सावरकर व सामाजिक बंधुता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |

 
सावरकर प्रखर हिंदुत्ववादी असले तरी ते कधीही जातीयवादी नव्हते, उलट त्यांच्या साहित्यांतून, भाषणांतून वेळोवेळी जातीनिर्मूलन, समता, बंधुता यावर प्रकर्षाने भर दिलेला जाणवतो. त्यामुळे सावरकरांचे सामाजिक बंधुतेविषयी विचार उद्धृत करणारा हा लेख...
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताचा राज्यकारभार हा लोकशाही पद्धतीने सुरू झाला. भारत हा संविधानानुसार धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो. इथे मुस्लिमांना कायद्यानुसार समानतेची वागणूक दिली जाते, प्रत्येक जातीतील लोकांना संविधानानुसार सवलती दिल्या जातात. पण दुर्दैव इतके की, सद्य परिस्थिती पाहाता इथल्या प्रत्येक स्तरात धर्मवाद आणि जातीयवाद अगदी मुळापासून मुरलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक स्तरातील लोकांना इथे ‘तुझी जात कोणती?’ असे विचारले जात नाही. तरीही नेहमी हिंदूंनी न केलेला अन्याय मात्र इथे काही जातीयवादी लोकांच्या तोंडाने ऐकू येतो. २०१८ च्या प्रारंभी आंग्ल वर्षाची सुरुवात ही एका पूर्वनियोजित जातीयवादी घटनेने झाली. या घटनेमुळे गेले पाच महिने जातीयवादाचे राजकारण आणि हिंदूंवर नेहमीप्रमाणे होणारी टीका, या दोन गोष्टी नित्यनेमाने सुरु आहेत, असे म्हणायला हरकत नाही. २०१९ ची निवडणूक पाहाता आणि जातीयवादी लोकांनी सरकारला ठेवलेल्या नावाप्रमाणे हिंदू सरकारच्या भीतीमुळे वा सत्तेमुळे काही पुढारी मंडळीही सत्तेच्या लालसेपोटी जातीय दंगली करण्यात पुढारली आहेत.
 
 
 
मग अशा परिस्थितीत आठवण होते ती, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हातात सत्ता नसताना, कुठल्याही प्रकारचा आर्थिक स्वार्थ नसताना, कुठल्याही प्रकारचा राजकीय पाठिंबा नसताना, परकीयांची सत्ता आपल्यावर असतानाही समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जातीतील लोकांना ‘हिंदू’ म्हणून जगायला शिकवणार्‍या तसेच स्वातंत्र्यासाठी मरायला शिकवणार्‍या एका नेतृत्वाची! राजकीय स्वार्थ वा जातीयवाद म्हणून नेहमी या नेतृत्वाकडे मात्र दुर्लक्ष केले गेले. भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे काही केवळ अहिंसा चळवळीने नाही, तर रक्ताचे पाट वाहून मिळाले आहे. पण, केंद्रस्थानी आले ते अहिंसावादी नेते आणि दुर्लक्षित झाले ते क्रांतिकारक. पारतंत्र्य हे केवळ इंग्रजांच्या तावडीतून नव्हे, तर जातीभेदाच्या तावडीतूनही नष्ट करण्याचे कार्य या नेतृत्वाने केले. पण, महाराष्ट्र मात्र ‘शाहू-फुले-आंबेडकर’ इतकाच मर्यादित राहिला. ‘टिळक-गोखले-आगरकर’ आणि अनेक असे समाजसुधारक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून मात्र जाणीवपूर्वक बाजूला केले जात आहेत. असाच एक ‘क्रांतिसूर्य’ जातीयवादाने म्हणा किंवा राजकारणाने म्हणा अंधारात गेला. ज्या सूर्याने संपूर्ण हिंदूंना सुधारणेचा प्रकाश दिला. महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या जातिव्यवस्थेवर कडाडून टीका करणारे, भारताच्या स्वातंत्र्याचे खर्‍या अर्थाचे प्रणेते, क्रांतिकारक व हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकर मात्र सोयीनुसार बाजूला सारले गेले. आज भारताची सद्यस्थिती पाहाता या विखुरलेल्या जातीयवादी समाजाची विस्कटलेली घडी बसवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती तात्याराव सावरकर उर्फ स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांमध्ये आहे.
 
भारतीय सशस्त्र क्रांतीचे प्रणेते तसेच भारतमातेची उपासना तात्यारावांनी शस्त्रांनी केली असे म्हणायला हरकत नाही. या त्यांच्या त्यागाचे स्वरूप पाहाता खर्‍या अर्थी ते भारताचे ‘स्वातंत्र्यवीर’ ठरले. त्यांच्या या कार्यामुळेच तात्याराव सावरकर हे जगभरात ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर’ या नावाने ओळखले जाऊ लागले. तात्यारावांनी प्रत्येक जातीतील लोकांना ‘जात’ म्हणून नाही, तर ‘हिंदू’ म्हणून जगण्याची शिकवण दिली. तसेच, ‘हिंदू’ म्हणून लढण्याचेही शिकवले. पण, भारताचे दुर्दैव इतके की, जातिभेद नष्ट करणार्‍या या व्यक्तीला मात्र ‘ब्राह्मण’ म्हणून समाजातून दुर्लक्षित केले गेले.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनेक छटा आहेत. ते सशस्त्र क्रांतीचे प्रणेते होते, ते हिंदूसंघटक होते तसेच ते समाजसुधारक होते. तात्यारावांना अनेकांनी जवळ केले. मात्र त्यांची सनातनी टीका पाहून, पण ही टीका करताना त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही, तर जातीयव्यवस्थेवर टीका करून, त्यांना हिंदू म्हणून आत्मसात करा हे तत्त्व शिकवले.
 
आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका ।
पितृभू:पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
 
तात्यारावांच्या या व्याख्येत सांगायचे झाले तर, “हिंदू म्हणजे जो जो कोणी सिंधू नदीपासून हिंद महासागरापर्यंत पसरलेली ही भारतभूमी, आर्यभूमी आपली पितृभूमी, नि पुण्यभूमी मानतो नि अधिकाराने तसे सांगू शकतो, तो तो हिंदू.” या तात्यारावांच्या व्याख्येनेच सर्व जातीतील लोकांना ‘जात’ म्हणून नाही, तर ‘हिंदू’ म्हणून बांधले. क्रांती घडवायची असेल तर समाजानुसार बदलणारे अनेक आहेत, पण खरा हिरा कोण असेल तर तो समाजपरिवर्तन करणारा. या प्रमाणे तात्यारावांनी धर्म न सोडता समाजपरिवर्तन केले. हिंदू धर्मातील जातिव्यवस्था नष्ट केली पाहिजे. राष्ट्र म्हणून टिकायचे असेल, तर भक्तिभावात बुडून नव्हे, तर विचारशील आणि वैज्ञानिक तत्त्वावर आधारित बदल त्यांना अपेक्षित होता आणि म्हणूनच त्यांनी पोथीनिष्ठेचा त्याग करायला सांगितला. त्यातील अनिष्ट प्रथांचा त्याग करायला सांगितले. मात्र, फक्त हिंदूंना नव्हे, तर इतर धर्मीय लोकांनाही हा संदेश दिला. पण, लोकांनी मात्र जातीविरोध लक्षात न घेता सनातनी विरोध लक्षात घेतला. या बदलाची सुरुवात त्यांनी रत्नागिरी येथे केली. अंदमानातून त्यांना रत्नागिरीत स्थलांतरित केले. तेथे खर्‍या अर्थी जातिभेदाविरोधात त्यांचे कार्य सुरू झाले. तात्याराव आपल्या एका कवितेच्या सुरुवातीला म्हणतात, ‘निज-जाती छळाने हृदय का न तळमळते? तुम्ही तरुण, शिरांतून रक्त नवे सळसळते.’ या ओळीप्रमाणे त्यांनी तरुणांना संघटित केले. हिंदूंना एकजीव करायचे असेल तर चातुर्वर्ण्य नष्ट केले पाहिजे. अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध केला. असे करताना त्यांनी लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही, पण हिंदू कूस मात्र सावरली, त्यातील आचार व विचार सावरले.
 
अस्पृश्यांना पाचशेहून अधिक मंदिरे त्यांनी खुली केली. पण, त्यांनी केलेल्या पोथीनिष्ठा विरोधाला मात्र काहींनी नास्तिकतेची व्याख्या दिली. त्यांना समाजात अनिष्ट प्रथा नको होत्या, पण धर्म हवा होता. भक्ती करणे हे चुकीचे नाही, देव पूजणे हे चुकीचे नाही, तर तो केवळ काहींनी पूजावा व काहींनी पूजू नये हे चुकीचे आहे, देव सर्वांनी पूजावे, पण सद्य परिस्थितीमध्ये जातीयवादी लोकांनी मात्र देवावर बहिष्कार टाकला आहे. इथे खर्‍या अर्थी हिंदुनिष्ठ सावरकर आपल्याला हवे आहेत. लेखक जयेश मेस्त्री त्यांच्या ‘तहानलेले सावकर’ या लेखामध्ये एक प्रसंग सांगतात. एकदा एका सभेमध्ये एक महार युवक आला व तो सावरकरांना म्हणाला, “तुम्ही अस्पृश्योद्धाराचे कार्य वगैरे करीत असता, तर तुम्ही माझ्या हातचं पाणी पिऊ शकता का?” सावरकर उत्तरले, “होय. का नाही? जा पाणी घेऊन ये.” त्या युवकाने पाणी आणले व सावरकर ते सहज प्यायले. कारण, ब्राह्मणाने दिलेले किंवा महाराने दिलेले, पाणी हे पाणी असतं आणि सावरकर ब्राह्मण व दलित यामध्ये भेदभाव करीतच नसत. त्यामुळे त्या महार युवकाच्या हातचे पाणी पिताना त्यांना काहीच वेगळे वाटले नाही. पण, सावरकरांनी त्या महार युवकाला सांगितले की, “तू एका चांभार मुलाच्या हातचे पाणी पिऊ शकतोस का?” त्यावर तो महार युवक म्हणाला, “नाही, नाही. मी त्याच्या हातचे पाणी पिणार नाही. कारण, माझी जात उच्च आहे.” म्हणूनच सावरकर गंमतीने म्हणतात, “हिंदूंमधील शेवटची जात कोणती? हे कळतंच नाही. कारण, प्रत्येक जातीला वाटतं की, या अमुक अमुक जातीपेक्षा माझी जात उच्च.”
 
