मुगाबे आणि झिम्बाब्वे क्रिकेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |






काही महिन्यांपूर्वी रॉबर्ट मुगाबे या झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षाला झिम्बाब्वे सैन्याने पदच्युत करून सत्ता हाती घेतली. खूप दिवसांनी रॉबर्ट मुगाबे हे नाव कानी पडलं. त्यापूर्वी प्रथमच हे नाव वाचलं होतं २००३ च्या वर्ल्डकप काळात. एक द्वेषाने भरलेला, लहरी सत्ताधीश अशीच त्याची ख्याती होती. स्वतः च्या गोऱ्या लोकांच्या द्वेषापायी त्याने संपूर्ण झिम्बाब्वे क्रिकेटची वाताहत केली.

नव्वदच्या शेवटच्या काळातील क्रिकेट ज्यांनी बघितलं असेल त्यांना झिम्बाब्वेचा क्रिकेटचा खेळ आठवेल. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य देशाच्या शेजारी राहून क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख केली होती. आठवतं, अजूनही अँडी फ्लॉवर व्यंकटेश प्रसादला सहज स्वीप मारून काऊ कॉर्नरपलीकडे फेकायचा. अंडी फ्लॉवर हा एकेकाळी भारतीय टीमचा अत्यंत डोकेदुखी ठरत होता. अँडी फ्लॉवर, झिम्बाब्वे टीमचा विकेटकिपर, अत्यंत गुणवान बॅट्समन, नेतृत्व करण्यात परिपूर्ण, समाजिक भान असलेला. कित्येकदा अँडी फ्लॉवर एकट्याने भारताची परिस्थितीत बिकट करायचा.


अँडी फ्लॉवरचा भाऊ ग्रँट फ्लॉवर. तो त्याच्या फिटनेस आणि स्वशिस्तीबाबत प्रसिद्ध होता. हेथ स्ट्रिक अहंकारी पण आक्रमक बॉलर कॅप्टन. ऍलिस्टर कॅम्पबेल अँडी ब्लिग्नॉट, अनेक गुणी खेळाडूंमुळे झिम्बाब्वेने क्रिकेटमध्ये कच्चा लिंबूपासून ते कसोटी क्रिकेट खेळणारा संघ हा प्रवास त्यांनी केला.

आज जे २०-२० आणि वन-डे क्रिकेटमधील, फास्ट बॉलरला किपरच्या डोक्यावरून मारणारे डेल स्कुप इम्प्रोवाइज्ड शॉट प्रसिद्ध आहेत, त्याची पहिली सुरवात २००० च्या काळात डगलस मॉरिअर या झिम्बाब्वेच्या बॅट्समनने केली होती. मॅकेग्रा, शॉन पॉलक, अनेक फास्ट बॉलर्सला तो सहज मारायचा. भारताविरुद्ध ही एका मॅचमध्ये त्यानेच झहीर खानला हाच शॉट्स मारून अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. त्यावेळी भारतीय टीम आणि प्रेक्षकसुद्धा अवाक आणि हवालदिल झाले होते. कारण असा शॉट मारला जाऊ शकतो हे तोवर भारतीय टीम आणि प्रेक्षकांनी बघितलंच नव्हतं.

भारतासाठी कधीही झिम्बाब्वे दौरे सोपे नव्हते. भारताला टेस्ट मॅचेसमध्येही त्यांनी हरवले होते. नियमितपणे बलाढ्य क्रिकेट टीम्स झिम्बाब्वे दौरे करायचे. हेन्री ओलांगा हा मस्तमौला कृष्णवर्णीय खेळाडू भारतात प्रसिद्ध झाला होता. मस्त हसमुख इनोसंट खेळाडू. सचिनने फटके देणं सुरू केले की चेहरा नाराज व्हायचा त्याचा पण निरागस होता. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये, सचिन तेंडुलकरच्या वडीलांचे निधन झाल्याने तो भारतात परत आला. आणि त्यावेळी भारतीय संघाचा झिम्बाब्वेविरुद्ध सामना झिम्बाब्वेने जिंकला होता. हे सगळ वरवर ठीक दिसत असलं तरीपण झिम्बाब्वे देशात मात्र एक कृष्णसर्प वंशभेदाच्या द्वेषात झिम्बाब्वे क्रिकेट गिळणकृत करत होता.

