व्यथा टिपणारी जपानी छायाचित्रकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018   
Total Views |

कुष्ठरोग्यांना भारतातच नाही तर जगभर दुय्यम, दुलर्क्षित आणि सर्वार्थाने दुर्दैेवी वागणुकीला सामोरे जावे लागते. एका जपानी छायाचित्रकाराने जगभरातील कुष्ठरोग्यांच्या याच भावना छायाचित्रांत कैद केल्या...

कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णांना त्यांच्या कुटुंबातूनच बहुतांशी वेळा अपमानास्पद वागणूक देऊन हद्दपार केले जाते. कारण, त्या एका आजारी-रोगी सदस्यामुळे संपूर्ण कुटुंबाला समाजाच्या उपेक्षित नजरांचा सामना करायची कदापि हिंमत नसते. मग अशावेळी कुटुंबीयांनीच धुडकावलेले हे कुष्ठरोगग्रस्त रस्त्याच्या एका कडेला वेदनांचे गाठोडे घेऊन कसेबसे जगण्यासाठी धडपडताना दिसतात. अशा या घरच्यांनीच टाकलेल्या कुष्ठरोग्यांना समाजाकडूनही भेदभावपूर्ण वागणुकीला सामोरे जावे लागते. कुष्ठरोगी म्हणून जीवन नकोसे झालेले काही बेजार मग हार मानून थेट या वेदनेतून कायम स्वरुपी मुक्त होतात, तर काही सामाजिक संस्थांच्या मदतीने एका नवीन आयुष्याचीही सुरुवात करतात. या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत ठरते ते कुष्ठरोगाविषयी घोर अज्ञान. मानवी स्पर्शातून हा रोग जडतो, अशा गैरसमजुतीतून कुष्ठरोग्यांना पशूसमान वागणूक दिली जाते. त्यांना हडतूड केले जाते. त्यांची अंगावर चुकूनही सावली पडू नये म्हणून सुरक्षित अंतर ठेवले जाते. पण, नाटसुको तोमिन्गा या ४९ वर्षीय छायाचित्रकाराने मात्र कुष्ठरोग्यांना कधीही अंतर दिले नाही. उलट, त्यांना आपलेसे करुन, त्यांची छायाचित्रे काढून त्यांनी ती जगासमोर आणली. उद्देश हाच की, जगाची कुष्ठरोग्यांकडे बघण्याची तिरस्कारपूर्ण आणि हीनतेची तुच्छ भावना कायमची संपुष्टात यावी.

‘द निपोन फाऊंडेशन’ या जगभरातील कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थेशी नाटसुको जोडल्या गेल्या. गेल्या १६ वर्षांपासून त्या विविध देशातील कुष्ठरोग्यांच्या वस्त्यांना भेटी देतात. कुष्ठरोग्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधतात. त्यांच्या समस्या, व्यथा जाणून घेतात. या रोगाविषयी आज त्या जनजागृती करतात. पण, जेव्हा नाटसुको यांनी कुष्ठरोग्यांच्या वस्त्यांना अशा भेटी देऊन छायाचित्रे काढण्याच्या प्रवासाला प्रारंभ केला, तेव्हा त्यांनाही कुष्ठरोगाविषयी फारशी माहिती नव्हती. त्यांच्याही मनात कुष्ठरोगाविषयी असेच अनेक अस्पर्शित गैरसमज घर करुन होते. पण, या भेटींमुळे, देशोदेशीच्या दौर्‍यांमुळे कालांतराने कुष्ठरोगाविषयी, कुष्ठरोग्यांविषयी वैद्यकीय माहितीबरोबरच त्यांच्या मानसिक-शारीरिक भावविश्‍वाचाही नाटसुकोंना थांग लागला आणि या कामासाठीच त्यांनी आपले अवघे आयुष्य समर्पित करुन घेतले. जे मी उघड्या डोळाने बघितले, ते किमान इतरांनी छायाचित्रांतून बघावे आणि कुष्ठरोगाविषयीच्या गैरसमजुती दूर व्हाव्ह्यात, हा त्यामागील त्यांचा उदात्त उद्देश...


त्यामुळे जसा एखादा लेखक लेखणीचा वापर करुन अस्वस्थतेच्या भावनांना वाट मोकळी करुन देतो, त्याच प्रकारे नाटसुको आपल्या छायाचित्रांतून कुष्ठरोग्यांच्या कळा जगासमोर आणतात. आजतागायत नाटसुकोने ५० पेक्षा जास्त देशांतील कुष्ठरोग्यांना भेटी दिल्या असून त्यांची कॅमेर्‍यात कैद केलेली छायाचित्रे प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर ठेवली आहेत. नाटसुकोंच्या या छायाचित्रांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रतिक्रियाही मानवीय असून अनेकांचा कुष्ठरोगाकडे बघण्याचा कलूषित दृष्टिकोन बदलल्याचे त्या सांगतात. नवी दिल्लीतही नुकतेच त्यांचे ‘अवर लाईव्ह्स’ हे भारतातील कुष्ठरोग्यांची जीवनशैली टिपणारे छायाचित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते, त्यालाही लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

कोणाला वाटेल केवळ भारतातच कुष्ठरोग्यांची अशी विदारक परिस्थिती आहे. पण, नाटसुकोच्या अनुभवांनुसारही इतरत्रही कमी-अधिक प्रमाणात कुष्ठरोग्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन रोगटच आहे. त्यातच दरवर्षी कुष्ठरोग्यांच्या संख्येत 60 टक्क्याने भर पडत असल्याचेही समोर आले आहे. तेव्हा, भारतातही अशाच उपेक्षित कुष्ठरोग्यांनीच एकत्र येऊन स्थापन केलेल्या अशा एकूण 800 वस्त्या आहेत. त्यापैकी चार वस्त्यांना नाटसुकोने भेटी दिल्या. तेथील परिस्थिती प्रत्यक्ष जाणून घेतली. तेही आपल्यासारखेच आहेत, माणूस म्हणून जगण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे, हाच संदेश नाटसुकोंनी आपल्या छायाचित्र प्रदर्शनातून उपस्थितांना दिला.
आफ्रिकेच्या दौर्‍यावर असताना कुष्ठरोग्यांचा असाच एक विचित्र अनुभव नाटसुकोंना आला. तेथील आदिवासींना सगळ्या खाण्या-पिण्याच्या वस्तू एकमेकांत वाटून घेण्याची सवय होती. त्यामुळे जेव्हा त्यांना कुष्ठरोगावर औषधोपचारासाठी गोळ्या दिल्या जायच्या, त्याही ते आपापसात तुकडे करुन वाटून घ्यायचे. त्यामुळे साहजिकच, त्या गोळ्यांचा कुष्ठरोग्यांवर कुठलाही परिणाम होत नव्हता. तेव्हा, आजच्या काळात कुष्ठरोग्यांना समजून घेण्याबरोबरच त्यांनाही या रोगाविषयी व्यवस्थित वैद्यकीय माहिती देण्याची, त्यांचे समुपदेशन करण्याची गरज असल्याचे नाटसुको आपल्या प्रत्येक छायाचित्र प्रदर्शनाच्या वेळी उपस्थितांना आवर्जून सांगतात.

तेव्हा, जगभरातील कुष्ठरोग्यांच्या व्यथा आपल्या कॅमेर्‍यात कैद करुन, त्या जगासमोर मांडणार्‍या अशा या अनोख्या जपानी छायाचित्रकाराला सलाम...
 
 
- विजय कुलकर्णी 
@@AUTHORINFO_V1@@