मोदीविरोध हाच एककलमी कार्यक्रम !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018   
Total Views |
 
 
 
विरोधकांची आघाडी अजून मूर्त आकार घेण्याआधीच त्यांच्यात खटके उडण्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान कोणी व्हायचे, याचे पतंग उडविण्यास आतापासूनच प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे, कोणताही कार्यक्रम, धोरण नसताना केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याच्या विरोधकांच्या एककलमी कार्यक्रमावर विश्वास ठेवण्याएवढी देशातील जनता नक्कीच दुधखुळी नाही.
 
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एखाद्या चांगल्या गोष्टीचे सूतोवाच केले तरी त्यात राजकारण आणून त्या विषयाचे गांभीर्य कसे नष्ट करायचे आणि त्या विषयाचा विचका कसा करायचा, असा विरोधी पक्षांचा आणि खास करून काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असल्याचे दिसून येते. कर्नाटक विधानसभेत जनता दल व काँग्रेस युतीचे सरकार आल्यानंतर तर विरोधी पक्षांची घोडी खूपच फुरफुरू लागली आहेत. आता २०१९ च्या लोकसभा जिंकून भाजपला सत्तेवरून दूर सारणार अशा मनोवस्थेत विरोधक आहेत, पण विरोधकांची आघाडी अजून मूर्त आकार घेण्याआधीच त्यांच्यात खटके उडण्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान कोणी व्हायचे, याचे पतंग उडविण्यास आतापासूनच प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे, कोणताही कार्यक्रम, धोरण नसताना केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याच्या विरोधकांच्या एककलमी कार्यक्रमावर विश्वास ठेवण्याएवढी देशातील जनता नक्कीच दुधखुळी नाही.
 
अलीकडे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी प्रत्येकाने आपली प्रकृती उत्तम ठेवली पाहिजे या हेतूने ट्विटरवर ‘हम फिट तो इंडिया फिट’ या हॅशटॅगद्वारे विराट कोहली, हृतिक रोशन आणि सायना नेहवाल यांना फिटनेस चॅलेंज दिले. सायना आणि हृतिक रोशन यांनी हे आव्हान लगेच स्वीकारले. विराट कोहली याने हे आव्हान स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पत्नी अनुष्का शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांना ‘फिटनेस चॅलेंज’ दिले. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते आव्हान तेवढ्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारले. पण, पंतप्रधानांनी कोहलीचे आव्हान स्वीकारल्याचे पाहून त्यास फाटे कसे फोडता येतील, असा प्रयत्न विरोधकांनी आणि विशेषत: काँग्रेसने सुरू केला.
 
वास्तविक प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त राहिली तर देशही तंदुरुस्त राहील, हा सद्हेतू पुढे ठेऊन राज्यवर्धन राठोड यांनी ‘हम फिट तो इंडिया फिट’ या मोहिमेस गती दिली. पण, काँग्रेसने त्यातही राजकारण घुसडले. या मोहिमेचा धागा पकडून पंतप्रधानांना आव्हाने देण्याची विविध नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली. साहजिकच त्यात आघाडीवर राहिले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी. त्यांना सध्या सगळीकडे नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिसत आहे. देशात काहीही घडले तरी त्याचे खापर यापैकी कोणावर फोडावे, याचा शोध राहुल गांधी घेत असतात. तसेच त्यांनी यावेळीही केले.
 
पंतप्रधान मोदी यांनी विराट कोहलीला दिलेल्या आव्हानाकडे राजकीय चष्मा बाजूला ठेवून पाहण्याची खिलाडूवृत्ती राहुल गांधी यांना दाखविता आली नाही. त्यात त्यांनी राजकारण आणले. पेट्रोल, डिझेल यांच्या किमती कमी करून दाखविण्याचे आव्हान त्यांनी पंतप्रधानांना दिले. ते आव्हान न स्वीकारता आल्यास आपण देशव्यापी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. पण पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्या पाहिजेत, यादृष्टीने केंद्र सरकार प्रयत्न करीत नसेल का? तसेच जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे तो पाहून, सदैव देशाचाच विचार करणार्‍या मोदी यांना सुखाची झोप लागत असेल का? पण, विरोधक इतका सकारात्मक विचार करणार नाहीत. त्यांच्याकडून ती अपेक्षाही नाही!
 
