अष्टपैलू कलागुणांचा नाशिकचा ‘निवासी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |




हॉटेल व्यवसाय, चित्रपटात काम, कंत्राटदार म्हणून केलेली कामे, नाशिक पालिकेत शिक्षण मंडळात नियुक्त नगरसेवक अशा अनेक मार्गांनी प्रगती साधलेल्या नाशिकच्या निवास मोरेंविषयी...

‘गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका!’ अशी एक ओळ अनेकदा ट्रकच्या मागे लिहिलेली दिसून येते. वरकरणी पाहता त्यामध्ये फारसा अर्थ दडलेला नाही, असे वाटले तरी गंभीरपणे विचार केल्यावर त्यामागील सत्यता पटू लागते. गरिबीतून आलेल्या माणसाला दारिद्य्राचे चटके सहन केल्याने आपल्याबरोबर असलेल्या गरिबांचे दुःख समजते. त्यातून त्याची सहवेदना जागृत होते. त्यामुळे विशेषतः लहानपणी ज्याने दारिद्य्र अनुभवले असेल, त्याला आपल्या जीवनात कसे वागायला हवे, याची कल्पना असते. आधीपेक्षा चांगले दिवस आल्यावर हलाखीत जगणार्‍या व्यक्तींना मदत करावी, अशी त्याची मनोभूमिका आपसूकच बनून जाते. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे नाशिकचे निवास मोरे.

अशोकस्तंभावर सध्या मयूर हॉटेल चालविणार्‍या निवास खंडेराव मोरे यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. हॉटेल, चित्रपट, समाजसेवा, राजकारण, कंत्राटदारी अशा विविध क्षेत्रात त्यांना कामाचा अनुभव आहे. पण, आपले जुने दिवस आठवून, आपल्याला झालेला त्रास इतर गरीब कुटुंबांना होऊ नये, म्हणून त्यांच्यासाठी काम करण्याची उमेद ते बाळगतात. लहानपणीच्या अनेक आठवणी ते सांगतात.

नाशिक तालुक्यातील शिंदे-पळसे जवळ असलेल्या चांदगिरी येथे त्यांचे आजोबा राहत होते. मोठे कुटुंब असल्याने रोजीरोटीसाठी त्यांचे वडील नाशिकला आले. रविवार पेठेत हमाली करून जीवन कंठू लागले. त्यांची आई, आजी गवत, शेण वाहून नेत असत आणि धुणीभांडी करून गुजराण करीत असत. वडिलांनी सैन्य दल, नाशिकरोड प्रेस, गांधीनगर प्रेस अशा अनेक नोकर्‍या करून अशोकस्तंभावर छोटे हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिवसा हॉटेल आणि रात्री प्रेसमध्ये रात्रपाळी असे निवास यांचे वडील व काका करीत असत. 1966 मध्ये त्यांनी सुरु केलेला हा व्यवसाय 1986 मध्ये निवास यांनी हाती घेतला. मिसळ, भजी, चहा असे पदार्थ पूर्वी मिळत. आता त्यांनी घरगुती आणि विशेषतः ग्रामीण जनतेला रुचणारे जेवण त्यात पिठले, भाकरी, भात, पातोड्याची आमटी, अशी विविधता आणल्याने ती मयूर हॉटेलची खासियत बनली. त्यामुळे किशोर कदम, सुशांत शेलार आदींसह अनेक चित्रपट कलाकार नाशिकला आल्यावर आवर्जून मयूर हॉटेलमध्ये फेरफटका मारतात. ते म्हणतात, “हॉटेल व्यवसाय म्हणजे केवळ पैसे कमविण्याचे साधन नसून, त्यासाठी खाण्याची आणि खाऊ घालण्याची आवड असावी लागते.” हॉटेल व्यवसाय, चित्रपटात काम, कंत्राटदार म्हणून केलेली कामे, नाशिक महापालिकेत शिक्षण मंडळात नियुक्त नगरसेवक अशा अनेक मार्गांनी त्यांनी प्रगती साध्य केली. मात्र, आजही त्यांना आपल्या जुन्या दिवसांची आठवण आहे. त्यामुळेच गरिबाघरच्या पाच मुलींच्या शिक्षणाचा, वह्या, पुस्तके, गणवेश आदी सर्व खर्च ते करतात. या बरोबरच हॉटेलमध्ये काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीदेखील मुक्त हस्ताने आर्थिक मदत करतात.

