कामरगावांत भरते पाखरांची शाळा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |

 
- विद्यार्थ्यांचे चिवचिव मंडळ घेते काळजी!

आप्पा महाजन

कारंजा लाड,
‘पाखरांचीही शाळा भरे उंचावरी...’ ही एक गोजिरी कविसंकल्पना! मात्र जवळच असलेल्या कामरगावांत उन्हाळ्याच्या सुटीत खरोखरीच पाखरांची शाळा भरते. लहानग्या विद्यार्थ्यांचा चिवचिवाट संपल्यावर त्यांचेच ‘चिवचिवाट मंडळ’ त्याची काळजी घेते.
 
जिल्हा परिषद विद्यालयांत तब्बल एका तपापासून पाखरांसाठी अन्न व पाण्याचे छत्र सुरू अव्याहत सुरू आहे.
एक छोटीशी घटना याच्या मुळाशी आहे. या शाळेत गोपाल खाडे हे 2005 साली सहायक शिक्षक पदावर रुजू झाले. तहान आणि भुकेने मरून पडलेल्या पक्ष्यांची कलेवरे घेऊन विद्यार्थी खाडे सरांकडे आले आणि त्या दिवसापासून या उपक्रमाला सुरुवात झाली.
 
पक्ष्यांना पाणी पिण्यासाठीची भांडी व अन्नछत्र सुरू करण्याची कल्पना समोर आली. सुरुवातीला प्लॅस्टिकच्या बरण्या व बॉटल कापून त्यात पाणी ठेवण्यात आले. परंतु उन्हाळ्यामध्ये पाणी गरम होत असल्यामुळे खास मातीची भांडी लावण्यात आली. हळूहळू 22 प्रजातींचे पक्षी या पाणवठ्यावर यायला लागले... आता मात्र या पाखरांच्या शाळेची गटसंख्या शेकडोंच्या घरांत आहे.
नंतरच्या शिक्षकांनी पाखरांची उन्हाळी शाळा भरविण्याचा हा उपक्रम कायम ठेवला. मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांच्या नेतृत्वात ही शाळा सुरू झाली आहे. ज्वारी, तांदूळ, बाजरी यासारख्या धान्यांचा हजारो पक्षी पाहुणचार घेत आहेत. पक्षी बचाव या मोहिमेसाठी चिवचिव मंडळाची खास स्थापनासुद्धा करण्यात आली. संपूर्ण कामरगावात जागोजागी चिवचिव मंडळाच्या माध्यमातून पाण्याची भांडी व धान्याचे वाडगी जागोजागी लावण्यात आली. साळुंकी, लालबुड्या, बुलबुल, सुतार, सूर्यपक्षी, चिमण्या, कावळे, कोतवाल, भारद्वाज, दयाळ, भोर, यासारखे विविध पक्षी किलबिल करत असतात.
शाळेत बर्ड फीडर व घरटी कार्यशाळा घेण्यात आली. टाकाऊ वस्तूंपासून शेकडो बर्ड फीडर तयार करण्यात येऊन परिसरात टांगण्यात आले. इतर शाळांमधे जाऊनसुद्धा येथील विद्यार्थी व शिक्षक बर्ड फीडर व घरटी बनविण्याची कार्यशाळा घेतात. पक्षी संवर्धनासाठी पथनाट्यासारखे अनेक उपक्रम राबविणे सुरू केले. शालेय विद्यार्थ्यांचा काम करण्याचा उत्साह व पक्ष्यांविषयी गोडी वाढावी, कायम राहावी यासाठी शाळेत घरटी, चित्रकला, घोषवाक्य, फलक यासारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या उपक्रमासाठी वसंत चव्हाण, नीता तोडकर, प्रेमलता पारवे, संजीवनी सोळंके, निर्मला शेरेकर, पुष्पा व्यवहारे, दीपाली खोडके, माधुरी दुधे, शाम पिहुलकर, प्रशांत वार्डेकर व विद्यार्थी परिश्रम घेतात.
------
 
 
 
चौकट-
आता माणसांना माणसांसाठीच वेळ नाही, अशा वेळी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी दाखवलेली एका तपापासूनची भूतदया हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सुट्या लागल्यावरही विद्यार्थी शाळेत येऊन पक्ष्यांकरिता पाणी, अन्न व घरट्यांची व्यवस्था स्वयंप्रेरणेने करतात.
- सुरेखा देशमुख (मुख्याध्यापिका)
 

 
 
चौकट....
पर्यावरणाचा मी एक घटक आहे. या पर्यावरणाचे मी काही देणे लागतो म्हणून दरवर्षी नियमितपणे न कंटाळता हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेत व परिसरात चालवतो चालवतो.
- गोपाल खाडे
@@AUTHORINFO_V1@@