‘कालजयी सावरकर’ विशेषांकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |



नाशिक : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या अतुलनीय योगदानामुळे क्रांतिकारकांचे मुकुटमणी ठरलेल्या स्वा. सावरकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दै. मुंबई तरुण भारत’तर्फे आज सोमवार दि. २८ मे रोजी कालजयी सावरकर’ या विशेषांकाचे प्रकाशन नाशिक आणि ठाणे या दोन ठिकाणी करण्यात आले. नाशिकमध्ये या विशेषांकाचे प्रकाशन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या हस्ते तर ठाण्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक पुरुषोत्तम आगवण यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्राचा इतिहास केवळ शाईने लिहिला जात नाही तर क्रांतिकारकांच्या रक्त, घाम आणि अश्रूंनी लिहिला जातो, स्वातंत्र्य मिळाले नसून भारतीयांनी ते मिळविले, असे म्हटले पाहिजे. हेच स्वातंत्र्यवीर सावरकर नावाच्या झंझावाताने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले,” असे ठाम प्रतिपादन ख्यातनाम वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. मुंबई तरुण भारततर्फे नाशिक येथील शंकराचार्य संकुलात स्वा. सावरकर जयंतीनिमित आयोजित कालजयी सावरकर विशेषांका’च्या प्रकाशनप्रसंगी स्वा. सावरकर-एक झंझावातया विषयावर ते बोलत होते.व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, विशेषांकाचे अतिथी संपादक अक्षय जोग, नाशिक शहर संघचालक विजयराव कदम, मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार उपस्थित होते.

मुंबई तरुण भारतने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सभागृह भरूनदेखील श्रोते येताना दिसत होते. डॉ.शेवडे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून सावरकर यांची कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये सावरकरांची महती सांगून या स्फूर्तिप्रद इतिहासापासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे सांगून मुंबई तरुण भारतने प्रकाशित केलेल्या विशेषांकात तरुण नवे लेखक, तरुण संपादक, नवे वाचक यांचा मेळ जमल्याने सावरकरांचे कार्य तरुणांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

सावरकर यांनी ब्रिटिश सरकारची माफी एकदाही मागितली नव्हती. तसा कोणताही पुरावा आढळलेला नाही. तसेच गांधी हत्या खटल्यात त्यांना गोवण्यात आले होते, आजही विचारवंत म्हटल्या जाणार्‍या मंडळींना त्यांना नावे ठेवल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणजेच सावरकरांचे कार्य महान आहे, याची ती एक पावतीच आहे,” असे डॉ. शेवडे यांनी सांगितले. सावरकरांच्या जीवनातील विदेशी कपड्यांची होळी,

मार्सेलिस उडी, अंदमान कारागृहातील कष्ट, रत्नागिरी पर्व, भाषाशुद्धी अशा अनेक गोष्टींचा आढावा आपल्या खेळकर शैलीत घेत प्रसंगी सध्याच्या स्थितीवर मार्मिक भाष्य करीत त्यांनी त्या कार्यामुळेच आज हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले असून २०१९ मध्येदेखील हेच सरकार येईल, असे ठासून सांगितले.

निलिमाताई पवार यांनी दै. मुंबई तरुण भारत’च्या ’कालजयी सावरकरअंकाची प्रशंसा करून या अंकामुळे तरुणांना राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सावरकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले.

अक्षय जोग यांनी, हा अंक तयार करताना प्रामुख्याने तरुण वाचक आणि लेखक डोळ्यासमोर ठेवला होता,” असे स्पष्ट केले. संपादक किरण शेलार यांनी राष्ट्रकार्य करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी दै. मुंबई तरुण भारतचा विशेषांक उपयुक्त ठरेल,” असे सांगून भविष्यातदेखील असे कार्य करणार असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन दै. मुंबई तरुण भारत’चे नाशिक ब्युरो चिफ पद्माकर देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास रा. स्व. संघाचे शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, पश्चिम विभाग प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर, नाशिक शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष महेश दाबक आदींसह संघ परिवारातील आणि शहरातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे : सावरकरांची महती शब्दांत वर्णन करण्यासारखी नाही अरविंद जोशी


 

