रविंद्रनाथ टागोर नावाचा कॅलिडोस्कोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |



आज दीडशे वर्ष उलटून गेल्यावरही ज्यांचे विचार, काव्य, नाटके, कथा जुने वाटत नाही. नित्य नेमाने त्यांचे विषयी काहीही वाचले, अनुभवले की ते अगदी आजचे किंवा कधी कधी तर आजच्या काळाच्याही पुढचे भासते, त्या गुरुदेवांबद्दल माझ्यासारख्या पामराने काय बोलावे खरेतर!! पण आज असे वाटतेय की, त्या अफाट ब्रम्हांडातून जे काही चांदणे माझ्या छोट्या आकाशात मी अनुभवले त्याबद्दल बोलावे.
 
टागोर पहिल्यांदा भेटले ते शालेय वयात काबुलीवाला आणि डाकघरच्या नाट्य प्रयोगातून. मिनीचे निरागस मैत्री करणे आणि काबुलीवाल्याने तिला लावलेली माया; माणुसकीचा एक छोटा निर्झर माझ्या अंतकरणात प्रवाहीत करती झाले. तर डाकघर मधला अमल त्याचे ते आपला आजार विसरून खिडकीतून दिसणाऱ्या जगाशी संवाद साधणे, मुक्त स्वछंद आयुष्याची स्वप्ने पहाणे. ते मुलांच्या भावविश्वाचे सहज प्रकटीकरण त्या बालवयात सुद्धा खोल कोरले गेले आणि सहज, नकळत टागोरांविषयी एक आत्मियतेचे एक नाते तयार झाले.

दहावी झाले तेव्हा एका शालेय स्पर्धेत बक्षिस म्हणून पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले व्यंगचित्र मिळाले. वाचनाची प्रचंड आवड होती त्यामुळे सुट्टी लागताच वाचून काढले. त्यांनी गुरुदेवांच्या ओढीनेच शांतिनिकेतनमध्ये बंगाली शिकण्यासाठी घालवलेल्या दिवसांचे ते अतिशय सुरेख वर्णन वाचताना तर टागोर पदोपदी भेटत गेले नव्हे ते खोल खोल झिरपत गेले. त्या वयात माझ्या स्वभावानुसार जी मूल्ये, जे आदर्श मला हवेसे वाटत होते त्याला मूर्त रूप मिळाले ते टागोर वाचून. मग ते वेड, ते प्रेम उत्तरोत्तर वाढत गेले. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी लिहिलेले वाचणे, त्यावरील चित्रपट पहाणे ह्या गोष्टी आवर्जून होत गेल्या.

पु. ल. नी लिहिलेले रविंद्रनाथ: तीन व्याख्याने असो, की मामा वरेरकरांनी त्यांच्या एकवीस कथांचा केलेला “एक विशन्ती” हा अनुवाद असो, हिन्दीमध्ये मिळालेले गीतांजली आणि इतर कवितांचे अनुवाद असोत. गुरुदेव भेटत गेले आणि प्रत्येक वेळी त्यांच्या जादुई व्यक्तित्वाची अमिट छाप सोडत गेले. चारुलता (नष्ट नीड), मृणाल (स्त्रीर पत्र), मृण्मयी (समाप्ती), विनोदिनी (चोखेर बाली) ह्या आणि अश्या अनेक नायिका त्यांच्या साहित्यातून माझ्या स्त्री मनावर संस्कार करत्या झाल्या. स्त्रीचे सत्व, ममत्व, त्याग, परम्परांनी तिची केलेली घुसमट आणि त्यातूनही झळाळणारी तिची जीवनसक्ती, तिचा अवखळपणा याचे चित्रण जसे टागोरांनी केले तसे क्वचितच कुणा पुरुष साहित्यिकांनी केलेले मला आढळले आहे. त्यांच्या नायिका हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो इतके स्त्री मनाचे रंग त्यांनी रेखाटले आहेत.


