भारत आणि इंडोनेशिया यांच्यात एकूण १५ करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |



जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशियाई देशांच्या दौऱ्यातील पहिला टप्पा हा यशस्वीपणे पूर्ण झाला असून भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये आज एकूण १५ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. व्यापार, सुरक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य आणि सांस्कृतिक या क्षेत्रांसह अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले असून याचा दोन्ही देशांना अत्यंत फायदा होणार असल्याचे मत दोन्ही देशांच्या प्रमुखांनी व्यक्त केले आहे.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पंतप्रधान मोदी यांचे आज आगमन झाले होते. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी स्वतः पंतप्रधान मोदी यांचे राजधानीमध्ये स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत व्यापक अशी द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, रेल्वे तंत्रज्ञान,जैवतंत्रज्ञान, आरोग्य, माहिती देवाण-घेवाण, सांस्कृतिक, आणि व्यापार या प्रमुख विषयांवर चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, तसेच करारांचे हस्तांतरण देखील करण्यात आले.

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील मैत्रीला यंदा ७० वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याविषयी देखील दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. यासाठी म्हणून दोन्ही देशांकडून एक विशिष्ट समिती नेमण्यात येणार असून या समितीद्वारे पुढील वर्ष दोन्ही देशांच्या मैत्रीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितले.


इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन आशियाई देशांच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कालपासून या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. यातील इंडोनेशिया पहिला टप्पा हा यशस्वीपणे पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणून ते मलेशियाला जाणार आहेत, याठिकाणी मलेशियाच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतल्यानंतर ते सिंगापूर जाणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@