अलीगढचा विवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018   
Total Views |


कुठलाही समाज वा देश अभिमानाच्या पायावर उभा राहात असतो. अस्मिता, अभिमान, गर्व या गोष्टीच एखाद्या समाजाला वा राष्ट्राला आपल्या अस्तित्वाची ओळख देत असतात. त्या ओळखीची प्रतिके तयार होत असतात आणि तो समाज वा राष्ट्र जमीनदोस्त करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ती प्रतिकेच नष्ट करायची असतात.

जगाच्या इतिहासात मोहम्मद अली जिना यांचे स्थान काय ? तर त्यांनी एका खंडप्राय देशाची फाळणी करण्याचा अट्टहास केला. जिना नसते तर ‘हिंदुस्तान’ नावाच्या देशाची फाळणी झाली नसती, की आज भारत-पाक नावाचा रक्तरंजित संघर्ष सतत पेटत राहिला नसता. अशा व्यक्तीचे छायाचित्र भारतातल्या कुठल्याही विद्यापीठात सन्मानाने लावण्याचे काहीही प्रयोजन नाही. पण, केंद्रीय विद्यापीठ मानल्या जाणार्‍या अलीगढ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात त्यांची एक तसबीर लावलेली आहे आणि ती हटवण्यावरून वादंग पेटला आहे. स्थानिक लोकसभा सदस्याने ते चित्र हटवण्याची मागणी एक पत्र लिहून केली आणि विद्यापीठातील एका विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी धुमाकुळ घालून त्यासाठी आंदोलन पुकारलेले आहे. त्यातून जी बाचाबाची झाली, त्यावर पोलीस कारवाई व्हावी म्हणून अधिकृत संघटनेने धरण्याचा तमाशा आरंभलेला आहे. एकूणच सरकारी अनुदानावर चाललेल्या विद्यापीठाची ही अवस्था आहे. देशातल्या अशा बहुतांश विद्यापीठात शिक्षणापेक्षा राजकीय हाणामार्‍या होण्यामुळे त्यांची ख्याती झालेली आहे. बाकीचे मुद्दे बाजूला ठेवले तरी देशाच्या मुळावर आलेल्या व्यक्तीचा असा सन्मान राखला जावा किंवा नाही, हा मुद्दा विसरता येत नाही. अशा विषयात कुठल्या निकषावर निर्णय घ्यायचे असतात? मुळातच देशाची फाळणी होऊन सात दशके उलटून जाईपर्यंत जिनांचे छायाचित्र तिथे असावेच कशाला? ‘देश’ म्हणून जी काही पायाभूत प्रतिके-भूमिका असतात, त्याला धक्का देणार्‍या सर्व गोष्टी वेळीच हटवल्या गेल्या पाहिजेत. पण, एकूणच ‘देश’, ‘राष्ट्र’, ‘राष्ट्रीय समाज’ याविषयी जो बौद्धिक भोंगळपणा सत्तर वर्षे जपला-जोपासला गेला, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. विचारांची व भूमिकांची गफलत करण्यालाच प्राधान्य मिळत गेल्याचा हा विपरीत परिणाम आहे.

आता असा एक युक्तिवाद केला जात आहे की, या विद्यापीठाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून आरंभापासूनच जिनांचे छायाचित्र त्या कार्यालयात लावण्यात आले होते. वाद उगाच उकरून काढण्यात आला आहे. मुद्दा असा की, देशाची फाळणी जिनांमुळे झालेली असेल, तर तेव्हाच देशाच्या कानाकोपर्‍यात असलेली त्यांची सर्व स्मारके व तत्सम गोष्टी पुसून टाकायला हव्या होत्या. कुठल्याही युक्तिवाद वा निमित्ताने त्याची जोपासना होण्याला जागा शिल्लक ठेवण्याचे काही कारण नाही. पण, ‘उदारमतवादाचे नाटक’ ही भारताची स्वातंत्र्योत्तर मोठी राष्ट्रीय समस्या बनून गेलेली होती. ज्यांनी या देशाच्या हिंदू समाजाचे नेतृत्व पत्करले होते, त्यांनीच हिंदू समाजाला वार्‍यावर सोडलेले होते आणि आपण धर्मासाठी वा हिंदूंसाठी बांधील नसल्याची भूमिका घेतलेली होती. त्यामुळे अशा विकृती टिकून राहू शकल्या, त्याच्याच परिणामी मग राष्ट्रीय मानसिकता रुजवली जाण्यापेक्षा स्वातंत्र्यपूर्व मनोवृत्ती अधिक जोपासली गेली. अलीगढ तर जुने विद्यापीठ आहे. नेहरू विद्यापीठ नंतरचे आहे. पण, तिथे तर देशद्रोही प्रवृत्तीलाच खतपाणी घालून रुजवण्याची शिकवण दिली गेली. काही महिन्यांपूर्वी त्याच नेहरू विद्यापीठात भारतीय लष्कराचे युद्धातील रणगाडे व विमाने प्रदर्शनासाठी ठेवण्याचा प्रस्ताव आलेला होता. त्याला विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांनी विरोध केला. ज्यांनी विरोध केला, तेच आता अलीगढच्या जिनांच्या चित्राचे समर्थन करताना दिसतील. ही प्रवृत्ती समजून घेतली पाहिजे. अशा लोकांना देश वगैरेशी कर्तव्य नसते. पण, त्या देश वा राष्ट्रामुळे मिळू शकणारे सर्व लाभ तेवढे मात्र हवे असतात. अनुदाने हवी असतात आणि सवलतीही पाहिजे असतात. पण, त्या मिळवून देणार्‍या समाजाशी कुठलीही बांधिलकी नको असते. जिनांच्या निमित्ताने पाकमध्ये उद्भवलेला वेगळा वाद आठवतो. तिथे काय झाले होते ?

