अस्मानी सुलतानी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |
 
 
 
इ.स.१६३२ च्या एप्रिल महिन्यात तीर्थयात्रेच्या निमित्ताने रामरायाची आज्ञा घेऊन रामदासांनी नाशिक सोडले. काही समर्थ चरित्रकारांच्या मते, रामदासांच्या तपाची बारा वर्षे पूर्ण होताच रामरायांची दृष्टांतात त्यांना आज्ञा झाली की, त्यांनी पायी फिरून, तीर्थयात्रा कराव्या व आपला देश न्याहाळून पाहावा. ते काहीही असले, तरी रामदास नाशिक सोडून निघाले हे खरे आहे. नाशिक मुक्कामी उत्तरेकडील हिंदूंच्या देव-देवालयांच्या विध्वंसाच्या बातम्या येत होत्या. नाशिक हे तीर्थक्षेत्र असल्याने अनेक प्रांतातून भाविक तेथे येत असतील. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादातून हिंदू देव-देवतांच्या मूर्तींच्या, देवालयांच्या विध्वंसाच्या बातम्या नाशिकपर्यंत येत होत्या. त्याकाळी प्रसारमाध्यमे नव्हती. तेव्हा बाहेर देशभरात काय चालले आहे हे जाणून घेण्याचे दोनच मार्ग म्हणजे, बाहेरून आलेल्या यात्रेकरुंच्या भेटी घेणे किंवा तीर्थयात्रा करून, स्वत: तेथील माहिती मिळवणे. रामदासांचा तीर्थयात्रेचा निर्णय तीर्थक्षेत्रातील देव आणि आपला देश पाहणे यासाठीच होता.
 
प्रा. श्री. म. माटे त्यांच्या ‘रामदास्वामींचे प्रपंच विज्ञान’ या ग्रंथात म्हणतात की, ‘तैमूरलंग व मुहम्मद तुघलक यांच्या आत्मकथनावरून त्यांच्या हिंदुस्थानावरील आक्रमणामागे हिंदू धर्माच्या विध्वंसनाचा हेतू होता याची स्पष्ट कल्पना येते. तैमूरलंगाने त्याच्या आत्मकथनात लिहिले आहे की, “हिंदुस्थानवर स्वारी करण्यात माझा हेतू असा आहे की, येथील नास्तिकांवर आक्रमण करावे. पैगंबराच्या वचनाप्रमाणे येथील लोकांना सत्यधर्माची दीक्षा द्यावी. नास्तिक्य आणि बहुदेवत्व ही तेथील घाण झाडून टाकावी. त्या लोकांची देवालये व त्यातील मूर्ती मोडून फोडून टाकल्या.” (पृष्ठ २४ उपरोक्त) मुहम्मद तुघलकाचेही मत आणि वागणे यापेक्षा काही निराळे नव्हते. त्याचे तर असे सांगणे होते की, असली देवळे होऊ देता कामा नयेत. तो म्हणतो, ”दैवी इच्छा प्रमाण धरून, मी ही मंदिरे पाडून टाकली आणि त्यातील काफिरशाहीचे पुढारी, जे या लोकांना हे पातक करण्यास प्रवृत्त करीत त्यांना ठार मारून टाकले.” ‘कोहा’ नावाच्या गावी एक नवीन देऊळ झाले. मूर्तिपूजक जमून पूजाअर्चा करु लागले. या लोकांना पकडून माझ्याकडे आणले, तेव्हा मी फर्मावले की, या लोकांचा राजवाड्यापुढे शिरच्छेद करावा. तसेच त्यांच्या पोथ्या, मूर्ती बरोबर आणलेली उपकरणे चव्हाट्यावर होळीत घालावी. (संदर्भ-श्री रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान)
 
तैमूरलंग व मुहम्मद तुघलक यांची आत्मकथने रामदासांच्या तीनशे वर्षांपूर्वीची असली तरी या अत्याचारांत नंतर फारसा फरक पडला नाही. उलट ते वाढतच गेले. यावनी आक्रमणाच्या परिणामरूप हिंदूंच्या देव-देवालयांच्या विध्वंसाचे अवशेष रामदासांना त्यांच्या भ्रमंतीत पाहायला मिळाले.
 