२००३ च्या वर्ल्डकपमध्ये मात्र पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर याची झलक दिसली. तो वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया या तीन देशांनी आयोजित केला  होता. यावेळी झिम्बाब्वेमध्ये ‘हरारे स्टेडियम’वर इंग्लंड आणि झिम्बाब्वेची मॅच होती. क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्यावर होतं. त्यावेळी मैदानात अँडी फ्लॉवर दंडावर काळा पट्टा बांधून उतरला होता. वीसेक ओव्हर्सपर्यंत कोणाला काहीही अंदाज नव्हता. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. झिम्बाब्वेच्या प्रेक्षकांनाही त्याचे आश्चर्य वाटत होते. त्यांनतर सगळ्यात मोठा धक्का म्हणजे, हेन्री ओलंगा या कृष्णवर्णीय खेळाडूनेही निषेधात्मक काळा पट्टा दंडावर बांधला होता. त्या मॅचपासून संपूर्ण जगाला, आफ्रिका खंडाच्या बाहेरील जगालाही रॉबर्ट मुगाबे या हिंसक प्रवृत्तीच्या शोषणाची माहिती कळली.

झाले असे होते, रॉबर्ट मुगाबे या कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षाने झिम्बाब्वेमध्ये गोऱ्या झिम्बाब्वियन नागरिकांचे सर्व प्रकारे शोषण करणं सुरू केलं होतं. त्यांनी गोऱ्या लोकांच्या शेतजमिनी बळजबरीने बळकावणे सुरू होते. गोऱ्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा नव्हती. सगळीकडे फक्त आणि फक्त कृष्णवर्णीयांचा दबाव होता आणि त्यामुळे झिम्बाब्वेमधील सामाजिक वातावरण बिघडले. सर्व जण असुरक्षित झाले होते. त्यामुळे क्रिकेट टीम्स तिथे खेळण्यास इच्छुक नसत आणि यामुळे अँडी फ्लॉवर या गौरवर्णीय खेळाडूने याविरुद्ध निषेध करण्याचा निर्णय घेतला. यासाठी वर्ल्डकपपेक्षा आणखी कुठलं व्यासपीठ योग्य असणार होतं! तो विश्वकपसुद्धा त्यांच्याच देशात होता. आणि म्हणून पहिल्या मॅचमध्ये अँडी फ्लॉवरने शांतपणे याच्या निषेधार्थ काळी पट्टी लावून खेळायचं ठरवलं. अँडी फ्लॉवरने त्याच्या या कृतीची कल्पना हेन्री ओलांगला कल्पना दिली होती. त्यापूर्वी फक्त त्याच्या भावाला ग्रॅंट फ्लॉवरलाच त्याची कल्पना होती. हेन्री ओलंगासुद्धा यासाठी तयार झाला. त्यानेही काळी पट्टी बांधून खेळण्याचा निर्णय घेतला. हिंसक, मग्रूर वर्णभेद करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या कारवायांचा निषेध एक गोरा आणि एक काळा माणूस सोबत मिळून करताय हा एक सुंदर संदेश जगात जाणार होता.





