुटले होते, त्यांनी भारताचे हृदय जाणले ते वाराणसीतच! वाराणसी नगरी हे तर येथील संस्कृतीचे एक प्रतिक आहे, जे या देशातील मृत्युंजय शिव-स्वरूप प्रकट करत असते.
 
 
भारताला आणि येथील संस्कृतीला चिर:तरुण ठेवणारे हे शिव-स्वरूप नेमके आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच! सर्वांच्या सुखाची कामना करणे हे याचे गूढ आहे, आणि जो सर्वांचे सुख इच्छितो त्यांचे अमंगल कधीही होत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. भारताने अनादिकाळापासून कुठल्याही देशावर स्वत:हून आक्रमण केले नाही, की कुण्या देशाला, धर्माला, जातीला नेस्तनाबूत करण्याचा मानस बाळगला नाही. भारताची साधना आहे ती विविधतेत एकता साधण्याची, विसंवादात संवाद साधण्याची. हा दृष्टांत देणारेच येथे महापुरुष ठरले आहेत. अशाच अनेक द्रष्ट्यापुरुषांचे स्मरण करताना आपल्याला नाव घेतले पाहिजे, कविवर्य रवींद्रनाथ टागोरांचे. महात्मा गांधीजींनी त्यांना 'द ग्रेट सेन्टीनल' अर्थात 'महान प्रहरी' म्हणून संबोधले होते. ते अनेक अर्थाने खरे आहे. आपण जेव्हा रूढीबद्ध प्रथांनी बरबटून जातो, किंवा बाहेरील आकर्षणाने स्वमुल्यांचा त्याग करू पाहतो, तेव्हा रवींद्रनाथ टागोरांची आठवण आल्यावाचून राहत नाही. त्यांचे 'स्वदेशी समाज' निबंधातील शब्द यात प्रेरक ठरतात.
 
 
"आपली बुद्धी, आपले हृदय, आपल्या आवडीनिवडी रोज पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे वाहत असतात. त्यांना रोखण्याचा एकमात्र उपाय आहे, तो म्हणजे आपण जे आहोत, जसे आहोत, तसे सज्ञातपणे, सबळपणे, स्थिरपणे, आणि संपूर्णपणे स्वत:ला ओळखून घेतले पाहिजे."
 
 
"विविधतेत एकतेची प्राप्ती, आणि अनेकतेत ऐक्याची स्थापना हाच तर भारताच्या अंतरमनात साचलेला खरा धर्म आहे. संपूर्ण भारतवर्ष विविधतेकडे विरोध म्हणून बघत नाही. केवळ आपल्याच लोकांचे नव्हे, तर परकीयांचे देखील येथे भरभरून स्वागतच होते. येथे परकीयांना शत्रू म्हणून पहिले जात नाही! म्हणूनच तर परित्याग केल्याशिवाय, विनाश केल्या शिवाय, एका विशाल व्यवस्थेत सर्वांना समान स्थान देण्यासाठी भारत नेहमी आग्रही असतो. आणि म्हणूनच सर्व जाती-पंथांचा येथे आदर केला जातो, प्रत्येकाचे महत्व येथे जाणून घेतले जाते, आणि त्यांना योग्य ते स्थान देखील येथे दिले जात असते."
 
 
"भारतवर्षात हा गुण आहे की, येथे कुठल्याही जाती-धर्माला शत्रू मानून, कुणालाही भयभीत केले गेले नाही. एखादे संकट जरी आले तरी देखील त्यातून सावरून जाऊन सर्वजण आपल्या विचारांच्या कक्षेच्या विस्ताराचीच अपेक्षा बाळगत असतात. हिंदू-बौद्ध-मुस्लीम-ख्रिस्ती भारतीय भूमीत एकमेकांविरोधात लढून मरून जाणार नाहीत! येथे ते सौख्याने नांदायचे एक सामंजस्य शोधून काढतील. ते सामंजस्य अ हिंदू असणार नाही, ते विशेषभावे हिंदू असेल. त्यात हिंदुत्वाचा गंध दरवळेल. त्याचे अंग-प्रत्यंग इतर संस्कृतीतले असले तरी देखील त्यात आत्मा असेल तो भारतवर्षाचाच..."
 
 
भारतीय संस्कृतीच्या गंगेतून भारतमातेचा अभिषेक करण्यासाठी एक अमृतमयी कुंभ भरावा लागेल, त्यासाठी कविवर्य रवींद्रनाथ टागोरांनी सर्वांना आमंत्रण देणाऱ्या काही ओळी 'भारततीर्थ' या काव्यात लिहिल्या आहेत.

एसो हे आर्य, एसो अनार्य, हिंदू मुसलमान,
एसो एसो आ आज तुमी इंग्राज, एसो एसो ख्रिस्तान,
एसो ब्राम्हण, शुची करी मन धरो हात सबाकार,
एसो हे पतित, करो अपनीत सब अपमान भार
मार अभिषेक एसो एसो त्वरा, मंगलघट हयनि ये भरा
सबार परशे पवित्रकरा तिर्थनीरे
एई भारतेर महा मानवेर सागरतीरे |
याचा अर्थ आहे की, हे आर्य या, हे अनार्य या, हिंदू मुस्लीम सगळे या, इंग्रजांनो आज तुम्ही पण या, ख्रिस्ती देखील या. ब्राम्हणांनो ! तुम्ही पवित्र मन करून सर्वांचा हात धरा. हे पतित, अपमानाचा भार काढून टाका. भारतमातेच्या अभिषेकासाठी सगळे लवकर या... भारताच्या विशाल मानव समुदायाच्या या काठावर सर्वांच्या स्पर्शाने पावन झालेला मंगलघट अजूनही संपूर्ण भरलेला नाही... तो भरण्यासाठी अवघे या..!!
 
 
रवींद्रनाथांनी लिहिलेल्या या महान काव्याहून अधिक उच्च भारतचं वर्णन अजून काय असू शकेल? कवितेत वर्णन केल्याप्रमाणे हा मंगलघट अजूनही पूर्ण भरलेला नाही, कदाचित तो आपल्या अर्घ्याची प्रतीक्षा करत असावा....!
 
 
अनुवाद
हर्षल कंसारा
(मूळ लेख मकरंद दवे लिखित
'सूर्यनी आमंत्रण पत्रिका' या गुजराती पुस्तकातील आहे. )
 
@@AUTHORINFO_V1@@