स्वतः सोडलेला बाण स्वतःच्याच...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2018
Total Views |



“होय, ती ऑडिओ क्लिप माझीच,” असे म्हणत उद्धवजींनी सोडलेला बाण त्यांच्यावरच मुख्यमंत्र्यांनी उलटवला. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आपली मूळ आणि संपूर्ण ऑडिओ क्लिपही ऐकवली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे डोंगर पोखरायला निघालेल्या उद्धवजींच्या हाती मात्र उंदीरच आला.

एकदा पराभवाची खात्री पटली की, माणूस प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालघर पोटनिवडणुकीसंदर्भातली मोडतोड केलेली ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करणार्‍या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल असेच म्हणावे लागेल. पालघर पोटनिवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी आपण काहीतरी फार मोठा गौप्यस्फोट करत असल्याचा आव आणत देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली, ज्यात मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये विजय मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना साम-दाम-दंड-भेदाची नीती अवलंबण्याची सूचना केल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांच्या याच नीतीवर आक्षेप घेत आपण देवेंद्र फडणवीस आणि भाजपला कसे चिमटीत पकडले, अशा फुशारक्या मारत उद्धवजी सर्वत्र मिरवू लागले. सेनेच्या पेंगुळलेल्या सैनिकांनीही मग कसलाही विचार न करता आपल्या सेनापतीने जणू काही भाजपचा पराभवच केल्याच्या आवेशात वटवट करायला सुरुवात केली. पण, त्यानंतर घडलेल्या नाट्याने उद्धवजींच्या आरोपातली हवाच काढून घेतली. शिवाय, सेनेच्या पेंगू सैनिकांनाही चांगलेच पंक्चर केले.

उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांनी, “होय, ती ऑडिओ क्लिप माझीच,” असे म्हणत उद्धवजींनी सोडलेला बाण त्यांच्यावरच उलटवला. उद्धव ठाकरेंनी माझी ऑडिओ क्लिप मोडतोड करून प्रसिद्ध केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आपली मूळ आणि संपूर्ण ऑडिओ क्लिपही ऐकवली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे डोंगर पोखरायला निघालेल्या उद्धवजींच्या हाती उंदीरच आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या खुलाशामुळे तरी उद्धवजी वा त्यांचे पेंगू सैनिक सुधारतील, असे वाटले. पण तसे काही झाले नाही. उलट, उद्धवजी व त्यांच्या पेंगू सैनिकांनी त्याच डोंगर पोखरून शोधलेल्या उंदराच्या जीवावर टुणटुण उड्या मारायला सुरुवात केली. मात्र, अशा खोटेपणाच्या कितीही उड्या मारल्या तरी विजयाच्या दिशेने झेप घेता येत नाही, हे उद्धवजींनी चांगलेच लक्षात ठेवावे. तसेच घोडामैदान जवळ असलेल्या या लढाईत निकालाच्या दिवशी पराभवाच्या बिळात खाली मान घालून बसण्याची तयारीही त्यांनी सुरू करावी. कारण, जनता समंजस आहे आणि तिला कोण खोटारडेपणा करतो, कोण सत्य बोलतो, हे चांगलेच कळते.