राहुल गांधी यांनी दिलेले आव्हान लक्षात घेऊन त्यांच्या भाटांनाही सुरसुरी आली आणि त्यांनीही आव्हाने देण्यास प्रारंभ केला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधानांना, ”सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक तंदुरुस्त करा,” असे आव्हान दिले. तसेच ”रोजगार तंदुरुस्ती करून दाखवा,” असेही आव्हान दिले. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रीय लोकदलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वीप्रसाद यादव हेही मैदानात उतरले. लालूप्रसाद सध्या तुरुंगात हवा खात असल्याने त्यांची गादी तेजस्वीप्रसाद चालवित आहेत. त्यांनीही पंतप्रधानांवर तोफ डागली. तरुणांना रोजगार देण्याचे, शेतकर्‍यांना मदत करण्याचे, दलित आणि अल्पसंख्याक यांच्याविरुद्ध हिंसाचार होऊ न देण्याचे आव्हान त्यांनी पंतप्रधानांना दिले.
 
या आव्हाने देण्याच्या शर्यतीत इतके दिवस प्रकाशझोतात नसलेले काँग्रेस नेते दिग्विजयसिंह हेही उतरले आहेत. गेले सहा महिने तीन हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आता त्यांनी तोंड उघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन हजार किलोमीटर लांबीची नर्मदा परिक्रमा पायी करण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे. या दिग्विजयसिंह यांना पक्षात कोणी विचारत नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी आध्यात्मिकतेचा बुरखा पांघरून नर्मदा परिक्रमा करण्याचे ठरविले. ती परिक्रमा करून आपली पापे तरी धुवून निघतील, असा त्यामागील विचार असावा. पण, पंतप्रधानांना देश चालवायचा आहे. प्रत्येक क्षण देशासाठी खर्च करणार्‍या पंतप्रधानांना अशी आव्हाने कशी काय दिली जाऊ शकतात? आपण एक निरुद्योगी म्हणून सर्वांना तसेच समजून दिग्विजयसिंह चालले आहेत.
 
ही सर्व आव्हाने पाहता ‘हम फिट तो इंडिया फिट’ या चांगल्या मोहिमेचा विचका करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. काहीही करून भाजपला आणि नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करण्याचे विरोधकांनी ठरविले आहे. कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांनी अभद्र युती करून सत्ता मिळवून भाजपला दूर ठेवण्यात यश मिळविले असले तरी मोदी आणि भाजपला देश पातळीवर आव्हान देणे त्यांना जमणार नाही. आताच विरोधी आघाडीची सूत्रे कोणाच्या हाती असावीत, यावरून चर्चा रंगत आहे. मायावती, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांना आतापासूनच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. जनता दल नेते शरद यादव हे आघाडीबाबत भलतेच आशावादी दिसताहेत. आमच्या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे, हा प्रश्न आम्ही काही तासांतच सोडवू, असे त्यांनी म्हटले आहे. “१९७७ मध्ये आम्ही ऐक्य घडवून आणले,” असे सांगताना त्यावेळच्या जनता दलात जनसंघ पूर्णपणे सहभागी झाला होता, हे ते विसरतात. लोकशाही धोक्यात आल्याची, देशाची घटना संकटात सापडल्याची ओरड विरोधकांनी सुरू केली आहे. पण, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांची हुकूमशाही राजवट झुगारून देण्याच्या लढ्यात कोण आघाडीवर होते, हे शरद यादव विसरून गेले की काय? हुकूमशाही राजवट उलथवून टाकून त्याजागी लोकशाही स्थापन करण्यात मोठा वाटा असलेल्या आणि आज भाजपच्या रूपाने देश व्यापलेल्या पक्षास तुम्ही लोकशाहीविरोधी म्हणता? राजकारणात इतकी खालची पातळी ही नेतेमंडळी कशी काय गाठू शकतात? तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी आतापासूनच देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील, असे वक्तव्य करून आपले महत्त्व वाढविण्यास प्रारंभ केला आहे.
 
ज्या कर्नाटकमधील सरकारमुळे विरोधकांना हर्षवायू झाला, त्या सरकारला पुढे कशी सर्कस करावी लागणार आहे ते दिसण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. राज्यातील ६.५ कोटी जनतेशी माझी बांधिलकी नसून काँग्रेसशी आहे, अशी अगतिकता व्यक्त करून आपण स्वत: काहीच निर्णय घेऊ शकत नसल्याचे त्यांनी कबूल केले आहे. त्यामुळे तेथे पुढे काय होणार याची कल्पना आताच येऊ लागली आहे. देशात सध्या ‘नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सर्व विरोधक’ असा सामना चालू असल्याचे दिसत आहे. पण, त्यात विरोधकांची डाळ शिजत असल्याचे अजून दिसून येत नाही. केवळ विरोधासाठी विरोध करून कोणालाही, राष्ट्राच्या हिताचा सदैव विचार करणार्‍या विचारधारेस रोखता येणार नाही!
 
 
 
 
 
- दत्ता पंचवाघ

 
 
@@AUTHORINFO_V1@@