आगमनाबरोबरच मान्सूनचा दक्षिण भारताला तडाखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018
Total Views |

मुसळधार पावसामुळे मंगळूरमध्ये पूरसदृशस्थिती 



मंगळूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत तीन दिवस अगोदरच केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने आल्या आल्या दक्षिण भारताला जोरदार तडाखा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण भारतात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. विशेष करून कर्नाटकातील मंगळूर शहराला याचा मोठा फटका बसला असून मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मंगळूर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण शहरामध्ये पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या कंबरे इतके पाणी जमा झाले असून शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा देखील खंडित झाला असल्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ होत आहे.





दरम्यान मंगळूर प्रशासनाने नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले असून राज्य सरकारच्या आदेशानंतर एनडीआरएफची काही पथके देखील शहरात आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. शहराच्या बाहेर बाजूने वाहणाऱ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील पावसामुळे वाढ झाली असल्यामुळे नदीकडेच्या तसेच डोंगरांच्या आसपासच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



 
दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचे केरळमध्ये आज आगमन झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये वादळी वाऱ्यांसह  जोरदार पाऊस सुरु आहे. केरळबरोबरच दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण तामिळनाडूमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.  याठिकाणी देखील काही ठिकाणी पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. परंतु मान्सूनच्या शीघ्र आगमनामुळे अनेकजण मात्र सुखावले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@