‘निसटा’ नव्हे... निष्ठाधर्म जोपासणारे भाऊसाहेब गेले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |



प्रामाणिकपणे जनआंदोलनात सक्रिय राहिलेला कार्यकर्ता घडत घडत पुढे नेता कसा बनतो आणि नेता बनल्यावरही मातीशी आणि आपल्या विचारधारेशी असलेलं नातं कायम कसं ठेवतो, याचे अलीकडल्या काळातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब फुंडकर.

सत्तापद असो अथवा नसो, समचित्तवृत्तीने संघटनाकार्य पुढे नेत राहायचे. माणसे, कार्यकर्ते जोडत राहायचे. ऐन तारुण्यात ज्या विचारांचा वसा घेतला, तो कधी सोडायचा नाही, अशी भावना सतत जपणार्‍यांपैकी एक लोकप्रतिनिधी म्हणजे पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर हे होय. शहरी मध्यमवर्गीयांचा पक्ष’ अशी प्रारंभीची ओळख असलेल्या भाजपला ‘जनसामान्यांचा पक्ष’ अशी ओळख प्राप्त करून देण्यासाठी आयुष्य झोकून दिलेल्यांच्या मालिकेतील आदरणीय भाऊसाहेब हे महत्त्वाचं नेतृत्व आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याला परवा चार वर्षे होतील, त्याचवेळी भाऊसाहेबांचे आज असे अचानक जाणे सर्वांनाच चटका लावून जाणारे ठरले.

सत्तावर्तुळापासून पक्ष जेव्हा कोसोमैल दूर असतो, त्यावेळी निष्ठेने विचारांची पताका खांद्यावर मिरवत राहणार्‍यांना अनेकदा उपेक्षेचे धनी व्हावे लागते. उपेक्षा, पराभव, संसाधनांची कमतरता, बलदंड सत्ताधीश प्रतिस्पर्धी यासारख्या अनेक प्रतिकूल घटकांवर मात करीत, ज्या विचारधारेपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्याच विचारधारेसाठी शेवटचा श्वास असेपर्यंत कार्यरत राहणे हे लक्षण आता दुर्मीळ होत चालले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब भारदे यांनी म्हटल्याप्रमाणे तिकीट मिळेपर्यंत निष्ठा आणि तिकीट न मिळाल्यास तेथून दुसर्‍या पक्षात निसटाही प्रवृत्ती सध्या किती वाढीस लागली आहे हे आपण बघतोच. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेबांसारख्यांची पक्षनिष्ठा आणि विचारधारेला प्राधान्य देणारी राजकीय कारकीर्द अनेकांना प्रेरणा देत राहील हे निश्चित.

दुहेरी निष्ठेचा आरोप, अंतर्गत कलह, अहंमान्य नेत्यांची मोठी संख्या अशा अनेक कारणांमुळे आणीबाणीनंतरचा जनता पक्षाचा प्रयोग फसला. या अनुभवातून आणि त्यानंतरच्या दारुण पराभवाच्या धक्क्यातून भाजपने सावरत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात भाजपला ग्रामस्तरापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, बहुजन समाजाच्या तरुण नेत्यांची जी फळी पुढे आली, त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि एकनाथराव खडसे यांच्या खांद्याला खांदा लावून, भाऊसाहेब फुंडकर यांनी बजावलेली कामगिरी अत्यंत मोलाची ठरली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, महाविद्यालयीन जीवनात अभाविप कार्यकर्ते, जनसंघ युवा आघाडी, आणीबाणीविरोधी आंदोलनात सत्याग्रह-अटक-कारावास असा संघर्ष केलेल्या भाऊसाहेबांनी पुढे १९८२ ते १९८४ या काळात महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्च्याचे अध्यक्षस्थानही भूषविले. त्यानंतर सन २००० ते २००३ या काळात प्रदेश भारतीय जनता पक्षाचे ते अध्यक्ष होते. १९८९, १९९१ आणि १९९६ असे तीन वेळा लोकसभा सदस्य म्हणून अकोला मतदार संघातून ते निवडून गेले. सन २००२ ते २००८, २००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०२० अशा तीन टर्म्स विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. त्याचप्रमाणे १९७८ ते १९८० आणि १९८० ते १९८५ या कालावधीत दोन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.

सन एप्रिल, २००५ ते एप्रिल, २००८ असे तीन वर्षे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. या काळात जनसामान्यांचे, प्रामुख्याने शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न त्यांनी सभागृहात केवळ मांडलेच नाहीत, तर ते सोडविलेदेखील. शेती, सहकार, शिक्षण, बँकिंग, सूत गिरणी या क्षेत्रातील अनुभव, दांडगा लोकसंपर्क, असंख्य कार्यकर्त्यांचा संपादन केलेला विश्वास यामुळे सभागृहात त्यांच्या भाषणांना जबरदस्त धार प्राप्त व्हायची. शेतकरी आणि बेरोजगारांसंदर्भात त्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे आवाज उठविला. सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजां’चे नाव आणि अमरावती विद्यापीठाला ‘संत गाडगे महाराज’ यांचे नाव देण्यासाठी त्यांनी सभागृहात ‘अर्धा तास चर्चा’ या संसदीय आयुधाद्वारे चर्चा उपस्थित केली होती. ही मागणी त्यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास गेली. महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रांगणात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना सन २००६-०७ या कालावधीसाठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रामाणिकपणे जनआंदोलनात सक्रिय राहिलेला कार्यकर्ता घडत घडत पुढे नेता कसा बनतो आणि नेता बनल्यावरही मातीशी आणि आपल्या विचारधारेशी असलेलं नातं कायम कसं ठेवतो, याचे अलीकडल्या काळातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब फुंडकर. पक्ष सर्वव्यापी बनवायचा असेल, तर सहकार-कृषी-शिक्षण-ऊस-दुग्धोत्पादन- कापूस- सूत गिरणी असे संस्थात्मक जाळेदेखील निर्माण होणे आवश्यक ठरते. पक्षविस्तार होत असताना अशा संस्थात्मक विस्तारामुळे दुसरीकडे विकासाचा पुढील टप्पादेखील ओलांडला जात असतो. याचे भान राखत, योगदान देत पुढे आलेल्या उत्तमराव पाटील, अण्णा डांगे, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रा. ना. स. फरांदे, रावसाहेब दानवे या मालिकेतील अग्रणी भाऊसाहेब आता कार्यकर्त्यांना विधान भवनात दिसणार नाहीत. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून, आपुलकीने सर्वांना स्नेहबंधनात जोडणारे भाऊसाहेब, शेतकरी दिंडी तर कधी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखालील संघर्षयात्रा गाजवून, आता मात्र अनंताच्या यात्रेला रवाना झाले आहेत. सत्तेची धावती गाडी पकडण्याचा ‘शॉर्टकट’ हाच राजमार्ग बनू पाहत असल्याच्या सध्याच्या राजकीय संस्कृतीत भाऊसाहेबांचा जनसंघ ते भाजपहा प्रवास पक्षनिष्ठा या संकल्पनेला झळाळी प्राप्त करून देणारा आहे हे मात्र निश्चित! त्यांना भावपूर्ण आदरांजली.

-निलेश मदाने

(लेखक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@