तेव्हा त्यांच्याकडे काळा आर्मबँड, पट्टी नव्हती. म्हणूम काळ्या रंगाची चिकटपट्टी लावून ते खेळले. अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलंगाने मॅच सुरू व्हायच्या आधी प्रेसमध्ये आपला संदेश दिला. तो एका विशिष्ट नावासाठी प्रसिद्धसुद्धा आहे. यात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. रॉबर्ट मुगाबेंकडून होणाऱ्या सततच्या शोषणामुळे, शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्यामुळे आम्ही शांतपणे याला निषेध म्हणून काळी पट्टी बांधून आजच्या मॅचमध्ये खेळणार आहोत. यानंतर मॅचमध्ये प्रेक्षकांपासून, अँपायर्स ते रॉबर्ट मुगाबेंना कळल्यावर सगळ्यांना याचा धक्का बसला. जगाला मुगाबेंच्या कृष्ण कारवायांबद्दल कळाले. त्या मॅचनंतर इंग्लंडच्या नासिर हुसेनने अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलंगाचे ऑन एअर कौतुक केले. सगळ्या पाश्चिमात्य जगातून, क्रिकेट जगतातून दोघांना पाठिंबा मिळाला. पण तिकडे रॉबर्ट मुगाबे त्यांचे कृत्य जगासमोर आल्याने मात्र पिसाळले होते. त्यांनी काही वर्षांपासून झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनवरही आपलं नियंत्रण मिळवायला सुरवात केली होती. त्यांनी झिम्बाब्वे क्रिकेटकरवी आपल्याच देशाच्या फ्लॉवर आणि हेन्रीवर कारवायी व्हावी यासाठी आय.सी.सी.कडे अर्ज केला होता. पण आय.सी.सी.ने त्यावर त्या खेळाडूंची ती वैयक्तिक प्रतिक्रिया आहे असे सांगून कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला. झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनकडून पुढच्या मॅचमध्ये दोघांनी असा निषेध करायचा नाही, म्हणुन दबाव आणण्यात आला. पण पुढच्या मॅचमध्येही ते दोघे काळीपट्टी बांधून आले. त्या मॅचमध्ये बरेच प्रेक्षकसुद्धा रॉबर्ट मुगाबेच्या निषेधार्थ काळी पट्टी बांधून आले होते. त्यानंतर हेन्री ओलंगाला वर्ल्डकपच्या इतर मॅचेसमधून टीममधून डावलण्यात आले. शेवटची एक लिग मॅच तो खेळला होता. कारण हेच होतं मुगाबेचा विरोध. त्यांचं संपूर्ण झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनवर संपूर्ण नियंत्रण होतं.

वर्ल्डकप सारख्या मोठ्या मालिकेत इंग्लंड संघाने झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेला रॉबर्ट मुगाबेचा हिंसाचार आणि शोषण याच्या विरोधात झिम्बाब्वेविरुद्ध मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला होता. वर्ल्डकप संपला. रॉबर्ट मुगाबेचचं नाव वर्तमानपत्रात येणे कमी झाले. पण तिकडे मुगाबेने अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलंगाचं जगणं कठीण केलं. दोघांनीही मुगाबेच्या जुलूमाला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण तेवढ्यावरही भागलं नाही. मुगाबे सरकारकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याने दोघांनाही देश सोडावा लागला. अँडी फ्लॉवर इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. अँडी फ्लॉवरने टीमचे कोचिंगही केले. हे सगळं तत्कालीन वर्तमानपतत्रात येत राहिलं. आजपर्यंत दोघे जणं झिम्बाब्वेला गेले नाहीत.

यातला अँडी फ्लॉवर हा मी बघितलेला सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. तो संपूर्णपणे परिपक्व फलंदाज होता. हेन्री ओलंगा तर अगदी तरुण नवोदित खेळाडू होता. पण दोघांचेही करिअर रॉबर्ट मुगाबेने संपवले. अँडी फ्लॉवर आणि नवोदित खेळाडू आणि भारतात खूप प्रसिद्ध आणि गंमतीचा विषय असलेला हेन्री ओलंगाचा विषय नेहमीसाठी संपला. पण मुगाबेंच्या काळ्या गोष्टी तिथेच संपल्या नाही. फ्लॉवर आणि ओलंगाच्या हकालपट्टीपासून झिम्बाब्वे क्रिकेटची अधोगती सुरू झाली.