अतिशय प्रश्न पडायचे वेळोवेळी, वाटायचे रोजच्या निसर्ग चक्रातले बदल दवबिन्दु टिपावेत इतका हळुवार टिपणारा हा भावुक कवी समाजातील पाखंडावर प्रभावी पणे वार करताना किती करारी भासतो. शांतिनिकेतन मध्ये वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करून एक प्रभावी तंत्र प्रत्यक्षात आणणारे गुरुदेव, श्री निकेतन मध्ये कृषि क्षेत्रात ही विज्ञान आणि पारंपरिक शेती व्यवसाय यांची सांगड घालून आपल्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांचे हाल कसे कमी होतील ह्या साठी अविश्रांत मेहनत घेत होते. देशोदेशी वैचारिक, शैक्षणिक देवाण घेवाणी साठी फिरताना हा विद्वान आपल्या देशातील गरीब अशिक्षित शेतकरी बांधवांसाठी पण ज्ञान आणि तंत्रज्ञान गोळा करीत होता. इंग्रज राजवटीमध्ये, श्रीमंत जमीनदार घराण्यातील ह्या राजपुत्राने आपल्या मुलाला बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला न पाठवता अमेरिकेत शेती तंत्रज्ञान शिकायला पाठवले. पद्मा नदीवर जमीनदारीची व्यावहारिक कामे करतानाच ते लोक जीवनात डोकावत होते आणि निसर्गाचे गीतही तन्मयतेने ऐकत होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी वाल्मिकी प्रतिभा हे नाटक लिहिताना त्यांनी त्यात पाश्चात्य लोक संगीत आणि अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत यांचा उत्तम मेळ साधला. त्यांची कविता एकीकडे निसर्गाचे हळुवार गोजिरे चित्र उभारते तर दुसरीकडे प्रेमाचे, मुक्तिचे आणि पर्यायाने जीवनाचे गहन भाष्य करते. ब्रिटिश जुलमी राजवटीवर कोरडे ओढताना, त्यांच्या हुकुमशाहीला विरोध करतानाच त्यांचे साहित्य, विज्ञान यांचा अभ्यास करण्यात ते मग्न होते. उत्तम संस्कृत आणि इंग्रजी साहित्य अनुवाद करताना ते मुलासाठी सहज पाठ लिहीत होते. मुलात मूल होऊन त्यांना घडवत होते वैद्यांनीक, आधुनिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करतानाच ते आपल्या प्राचीन संस्कृतीचा तिच्या महानतेचा प्रसार जगभर करतात. तर आपल्या तत्कालीन समाजबांधवांचे पाखंडी, कर्मठ धर्मवर्तन कसे चुकीचे आणि हास्यास्पद आहे हे ठासून मांडत होते. त्यात त्यांनी स्वत: अंगिकारलेल्या ब्राम्हो समाजालाही सोडले नाही. हे अद्भुत होते पण आश्चर्य कारक मुळीच नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार होता. माणुसकी, मुक्ति, कैवल्य आणि नवउन्मेष ह्या चार वेदांचे आचरण त्यांनी आयुष्य भर केले. ‘जे जे उत्तम, उददात्त, उन्नत, मह्न्मधुर ते ते’ आत्मसात करत, आणि भरभरून देता देता हा आनंदयात्री वाटचाल करत गेला. त्यांनी चित्रे काढली, गीते लिहिली, नृत्य केले, नाटक केले, ते गाईले त्यांनी वादन केले. त्यांनी निबंध लिहिले आणि पत्रे पण. आयुष्याचे कुठलेही अंग त्यांनी अस्पर्श ठेवले नाही. टागोर नावाचा कॅलिडोस्कोप तुमच्या हाती लागला की तुम्हाला वेड लागावे इतकी असंख्य चित्रे ते आपल्याला दाखवतात. ती अनुभवताना आणि त्यानंतरही ती चित्रे तुमच्या अंतर्मनावर आपला ठसा उमटवतात तो कायमचाच!!

- दीपा वाकडे
@@AUTHORINFO_V1@@