नक्षल्यांचा नायनाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |



आजवर नक्षलवाद्यांनी ताकदीच्या बळावर वनवासी आणि ग्रामीण भागातील, दुर्गम प्रदेशातील गावकर्‍यांचा आवाज दाबून ठेवला, पण त्यांनीच आता नक्षलवाद्यांना संपविण्याची भाषा केली, यामागेही निश्‍चित अशी कारणे आहेत. वनवासी बांधवांची ही भूमिका नक्कीच स्वागतार्ह असून नक्षलमुक्तीच्या दिशेने हे पुढचे पाऊल ठरेल, एवढे नक्की.

गडचिरोली आणि जवळपासच्या जंगलात गेल्या महिन्यात पोलिसांनी 45 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने खवळलेल्या नक्षलवाद्यांनी त्याचा बदला घेण्याचे ठरवले. गडचिरोलीतील जंगल प्रदेशात तशा अर्थाचे फलक, पोस्टर व बॅनर लावून त्यांनी तसे संकेतही दिले. एकीकडे नक्षलवाद्यांनी आपल्या चळवळीतील म्होरक्यांच्या हत्यांचा बदला घेण्याचे ठरवले असतानाच आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या ताकद आणि भीतीच्या सावटाखाली जीवन कंठत आलेल्या वनवासी समाजाने आता नक्षलवाद्यांना थेट गोळ्या घालण्याचीच मागणी केली. नक्षल प्रदेशातील सर्वसामान्य जनतेची ही मागणी नक्कीच विचार करायला लावणारी.


ज्या वनवासी बांधवांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या उत्थानासाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढणारी आपली चळवळ असल्याचे सांगत नक्षलवाद्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला, त्याच वनवासी, गिरीवासी जनांनी नक्षलवाद्यांच्या नायनाटाची मागणी करावी, हा जसा नक्षल चळवळीचा पराभव तसाच प्रशासन आणि लोकशाही प्रणालीचा विजयच. आजवर नक्षलवाद्यांनी ताकदीच्या बळावर वनवासी आणि ग्रामीण भागातील, दुर्गम प्रदेशातील गावकर्‍यांचा आवाज दाबून ठेवला, पण त्यांनीच आता नक्षलवाद्यांना संपविण्याची भाषा केली, यामागेही निश्‍चित अशी कारणे आहेत. आम्ही आदिवासींच्या मानसन्मान आणि अधिकारासाठी सरकारशी लढाई करीत आहोत. आम्हाला सामाजिक-आर्थिक समता प्रस्थापित करायची आहे. शोषणमुक्त समाज हे आमचे स्वप्न आहे, असा प्रचार सामूहिक कत्तली आणि हिंसाचार घडविणार्‍या नक्षलवाद्यांनी गेली चाळीस वर्षे सातत्याने केला. नक्षलवाद्यांचा हा प्रचार खरे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशाच प्रकारचा होता. पोलीस चौक्यांवर हल्ला करणे, निरपराध वनवासींच्या कत्तली करणे, त्यांच्या वाड्या -वस्त्या जाळणे, सरकारी कार्यालयांची जाळपोळ करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर अचानक हल्ले करून त्यांना ठार मारणे, हाच नक्षल्यांचा खरा चेहरा होता आणि आहे. अशा शेकडो घटना ज्याला रेड कॉरिडॉर म्हणतात, त्या छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, महाराष्ट्र, आंध प्रदेश या राज्यात घडल्या.

नक्षलवादाचा प्रचार करणारे काही गट वनवासींच्या गावात वारंवार जाऊन आपणच वनवासींचे मुक्तीदाते असल्याचा दावाही करतात. वनवासी तरुण आणि तरुणी त्यांच्या प्रचाराने प्रभावितही होतात. नक्षलवाद्यांच्या टोळ्यात काही वनवासी तरुण-तरुणी सामीलही होतात. पण प्रत्यक्षात या टोळीत गेल्यावर मात्र वनवासी तरुणींचा प्रचंड छळ होतो. त्यांना अनेक नक्षलवादी आपल्या वासनांची शिकार बनवतात. त्यांच्यावर सर्रास बलात्कार केले जातात. त्यांची वाच्यता केल्यास जिवे मारण्याचीही धमकी दिली जाते. या तरुणींना कुठल्याही सन्मानाची-समतेची वागणूक दिली जात नाही. नक्षलवाद्यांच्या याच अमानुषपणामुळे त्यांनी जो वनवासीहिताचा बुरखा पांघरला होता, तो टराटरा फाटला गेल्याचे दिसते. अशा घटनांमुळेच वनवासी बांधवांचा नक्षलवाद्यांवरचा विश्‍वास उडून गेला. ज्यामुळे ते आता नक्षल्यांना संपविण्याची भाषा करत आहेत.

