खेळांमधूनच व्यक्तिमत्व विकास शक्य : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2018
Total Views |

'मन कि बात'मधून तरुणांना आवाहन



नवी दिल्ली : 'खेळ हे पूर्वी मुलांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग होता, परंतु आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुले यापासून दूर जात आहेत. परंतु पारंपारिक खेळांमधूनच मुलांचा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास होतो. त्यामुळे लहान मुलांनी-तरुणांनी पारंपारिक खेळ खेळण्यावर भर दिला पाहिजे' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आकाशवाणीवरील आपल्या 'मन कि बात' या कार्यक्रमाच्या आजच्या ४४ व्या भागामध्ये ते बोलत होते.

देशात नव्याने सुरु झालेल्या 'फिट इंडिया' या मोहिमेविषयी बोलताना, व्यायामासह व्यक्तिगत जीवनातील खेळांचे महत्त्व त्यांनी सांगितले. खेळांमुळे मुलांमध्ये सांघिक वृत्ती वाढते, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या विचाराने योग्य निर्णय घेणे या सारख्या गोष्टी या खेळांमुळे मुलांच्या मनात रुजतात. परंतु दुर्दैवाने आज आपल्या देशातील लहान मुले आणि तरुण या खेळांपासून दूर जाऊ लागली आहेत. ज्याचे गंभीर परिणाम मुलांच्या बालपणावर पडण्याची शक्यता आहे. मुले जर खेळांपासून दूर राहिली तर भविष्यात फक्त खेळच नव्हे तर मुलांचे बालपण देखील नष्ट होऊ शकते.' अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच लहान मुलांनी आणि तरुणांनी मैदानी खेळ अधिक खेळावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अनेकांचे केले कौतुक

याचबरोबर देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या अनेकांचे कौतुक त्यांनी यावेळी केले. आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच 'सागरिका नाविक परिक्रमा' पूर्ण करून आलेल्या भारतीय नौदलातील सहा महिला अधिकाऱ्यांचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले. भारतीय नौदलातील या सहा महिला अधिकाऱ्यांनी अवघ्या जगाची परिक्रमा पूर्ण करून जगाचे नाव उंचावले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

याचबरोबर माउंट एवरेस्ट सर करणाऱ्या अनेकांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. नेपाळतर्फे एवरेस्टवर चढाई करणारी १६ वर्षीय भारतीय तरुणी शिवांगी पाठक, एवरेस्ट करनारी जगातील पहिली पिता-पुत्रीची जोडी असलेले अजीज बजाज आणि त्यांची कन्या दिया बजाज, देशात पहिल्यांदा चंद्रपूरमधील आश्रम शाळेतील मुलांच्या गटाने एवरेस्टवर केलेल्या चढाईचे पंतप्रधानांनी यावेळी तोंड भरून कौतुक केले. तसेच 'स्वच्छ गंगा अभियानांतर्गत एवरेस्ट सर करून त्याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले.

@@AUTHORINFO_V1@@