रुद्राक्ष - भक्ती... शक्ती... मुक्तीदाता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |


निसर्गामध्ये असणारी विविधता मनाला थक्क करणारी. रंगरूप मनोवेधक. त्याच्या सहवासात मनाची मरगळ दूर करण्याची किमया. सकल वृक्ष-फळं यांची गुणवैशिष्ट्ये मानवाला उपकारक ठरणारी. रुद्राक्षाची झाडं-फळं-बिया अंतर्बाह्य शुचिता प्रदान करणारी! रुद्राक्ष म्हटला की, साधू-संन्यासी नजरेसमोर येतात. योग्याच्या जटेवर-दंडावर-गळ्यात रुद्राक्षमाळा धारण केेलेल्या असतात. रुद्राक्ष आणि शिवाचा जवळचा संबंध! ‘रुद्र’ हे शिवाचं नाव तर ‘अक्ष’ म्हणजे डोळा! शिवाची भक्ती करणारे रुद्राक्षाला शुभ मानतात. काशी क्षेत्री भगवान शंकर-शिवभक्तांना-उपासकांना ज्ञान आणि मोक्ष प्रदान करतात. गंगेच्या जलात स्नान आणि रुद्राक्ष धारण करणार्‍यांच्या जीवनात पुण्यमय प्रभात उगवते.

एकमुखी रुद्राक्ष मुळात दुर्मीळ! तो धारण-परिधान केल्याने महापापंदेखील बाधक ठरत नाहीत. दोन मुखी रुद्राक्ष अर्धनारीनटेश्‍वर शिवाचं प्रतीक. पंचमुखी शिवाचं पाच मुखांचं प्रतीक. एकपासून एकवीस मुखाचे रुद्राक्ष आणि त्याचं महात्म्य अगाध! महाभारत-रामायण-शिवमहात्म्य अशा ग्रंथांमधून रुद्राक्षांच्या दैवी गुणांचा उल्लेख आढळतो. वाईट व्यक्ती आणि दुष्ट शक्ती यांपासून संरक्षण करण्याची शक्ती रुद्राक्षामध्ये सामावलेली आहे. मनाचं अस्वास्थ्य-अशांतता संपवून नितांत, नितळ शांतता प्रदान करण्याचा गुण रुद्राक्षाठायी असल्याची अनुभूती प्राप्त होते. मनासमवेत तनाचं आरोग्य उत्तम ठेवण्याचा गुणधर्म यामध्ये सामावलेला आहे. स्वास्थ्य आणि समृद्धी प्रदान करणारा रुद्राक्ष पूजनात-जीवनात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करतो, यात नवल नाही.

रुद्राक्षाच्या कवचात ब्रह्मदेवाचा वास तर त्याच्या पोकळीत विष्णूचा आराम आणि त्याच्या आत शिवाचा निवास असतो. ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्ती यामध्ये असतात, असं ’रुद्राक्षजलोपनिषदा’ मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रेयांची उपासना करणार्‍यांमध्ये रुद्राक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असणं स्वाभाविक आहे. श्रीगुरुचरित्र मंत्रग्रंथामध्ये रुद्राक्षमहिमा कथनाचे अध्याय आहेत. रुद्राक्ष धारण करणार्‍यास पापं स्पर्शही करू शकत नाहीत. रुद्राक्ष धारण करण्यास वेदांनी मान्यता दिलेली आहे. 108 रुद्राक्ष माळेची थोरवी फार मोठी! गळ्यात अशी माळा धारण करणे, रुद्राक्ष माळेवर जप करणे यामुळे जपाचे फळ अनंत पटीने प्राप्त होतं. याच्या धारण करण्याने मानवाला सद्‍गती मिळून रुद्रलोकामध्ये अखंड वास करता येतो. मृत्युसमयी तो घातला असेल तर माणसाची जन्ममृत्यूच्या चक्रामधून सुटका होऊन तो मुक्त होतो.

शिवपत्नी पार्वती हिच्या दागिन्यांसाठी शिवाने स्वर्गामधून रुद्राक्ष भूलोकी आणले. पार्वतीने बांगड्या-बाजूबंद-माळा-कर्णफुले रुद्राक्षाची करून घातली. त्यामुळे दागिन्यांच्या घडणीत रुद्राक्ष महत्त्वपूर्ण ठरतो. सौंदर्याला सात्विकतेची किनार लाभते. हे रुद्राक्ष फळ खाल्ल्यास तहान लागत नाही. म्हणून याला ‘अमृत फळा’चा बहुमान मिळाला. साधना करणारे यती-योगी रुद्राक्ष सेवन करतात. असा हा रुद्राक्ष भक्ती-शक्ती आणि युक्ती प्रदान करणारा आहे. लौकिक-पारलौकिक, स्थूल-सूक्ष्म या दोन्हीकडचा प्रवास सुलभ करणारा ‘रुद्राक्ष’ पापक्षय-पुण्यसंचय करून मोक्षाच्या मुक्कामी पोहोचविणारा आहे. वैराग्याची प्राप्ती प्रदान करण्याची किमया याच्या ठायी आहे.

