सावरकरांचा मानवतावाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ओळख सर्वांना प्रखर राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी म्हणून आहेच. पण, या राष्ट्रवादाच्या मुळाशी ‘मानवतावाद’ दडला आहे, हे फार जणांना ठाऊक नसते. याच तथ्याची उजळणी आज आपण करणार आहोत.
 
‘माझ्या आठवणी’ या आपल्या आत्मचरित्रात सावरकर म्हणतात, “आमची खरी जात मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानव धर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर.” (समग्र सावरकर वाड्मय खंड १- पृष्ठ २४८)
 
अंदमानात हालअपेष्टा सहन करीत असताना, दर वर्षाला एकच पत्र लिहायची अनुज्ञा होती. त्या भीषण परिस्थितीतही ते लहान भावाला लिहितात- “ज्यात सर्व मनुष्यजातीचा समावेश होईल आणि जेथील एकूण एक स्त्रियांना आणि पुरुषांना ही पृथ्वी, हा सूर्य, ही भूमी आणि हा प्रकाश हीच मनुष्याची खरी पितृभूमी आणि मातृभूमी आहेत. यापासून मिळणार्‍या लाभासाठी प्रयत्न करण्याचा आणि त्यांचा उपभोग घेण्याचा समान अधिकार राहील, असे संपूर्ण जगाचे एक राष्ट्र हे आमचे ध्येय आहे आणि त्यावर आमचा विश्वास आहे. इतर सारे विभाग आणि भेद अवश्य असले तरी कृत्रिम आहेत. ज्याप्रमाणे पेशींचे रूपांतर व्यक्तिपिंडात होते, व्यक्ती कुटुंबात विलीन होतात आणि संघाची राष्ट्रे बनतात, त्याप्रमाणे सर्व राष्ट्रे ज्याच्यात एकरूप होऊन जातील असे विश्वराष्ट्र स्थापन करणे, हेच सर्व राजकीय शास्त्र आणि कला यांचे ध्येय आहे किंवा असावयास पाहिजे.” (अंदमानच्या अंधेरीतून, पृष्ठ १९)
 
अगदी ज्या पुस्तकावर न वाचताच सावरकरविरोधक ‘जातीयवादी’ समजून तुटून पडतात, त्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथातही समारोप करताना सावरकर लिहितात, “माझा स्वदेश? ऐका तर बंधूंनो! माझ्या देशाच्या मर्यादा म्हणजे त्रैलोक्याच्या मर्यादा, तीच माझ्या देशाची सीमा! तुकाराम आणि बुद्धाचा हवाला देऊन, आम्हास कुणासही अकारण दुखवायचे नाही,” असे या ग्रंथात आवर्जून सांगतात.
 
वरील मानवतेच्या ध्येयाचा उच्चार सावरकरांनी अगदी हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरूनसुद्धा वारंवार केला आहे- “खरे बोलावयाचे म्हणजे पृथ्वी हीच आपली मातृभूमी आणि मानवजाती हेच आपले राष्ट्र होय.” (१९३७, कर्णावती)
 
“हेही खरेच आहे की, एकच मानवी राज्य, सर्व मनुष्यजात हे त्यातील नागरिक नि पृथ्वी ही त्यांची मातृभूमी असेच ध्येय राजकारणाचे असावयास पाहिजे. अखिल मानवजातीच्या एक पंचमांशाने असलेला हा सर्व हिंदुस्थान धार्मिक, वांशिक आणि सांस्कृतिक भिन्नभावाचा विचार न करता त्या सर्वांना एकात्म गटात बुडवून एक झाला, तर ते सर्व मानवजातीने एक मोठे पाऊल टाकले असे होईल.” (१९३८, नागपूर)“पृथ्वी हाच आपला देश व मानव्य हाच आपला धर्म ही भूमिकाही ध्येय म्हणून मला मान्य आहे.” (१९४३, एकसष्टी समारंभ)
 
“पृथ्वी ही आमची खरी मातृभूमी आहे. मानवजात आमचे राष्ट्र आहे आणि समान अधिकार, समान कर्तव्ये यांच्यावर अधिष्ठित असलेले अखिल मानवी सरकार हेच आमचे अंतिम साध्य असले पाहिजे.” (१९४४, कौनवे जागतिक बंधुभाव संस्थेच्या अधिवेशनास पाठवलेला संदेश)
 
