समाजसेवा हीच ईश्‍वरसेवा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018   
Total Views |


समाजसेवा करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. वयाच्या १७ व्या वर्षी फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून सहा लाखांची रक्‍कम जमा करून कर्करोग रुग्णांना मदतीचा हात देणार्‍या शील सोनेजीने केलेले काम कौतुकास्पद आहे.

आज आरोग्याच्या संदर्भात कोणत्याही गंभीर आजारांची लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्‍ला घेऊन त्यावर उपचार आणि गरज भासल्यास आवश्यक ती शस्त्रक्रिया करून घेतली जाते. पूर्वी या आजारांची व्याप्ती आणि प्रकार काहीसे मर्यादित होते. पण, अलीकडच्या काळात या आजारांचे प्रमाण, त्यांचे स्वरूप हे पूर्णतः बदलून गेले आहे. अर्थात, या वेगवेगळ्या गंभीर आजारांवर उपचार करण्याच्या उपचारपद्धती उपलब्ध असल्या तरी उपचारांसाठी पाण्यासारखा पैसा मोजावा लागतो. ज्यांना हे पैशाचं गणित जुळवता येतं, असा एक वर्ग उपचार करून त्या आजारातून सुखरूपपणे बाहेरही पडतो. पण, एक वर्ग असाही असतो की, त्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मग अशा अशा व्यक्तींना गंभीर आजार झाल्यास साधे उपचार घेणेही परवडत नाही. मग अशा वेळेस त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी समाजातील काही दिलदार व्यक्ती सढळ हस्ते मदत करतात. त्यापैकीच एक म्हणजे शील सोनेजी. मूळच्या बंगळुरूच्या असलेल्या २१ वर्षीय शील सोनेजीच्या मनात लहानपणापासून गरजवंतांना मदत करण्याचा विचार यायचा. त्याचाच एक भाग म्हणून शाळेमध्ये असताना स्वतः शिक्षणाचे धडे गिरवताना तो गरीब वस्तीमध्ये राहणार्‍या मुलांना शिक्षणाचे धडे द्यायचा. पण, तरीदेखील आपण अजून काहीतरी करायला पाहिजे, हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यानंतर शील याने शोध घेतला असता त्याला ’समीक्षा फाऊंडेशन’बाबत माहिती मिळाली. ’समीक्षा फाऊंडेशन’ ही संस्था कर्करोगाने ग्रस्त झालेल्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी मुलांना शिक्षण देण्याचे काम करते. कर्करोग झाल्यानंतर उपचार करण्यासाठी खूप खर्च येत असल्याने काही पालकांना मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे परवडत नाही. त्यामुळे हे फाऊंडेशन मुलांना शिकवण्याचे काम करते. अकरावीमध्ये असताना शील ‘समीक्षा फाऊंडेशन’शी जोडला गेला. मुलांना शिकवण्याचं काम सुरू होतं, पण या मुलांना आर्थिक मदतीची गरज असल्याची बाब शीलच्या लक्षात आली. त्यामुळे या मुलांना अधिक मदत व्हावी, यासाठी या कामाची कक्षा वाढवली पाहिजे, असा विचार शीलच्या मनात आला. यासाठी अनेक लोकांशी त्याने संवाद साधला. यावेळी देणगी देणार्‍या संस्था, व्यक्‍तींची मदत घ्यावी, असा सल्‍ला त्याला अनेकांनी दिला. पण, शीलला दुसर्‍यांकडून आर्थिक मदत घेण्याआधी आपणही काहीतरी केलं पाहिजे, असं सतत वाटत होतं. मग यातून शीलच्या मनात एक कल्पना आली. फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून उभा राहणारा पैसा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या हितासाठी वापरता येईल, असं त्याला वाटू लागलं. लगेचच त्याने या विचारावर काम करायला सुरुवात केली.


बंगळुरूच्या प्ले अरीनामध्ये एक फुटबॉल स्पर्धा आणि फॅमिली इव्हेंटमध्ये स्पर्धा घ्यावी, यासाठी त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यासाठी अनेक लोकांशी संपर्क साधून पुढे काय करता येईल, याचं तो नियोजन करू लागला. जर आपला हेतू चांगला असेल, तर त्याचे परिणाम चांगलेच होतात, असा विश्‍वास शीलला होताच. फाऊंडेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहकार्‍यांना शीलची कल्पना आवडली. त्यांनी यामध्ये सहभाग दर्शवला. त्यानंतर दोन ठिकाणी फुटबॉलच्या स्पर्धा भरवण्यात आल्या. ही फुटबॉल स्पर्धा कशासाठी आयोजित करण्यात आली आहे? त्याचा हेतू काय आहे? हे क्रीडाप्रेमींना सांगितल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्पर्धेसाठी तिकिटांची खरेदी करण्यात आली. शीलने शाळेमध्ये बिझनेस मॅनेजमेंटबाबत जे ज्ञान मिळवले होते, त्या ज्ञानाचा त्याने या कामासाठी उपयोग केला. शीलने या कामासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा भरपूर वापर केला. त्याने भरपूर लिंक्ड इन रिक्वेस्ट पाठवून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या लोकांशी संपर्क साधला. याकामी त्याच्या मित्रांचेदेखील खूप चांगले सहकार्य मिळाले. त्याच्या मित्रांनी घरोघरी जाऊन दानाची मोहीम चालवली आणि त्याद्वारे रक्कम गोळा केली. लोकांकडून चेक घेऊन त्या बदल्यात त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. ही स्पर्धा योग्य प्रकारे पार पडावी यासाठी ’युईएफए’ची मान्यता असलेल्या पंचांची नियुक्ती करण्यात आली. खेळताना खेळाडूंच्या सुरक्षेसाठी ’सकरा वर्ल्ड रुग्णालया’ सोबत सहकार्यासाठी टायअप करण्यात आले. स्पर्धेसाठी सर्व संघाची निवड झाल्यानंतर शील कॉर्पोरेट कंपन्यांकडे गेला आणि पैसे दान करण्याची विनंती त्यांना केली. या सर्व प्रयत्नांमुळे ते सहा लाख रुपयांची रक्कम गोळा करण्यात यशस्वी झाले. अनेक कंपन्यांनी ही स्पर्धा स्पॉन्सरसुद्धा केली. या स्पर्धेने शीलला बरेच काही शिकवले. समाजकल्याणाचे काम आपण सतत करत राहण्याची शीलची इच्छा आहे. पण, सध्या शील इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी कॅनडामध्ये वास्तव्यासाठी गेला आहे. आपलं शिक्षण पूर्ण करून भविष्यामध्ये एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक होण्याचं ध्येय शील बघत आहे. 


- सोनाली रासकर
@@AUTHORINFO_V1@@