डोंबिवलीकरांनी घेतला अनोख्या मैफिलीचा आस्वाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |



डोंबिवलीः बगळ्यांची माळफुले, भेटी लागी जीवा, या चिमण्यांनो, सुन्या सुन्या मैफिलीत, असा बेभान हा वारा, या मराठी गीतांसह चुरा लिया है तुमने, अब तो है तुमसे, निले निले अंबर पर, ए मेरी जोहराजबी अशा हिंदी अजरामर गीतांचा अनोखा आस्वाद सतार वाद्य आणि तंतुवाद्याच्या माध्यमातून डोंबिवलीकरांनी रविवारी घेतला. निमित्त होते डोंबिवलीकर संदीप वैद्य यांच्या मातोश्री मालती वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मधुमालती इंटरप्रायझेस या संस्थेने सादर केलेल्या ’जुळल्या सुरेल तारा’ या कार्यक्रमाचे.

सुप्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सतारवाद्य व तंतुवाद्यांचा उपयोग करून एक अनोख्या संगीतमैफिलीचा आस्वाद डोंबिवलीकर संगीतप्रेमींनी घेतला. यामध्ये सतार, व्हायोलिन, स्वरलिन, गिटार व त्यांचे विविध प्रकार, मेंडोलिन या वाद्यांचा समावेश होता. सुप्रसिद्ध कलाकार विघ्नेश जोशी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून वादकांना बोलते केले तर वादकांनी त्यांच्या कलेतून वाद्यांना गाते केले. ज्येष्ठ कलाकार उमाशंकर शुक्ल यांनी सतारीची रचना, तसेच सतारवादनाची पद्धत आणि सतारीचा सिनेसंगीतात किंवा नाट्यसंगीतात कशाप्रकारे उपयोग केला गेला आहे, हे विशद केले तर ”बैय्या ना धरो’ आणि ’मधुबन मे राधिका’ या गाण्यांमध्ये प्रामुख्याने सतार हे वाद्य वापरले असल्याचे त्यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांना पटवून दिले.

महेश खानोलकर यांनी स्वरलिन या नवीन वाद्याची ओळख करून देत व्हायोलिन वाद्याबाबत व वादनाबाबत सखोल माहिती दिली. सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक श्रुती भावे यांनी आपल्या प्रभावी वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर लग जा गले, बगळ्यांची माळ फुले यासारखी गाणी व्हॉयोलिनवर सादर करताना क्षणभर रसिकांना गायक गात असल्याचा आभास निर्माण करून दिला.

गणराज रंगी या गणेशवंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याचबरोबर डोंबिवलीकर कलाकार मनीष कुलकर्णी व अमोघ दांडेकर यांनी गिटारवर चुरा लिया है तुमने, अब तो है तुमसे, निले निले अंबर पर, ए मेरी जोहराजबी, यांसारखी अनेक हिंदी चित्रपटातील अजरामर गीते सादर केली. मनीष यांनी मेंडोलिनवर अशा काही धून वाजवल्या, ज्या एखाद्या चित्रपटाची ओळख म्हणूनच आज प्रसिद्ध आहेत. किसी की मुस्कराहटो, पुकारता चला हूँ मै, घर आया मेरा, सोलह बरस की, दिल दिया है, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, एक दो तीन या धून वाजवून रसिकांची मने जिंकली. तसेच तंतुवाद्याचेही उत्तम वादन करण्यात आले.वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त ’जयोऽस्तुते’ या सावरकरांनीच लिहिलेल्या काव्याने आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@