प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलद्वारे बाहेर पाठवणाऱ्या विद्यार्थ्याला पकडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |

विद्यापीठाच्या तपास पथकाकडून एमआयटी महाविद्यालयात कारवाई

 
 
 
पुणे : एमआयटी महाविद्यालयात गेल्या बुधवारी परीक्षा सुरु असताना वर्गात मोबाईलवरून प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर पाठवणाऱ्या विद्यार्थ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पथकाने शनिवारी पकडले. हा खोडसाळपणा करणाऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध एमआयटी महाविद्यालयातर्फे पोलिसांत तक्रार देण्यात येत आहे. तसेच, याबाबत सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयाच्या हलगर्जीपणाबद्दल कारवाई करण्याच्या निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.
 
या प्रकरणी आदर्श रवींद्रन या विद्यार्थ्याला पकडण्यात आले आहे. तो पौड रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालयात इंजिनिअरिंग शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. तो पहिल्या वर्षाच्या ‘इंजिनिअरिंग मेकॅनिक्स’ या विषयात अनुत्तीर्ण झाला होता. त्याने गेल्या बुधवारी हा ‘बॅकलॉग’चा पेपर दिला. त्या वेळी त्याने हा खोडसाळपणा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नेमलेल्या तपास पथकाने ही कारवाई केली. गेल्या बुधवारी ‘इंजिनिअरिंग मेकॅनिक्स’ या विषयाचा पेपर सुरू असताना प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी हे पथक स्थापन करण्यात आले होते.
 
आदर्श हा मूळचा केरळचा आहे. त्याचे वडील लोणावळ्यात राहतात, तर तो स्वत: पुण्यात भाड्याने खोली घेऊन राहतो. याबाबतच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श हा पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्रावर १५ मिनिटे उशिरा पोहोचला. वर्गातील शिक्षकांची नजर चुकवून त्याने मोबाईल सोबत नेला. हा मोबाईल फोन त्याच्या मित्राचा होता. आत जाताच त्याने तातडीने प्रश्नपत्रिका घेतली आणि मोबाईल फोनवरून त्याची छायाचित्रे घेतली. ही छायाचित्रे वर्गाबाहेर पाठवून त्याने फोन पुन्हा बॅगेत ठेवून दिला.
 
विद्यापीठाचे तपासपथक शनिवारी आदर्शपर्यंत पोहोचले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला आहे. हा प्रकार एमआयटी महाविद्यालयात घडल्याने या महाविद्यायाकडून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात येत आहे. यासंदर्भातील माहिती सविस्तर अहवाल आल्यानंतर महाविद्यालयावर कारवाई करण्याबाबत परीक्षा विभाग निर्णय घेईल, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@