प्रमोदजींना आठवताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |



एक उत्तम कार्यकर्ता, द्रष्टा नेता, दांडगा जनसंपर्क आणि राजकारणात सर्वांना आपलासा वाटणारा असा ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ नेता म्हणजे प्रमोदजी महाजन. आज प्रमोदजींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...

श्रोत्यांना मंत्रमुग्ध खरं तर संमोहित करणारे वक्तृत्व कसे असावे, याची जेव्हा जेव्हा चर्चा यापुढील काळात होत राहील, त्या त्या वेळी प्रमोदजी महाजन यांची आठवण निश्चितच होईल. व्याख्यानास उभे राहिल्यावर प्रमोदजींनी पहिल्या चार-पाच वाक्यात श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेतला नाही, असे कधी झाले नाही. त्यानंतर मग एक दीड तास ते आणि श्रोते एक संमोहित करणारा अनुभव! ‘आज प्रमोदजींची सभा आहे,’ हे नुसते वाक्य १९९० च्या दशकात माझ्यासारख्या महाविद्यालयातील तरुणांसह अनेक कार्यकर्त्यांच्या मनात एक चैतन्याची सळसळ निर्माण करून जायचे. १९८५ च्या ‘पुलोद’ प्रयोगाचे प्रमोदजी महत्त्वपूर्ण सूत्रधार. नाशिकमध्ये डॉ. दौलतराव आहेर यांच्या विजयाची परंपरा तेव्हापासून सुरू झाली. प्रचारकाळात प्रमोदजींची सभा जाणीवपूर्वक अगदी शेवटच्या दिवशी रात्री उशिरा घेतली जायची. विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी! प्रमोदजींची शेवटची सभा आणि उमेदवाराचा विजय असे नाशिकमध्ये जणू समीकरणच तयार झाले होते.

मी आणि मित्र परिवार एच.पी.टी महाविद्यालयात राज्य शास्त्राचे धडे गिरवित असतानाचा तो काळ. देशातील विलक्षण वेगवान राजकीय घटनांनी भारलेला होता. केंद्रात विश्वनाथ प्रताप सिंग यांचे भाजप आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले सरकार, अडवाणींची रामरथयात्रा, त्याचे सारथ्य करीत असलेले प्रमोदजी, अडवाणींना समस्तीपूर येथे झालेली अटक, १९९२ चे कारसेवा आंदोलन, त्याअगोदर राजीवजींची ऐन लोकसभा निवडणूक प्रचारकाळात झालेली हत्या, त्यानंतरच्या मतदानप्रसंगी निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, भारताच्या उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे शिल्पकार ठरलेले नरसिंहराव यांची पंतप्रधानपदी झालेली निवड, महाराष्ट्रातील १९९५ चे सत्तांतर, महालक्ष्मी मैदानावरील भाजपचे महाअधिवेशन अशा विस्तृत आणि वैशिष्ट्यपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवरचे प्रमोदजींच्या वक्तृत्वशैलीतील भाष्य त्यांच्या सभांमधून ऐकणे हा राज्यशास्त्राचा विद्यार्थी आणि त्याचवेळी पत्रकारितेच्या उंबरठ्यावरील तरुण म्हणून चिरस्मरणात राहणारा अनुभव होता. घरात आईच्या कार्यकर्तेपणामुळे सभा, मोर्चे, आंदोलने लहानपणापासून फार जवळून अनुभवता आले. नेहरू उद्यानाजवळील प्रमोदजींची एक सभा रात्री ८ ऐवजी पावणेबारा वाजता सुरू झाली. मात्र, तरीही नाशिककर श्रोते त्यांना ऐकण्यासाठी तितक्याच मोठ्या संख्येने थांबले होते. शिवतीर्थावरील युतीच्या प्रचाराचा शुभारंभ सोहळा रात्री ८ वा. संपल्यावर ते नाशिककडे निघाले होते. त्यांची राखाडी रंगाची अ‍ॅम्बेसेडर व्यासपीठामागे येताच अरुण शेंदुर्णीकर यांनी नेहमीप्रमाणे “आता शून्य मिनिटात प्रमोदजींचे व्यासपीठावर आगमन होत आहे,” अशी उद्घोषणा केली आणि चार तास ताटकळत बसलेल्या श्रोत्यांमध्ये एकदम उत्साह संचारला. बहुधा १९८९ च्या लोकसभा की १९९० च्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठीची ही सभा असावी. नेहरू उद्यानाचा परिसर, मामा मुंगींचा कट्टा येथे रात्री गरम दुधाची विक्री करणार्‍या गाड्या लागतात. अंकुशच्या गाडीवरील घट्ट, गरम मसाला दूध प्रसिद्ध होते. सभेला उशीर झाल्याने या सर्व गाड्यांवरील दूध, जवळच्या भेळपुरीच्या गाड्यांवरील जिन्नस पूर्ण विक्री होऊ साफ झाल्याचे आठवते. प्रमोदजी येईपर्यंत रात्री ८ ते १२ असा चार तासांचा किल्ला स्थानिक वक्त्यांनी जोरदारपणे लढविला. शिवसेनेचे पदाधिकारी नंदन राहणे यांचे वक्तृत्व वेगळ्या शैलीचे होते. ‘नाशिकचे प्रमोद महाजन’ म्हणून साने विजय राजाराम उदयाला येत होते. त्यावेळी राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करीत असलेल्या भाजपमधील अनेकांवर प्रमोदजींच्या वक्तृत्वशैलीची छाप स्पष्टपणे दिसून यायची. अगदी प्रदीप पाटणकरदेखील त्याच शैलीचे अनुकरण करीत चौकसभांची मालिका गाजवित असे. लोकसभा निवडणुकीसाठीची १९९१ च्या मे महिन्यात शिवाजी उद्यानासमोर प्रमोदजींची रात्रीची सभा ऐन रंगात असताना अचानक सभेच्या शेवटी श्रोत्यांमधून गडबड-गोंधळ सुरू झाला. अनेकांना हा सभा उधळण्याचा डाव असावा, अशी शंका आली. काँग्रेसचे नेते शांतारामबापू वावरे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत व्यासपीठाकडे सरकत होते. ”राजीवजी गांधी यांची हत्या झाली आहे, सभा बंद करा,” असे त्यांचे सांगणे होते. मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप तेव्हा नव्हते. एवढ्या मोठ्या गर्दीची सभा आटोपती घ्यायची आणि तेही प्रतिपक्षाचे एक नेते सांगतात म्हणून. प्रसंग विलक्षण कसोटीचा होता. प्रचंड संख्येचा श्रोतृवर्ग नाराज झाला होता. नेमके खरे काय ते कोणालाच कळेनासे झाले होते. यावेळी प्रमोदजींनी दाखवलेली समयसूचकता आणि सभानियंत्रणाचे कौशल्य त्यांच्यातील संसदीय सभ्यतेची, असामान्य नेतृत्वशैलीची आणि नाशिककरांवरील प्रेमाची साक्ष आहे. ”शांतारामबापू वावरे हे माझे जवळचे मित्र आहेत. ते सांगत असलेली माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या हत्येची बातमी खोटी ठरावी, अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. पण, हा सभा रद्द करण्याचा प्रयत्न असेल तर मित्रहो, उद्या याच ठिकाणी याचवेळी मी माझे उर्वरित भाषण पूर्ण करायला तुमच्या भेटीसाठी हजर आहे. कृपया सर्वांनी अत्यंत शांतपणे, कोणताही गोंधळ न करता आपापल्या घरी परतावे,” हे सभा आटोपती घेतानाचे प्रमोदजींचे शब्द माझ्या आजही स्मरणात आहेत. पांगलेल्या गर्दीतून पुढे वाट काढत आम्ही दै. ’देशदूत’, दै. ’गांवकरी’च्या कार्यालयाकडे गेलो. तेथेही प्रचंड गर्दी जमली होती. पीटीआय, युएनआयच्या टेलिप्रिंटरवर राजीवजींच्या हत्येच्या बातमीचा ‘न्यूज फ्लॅश’ आलेला होता.

