दिवंगत अरुण दाते यांना सर्व स्तरांतून श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2018
Total Views |

 
 
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. दाते यांच्या जाण्याने मराठी भावगीत सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. चित्रपट, नाट्य, राजकीय, क्रीडा, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे.
 
जगविख्यात गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी दाते यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अरुण दाते यांच्या वडिलांपासून मंगेशकर कुटुंबियांशी असलेले आपले कौटुंबिक संबंध विशद करून लतादीदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
 
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाते यांना आदरांजली वाहिली आहे. मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारे एक श्रेष्ठ भावगीत गायक आपल्यातून निघून गेले अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक दशके मराठी रसिकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या या गायकाला त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
 
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनीही अरुण दाते यांच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या निधनामुळे भावगीताचा तारा निखळला आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केँद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी देखील अरुण दाते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. थेट मनात डोकावणाऱ्या गायकीमुळे अरुण दाते संगीतातील शुक्रताराच होते. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रातील पोकळी अधिक गडद झाली अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
 
केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून दाते यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. मध्यप्रदेशातील काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी देखील दाते यांच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला आहे. दाते यांचा मधुर स्वर कायम कानात घुमत राहील असे सिंदिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
 
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरगंगेच्या काठावरून रसिकांना आनंद देणाऱ्या दाते साहेबांनी भावसंगीताची परंपरा खऱ्या अर्थाने पुढे नेली असे तावडे यांनी म्हटले आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्याचा मंत्रच जणू त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना दिला अशा शब्दांत तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
काँग्रसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही दाते यांना आदरांजली वाहिली आहे. आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा भावगीतातील शुक्रतारा हरपला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@