बारावीनंतर उद्योगाकडे वळल्याने त्यांचे शिक्षण रखडले होते, मात्र नंतर त्यांनी जिद्दीने मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन,
बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेले निवास मोरे यांना पहिलवानकीचा छंद होता. त्यांचे वडील खंडेराव मोरे हे आज 82व्या वर्षीदेखील व्यायामाला स्थान देतात. त्यांचा मुलगा बी. ई. मेकॅनिकलचे आणि पुतण्या बी. ई. सिव्हीलचे शिक्षण घेत आहेत आणि ते दोघेही आपल्या आरोग्याच्या बाबतीत तितकेच जागरुक आहेत.

महाविद्यालयात असताना दूरचित्रवाणीवरील एक मालिका पाहत असताना त्यांच्या मनात सहज विचार आला की, त्यातील नटमंडळींपेक्षा आपण चांगले काम, अभिनय करू शकतो. बारावीत असलेल्या निवास यांनी मग दूरदर्शन आणि स्थानिक वाहिनीसाठी काम करणार्‍या अजित सारंग यांच्याशी संपर्क साधला. मग सारंग यांनी त्यांना ‘दक्षता’ या स्थानिक वाहिनीवरील मालिकेत काम करण्यासाठी बोलाविले. तेव्हाचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनकर त्यावेळी या लोकांमध्ये गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर मालिकेसाठी काम करीत होते. सारंग यांच्या सांगण्यावरून ते निवासला शोधत आले, तेव्हा काहीतरी भानगड केली की काय, असा प्रश्न घरच्या आणि आजूबाजूच्या मंडळींना पडला. मात्र, खरोखर मालिकेत काम करण्याची वेळ आली, तेव्हा नाशिकमधील नाट्यक्षेत्रातील मंडळींमध्ये त्यांना भांडणाचे एक दृश्य करायला सांगण्यात आले आणि त्यांच्यासमोर होत्या नाशिकमधील अनुभवी अभिनेत्री शुभांगी पाठक. पती-पत्नीतील भांडणाचा प्रसंग आपल्याला रंगविता येईल का, असा विचार देखील निवास यांच्या मनात आला. मात्र, मनाचा हिय्या करून, त्यांनी तो रंगविला. सारंग आणि अन्य मंडळी खुश झाले आणि अभिनय क्षेत्रातील निवास यांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नाशिकचेच असलेले राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटापासून त्यांची कारकीर्द खर्‍या अर्थाने सुरु झाली. मग ‘भरत आला परत’, ‘लक्ष्मीचे पाऊल’, ‘वैभवलक्ष्मी’, ‘बापमाणूस’, ‘स्वामी’, ‘वंशवेल’ आदी अनेक चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. ‘यंग्राट’ हा त्यांचा येऊ घातलेला चित्रपट आहे. तसेच ‘कावळा’ या निवास मोरे यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाला 2017 मध्ये दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामाजिक चित्रपटांच्या श्रेणीत प्रथम पुरस्कार मिळाला. ’कावळा’ या चित्रपटाचा विषय पूर्णतः सामाजिक आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटाचा विषय सामाजिक असल्याचे ते अभिमानाने सांगतात. ’कावळा’ला या शिवाय महाराष्ट्रात चार ठिकाणी नामांकने मिळाले. नाशिकच्या चित्रपटाला मिळालेले हे एक मोठे यश आणि त्याचे श्रेय निवास यांना जाते. सध्या ते ‘हेड कॉन्स्टेबल’च्या जीवनावर चित्रपट बनवत आहेत. नाशिकचे नाव चित्रपट क्षेत्रात गाजवून, नेत्रदीपक कामगिरी करावी अशी त्यांची मनीषा आहे. त्यांची ही मनीषा पूर्ण होवो याच शुभेच्छा!

                                                                                                             -

-nÙmH$a Xoenm§S>o

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@