वैराग्य आलं की, आसक्तीचा ओलावा नाहीसा होतो. लौकिकामध्ये रस वाटत नाही. त्यामुळे दृश्य सृष्टीमध्ये रमायला होत नाही. आसक्ती संपली की विरक्ती सहजपणाने येते. नको त्या वृत्ती निर्माण होत नाहीत. वृत्तीची निवृत्ती होते. विवेक जागृत होतो. नित्य-अनित्य, सत्य-असत्य यामधून शाश्‍वत-चिरंतन असणारा परमात्मा त्याकडे लक्ष लागतं. वासनांचा लय-क्षय झाल्यामुळे षड्रिपू आपोआप नाहीसे होतात. कोणत्याही नाशिवंत गोष्टी नकोशा वाटतात. जीव उत्क्रांतीकडे वाटचाल करू लागतो. रुद्राक्ष धारण करण्याचा सुपरिणाम लक्षात येतो. एक सहस्र रुद्राक्ष अंगावर धारण केले की पवित्रता वर्धित होत जाते. जीव शिवरूप होऊन जातो म्हणजेच रुद्ररूपच होतो. त्यामुळे सकल देव वंदन करतात. कारण देवांचा देव महादेव आहे नं!

रुद्राक्षामुळे काय.. काय घडू शकतं ते श्रीगुरुचरित्र ग्रंथामधील 33व्या अध्यायात कथन केलेलं आहे. काश्मीर देशामध्ये भद्रसेन राजा होता. त्याला सुधर्मा नावाचा पुत्र होता व त्याच्या प्रधानाचा पुत्र तारक होता. या दोघांचे आचरण शैव धर्माचे असून ते शिवपूजन करीत. अंगाला भस्म आणि अंगावर रुद्राक्षमाळांचे अलंकार घालीत असत. त्या दोघा कुमारांना सुवर्ण, रत्न अलंकार आवडत नसत. या त्यांच्या विचित्र, वैराग्याचं रहस्य आधीच्या जन्मामध्ये दडलेलं होतं. राजपुत्र व प्रधानपुत्र कुक्कुट आणि मर्कट होते. त्यांना रुद्राक्षाच्या माळा अलंकार म्हणून घातलेल्या असत. त्याचा परिणाम व पूर्वजन्मीचा संस्कार यामुळे ते मानवयोनीत तसेच राजघराण्यात जन्माला आले. ते त्यामुळे ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करीत होते. हीच महानंदा व कुक्कुट मर्कटाची कथा शिवलिलामृत ग्रंथामध्येदेखील आहे. या अध्यात्म ग्रंथामधून रुद्राक्षाचं माहात्म्य प्रकर्षाने लक्षात येतं. जीवांचा शिवापर्यंतचा प्रवास रुद्राक्ष धारणेमुळे होऊ शकतो. प्रत्येकाने रूद्राक्ष अंगावर घालण्याचा फायदा ग्रंथांमधून अधोरेखित केलेला आहे.

स्थूल आणि सूक्ष्म देहाला लाभ देणारा रुद्राक्ष! मनाला परमशांती प्रदान करून पावन करणारा रुद्राक्ष ! वृक्षाचं फळ, बी असून वृक्षाचं जीवनातील महत्त्व कथन करणारा रुद्राक्ष! पूजन...धारण करण्याने अमाप फलप्राप्ती करून देणारा रुद्राक्ष! भूलोकी असूनही शिवलोकी होऊन पोहोचवाणारा रुद्राक्ष! भक्तांच्या भक्तीला उंचीवर घेऊन जाणारा... सामान्य... साधू...संन्यासी..साधक इ. सकलांना उद्धरणारा... उत्क्रांती करणारा..उच्च स्थानी नेणारा... अज्ञानाच्या अंध:काराला नष्ट करणारा. इतकी महानता एवढ्याशा रुद्राक्षामध्ये सामावलेली असल्याने आश्चर्यासह अमूल्य परमानंदाची, परमात्म्याची प्राप्ती होते. कष्ट कमी आणि फळ अफाट असा रुद्राक्षमहिमा आहे. आपण त्याचा लाभ का करून घेऊ नये?


- काैमुदी गोडबोले
@@AUTHORINFO_V1@@