दररोज ७५ रुपये शेअर बाजारात गुंतवा, वीस वर्षात ३४ लाख कमवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

शेअर बाजार ‘सट्टा’ असल्याची होते‘थट्टा!’
प्रतिदिन ७५ रु. हे मल्टी प्लेक्स तिकिटाच्या रकमेपेक्षाही कमी!

 
 
खात्रीचा चक्रवाढ परतावा प्रतिवर्ष सरासरी १५ टक्के
गुंतवणुकीसाठी ‘भरती-ओहोटी’चा नियम
आपल्या देशात अनेक लोक शेअर बाजारात पैसे गुंतवण्या पासून दूर राहणे पसंत करतात. शेअर बाजार म्हणजे ‘सट्टा’ असल्याची ‘थट्टा’ केली जात असते. शेअर बाजार म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीपासून उत्पन्न मिळविण्याचा एक स्त्रोत असला तरी देशातील लाखो कुटुंबे ते स्वीकारण्यास तयार नाहीत. वस्तुत: भारतीय शेअर बाजाराने गेल्या दशकभरात इतर कुठल्याही गुंतवणुकीच्या तुलनेत सवोत्कृष्ट परतावा (रिटर्न) मिळवून दिला आहे. तरीही यादृष्टिने देशातील लोकां ची मानसिकता तयारच होत नाही 
 
लोकांना बाजारातून अगदी खात्रीचा परतावा (ऍश्युअर्ड रिटर्न्स)हवा असतो. त्यांना वाटते की त्यांच्याकडे बाजारात व्यवहार/गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान नाही. अनेकांना तर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे भांडवलच त्यांच्याकडे नाही. बाजारातून अपेक्षित परतावा मिळण्याची अपेक्षा करणे म्हणजे राहूल द्रविडने एखाद्या कसोटी सामन्यात एकामागोमाग षटकार मारीत राहण्यासारखेच होय! आपणास माहित आहेच की, राहूल द्रविड षटकार बहाद्दर नसून किल्ला लढविणे व शांतपणे खेळत राहणे पसंत करणारा आहे. याचप्रमाणे बाजारही तुम्हाला हवा असलेला खात्रीचा परतावा अल्पांवधीत देऊ शकणार नाही. पण तुम्ही थोडा जास्त वेळ दिला तर अल्पावधीत बाजारात येणारे चढउतार पचविल्यानंतर तो तुम्हाला काही प्रमाणात तरी परतावा देऊ शकेल अशी अपेक्षा करता येते.
ज्ञानाचा अभाव समजून घेता येतो. तसेच तो मुद्दा सोडविताही येतो. जर कुणाला आज (वर्तमानकाळात) गुंतवणूक करुन तिची फळे उद्या(भविष्यकाळात) चाखायची इच्छा असेल तर त्याला खूपच मेहनत आज करावी लागेल. यादृष्टिने एक उदाहरण घेऊ या.
समजा तुम्ही पंचविशीत असून तुम्हाला दरमहा २० ते २५ हजार रुपये वेतन मिळते. तुम्ही मनसोक्त खर्च करीत असाल तर तुम्हाला एक सल्ला देता येईल. तुम्हाला फार काही बचत करायची नसली तरीही दररोज फक्त ७५ रुपयांप्रमाणे गुंतवणूक केली तरी तिचा प्रचंड परतावा भविष्यकाळात तुम्हाला मिळू शकतो.
 
 
हा पैसा इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतविला गेला तर आतापर्यंतच्या म्युच्युअल फंडांच्या इतिहासानुसार प्रतिवर्षी सरासरी १५ टक्के परतावा (बाजारातील तेजी-मंदीचे चढउतार हिशेबात धरुन) मिळतो असे गृहित धरले तर २० वर्षांच्या अखेरीस आपणाला कल्पना केली नसेल एवढी प्रचंड रक्कम मिळू शकते.
 
 
यावर काही जण असा हिशेब करतील की, प्रतिदिन ७५ रुपयेप्रमाणे दर महिन्यास २२५० रुपये जमा होतात. त्यांना गुणिले १२ महिने व गुणिले २० वर्षे याप्रमाणे ५ लाख ४० हजार रुपये जमा होतील. त्यावर १५ टक्के खात्रीचा परतावा धरुन एकूण रक्कम ९ लाख रुपये किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त होऊ शकते.
 
 
पण प्रत्यक्षात बाजारात प्रतिवर्षी एवढाच परतावा मिळेल असेही नाही. तसेच एखाद्या वर्षभरात अगदी थोेड्या परताव्यावरही समाधान मानण्याची वेळ येईल किंवा अजिबात मोबदलाही मिळणार नाही. पण अनेक वर्षांचा काळ गेल्यानंतर मिळणारा सरासरी १५ टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त परतावा मिळणे शक्य असते. पण तेवढाही धीर देशातील गुंतवणूकदारांना निघत नाही.
 
 
तरीही प्रतिवर्षी सरासरी १५ टक्के परतावा हा चक्रवाढ व्याज पद्धतीने मिळत असतो असे गृहित धरल्यास प्रतिदिन ७५ रुपये गुंतविल्यास वीस वर्षांच्या काळात आपल्याला मिळणारी रक्कम थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३३ लाख ६८ हजार ७८९ रुपये इतकी मोठी असेल! ७५ रुपये ही रक्कम एखाद्या मल्टीप्लेक्सच्या तिकिटाला लागणार्‍या रकमेपेक्षा कमीच असली तरी ती गुंतवून आपल्याला केवढा पैसा कमावता येतो हे आपल्या लक्षात आले असेलच!
 
 
शेअर बाजारात नेहमीच चढउतार होत असतात. त्यामुळे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. ‘कभी खुशी कभी गम’ असा प्रकार दररोजच घडत असतो. म्हणून वारंवार व्यवहार करण्यापेक्षा ज्यावेळी शेअर बाजार खाली येईल त्यावेळी गुंतवणूक करणे हिताचे असते. याच स्तंभात पूर्वी वर्णन केलेला ‘भरती ओहोटी’ चा नियम ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे.‘ओहोटी’(मंदी)च्यावेळी शेअररुपी मासे पकडून ‘भरती’(तेजी)च्या वेळी ते किनार्‍यावर (बाजारात) आणून व विकून चांगला नफा कमावता येतो.
 
नॅशनल पेन्शन स्कीममधून पैसे काढण्याच्या नियमात शिथिलता
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजने(एनपीएस)मधून पैसे काढण्याच्या नियमात शिथिलता आणण्यात आली आहे. आता मुलांचे शिक्षण किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी एनपीएसच्या निधी(फंडा)तून ५० टक्के रक्कम काढता येणार आहे. तसेच आपल्या मर्जीनुसार शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठीची मर्यादा ५० टक्क्यांवरुन वाढवून ७५ टक्के इतकी करण्यात आली आहे. पण ही सवलत ५० वर्षाखालील गुंतवणुकदारांनाच मिळणार आहे. सध्याच्या नियमानुसार फंडातून २५ टक्के रक्कम काढता येत असते.
 
@@AUTHORINFO_V1@@