रामदास तीर्थयात्रेच्या निमित्ताने भ्रमंतीस निघाले, तत्पूर्वी इ.स. १६२९ आणि १६३० या दोन वर्षांत महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता. पावसाने पाठ फिरवली. पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे सर्वांचेच अतिशय हाल झाले. रामदासांनी ते सारे नक्कीच पाहिले असेल, अनुभवले असेल. त्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी ‘अस्मानी सुलतानी’ या प्रकरणात केले आहे. त्याचा संबंध प्राप्त दुष्काळाशी असावा. त्या काव्यात रामदास लिहितात-
 
 
बहुसाल कल्पांत लोकासी आला ।
महर्गे बहु धाडी केली जनाला ।
कितीयेक ते मृत्यूसि योग्य जाले।
कितीयेक ते देश त्यागुनि गेले ॥
 
 
लोकांना वाटले की जणू कल्पांत, सृष्टीचा शेवट आला आहे, निसर्गाचा कोप हे अस्मानी संकट होते. त्यात लोक होरपळून निघत होते. तशात भर म्हणून सुलतानी आक्रमणांचे संकट समोर उभे होते. लोक मरायला टेकले. काहीजण गाव सोडून, देश सोडून निघून गेले. गावे ओस पडू लागली. ठिकठिकाणी दुष्काळामुळे लोक अन्नान्नदशा होऊन मेले. अनेक लोक बेघर झाले. दुष्काळ तर जीव खात होता. त्यात सुलतानी धाड आली, तर ते इतर वस्तूंबरोबर चांगल्या स्त्रियाही पळवून नेत होते आणि त्यांना भ्रष्ट करीत होते. रामदासांनी त्याचे अत्यंत हृदयद्रावक शब्दांत वर्णन केले आहे-
 
उदंड चाकरी चाकरी, मिळेना भाकरी।
लोक निलंड निलंड काढूनि नेती पोरी।
न्याय बुडाला बुडाला, जाहली शिर्जोरी।
पैक्याकारणे कारणे, होते मारामारी।
 
अशी ही तीव्र दुष्काळाची दोन वर्षे महाराष्ट्राने अनुभवली. मुसलमानांच्या स्वार्‍यांचा त्रास त्यात भर घालीत होता. जीणे दुरापास्त झाले होते. अशावेळी महाराष्ट्राबाहेर सार्‍या देशभरात काय स्थिती होती, हे रामदासांना जाणून घ्यायचे होते. लोकांची ही स्थिती पालटावी यासाठी काही तरी करायला हवे, असे त्यांना मनातून वाटत होते. प्रथम धर्माची स्थिती सुधारावी. लोक सुसंस्कारित आणि बलवान करावे. लोकांना धर्म, संस्कृतिरक्षणार्थ तयार करावे. ‘मुख्य ते हरिकथा निरुपण’ हे त्यांना साधायचे होते. धर्माचे रक्षण करून, धर्माच्या नावावर लोकांना एकत्र आणायचे, असे त्यांना वाटत होते. तेव्हा या भ्रमंतीतून तीर्थयात्रा देश निरीक्षण करताना कोणीतरी धर्माचा त्राता शोधावा आणि त्याच्या साहाय्याने यावनी आक्रमणाच्या छळाला कसे रोखायचे, याचा त्यांना अंदाज घ्यायचा होता. रामदास बालवयात असताना ठोसर घराण्याला सुलतानशाहीचा फटका बसला होता. त्यावेळी रामदासांचे वय सात-आठ वर्षांचे असावे. या सुलतानशाहच्या वक्रदृष्टीने त्यांच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला होता आणि वडीलबंधू गंगाधरपंताना गावचे कुलकर्णीपण सोडावे लागले होते.
 
‘तीर्थावळी दंडीगाणे’ या नावाचे रामदासांचे एक कवन उपलब्ध आहे. त्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांबरोबर इतरही काही क्षेत्रांचा उल्लेख आहे. त्यावरून त्यांच्या भ्रमंतीचा अंदाज करता येतो. एखाद्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राहून दुसर्‍या तीर्थक्षेत्राकडे जाताना वाटेत समजतील त्या क्षेत्रांनाही भेटी देत त्यांचा प्रवास चालू होता. रामदासांनी नाशिक सोडले, तेव्हा त्यांचे वय २४ वर्षांचे होते. सहा फूट उंच आणि बारा वर्षे सूर्यनमस्काराने कमावलेले शरीर, पिळदार दंड, ब्रह्मचर्याचे तेज आणि एका वेळेस कितीही चालण्याची तयारी असे त्यांचे रुप होते. देवदर्शन, देशदर्शन करीत सर्व बाबतीत सूक्ष्म निरीक्षण करीत त्यांची पदयात्रा चालली होती.
 
 
 
 
 
- सुरेख जाखडी

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@