मुद्दाम गौरवर्णीय खेळाडूंना डावलून कृष्णवर्णीय खेळाडूंना भरणा कारण्याचा त्यांचा सतत प्रयत्न होता. तोवर त्यांनी झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनवरही हुकूमत मिळवली होती. एक वर्षानी अचानक झिम्बाब्वेचा कॅप्टन (कदाचित हिथ स्ट्रिक नक्की आठवत नाही) ला पदच्युत करून त्याच्या जागी कृष्णवर्णीय “तातेंदा तायबू” या वीस वर्षांपेक्षाही छोट्या खेळाडूला, ज्याच्याकडे आंतरराष्ट्रीय खेळाचा कुठलाही मोठा अनुभव नव्हता, जो स्वतःच राष्ट्रीय संघात आपली जागा पक्की करण्यास झगडत असताना, झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा कर्णधार करण्यात आले. हा वर्णद्वेषातुन घेतलेला निर्णय होता. याविरोधात सर्व झिम्बाब्वे संघ उभा राहिला. मुगाबेने यावर निचपणाची हद्द करत त्या सर्व विरोधी संघाला काढून त्याजागी दुसरे खेळाडू आणले. ते बहुतेक सर्व कृष्णवर्णीय खेळाडू होते. क्रिकेट गुणवत्तेमध्ये ते सर्व दुय्यम खेळाडू होते. परिणामी झिम्बाब्वे क्रिकेट टीम पुढील वर्ष दोन वर्षे सर्व सामने हरत गेलं.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघावर अशी वेळ न येऊन मानहानी होऊ नये अशी वेळ त्यांच्यावर आली. झिम्बाब्वे क्रिकेटचा कसोटी दर्जा आयसीसीने काढून घेतला. काय वाटले असेल तेव्हा झिम्बाब्वे प्रेक्षकांना, निवृत्त ज्येष्ठ खेळाडूंना ! ज्यांनी मेहनत करून झिम्बाब्वे क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळवून दिला. ही सर्व अधोगती रॉबर्ट मुगाबे या सत्ताधीशाच्या द्वेषामुळे झाली.

मुगाबेने आंतरराष्ट्रीय पत्रकारांना झिम्बाब्वेमध्ये येऊन खेळाचे रिपोर्टिंग करण्यासही बंदी घातली. यामुळे झिम्बाब्वे देशाचे आणि क्रिकेटचे नाव आणखी खराब झाले. पुढे एक वर्षानी झिम्बाब्वे संघाची कसोटी सामन्यावरील बंदी काढण्यात आली. इतकं सगळं रामायण ज्याला कर्णधार बनवलं म्हणून घडलं तो तातेंदा तायबूनेही यानेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

त्यानंतर आधीच आयसीसीने ठरवलेल्या कार्यक्रमानुसार २००५ मध्ये न्यूझीलंड संघाने झिम्बाब्वेचा दौरा इच्छा नसताना केला. त्या दौऱ्यातही झिम्बाब्वे संघात नकारात्मक घडामोडी घडल्यात. गौरवर्णीय प्रशिक्षिकाला दौरा सुरू असताना काढून टाकण्यात आले. त्याच वर्षी भारतीय संघानेही झिम्बाब्वे दौरा केला. पण हा दौरा गाजला तो वेगळ्याच गोष्टीसाठी. यात कॅप्टन सौरव गांगुली आणि प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यातील मतभेद उघडकीस आले.

२० - २० वर्ल्डकप २००७ मध्ये झिम्बाब्वे संघाला पुन्हा नवी ऊर्जा मिळणारी गोष्ट घडली. या वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. पण तरीही झिम्बाब्वे संघ क्रिकेट जगतात रसातळाला गेला. कारण रॉबर्ट मुगाबेने केलेला सातत्याने हस्तक्षेप. आज झिम्बाब्वे देश अर्थिक, सामाजिक बाबतीतही रसातळाला गेला आहे. क्रिकेट असो वा कोणताही खेळ तिथे बहरला नाही. कदाचित पुढच्या वर्षीच्या वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वे संघ खेळू शकेल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. याचे कारण एक लहरी, वर्णद्वेषी माणसाने सत्तेचा दुरूपयोग करून आपल्याच देशातील खेळ संस्कृती बेचिराख करून टाकली.
 
 
- अभिजीत पानसे 
@@AUTHORINFO_V1@@