वृक्षप्रेमी सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |
 
 
 
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विविध पैलूने अनेकांना सुपरिचित आहेतच. क्रांतीकारक, समाजसुधारक, हिंदुत्त्वनिष्ठ, कवी वगैरे. असा एकही विषय नसावा ज्यात सावरकरांची दृष्टी पोहचली नाही. ते भविष्यकारही होते; अर्थात राष्ट्रीयदृष्ट्या. विवाहविषयक त्यांचे विचार यातही ते उणे पडले नाहीत. अशा सार्‍या पैलूत अधिक एक पैलू पडतोय तो मात्र अनेकांना अपरिचित असावा. तो पैलू म्हणजे पर्यावरण क्षेत्र. ह्या विषयासंबंधी सावरकरांची दखल घेतली गेल्याचे दिसत नाही.
 
 
आज पर्यावरणावर चर्चासत्र चालतात, परिसंवाद घेतले जातात. विविध कार्यक्रमातून उपक्रम राबविले जातात. ‘पर्यावरण दिन’ वृत्तपत्राच्या कागदावरच काय तो दिसतो. ‘झाडं लावा, झाडं जगवा’ घोषणा दिल्या जातात, संदेश दिला जातो. घोषणा फलक विद्यार्थी केवळ हातात घेऊन मिरवतात, त्या दिवसापुरता तो सोहळा साजरा होतो खरा; पण प्रत्यक्ष ‘वृक्षारोपण कृती’ मात्र फारशी दिसून येत नाही. झाडं ही राष्ट्रीय संपत्ती आहे याचं मोल थोड्याफार प्रमाणात आज जाणवू लागलं आहे व प्रसार केला जाऊ लागला आहे. सावरकरांसारखे दूरदृष्टीचे प्रणेते याही विषयात कृतीशील अग्रणी ठरतात. काळाजी पाऊलं ओळखणारे सावरकर मृत्यूनंतर मलाही विद्युत दाहिनीत घाला असं सांगत, ‘लाकूडफाटा बचाव’ या धोरणाची शिकवण देत, वृक्षतोड ही राष्ट्रीयहानी हे दर्शवतात. हा विचार, हा संदेश मौल्यवान नव्हे काय ..? सावरकर प्रचंड विज्ञानवादी ! झाडांवर, फुलांवर, पक्ष्यांवर अलोट प्रेम करणारे वीर सावरकर कितींना ज्ञात असावे! स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी असलेले सावरकर ‘अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकूनी जाती, अमर होई ती वंशलता’ अशा शब्दफुलांनी अनेक काव्यपंक्ती रचतात. देशाच्या स्वातंत्र्याचा विचार जेवढ्या दूरदृष्टिने, दिव्यदृष्टिकोनातून करतात तेवढाच झाडांसंबंधी, फुलांसंबंधी, लता-वेलींसंबंधी करताना आढळतात. याची साक्ष आजही त्यांनी लावले निंबोणीचा वृक्ष सावरकरांचे झाडांवरील असलेल्या विलक्षण प्रेमाची साक्ष देत तटस्थपणे ७३ वर्षांपासून उभा असून, ‘झाडं लावा, झाडं जगवा’ हा सावरकरी संदेश देत आहेत.
 
 
नाशिक येथे आधाराश्रमाच्या मागील बाजूला ‘तिवारी महल’ च्या प्रांगणात सावरकरांनी निंबोणीचं झाड २६ जुलै, १९३७ लावलं. त्या इवल्याशा झाडाचा आज वटवृक्ष झाला आहे. ‘झाडं लावा, झाडं जगवा’ या विचाराला सावरकरांनी विशेष प्राधान्य देवून बळ दिलेलं दिसून येतं.
 
 
तिवारी महलचे त्यावेळचे मालक किसनलाल चक्रपाणी उपाख्य के.सी.तिवारी, सावरकरांच्या कार्यावर अत्यंत खुश असून, त्यांच्या प्रभावाने सावरकरांचे जिवश्चकंठश्च मित्र बनले. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’च्या पाच संस्थापकांपैकी तिवारी एक होते. अनेकदा सावरकरांचा मुक्काम तिवारींच्या महला मध्ये असायचा. के.सी.तिवारींच्या घरी मुक्कामी असताना सावरकर नेहमीच झाडं व त्यांच्या पालनपोषणाविषयी चर्चा करीत. त्यातून तिवारींनाही प्रेरणा मिळाली. त्यात वड, औदुंबर, फणस, खिरण्या सारी झाडं सावरकर- तिवारी यांची साक्ष देताहेत. सावरकरांनी लावलेला निंबोणी वृक्ष मात्र तिवारी महलच्या दर्शनी भागात असून, जाणार्‍या येणार्‍यांचे लक्ष वेधून घेतोय !
 
 
त्या निंबोणी वृक्षावर सावरकरांनी २६ जुलै, १९३७ रोजी लावलेला वृक्ष असा फलक विशेष आकर्षण निर्माण करतोय. रस्त्याला अडचण होते म्हणून सावरकरांनी लावलेल्या निंबोणी वृक्ष तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. हे समजताच योगेश तिवारी अन् त्यांच्या वृक्षप्रेमी सहकार्‍यांनी सरळ नाशिक कोर्टात व नंतर हायकोर्टात धाव घेतली. सुमारे दीड दोन लाख रुपये खर्च केले, धावपळ केली, त्याकामी चंडालिया, नाझरे, अॅड.भावसार अन् तिवारी यांनी प्रयत्नपूर्वक प्राण पणाला लावून ते वृक्ष वाचवले, ही खरंच कौतुकास्पद बाब. त्या मंडळींचं हे खरं सावरकर प्रेम. ही खरी सावरकर भक्ती. ही सारी मंडळी सांगतात, ‘‘सावरकरांनी आम्हाला दिलेला हा अमोल ठेवा जपण्यातच आमची खरी सार्थकता आहे, सावरकरांच्या वृक्ष लागवड, वृक्ष प्रेमातून, आम्हाला मिळालेली प्रेरणा प्रसारित करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. हीच आम्हांकरिता खरी सावरकर स्मृती!’’ ही कृतीशील प्रेरणा स्फूर्ती देईलच देईल यात संदेह नाही.
 
 
 
- वीरेंद्र ल.देशपांडे
 
@@AUTHORINFO_V1@@