धुळे जिल्ह्यात भाजपमध्ये दोन तट ?...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |

पत्रकबाजीमुळे पक्षाची नाचक्की, तिघा नेत्यांना एकत्र आणा...
विजयराव पुराणिक यांच्याकडून अपेक्षा



 
 
धुळे, ३० मे :
 
जिल्ह्यातील भाजपमध्ये उघड उघड दोन तट पडले असून रोजच्या पत्रकबाजीमुळे भाजपाची जिल्ह्यात नाचक्की होत आहे याचे शल्य पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्याना टोचत आहे.
 
 
 
याचे कारण शहरातील रस्त्याच्या कामात येणार्‍या मंदिरे तोडण्याच्या कामातून हा वाद निर्माण झाला आहे. प्रथम हा वाद शिवसेना व राष्ट्रवादी मिळून आमदार अनिल गोटेंवर आरोप करून रोजच्या पत्रक बाजीत धुळ्यात वाद विकोपाला गेला आणि यातूनच मंदिर बचाव समिती तयार होऊन नामदार सुभाष भामरे व नामदार जयकुमार रावल यांनी शिष्टमंडळ घेऊन याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत मांडली.
 
 
 
या घटना घडत असतांना धुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढत असून यासाठी भाजपात विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात प्रवेश करीत आहेत आणि प्रवेश करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून पक्षात प्रवेश द्यावा, अशी भूमिका आमदार अनिल गोटे यांची राहिली आहे.तर पक्षाची भूमिका ‘वाल्याचा वाल्मिकी’ करण्याची आहे अशी भूमिका घेत ना. सुभाष भामरे यांनी अनेकांचा प्रवेश करून घेतला. ना.डॉ. सुभाष भामरे व आ. अनिल गोटे यांचे सख्य गेल्या २० ते २२ वर्षापासूनचे आहे. ना. रावल हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी व सामान्य जनतेशी जनसंपर्क दांडगा आहे. शिंदखेडा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन ठरवून मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी ते धडपडत आहेत. गेल्या तीन पंचवार्षिकपासून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.ते भाजपच्या कार्यापध्दतीची व विचारधारेशी एकरूप झाले आहेत यामुळे तालुक्यातील सर्व संस्था भाजपाच्या ताब्यात आहेत.
 
 
 
हे सारे असतांना तिघेही नेत्यांनी आप आपले मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवश्यकता आहे. यात नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात यासाठी प्रसार माध्यमांकडे जाऊन जाहीरपणे टिका-टिपणी करणे योग्य नाही यासाठी पक्षातील नेत्यांकडे बसून आपसातील मतभेद मिटविणे आवश्यक असून अशीच संघ परिवाराची कार्यपद्धती आहे या सर्व बाबतीत अनेक कार्यकर्त्यांमधून खेद व्यक्त केला जात असून धुळे जिल्ह्यात वाढणारी भाजपा आगामी काळात संपू शकते याचे भान या नेत्यांनी ठेवणे अगत्याचे होय अशी कुजबुज जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
 
 
 
या सर्व बाबींकडे भाजपाचे नवनियुक्त प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी लक्ष घालणे आवश्यक असून जिल्ह्याच्या राजकीत पटलाची संपूर्ण माहिती विजयराव पुराणिक यांना आहे.जिल्ह्यात भाजपाची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतांना परिवार क्षेत्रातील एका संघटनेचे जिल्ह्यात काम केलेले आहे. यामुळे भाजपातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध आलेले आहेत. या सर्वांशी चर्चा करून या नेत्यांमध्ये असलेले मतभेद दूर करून यांना जिल्ह्याच्या विकासासाठी व भाजपा वाढीसाठी कसे एकत्र आणता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आपल्या संघटन कौशल्याने या तिघे नेत्यांना एकत्र आणणे अशक्य नाही यासाठी आपले कसब विजयराव पुराणिक यांनी लावावे, अशी अपेक्षा जुन्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. या सगळ्या घटनेत भाजपाचे जिल्ह्यातील तिघेही नेते एकत्र येतील व पक्ष वाढीसाठी आपली ताकद पणाला लावतील, अशी अपेक्षा आजतरी पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@