आजही आपल्या देशात शहीद भगतसिंग मोठा कौतुकाचा विषय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला एक गाजलेला योद्धा म्हणून भगतसिंग यांचे नाव अभिमानानेच घेतले जाते. देशाच्या कानाकोपर्‍यात भगतसिंगांची स्मारके आहेत. त्यांच्या नावाच्या वास्तू, रस्ते वा संस्था आहेत. पण, जिथे या महान स्वातंत्र्य सैनिकाला जाहीरपणे फासावर लटकविण्यात आले, त्या चौकात त्याचे नामोनिशाण उरलेले नाही. देशासाठी म्हणजे भारतासाठीच नव्हे, तर पाकिस्तानसाठीही भगतसिंगांनी आत्मबलिदान केले होते. म्हणजेच, पाकिस्तानसाठीही हा योद्धा तितकाच महत्त्वाचा राष्ट्रपुरूष आहे. लाहोरच्या शादाब चौकात त्याला फाशी देण्यात आली. आज तिथे त्याची कुठलीही स्मृती नाही. काही वर्षांपूर्वी तिथल्या मूठभर लोकांनी त्यासाठी प्रयत्नही केले होते. त्या चौकाला भगतसिंगांचे नाव देण्याचाही प्रयत्न झाला होता. पण, तेथील उच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करून त्याला नकार दिला. स्वातंत्र्यासाठी जे प्रयास झाले, त्यातला भगतसिंगांचा प्रयत्न पाकिस्तानलाही लाभदायक ठरलेला होता. पण, त्याची पाकिस्तानात कोणाला तरी फिकीर आहे काय? महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाकिस्तानात जी भूमी गेली, तिथलाच हा भूमिपुत्र होता. पण, त्याची कुठलीही स्मृती जपलेली नाही. परंतु, इथे मात्र देशाचे तुकडे पाडणार्‍या जिनांचे कौतुक चालले आहे. मुंबईतील त्यांचे निवासस्थान असो वा अन्यत्र कुठे त्यांची छायाचित्रे असोत, अशा गोष्टी ‘ऐतिहासिक’ असल्याचे गुणगान आपल्याला ऐकावे लागत असते. उलट जिथे कुठे राष्ट्रीय अभिमान-स्वाभिमानाचा विषय येतो, तिथे राष्ट्रवादाची टवाळीही चालू असते. किती चमत्कारिक गोष्ट आहे ना? जिनांच्या कामाचा अभिमान बाळगण्याचे कौतुक आहे आणि देशाचा अभिमान बाळगणे मात्र हास्यास्पद आहे. हा कुठला शहाणपणा आपल्या माथी मारला जात असतो? कुठून ही विकृती बुद्धिवादी वर्गात शिरलेली आहे?

कुठलाही समाज वा देश अभिमानाच्या पायावर उभा राहात असतो. अस्मिता, अभिमान, गर्व या गोष्टीच एखाद्या समाजाला वा राष्ट्राला आपल्या अस्तित्वाची ओळख देत असतात. त्या ओळखीची प्रतिके तयार होत असतात आणि तो समाज वा राष्ट्र जमीनदोस्त करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ती प्रतीकेच नष्ट करायची असतात. पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत युनियन प्रदेशात दीर्घकाळ कम्युनिस्ट पक्षाची सत्ता राहिली. मग जेव्हा सोव्हिएत युनियन संपुष्टात आले, तेव्हा तिथे उभारलेले शेकडो लेनिनचे पुतळे जमीनदोस्त करण्यात आले. सोव्हिएत खाणाखुणा उद्ध्वस्त करण्याचे काम झाले. ती जुलूमाची प्रतीके होती, ती अपमानाची प्रतीके होती, अभिमानाचे खच्चीकरण करणारी प्रतीके नष्ट करावीच लागतात. मुंबईतही डझनावारी ब्रिटिश राज्यकर्त्यांचे पुतळे हटवले गेले आणि रस्ते, इमारतींची नावे बदलली गेली. आज ते जिवंत नाहीत की तेव्हाही हयात नव्हते. मग त्यांचा द्वेष म्हणून अशा कृती होत नाहीत, तर समाज ज्या अभिमानाच्या पायावर उभा राहातो आणि राष्ट्रनिर्मितीत आपले सर्वस्व झोकून देतो, त्याच्या त्या उदात्त भावनेला इजा करणार्‍या गोष्टी हटवाव्या लागतात. म्हणूनच स्वतंत्र भारतात फाळणीच्या जनकाला कुठलेही स्थान असू शकत नाही. ते आधीपासून असले तरी ते नष्ट करण्याला पर्याय नसतो. नवा इतिहास घडवण्यासाठी आधीचा पराभूत इतिहास पुसून टाकण्याला पर्याय नसतो. म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात अलीगढ विद्यापीठात काय होते व कधीपासून होते, या युक्तिवादाला अर्थ नाही. चूक जेव्हा केव्हा लक्षात येते, तेव्हा ती तात्काळ दुरूस्त करण्यातच शहाणपणा असतो. बाकीचे युक्तिवाद फसवे असतात. रोग जुना आहे, म्हणून तो जपायचा नसतो, तर अधिक घाईगर्दीने त्याचे निर्मूलन करणे अगत्याचे असते. त्यात जो कोणी आडवा येईल, त्याला म्हणूनच ‘समाजशत्रू’ समजण्यालाही पर्याय नसतो.



- भाऊ तोरसेकर
@@AUTHORINFO_V1@@