स्वातंत्र्यवीरांची नीती आजही जातीयवादी नेते व काही जातीवादी मंडळी नाकारतात. पण, सद्यस्थितीत देशात विकास महत्त्वाचा असेल तर सामाजिक बंधुता जोपासणे आवश्यक आहे. पण, ती केवळ एका जातीने नव्हे, सर्व जातींनी जोपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी हा समाज एकत्र व्हावा म्हणून केवळ ‘जात’ हे ध्येय न ठेवता ‘अखंड हिंदुस्थान’ हे ध्येय ठेवले. त्यासाठी त्यांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. या अंतर्गत सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे शिवजयंती, गणेशोत्सवही लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन सर्व जातीतील लोकांना एकत्र आणले. त्याचे पुढे ‘अभिनव भारत’ या संघटनेत रूपांतर करून, ही तरुण मंडळी देश कार्यासाठी उतरवली. तसेच त्यांनी आंतरजातीय विवाह ही पद्धतही सुरू केली. त्यांची ही सामाजिक शिकवण आजच्या घडीलाही लागू पडते. त्याचप्रमाणे तुम्ही सनातनी असा, तुम्ही वैदिक असा, नास्तिक असा, पण त्या विचारामध्ये तुम्ही हिंदू आहात आणि हिंदू म्हणून कार्य करा, कारण एकसंघ असाल, तर आपले राष्ट्र टिकेल, हे विचार त्यांनी मांडले. सावरकरांचे हे विचार केवळ समाजहित नव्हे, तर राष्ट्रहितालाही अत्यंत पोषक आहेत.
 
सावरकरांच्या मते, “स्त्री ही अबला नसून सबला आहे. तिने आपल्या पतीसमवेत राष्ट्र रक्षणासाठी कार्य करावे, लढण्यासाठीही पुढे धजावे,” असे त्यांना वाटे. त्यांना स्त्री-पुरुष हा भेदच मान्य नव्हता. मुळात स्त्रीने स्वतंत्र जगावे अशी त्यांची धारणा होती. त्याचप्रमाणे त्यांचे गायीविषयीचे विचारही जाणून घ्यायला हवेत. त्यांनी गोपूजनापेक्षा गोपालन करावे असे सांगितले. परंतु, त्यांनी सांगितलेल्या गाय हा एक उपयुक्त पशू आहे, या विचारावर मात्र “गोहत्या करा किंवा गोमांस खा असे सावरकर म्हणतात,” असे धादांत खोटे पसरवले जाते. विरोधकांनी कधी जातिविरोधी आणि धर्मनिरपेक्ष सावरकर स्वीकारले नाहीत. सावरकरांनी गायीचा कृषी क्षेत्रात उपयोग व्हावा, त्यांची जागा ही रस्त्यात गायीला दर्शनाला उभं करून, पैसे कमवण्यासाठी नाही, तर कृषिप्रधान देशाला कृषी व्यवसायात समृद्ध करण्यासाठी आहे.
 
सावरकरविचार हे सद्यस्थितीत विविध अंगांनी पण प्रामुख्याने सामाजिक हित व बंधुता यासाठी नक्कीच पोषक व पूरक आहेत. काही वेळा त्यांना ‘ब्राह्मण’ म्हणून दूर केले जाते. काहींनी तर केवळ पोथीत्याग घेतला. पण, सद्य परिस्थितीत सावरकर आपलेसे करणे हे जातीयवादी मंडळींना न पचण्याजोगे आहे. तात्यारावांच्या भाषेत सांगायचे तर, “हिंदुस्थान जी आमची पितृभू नि पुण्यभू आहे, ती काही पृथ्वीतल्या दुसर्‍या कुठल्या भूमीहून पूर्णपणे विसदृश्य भूमी म्हणून नव्हे, तर तिचा आमच्या इतिहासाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. तसेच ती आमच्या वाडवडिलांचे पिढ्यान्पिढ्यांचे घर आहे की ज्यात आमच्या मातांनी पिढीपिढीला आपल्या हृदयाशी धरून आम्हाला पहिले स्तन्य पाजिले नि आमच्या पित्यांनी आपल्या मांड्यावर घेऊन आम्हाला थोपटले, या कारणांमुळेच होय.” या विचारांमुळेच समाजसुधारक, हिंदुसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकर आजही राष्ट्रहिताच्या दृष्टीने, सामाजिक सलोख्यासाठी गरजेचे आहेत. देहाने नसले, तरी त्यांचे विचार हे जिवंत असणे गरजेचे आहे.
 
 
 
 
 
- नेहा सुनील जाधव, दिवा  (8692051385)
@@AUTHORINFO_V1@@