बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना लवकरच ११०० कोटी रुपयांची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |



नाशिक : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना लवकरच ११०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील मालेगाव व येवल्यामधील बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात गतवर्षी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामध्ये राज्यातील ४३ लाख हेक्टरपैकी जवळपास ३४ हेक्टरवरील कापूस खराब झाला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव व येवला तालुक्यातील ३३ हजार ८८०.२८ हेक्टरपैकी २७ हजार ७१३.४३ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे बोंडअळीमुळे नुकसान झाले. यामध्ये जिरायत क्षेत्रावरील २४ हजार ९२४, तर बागायती क्षेत्रातील २७८९ हेक्टरवरील कापसाचा समावेश आहे. यामुळे ३७ हजार ७८१ शेतकरी बाधित झाले आहेत. या  शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने २० कोटी ७० लाख ३ हजार ९६ रुपयांची मदतीची मागणी सरकारकडे केली होती.


सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, जिल्ह्यासह राज्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी आर्थिक मदत देण्याचे घोषित केले होते. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नव्हती. परिणामी अगोदरच संकटात सापडलेला बळीराजा हवालदिल झाला होता. सरकारी मदतीकडे तो डोळे लावून बसला होता. दरम्यान, सरकारने राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांसाठी ११०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे भरपाईसाठी डोळे लावून बसलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@