उपराष्ट्रपती करणार मध्य आणि दक्षिण अमेरिकेचा दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |

ग्वाटेमाला, पनामा आणि पेरूला देणार भेट




नवी दिल्ली :
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे येत्या ६ ते ११ मे दरम्यान आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या या दौऱ्या दरम्यान ते मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडातील ग्वाटेमाला, पनामा आणि पेरू अशा एकूण तीन देशांना भेटी देणार असून यादरम्यान विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्याशी करार करणार आहेत. तसेच नायडू यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा असल्यामुळे भारतासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या प्रीती सरण यांची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या विषयी आज माहिती दिली. आपल्या या तीन देशांच्या दौऱ्यामध्ये नायडू हे सर्वात प्रथम ग्वाटेमालाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्वाटेमालाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि ग्वाटेमाला सिटीचे महापौर यांची ते भेट घेणार आहेत. तसेच राजकीय, व्यापारिक, माहिती-तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आणि शिक्षण आदी क्षेत्रांविषयी त्यांच्याशी चर्चा व करार करणार आहेत. विशेष म्हणजे ग्वाटेमालामधील उद्योजकांना भारतात गुंतवणुकीसाठी थेट आमंत्रण देणार असल्याचे सरण यावेळी सांगितले.


यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७ ते ९ मे दरम्यान ते पनामाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असतील. याठिकाणी देखील ते पनामाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणि नव्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी काही करार ते करणार आहेत. प्रामुख्याने शेती, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल आणि आरोग्य या क्षेत्रात महत्त्वपूर्ण करार केले जाणार आहेत. तसेच राजकीय भेटीनंतर याठिकाणी असलेल्या भारतीय नागरिकांची देखील ते भेट घेणार असल्याचे सरण यांनी सांगितले.

आपल्या या दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्यात ते पेरूला भेट देणार आहेत. पेरूमध्ये गेल्या सहा महिन्यांपूर्वी नवे सरकार अस्तित्वात आले असून या सरकारच्या आमंत्रणावरूनच नायडू हे याठिकाणी जात असल्याचे सरण यांनी सांगितले. पेरू आणि भारत यांच्या मैत्रीला यंदा ५५ वर्ष पूर्ण होत आहेत. याप्रसंगानिमित्त पेरू सरकारने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील व सभेला संबोधित करतील. तसेच या भेटी पेरुबरोबर काही महत्त्वपूर्ण करार देखील करतील, असे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@