नाशिकमध्ये प्रमोदजींचा मुक्काम ज्येष्ठ नेते (कै.) बंडोपंत जोशी यांच्या निवासस्थानी असायचा. पंतांचे सुपुत्र देवदत्त हे आमचे एच.पी.टी महाविद्यालयातील सहअध्यायी. त्यामुळे गाजलेल्या सभेनंतर दुसर्‍या दिवशी आमचा गराडा देवदत्तभोवती असायचा. सभेतील काही चमकदार अथवा हंशा-टाळ्या घेतलेल्या वाक्यांची त्यानंतर अनेक दिवस उजळणी होत असे. पुढे मी ‘नाशिक तरुण भारत’चा निवासी संपादक झालो, तेव्हा प्रमोदजींना खूप जवळून भेटता आणि ऐकता आले. चंचलस्मृती, वडाळा, मुंबई येथे १९९८ च्या लोकसभा निवडणूकप्रसंगी सर्व आवृत्त्यांच्या संपादकांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यास मी हजर होतो. हिंदी आणि इंग्रजीवरही प्रमोदजींचे विलक्षण प्रभुत्व असल्याने त्यांची लोकसभेतील भाषणेही तितकीच संस्मरणीय ठरली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी म्हणजे प्रमोदजींच्या संकल्पनेचा, प्रशिक्षणविषयक चिंतनाचा आणि संशोधकवृत्तीचा चिरंतन ठरलेला आविष्कार. प्रबोधिनीने वक्तृत्वकलेसंदर्भात प्रमोदजींची संपादित आणि प्रसारित केलेली सीडी प्रत्येकाने अभ्यासायलाच हवी. ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ असलेल्या प्रमोदजींच्या स्मृतीस अभिवादन!



- निलेश मदाने
(लेखक महाराष्ट्र विधानमंडळ
सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@