दरम्यान, उद्धवजींनी त्याच त्या मोडतोड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणीही निवडणूक आयोगाकडे केली, पण मुख्यमंत्र्यांनीच जगासमोर सत्य मांडल्याने उद्धवजींची चांगलीच गोची झाली. तरीही आपली गोची झाल्याचे, मोडतोड करून ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केल्याचे कबूल करतील ते उद्धवजी कसले? ते उद्धव ‘ठकवणारे’ ठकवतच राहणार. म्हणूनच कुरतडलेली ऑडिओ क्लिप घेऊन आपल्या कडू झालेल्या तोंडाने ते आता मुख्यमंत्र्यांना मराठी शिकविण्याचे आव्हान देत फिरत आहेत. कदाचित, मराठी माणसाला वार्‍यावर सोडल्याने आणि इतरांचे खिसे भरण्याचे काम करून दाखवल्याने उद्धवजी मराठी विसरले असावेत. उद्धवजींनीही हे मान्य करावे, त्यांना मराठी शिकवण्याची व्यवस्था ही नक्कीच केली जाईल.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आवाजातली आणि मोडतोड केलेली ऑडिओ क्लिप शिवसेनेच्या एखाद्या फुटकळ नेत्याने प्रसिद्ध केली असती तर त्याचा एवढा बभ्रा झाला नसता. पण, शिवसेना पक्षप्रमुखांनीच आणि तेही मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप, मोडतोड करून प्रसिद्ध करणे, म्हणजे सेनेच्या मनातला पराकोटीचा भाजपद्वेष दर्शविणारीच घटना म्हटली पाहिजे. अमेरिका वा उत्तर भारतातल्या निवडणूक प्रचाराने अनेकदा खालची पातळी गाठल्याचे नेहमीच चर्चिले जाते, पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची मोडतोड केलेली ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करून आपणही प्रचारात अशी खालची पातळी गाठण्यात अजिबात कमी नसल्याचे दाखवून दिले. दिवंगत चिंतामण वनगांच्या मुलाला कपटाने आपल्या टोळक्यात ओढून शिवसेनेने मित्राच्या पाठीत खंजीर खुपसत आपला घाणेरडा स्वभाव तर आधीच दाखवला होता. आता मोडतोड केलेली ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करून आपला खोटारडेपणाही जगाच्या वेशीवर टांगला. बरोबरच आहे, शिवसेनेचा इतिहासच खोटारडेपणा आणि सर्वसामान्य जनतेला ठकविण्याचा आहे, त्यामुळे आताही त्यांनी तीच परंपरा जपली. खोटेपणाचा कळस गाठत मुख्यमंत्र्यांवरच बिनबुडाचे आरोप करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली.

शिवसेनेच्या खोटारडेपणाच्या, बिनबुडाचे आरोप करण्याच्या अनेक गोष्टी सांगता येतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कांगावा हा त्यातलाच प्रकार. गेल्या कित्येक वर्षांपासून हा कांगावा करतच शिवसेनेने मराठी माणसाला ठकवले, फसवले. शिवसेनेने मराठी माणसाचा कैवार घेतल्याचा आव आणत मराठी माणसालाच मुंबईबाहेर जायला भाग पाडले. आज मुंबई मराठी माणसाची’, असे म्हणताही येत नाही, त्याचे कारण हेच शिवसेनेचे खोटारडेपणाचे, ठकविण्याचे राजकारण कारणीभूत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक आली की, विकासाचे, खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन देत गेल्या २५ वर्षांपासून मुंबईकरांना चुना लावण्याचे कामही शिवसेनेनेच केले. आता हेच खोटे बोलून सर्वसामान्य जनतेला चुना लावण्याचे काम शिवसेनेला पालघरमध्येही करायचे आहे. म्हणूनच उद्धवजी धोतर्‍याच्या पानांचा तोबरा भरून पालघरभर उधळले. त्या उधळण्यातूनच मग मोडतोड केलेली ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करण्याचाही उद्योग त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह असे काहीही नसल्याचे सामान्य बुद्धीची व्यक्तीही सांगू शकते. साम-दाम-दंड-भेदाची नीती भारतात प्राचीन काळापासून वापरली जाते, त्याला ‘कूटनीती’ म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी तीच नीती अवलंबण्याची सूचना आपल्या कार्यकर्त्यांना केली, पण ज्यांना सत्तेच्या सोनेरी ताटातला मलिदाच दिसतो, त्यांना हे कसे माहिती असणार? त्यासाठी अभ्यासही असावा लागतो आणि फक्त आदेशावर चालणार्‍यांचा असा काही अभ्यास असण्याची शक्यता नाहीच. आता हा अभ्यास करण्यासाठी आणि मराठी शिकण्यासाठी उद्धवजींनी सैनिकांसह लवकरात लवकर शिकवणीच लावून टाकावी, म्हणजे अर्थ न समजल्याने तोंडावर आपटण्याची वेळ पुन्हा कधी येणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@