नक्षलवादी दरवर्षी बंद पाळतात, मात्र त्याने काहीच साध्य होत नाही. उलट नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. नक्षलवादी बंदुकीच्या धाकावर वनवासी बांधवांना हिंसा करण्यास बाध्य करतात. त्यामुळे अनेक विकासकामांचा खोळंबा होतो. हे आता वनवासींच्या लक्षात येऊ लागले आहे. तसेच पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप ठेवून नक्षलवाद्यांकडून गावातील निरपराध सामान्य नागरिकांच्या क्रूर हत्या करणे, ठेकेदारांकडून खंडणी वसूल करणे, लोकांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्यावर अत्याचार करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, वनवासी बांधवांना जबरीने नक्षल दलममध्ये भरती करून हिंसा घडवून आणणे इत्यादी कारणांमुळे वनवासी बांधवांच्या मनात नक्षल्यांविरुद्ध रोष निर्माण होऊ लागला. ज्याचे प्रत्यंतर आता वनवासी बांधवांकडून नक्षलवाद्यांचा विरोध करण्यात येत आहे.

दुसरीकडे नक्षलवादी स्वत:ला कम्युनिस्ट विचारांचे पाईक म्हणवतात. प्रत्यक्षात मात्र विकृतीने पछाडलेल्या नरपशूंसारखीच त्यांची कामगिरी असते. नक्षलवाद्यांच्या टोळ्या उद्योगपती, कारखानदार, व्यापारी, व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपयांच्या खंडण्या वसूल करतात. याच पैशातून नक्षलवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळवतात. आम्ही म्हणतो तोच कम्युनिझम आणि आम्ही करतो ती कृती, देशात कम्युनिस्ट क्रांती व्हावी यासाठीच, असाही नक्षलवाद्यांचा प्रचार आहे. प्रत्यक्षात मात्र कम्युनिझम असो वा आताची नक्षलवादी चळवळ दोघांचेही मूळ रक्तरंजित क्रांतीचेच. हे आता वनवासी बांधवांना चांगलेच कळून चुकले आहे. त्यामुळेच त्यांनी आता नक्षलवाद्यांना संपवण्याची मागणी केली आहे. नक्षलवादाचा भेसूर चेहरा जसा वनवासी भागात दिसतो, तसाच तो शहरी भागातही बुद्धीजीवी, उदारमतवादी या नावाने वारताना दिसतो. हा शहरी नक्षलवादही महाराष्ट्रातल्या गेल्या काही महिन्यांतल्या घटनांवरुन पाहायला मिळाला. पण आता वनवासी बांधवांनीच जंगलातल्या नक्षल्यांना गोळ्या घालण्याचे म्हटल्याने या शहरी नक्षलवाद्यांची यावरची नेमकी भूमिका काय असेल, हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरेल.

नक्षलवाद्यांचे खरे स्वरूप उघडे पाडण्यासाठी शासनस्तरावरही गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. पोलीस व प्रशासन विविध दुर्गम भागात पोहोचून तेथील वनवासी बांधवांना विश्वासात घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून अंधारात असलेल्या गावांना विजेच्या माध्यमातून प्रकाश मिळाला आहे. अनेक दुर्गम भागात रस्ते व पूल बांधकामाला गती देण्यात आली आहे. पोलीस प्रशासन व शासनाकडून जनजागरण मेळावे व ग्रामभेटीच्या माध्यमातून गावकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सातबारा, रेशनकार्ड, वाहन परवाने, रोजगार प्रशिक्षण, शिक्षणासाठी मदत, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातच खोट्या आमिषाला बळी पडून आपले गाव सोडून नक्षल्यांना साथ देणारे तरुण-तरुणी शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. आत्तापर्यंत शेकडो भरकटलेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून लोकशाही प्रवाहात प्रवेश केल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. पोलीस व प्रशासनाच्या कामांमुळे आपल्या समस्यांची उत्तरे नक्षलवाद्यांकडून नव्हे तर लोकशाहीकडूनच मिळतील, यावर वनवासी बांधवांचा विश्‍वास बसू लागला आहे. ज्यामुळे आता ते नक्षलवादी चळवळीला धुडकावून थेट त्यांना नेस्तनाबूत करण्याची भाषा करत आहेत, हे स्वागतार्ह असून नक्षलमुक्तीच्या दिशेने हे पुढचे पाऊल ठरेल, एवढे नक्की.


@@AUTHORINFO_V1@@