विधान परिषदेचे अवघड गणित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |




विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक २१ मे रोजी होत आहे. या निवडणुकीतील मतदार हे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडून आलेले सदस्य असतात. जिल्ह्यात सर्व पक्षांचे सदस्य निवडून आलेले आहेत. त्यात शिवसेना सर्वाधिक सदस्य असल्याने प्रथम, भाजप दुसर्‍या, राष्ट्रवादी तिसर्‍या तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र मतदार कितीही असले तरी एखाद्या पक्षाकडे जास्त मतदार दिसत असले म्हणून त्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, याची कोणतीही शाश्वती यात देता येत नाही. त्यामुळेच मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. आता राष्ट्रवादीचे नरेंद्र दराडे शिवसेनेत तर शिवसेनेचे शिवाजी सहाणे राष्ट्रवादीत आलेले आहेत. भाजपचे परवेज कोकणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. यामुळे विधान परिषदेचे गणित अवघड बनले आहे.


या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक शाखेने जाहीर केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील ६४४ मतदार २१ मे रोजी त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने गत २५ एप्रिल रोजी विधान परिषद मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती. या यादीवर सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार तीन सदस्यांनी नावात बदल करून घेण्याबाबत हरकती नोंदवल्या होत्या.


त्यामध्ये देवळा, मालेगाव व सटाणा येथील प्रत्येकी एका हरकतीचा समावेश होता. दरम्यान, या हरकती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी निर्णय घेत निकाली काढल्या. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार नाशिक व मालेगाव मनपाचे अनुक्रमे १२७ व ८९ सदस्य मतदानाचा हक्क बजावतील. तसेच जिल्हा परिषदेचे ७३ व जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे १५ सभापती यांनाही मतदान करता येणार आहे. ९ नगरपालिकांमधील २१८ सहा नगरपंचायतींमधील ११४ तसेच देवळाली कॅन्टोमेंटच्या ८ सदस्यांचा या यादीत समावेश आहे.


विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख तीन उमेदवारांनी आपली स्थावर व जंगम मालमत्ता जाहीर केली असून त्यात जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांनी सर्वाधिक 81 कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. त्याखालोखाल सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडे 51 कोटी तर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी 21 कोटी रुपयांची मालमत्ता दाखविली आहे. याशिवाय दराडे व सहाणे यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, कोकणी यांच्यावर मात्र कोणताही ठपका नाही. उमेदवारांनी नामांकन दाखल करतेवेळी आपली व आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्तेचा गोषवारा शपथेवर दाखल करण्याची तरतूद निवडणूक कायद्यातच आहे. त्यानुसार परवेज कोकणी यांच्या नावावर गोवर्धन, झारवड, सामुंडी, पिंपरी, तळेगाव, मखमलाबाद, नाशिक, वडाळा शिवार व त्र्यंबकेश्वर येथे शेतजमिनी असून, बॅँकेतील रोकड, सोन्या, चांदीचे दागिने व वाहने असे मिळून 2 कोटी 4 लाख 91 हजार 274 रुपये किंमत आहे. कुटुंबातील सदस्यांकडील मालमत्ता मिळून एकूण 81 कोटी 15 लाख 35 हजार इतकी मालमत्ता जाहीर केली आहे. तर नरेंद्र दराडे यांच्या नावे नाशिक, येवला, गोतसाई (कल्याण), मखमलाबाद, जळगाव नेऊर, कोटमगाव, निमगाव मढ या ठिकाणी जमिनी असून, बॅँकेतील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने व वाहनांची किंमत मिळून एकूण 51 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. शिवाजी सहाणे यांच्याकडे देवळाली शिवारातील घर, आगरटाकळी, चांदशी, नाशिक शिवार, दसक, कामटवाडे, चिंचोली शिवारात जमिनी असून, याशिवाय बॅँकेतील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असे सर्व मिळून 21 कोटी 64 लाख 31 हजार 287 रुपयांची मालमत्ता आहे.


अर्ज भरण्यापासून माघारीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत असून रिंगणात कोण कोण राहणार, त्यावर पुढील अंदाज बांधणे शक्य होऊ शकेल. अपक्ष आणि छोटे पक्ष ऐनवेळी कोणती भूमिका घेतात, यावरदेखील विजयाचे पारडे फिरू शकते. व्यक्तीशः मतदार कोणालाही मत देऊ शकतो. त्याच्या निर्णयावर त्यावेळची परिस्थिती अवलंबून आहे. शहरातील सामान्य नागरिकाची मात्र यात फक्त प्रेक्षकाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे काय होते ते पाहायचे इतकेच.


पक्ष आणि त्यांचे मतदार

शिवसेना २०७

भाजप १६७

राष्ट्रवादी १००

काँग्रेस ७१

मनसे ५

बसपा १

आरपीआय ५

एमआयएम ७

जनता दल ६

श.वि.आ १८

जनशक्ती पॅनल ५

माकप १३

अपक्ष ३८

- पद्माकर देशपांडे
@@AUTHORINFO_V1@@