अवघ्या आठ वर्षांच्या वयात क्रांतीची घेतलेली शपथ, परदेशी कपड्यांची होळी, अभिनव भारतची स्थापना, स्वातंत्र्याला जागतिक पटलावरून सहमती, पाठिंबा आणि जोर मिळावा म्हणून लंडन, पॅरिसमध्ये केलेले काम, ब्रिस्टन ते अंदमान तुरुंगवास, स्थानबद्धता, रत्नागिरीतून केलेले समाजसेवेचे काम असा अद्वितीय प्रवास तितक्याच सादर होत असताना गडकरीच्या प्रेक्षागृहातील तमाम ठाणेकर सावरकरांच्या झंझावादात न्हाऊन निघाले. निमित्त होते ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘कालजयी सावरकर विशेषांका’च्या दिमाखदार प्रकाशनाचे आणि याप्रसंगी आयोजित ‘सावरकर : एक झंझावात’ या कार्यक्रमाचे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबई तरुण भारतया राष्ट्रवादी विचार मांडणार्‍या दैनिकाने आपली परंपरा कायम राखत एक संग्रही विशेषांक आज प्रकाशित केला. जिल्हा संघचालक अरविंद जोशी, प्रसिद्ध उद्योजक पुरुषोत्तम आगवण व व्यवसायप्रमुख रविराज बावडेकर यांच्या उपस्थितीत गडकरी रंगायतन येथे या अंकाचे प्रकाशन झाले. याचबरोबर नरेंद्र बेडेकर यांनी खास ’मुंबई तरुण भारत’साठी निर्मित केलेल्या ‘सावरकर - एक झंझावात’ या विलक्षण प्रेरणदायी कार्यक्रमाचे आयोजनदेखील यानिमित्ताने करण्यात आले होते. ‘मुंबई तरुण भारत’च्या मार्केटिंगच्या समूहाने आज ठाणेकरांना एक अनोखी भेट दिली. श्वेता वैद्य, आनंद वैद्य, सुधीर लवांदे आदी सहकार्‍यांनी आज नेत्रदीपक कार्यक्रम पार पाडला.

सावरकरांची महती ही शब्दांत वर्णन करता येण्यासारखी नाही, घरादारावर ज्या कुटुंबाने तुळशीपत्र ठेवले, असे कुटुंब भारताच्या इतिहासात दुर्मीळ असे आहे. आजच्या तरुण पिढीने सावरकरांच्या चरित्राचे पारायण करायला हवे,” असे सांगत प्रमुख अतिथी जिल्हा संघचालक अरविंद जोशी यांनी, सावरकर हे सामान्य माणसांच्या बुद्धीला झेपणारे व्यक्तिमत्त्व नाही, उत्तम वक्ता, कवी, भाषाशुद्धीकार, क्रांतिकारक, समाजसुधारक असलेले सावरकर कळणे खूपच कठीण आहे. आत्ताच्या पिढीला स्वातंत्र्याची किंमत माहीत नाही, ते फुकट मिळाल्यासारखे वाटते पण सावरकर जर अभ्यासले तर आपल्या पूर्वजांनी काय बलिदान केले ते कळेल,” असे सांगितले. सावरकरांचे आयुष्य सदासर्वकाळ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

कालजयी सावरकर विशेषांकाच्या प्रकाशनानंतर बोलताना पुरुषोत्तम आगवण म्हणाले की, थोड्या कालावधीत अफाट कर्तृत्व सावरकरांनी गाजवले आहे. एकीकडे चीनसारखी राष्ट्रे जग गिळू पाहात असताना आपल्याला आता सावरकरांनी सांगितलेला हिंदू राष्ट्रवाद प्रखरपणे पुढे नेला पाहिजे. सगळे विश्वच जर जगाला कुटुंब मानणार असेल तर आम्ही तर त्याच विचाराचे आहोत पण एकतर्फी बलिदान आम्ही करणार नाही. भारत ही ज्यांची पितृभूमी, मातृभूमी आहे, त्यांचे राष्ट्र हे भारत आहे. राष्ट्राप्रती पहिली निष्ठा तेच भारतीय,” हे सावरकरांचे तत्त्वज्ञान घेऊन चालले तर भारताचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे आगवण यांनी यावेळी सांगितले.

सावरकर-एक झंझावातकार्यक्रमाचा हा पहिला प्रयोग असला तरी कार्यक्रमाच्या सादरीकरणातील नेमकेपणा श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. नरेंद्र बेडेकर, अनुजा वर्तक, धनंजय म्हसकर, आरोह वेलणकर आणि समूहाने सादर केलेल्या या कार्यक्रमाने सावरकरांचा जीवनपट ताकदीने सादर केला. आ. निरंजन डावखरे यांच्यासह मोठ्या संख्येने ठाण्यातील मान्यवर व्यक्ती श्रोते म्हणून उपस्थित होत्या.


@@AUTHORINFO_V1@@