१९४७ ला ’वर्ल्ड’ या पत्राचे संपादक गाय आल्ड्रएड यांना पाठवलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, ‘‘आताही या लहानशा पत्रात एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. माझ्या अलीकडील लेख नि भाषणांवरून आपणाला वाटेल की, मी आता संकुचित राष्ट्रवादी झालो आहे. मानवाची प्रगती राष्ट्रवाद नि संघराज्य या मार्गाने व्हावी, असे माझे मत असले तरी या सर्वांचे म्हणजेच मानवजातीचे राजकीय ध्येय मानवता हेच असले पाहिजे, राष्ट्रवाद हे असू नये. सर्व राजकीय कला आणि शास्त्र यांचे अंतिम ध्येय मानवराज्य हेच असले पाहिजे, पृथ्वी हीच आपली माता नि मानवजात हेच आपले राष्ट्र. असे असले, तरी या लहानशा पत्रात एवढेच सांगायचे की इतिहासाच्या कालक्रमानुसार सध्या मला माझी सर्व शक्ती सापेक्ष अशा हिंदुसंघटन आणि हिंदुराष्ट्र कार्यासाठी लावावी लागत आहे. हे कार्यही मानवराज्य ध्येयाचीच एक पायरी आहे.
 
“The India in my dream would have unbounded faith in a world commonwealth because the earth is the common motherland of all.''
 
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “सावरकरांची तत्त्वमीमांसा निरपवादपणे मानवतावादी आहे, हिंदुत्ववादी नाही.” (सावरकर स्मारक ग्रंथ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पृष्ठ ४४)
 
धनंजय कीर म्हणतात, “राष्ट्रवाद हे मानवतेच्या मार्गावरचे पाऊल आहे आणि अखिल मानवराज्य हेच मानवाचे ध्येय आहे अशी सावरकरांची श्रद्धा होती.” (स्वा. सावरकर, धनंजय कीर, पृष्ठ २०२)
 
मानवतावादाची ही उच्चतम पायरी गाठण्यासाठी आधी सर्व राष्ट्रांना एका पातळीवर आणणे आवश्यक होते. भारतास प्रगत राष्ट्रांच्या पातळीवर नेण्यासाठी भारतातील सर्व समूहांना विज्ञाननिष्ठ बनवून, एका पातळीवर आणणे आवश्यक होते. एकाच लेखणीच्या फटकार्‍यात हिंदू व मुसलमान दोघांनाही सावरकर ‘विज्ञाननिष्ठ’ बनण्याचा सल्ला देत होते. पण, त्यावेळेस भारतातील प्रमुख राजकीय पक्ष मुस्लीम बांधवांच्या अंधश्रद्धांना कुरवाळत होता. हे मानवतेसाठी घातक होते. यासाठी सावरकरांनी मुस्लिमेतरांना ‘हिंदू’ या नावाखाली एकत्र संघटित करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांचे शत्रुत्व मुस्लीम माणसाशी नसून, इस्लामच्या नावावर चालणार्‍या अमानवीय तत्त्वांशी होते. भावनेच्या ओघात सावरकरांची लेखणी कुठे घसरलीही असेल, पण त्यांचे मूळ ध्येय मानवता हेच होते हे वरील त्यांच्या लहानपणापासून ते अगदी मृत्यूपर्यंतच्या काळातील समान उद्गारांवरून दिसून येते.
 
डॉ. वि. म. शिंदे आणि आ. ग. साळवी यांनी सावरकरांच्या वैयक्तिक आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यात सावरकरांच्या मानवतावादी वर्तनाची अनेक उदाहरणे सापडतात. साळवी म्हणतात, “ते एकदा बोटीने सावरकरांसोबत प्रवास करत होते. बोटीचा नाविक मुसलमान होता. तो सावरकरांना पाहून घाबरला, पण सावरकरांनी त्याला जवळ बोलावून घेतले व त्याच्यासोबत एका ताटात जेवण केले.”
 
