विद्यापीठाच्या ‘डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचार’ या नव्या अभ्यासक्रमाला मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बार्टीसोबत सामंजस्य करार

 

 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज् सेंटरला मा. कुलपती सी. विद्यासागर राव यांनी मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत स्वतंत्र विभागाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचार’ असा स्वतंत्र पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
 
या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन केंद्र (बार्टी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, बार्टीचे प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत महाजन, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. ए. डी. शाळिग्राम, विभागप्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांच्या नव्या पैलूंवर तरुणांनी संशोधन करावे हा आगळा विचार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर संशोधनाला चालना मिळावी यासाठी पुढाकार घेत आहे हे आशादायी चित्र आहे, असे मत बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी व्यक्त केले.
 
या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सुरक्षा विषयक प्रश्नांकडे कशा पद्धतीने पाहत हा अधिक सखोल संशोधनाचा व नाविन्यपूर्ण विषय आहे. सामाजिक जीवना बरोबरीनेच राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतचे डॉ. आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहेत. त्याविषयी या अभ्यासक्रमांतर्गत अध्यापन, संशोधन विद्यापीठात सुरू होईल. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नवा पायंडा शैक्षणिक क्षेत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाडला आहे, अशी माझी भावना आहे.
 
या विभागाचे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी प्रा. डॉ. विजय खरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रा. डॉ. विजय खरे म्हणाले की, हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी संरक्षण व सामरिक शास्त्र या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा असून येत्या शैक्षणिक वर्षात २०१८-१९मध्ये हा अभ्यासक्रम सुरू व्हावा यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी प्रयत्न केले. तसेच बार्टीने विद्यार्थ्यांना संशोधन कार्यात प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केल्याने आनंद होत आहे.
 
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये -
⦁ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचार’ या पदव्युत्तर पदविका स्वरूपातील अभ्यासक्रमाला २०१८-१९ पासून म्हणजेच येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात करण्याची मान्यता प्राप्त झाली आहे.
⦁ या अभ्यासक्रमासाठी एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यासाठीचे शैक्षणिक शुल्क आणि विद्यावेतन बार्टीच्या वतीने देण्यात येणार आहे. याविषयी बार्टी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
⦁ या अभ्यासक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर संशोधन करण्यात येईल.
⦁ यामध्ये विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण विषयक विचार, चीन आणि पाकिस्तान बाबतचे धोरण, अंतर्गत सुरक्षा व परराष्ट्रीय धोरण, भाषावार प्रांतरचना, अंतर्गत सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षेच बदलते स्वरूप व दहशतवाद अशा विविध विषयांवर सर्वंकष चर्चा आणि संशोधन व्हावे यासाठी मानवविज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@