कुशल मनुष्यबळ घडविणे हे विद्यापीठाचे लक्ष्य !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018
Total Views |

शंतनुराव किर्लोस्कर अध्यासनाच्या कार्यक्रमात कुलगुरूंचे प्रतिपादन


 
 
पुणे : विद्यापीठाच्या सर्व विभागांद्वारे रोजगारप्रधान शिक्षणाचा विचार असतो. सध्या नोकऱ्या उपलब्ध असल्या तरी कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कौशल्यप्रधान तरुणाई घडवणे हे विद्यापीठाचे लक्ष्य असेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
 
शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शंतनूराव किर्लोस्कर अध्यासनातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात डॉ. करमळकर बोलत होते. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’चे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. आर. देशपांडे, अध्यासनाचे प्रमुख डॉ. (कॅप्टन) सी. एस. चितळे, अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नेहमी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्राधान्याने विचार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सचोटीने गुणवत्ताप्रधान व्यवसाय करणारे शंतनुराव किर्लोस्कर यांच्या नावे स्वतंत्र अध्यासन विद्यापीठात सुरू आहे. या अध्यासनाच्या वतीने व्यावसायिकता हा विचार म्हणून विद्यार्थी व समाजातील विविध घटकांमध्ये रुजावा याकरिता नवीन उपक्रम सुरू केला जात आहे, असेही डॉ. करमळकर म्हणाले.
 
प्र-कुलगुरू डॉ. उमराणी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना रोजगार मिळणे व व्यवसायाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. शिक्षण हे यशस्वी मार्गक्रमणा करण्यासाठीचे साधन आहे, त्याचवेळी सक्षम व्यावसायिक घडवणारे शिक्षण देणे ही जबाबदारी आहे. विद्यार्थी बाहेर पडल्यावर त्याला रोजगार मिळावा यासाठी विद्यापीठ काम करीत आहे. शंतनुराव किर्लोस्कर यांनी महाराष्ट्राला व्यवसाय करण्याचे स्वप्न दाखवले आणि प्रत्यक्षात दर्जेदार उत्पादने निर्मिती करणारा कारखानाही काढला. तसेच ध्येयनिष्ठ स्वप्न तरुणांनी बघितले पाहिजे. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या प्रयत्नात त्यांच्या सोबत राहील, असेही ते म्हणाले.
 
देशपांडे म्हणाले की, व्यावसायिक हा विविध कौशल्यांमध्ये प्रविण असावा हे शंतनुराव किर्लोस्कर यांच्या कार्यक्षमता व कार्यशैलीकडे बघून तरुणांना शिकता येईल. कंपनीतील प्रत्येक कामगार ते अधिकारी वर्गापर्यंत त्यांचे व्यक्तिगत लक्ष असायचे. त्यामुळे व्यावसायिक उभारणी करताना विश्वास संपादित करून आज किर्लोस्करचा वटवृक्ष उभारला आहे.
 
यावेळी मंचावर व्यवस्थापन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल पवार आणि डॉ. (कॅप्टन) सी. एस. चितळे उपस्थित होते. डॉ. प्रफुल्ल पवार यांनी विद्यापीठामधील नाविन्यपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला. सैनिकांना निवृत्तीनंतर व्यावसायिक उभारणी करता यावी यासाठी कालबद्ध त्रिस्तरीय मार्गदर्शन यंत्रणा शंतनुराव किर्लोस्कर अध्यासनाच्या वतीने उभारण्यात येत असल्याचे डॉ. चितळे यांनी सांगितले. कौशल्य विकास केंद्राच्या प्रमुख डॉ. पूजा मोरे यांनी नवव्यावसायिकांना आवश्यक मार्गदर्शन व कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण विद्यापीठाच्या वतीने देण्यात येईल असे सांगितले. आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने निवृत्त सैनिक व अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उद्योजकांसोबत व नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या उपस्थितांसोबत कमिन्स इंडियाचे माजी संचालक डॉ. एस. एस. पाटील, मिटकॉनच्या संचालिका डॉ. सायली गानकर, डिझाईन लर्निंग सिस्टीमच्या संचालिका डॉ. जयश्री फडणवीस यांनी चर्चा केली. या परिसंवादात व्यवसाय उभारणीतील आव्हाने आणि संधी यावर खुली चर्चा करण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@