लग्नपत्रिकेद्वारे दिला ‘बेटी बचाव बेटी पढाव’ संदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |

लग्नपत्रिकेद्वारे दिला ‘बेटी बचाव बेटी पढाव’ संदेश
 
मुक्ताईनगर, ३ मे
 
निमखेडी बुद्रुकच्या वधूचा आदर्श वसा
 
लग्नपत्रिका म्हटले म्हणजे नातेवाईक, प्रेषक, संयोजक, आयोजक, निमंत्रक या सगळ्यांचा गोतावळा आला. त्यांची नावे आली, भाऊबंदकीची नावे आली, एवढेच नव्हे तर बालगोपाळांचा देखील भरणा झाला म्हणजेच लग्नपत्रिका पूर्ण झाली असा मानले जाते.
 
 
मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील एका नववधूने आपल्या लग्नपत्रिकेत मौलिक संदेशाद्वारे मुलीचे तसेच पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा आगळा वेगळा आदर्श असा वसा घेतला असून तसा ठसा देखील आपल्या पत्रिकेद्वारे संदेश देत निर्माण केलेला आहे .
 
 
निमखेडी बुद्रुकच्या रविना महादेव तायडे या वधूचे आठ मे रोजी यावल तालुक्यातील चिंचोली येथील भरत दत्तात्रय सोळुंके या वरासोबत लग्न आहे. अतिशय सर्वसामान्य परिस्थितीत रविनाने बी.ए. (इंग्रजी स्पेशल)एवढे शिक्षण घेतले असून संगणकाचे कोर्स देखील ती करत आहे .आई आणि वडील दोघे शेतीकाम करणारे शिक्षणाचा त्यांचा जवळकीचा एवढा संबंध नाही ,मात्र मुलं शिकतात त्यांना शिकू द्यावे म्हणून परिस्थितीचा विचार न करता आपल्या मुलीला आई सविता व वडील महादेव भिवसन तायडे यांनी उच्च शिक्षण दिले. लहान मुलगा प्रशांत हा बारावी शास्त्र या विषयात शिक्षण घेत आहे.
 
 
आपल्या वडिलांनी परिस्थितीचा विचार न करता सर्वसामान्य शेतकरी असल्यानंतर देखील मुलीला वाचवले आणि वाढवले एवढंच नव्हे तर चांगलं शिक्षण देखील दिले, या कृतज्ञभावाने प्रेरित नववधू रविना हिने देखील आपल्या प्रमाणेच इतर मुलींनी देखील शिकावे असा उद्देश डोळ्यात ठेवून आपल्या स्वतःच्या लग्न पत्रिकेमध्ये बेटी बचाव बेटी पढाव असा संदेश दिला आहे.
‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ असा संदेश देतानाच हिंदीमध्ये ‘बेटी को मत समझो भार ,बेटी है जीवन का आधार’ असा मौलिक संदेश देखील पत्रिकांमध्ये छापण्यास आपल्या पालकांना भाग पाडले आहे आणि सार्‍या नातलगांना विचार करण्यास भाग पाडले आहे.
 
 
पाणी जीवनावश्यक बाब असून ‘जल हे जीवन आहे, पाण्याचा जपून वापर करा’ असा देखील संदेश पत्रिकेमध्ये आहे.आई वडील शिकलेले नसल्याने स्वतः पत्रिका तयार करून स्वतः ऑफसेट वर जाऊन बेटी बचावचा व पाणी वाचवण्याचा संदेश स्वतःच्या लग्नपत्रिकेतून देणार्‍या रवीनाचे तालुक्यातून व कोळी समाजातून कौतुक केले जात आहे.
 
 
संदेश देण्यामागे उदात्त हेतू
लग्नपत्रिका ही नातेवाईक आप्तेष्ट व आपल्या गोतावळ्यामध्ये मनापासून वाचली जाते ,त्यामुळे बेटी बचाव किंवा पाणी वाचण्यासारखा संदेश त्यातून मिळावा व तसे आचरण आयुष्यभर अनेक जण करतील, या हेतूने प्रेरित होऊन मी लग्नपत्रिकेत हा संदेश दिला आहे. त्याचा सुपरिणाम होईलच!
- रवीना तायडे (नववधू)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@