युनिट ७३१ समाप्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |




                                पिंगफँग मधील युनिट ७३१ ची इमारत                                         सर्जन जनरल शिरो ईशी

सर्जन जनरल शिरो ईशीच्या हाताखाली चाललेलं युनिट ७३१ हे महायुद्धाच्या शेवटापर्यंत कार्यरत होतं, याचं कारण त्याची प्रचंड गुप्तता. ३,००० च्या वर कैद्यांना अमानुषरित्या प्रयोग करून मारणाऱ्या या युनिटमध्ये महायुद्धाच्या शेवटी क्रूरतेला उधाण आलं. १९४५ साली या युनिटकडून "ऑपरेशन चेरी ब्लॉसम्स ऍट नाईट" चा प्रस्ताव आला. या ऑपरेशननुसार हार्बिनला आलेल्या ५०० नव्या तुकड्यांपैकी २० तुकड्या या प्रसिद्ध 'कामिकाझे' वैमानिकांच्या असून, त्यांना प्लेग-बाँब्स देऊन कॅलिफोर्नियावर हल्ला करायला लावणार होते, असं तोशिमी मिझोबुची, एक युनिट ७३१ चा मार्गदर्शक म्हणाला. ही विमाने सबमरीन्सच्या सहाय्याने दक्षिण कॅलिफोर्नियाला नेण्यात येणार होती. परंतु, अनेक कारणांनी 'ऑपरेशन चेरी ब्लॉसम्स ऍट नाईट' मान्य झालं नाही, एक कारण होतं की जनरल हिडेकी टोजोला जंतूप्रसारक युद्धनिती मान्य नव्हती, आणि तेंव्हा जपानवर अशी वेळ आली होती की त्याचं सैन्य हे जपानच्या सुरक्षेसाठी वापरणं गरजेचं होतं, ते अमेरिकेत पाठवणं अशक्य होतं. यामुळे ते ऑपरेशन रद्द झालं.

त्यातून जपान आणि जर्मनी महायुद्ध हरायला आले होते. ऑगस्ट १९४५ मध्ये जपानने शरणागती तयार केली होती, यामुळे 'लाल सैन्या'ला घाबरून शिरो ईशीने युनिट ७३१ ची कागदपत्रं जाळून टाकली, छावणीला स्फोटकं लावून उडवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु काही इमारती त्यातून अंशतः बचावल्या. अनेक अधिकारी बायकामुलांसकट जपानला पळून गेले. अनेकांना ईशीने पोटेशियम सायनाईडच्या गोळ्या दिल्या होत्या, पकडले गेले तर जिवंत पकडले जाऊ नये म्हणून! अमेरिकेन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मायक्रोबायोलॉजिस्ट) मरे सँडर्सला जपानी जंतूप्रसारक युद्धनितीच्या तपासासाठी नेमलं होतं. पकडलेल्या काही लोकांकडून त्याने युनिट ७३१ ची माहिती उकळली आणि तेंव्हा अमेरिकेन सैन्याच्या जनरल डग्लस मॅकार्थर उर्फ 'गाईजिन शोगन'ने जपान्यांसोबत एक 'मांडवली' केली. अमेरिकेसाठी जंतूप्रसारक युद्धनितीच्या अथपासून इतिपर्यंत माहितीच्या बदल्यात युनिट ७३१ च्या गुन्हेगारांना अभय! आणि हेच युनिट ७३१ च्या गुप्ततेमागचं सगळ्यात मोठं कारण ठरलं! "अमेरिकेने मिळालेल्या आयत्या माहितीच्या बदल्यात कोणावरच खटला भरला नाही, इतकंच नाही तर अनेकांना मानधनही दिलं" असं अमेरिकेन इतिहासतज्ञ शेल्डन हॅरीस म्हणतात.

जपानी सरकारनेही आपल्या जनतेला याचा सुगावा लागू दिला नाही. अनेक नराधमांना 'राष्ट्रपुरुष' म्हणवून त्यांचं सर्रास उदात्तीकरण सुरू केलं. इतिहास अभ्यासक साबुरो लेनागा यांनी माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमासाठी पाठवलेली नानजिंग कत्तलीवरची आणि युनिट ७३१ वरची हस्तलिखितं जपानी शिक्षण मंत्रालयाने सरळ नाकारली, "युनिट ७३१ बद्दल लिहील्यास पुस्तक छापलं जाणार नाही" असंही सांगितलं गेलं. या प्रकाराने चिडून जाऊन लेनागा यांनी शिक्षण खात्यावर खटला भरला, तो खटला ते जिंकले असावे, कारण पुढे जाऊन अभ्यासक्रमात युनिट ७३१ चा अंशतः का होईना, उल्लेख आला. महायुद्ध संपल्याच्या ५० वर्षांनंतरही जपानी सरकार आपल्या पाशवी कृत्यांची जबाबदारी घ्यायला नाकबूल होतं, आता कुठे हळूहळू एकेक गोष्टी मान्य करायला त्या सरकारने सुरुवात केली आहे.

या सगळ्या सावळ्या गोंधळात, अमेरिकेने जरी अभय दिलं असलं, तरी सोव्हिएत युनियनने या कारवायांमध्ये हात असलेल्या अनेकांचे खटले चालू ठेवले होते. आणि युनिट ७३१, युनिट १६४४ व युनिट १०० मधल्या १२ उच्चपदस्थ सैन्याधिकारी व शास्त्रज्ञांना २५ वर्षांपर्यंत सर्बियन लेबर कँपमध्ये पाठवण्याच्या शिक्षा ठोठावल्या गेल्या. डिसेंबर १९४९ ची ही सुनावणी 'खाबारोव्हस्क' येथे झाली. परंतु, दुर्दैवाने पुराव्याअभावी आणि अमेरिकेच्या अभयामुळे या सगळ्यांचा पुढारी जनरल शिरो ईशी हा सुखरुप सुटला होता, तो १९५९ मध्ये कर्करोगाने मेला. त्याच्यासोबत असलेले अनेक अधिकारीही सुखरूप सुटले, नुसते सुटले नाहीत, तर जपानमध्ये जाऊन 'टोकियोचे राज्यपाल', 'जपान वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष' अशा पदांवरही जाऊन बसले. गुन्हेगारांना सत्ता हा प्रकार केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता!
अशाप्रकारे जवळपास एक दशक चाललेल्या या नरकाचा शेवट हा त्याच्या गुन्ह्यांच्या मानाने फारच सुखकर झाला. या भीषणतेविषयी संशोधन तुलनात्मकदृष्ट्या नुकतंच सुरू झाल्याने मतभेद अनेक आहेत. परंतु एक नक्की आहे; सत्तेच्या लालसेपोटी असंख्य लोक अमानुषरित्या मारले गेले आणि त्यांना मारणारे थंड रक्ताचे खुनी हे सुखरूप सुटून सर्वसाधारण आयुष्य जगू शकले. न्याय मिळाला त्या मृतातम्यांना ? त्या १२ जणांमुळे ? मुळीच नाही ! आणि अमेरिकेच्या कृपाशिर्वादाने आता तो कधीच मिळणं शक्य नाही. ही भेकड जपानी सरकारची हार, त्या देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी हार आहे, महायुद्धाच्या पराभवापेक्षाही मोठी!
 
समाप्त
- शुभंकर सुशील अत्रे
@@AUTHORINFO_V1@@