एस.टी.च्या जळगाव विभागाचा कमाईत राज्यात चौथा क्रमांक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |

पुढेही पहिल्या पाचात तरी राहूच: विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे

 
 
जळगाव, ४ मे :
एप्रिल २०१८ या महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने सुमारे १ कोटीचे उत्पन्न मिळवत राज्यातील ३१ विभागात चौदावा तर शेवटच्या १० दिवसात चौथा क्रमांक मिळवला आहे. १५ मे नंतर ‘प्रवाशांचा सीझन’ कमी होणार असला तरी पुढे राज्यात एक नंबरवर राहू, निदान पहिल्या पाचात तरी राहूच!, असा विश्‍वास जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी व्यक्त केला आहे.
 
 
राजेंद्र देवरे यांनी गेल्या महिन्यात पदभार हाती घेतला. त्यानंतर प्रथमच त्यांनी आज ४ मे रोजी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. त्यांनी खुल्यादिलाने सहज संवाद साधत महामंडळाच्या व्यापक प्रवासी सेवा आणि राज्यभरातल्या वैभवाचे आणि सेवेचे चित्र मांडले. भविष्यात खाजगी ट्रॅव्हल्सशी, बेकायदा वाहतुकीशी सामना करु, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
* महामंडळ अजिबात तोट्यात नाही, राज्यात हजारो कोटींची मालमत्ता, जळगाव विभागाही देणीही किरकोळ, पत शाबूत, पगार वेळेत.
* बसेसची संख्या पुरेशी, भारमान ७० टक्के, मात्र चालक २१ कमी, वाहक २३५ कमी (परिणामी असंतोष, नाराजी पण समजुतीने, गोडीगुलाबीने व ओव्हर टाईम देऊन बसेस नियमित ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न.) यांत्रिक कामगारांची ७० पदे नुकतीच भरल्याने बढत्या देत पुन्हा एवढीच पदे भरणार.
* गेल्या २ वर्षात जळगाव विभागाला नवीन एकही बस मिळालेली नाही. १२ ऐवजी १० वर्ष झालेल्या बसेस भंगारात काढण्याचा नव्याने निर्णय झाल्याने १२५ बसेस जाणार भंगारात.
* ‘लाल परी’ च्या जागी आता ‘लक्झरी लूक’ च्या नॉन एसी बस दाखल होणार.
* वाजवी भाडे आणि सुरक्षीत प्रवासासंबंधी जनतेची अपेक्षा व मागणी भुसावळ व जळगावहून पुणे (आणि परतीच्या) अशा ४ बस फेर्‍यांचे नियोजन
* राज्यातील १३ बसपोर्टमध्ये जळगावच्या विभागीय कार्यालय आणि नवीन बसस्थानकाचा समावेश, रंगरुप पालटणार. ३० कोटीचा आराखडा तयार आणि राज्यस्तरावर रवाना. लवकरच निविदा.
* कर्मचार्‍यांसाठी गणवेश उपलब्ध, सोमवारपासून वितरण
 
 
परिस्थिती प्रतिकूल असली तरी अनेक अडचणींवर मात करीत आहोत. रोज बैठक, आगार स्तरावर नियुक्त पालक अधिकार्‍यांशी रोज संवाद, प्रसार माध्यमांकडून एस.टी.सेवेसंबंधीच्या भल्याबुर्‍या बातम्यांची दखल आणि कार्यवाही आदी खबरदार्‍या घेत असल्याने अनेक समस्या दूर करण्यात यश आले आहे, असा दावाही त्यांनी केला.
 
 
यंत्रअभियंता (चालन) प्रशांत वायकर, उपयंत्र अभियंता ताराचंद पाटील, राहूल शिरसाठ, उपविभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी प्रशांत गहाजन, लेखाधिकारी के.आर.बागूल, सुरक्षा व दक्षता अधिकारी दामू धनभाते, विभागीय भांडार अधिकारी दिलीप सपकाळे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले, विभागीय अभियंता राजन चव्हाण, वसंतराव चव्हाण आदी उपस्थित होते. त्यांनीही वेळोेवेळी संवादात भाग घेतला.
 
@@AUTHORINFO_V1@@