रत्नागिरी हिंदू सभेच्या प्रतिवृत्तात ४० पाने सावरकरांनी दलित मुलांच्या शाळाप्रवेशासाठी केलेल्या कार्याच्या वर्णनासाठी खर्च केली आहेत. वारंवार माणुसकीचे आवाहन सर्व धर्मीयांना करून, सावरकरांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या शंभर टक्के शाळांमध्ये दलित मुलांना प्रवेश मिळवून दिला आणि एवढेच नव्हे तर त्यांना इतर मुलांसोबत सरमिसळ बसवले. यापेक्षा अधिक मानवतेचे उदाहरण ते काय द्यावयाचे?
 
अंदमानात शेवटी शेवटी सावरकरांकडे कोलूच्या मुकादमाचे काम होते. परंतु, त्यांनी आपल्याला पूर्वी परधर्मीयांकडून मिळालेल्या अमानुष वागणुकीचा कधीही बदला घेतला नाही किंवा हिंदू-मुसलमान असा भेद कैद्यांमध्ये केला नाही.
 
कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सावरकरांचे रत्नागिरीतील कार्य पाहून म्हणाले, “रत्नागिरीतील सामाजिक मतपरिवर्तनाची बारीकरीतीने जी पाहणी केली, तीवरुन मी नि:शंकपणे असे सांगतो की, येथे घडत आलेली सामाजिक क्रांती खरोखर अपूर्व आहे. सामाजिक सुधारणेचे कार्य मी जन्मभर करीत आलो. ते किती कठीण, किती किचकट, मीदेखील मधून मधून निरुत्साह व्हावे असे चेंगट कार्य अवघ्या सात वर्षांत रत्नागिरीसारख्या, अगदी रेल्वे-टेलीफोनचे तोंड न पाहिलेल्या सोवळ्यांच्या बालेकिल्ल्यात तुम्ही हजारो लोक जन्मजात अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यास सजला आहात आणि भंगीप्रभृती धर्मबंधूंबरोबर बेखटक, सहासन, सहपूजन, सहभोजन सारे सामाजिक व्यवहार प्रकटपणे करत असताना मी पाहत आहे. याचा मला इतका आनंद झाला आहे की, हे दिवस पाहण्यास मी जगलो हे ठीक झाले असे मला वाटते. मी कुणाचा भाट होऊ इच्छित नाही. पण, या स्वातंत्र्यवीराने आपल्या अज्ञातवासाच्या अवघ्या सात वर्षांत ही सामाजिक क्रांती घडवून आणली, त्या बॅ. सावरकरांचा किती गौरव करू असे मला झाले आहे. कालपासून तुम्ही हजारो नागरिक विशेषत: ही तरुण पिढी त्यांचेवर जो निस्सीम विश्वास ठेवीत आहात, तो मी पाहत आहे. पण त्या तुम्हा साऱ्या तरुणांमध्ये खरा तरुण जर कोण मला दिसत असेल तर तो निधड्या छातीचा वीर सावरकर होय! मला असे म्हटल्यावाचून राहवत नाही की बरे झाले हा अज्ञातवास आला! नाही तर ही सामाजिक सेवा करण्यास ही स्वारी उरली असती की नाही हीच शंका आहे. सावरकर बंधूंविषयी आम्हास प्रथमपासूनच फार आदर वाटे. म्हणून त्यांना भेटण्यासाठीच मुख्यत्वेकरुन इथे आलो आणि त्यांनी चालविलेली ही सामाजिक क्रांतीची यशस्वी चळवळ पाहून इतका प्रसन्न झालो आहे की, देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांसच द्यावे! कारण माझे अपुरे राहिलेले हेतू पुरवील तर हा वीरच पुरवील असे मला वाटत आहे. सरकारने त्यांस या सामाजिक कार्यापुरते तरी मोकळे सोडावे अशी खटपट सर्व स्पृश्यास्पृश्यांच्या नि सुधारकांच्या वतीने करावी असे राजभोजांचे नि माझे ठरले आहे.” (सत्यशोधक ५.३.१९३३)
 
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांना दरडोई एक मत नव्हते. सावरकरांनी या तत्त्वाचा हिरीरीने पुरस्कार केला. हिंदू महासभेच्या हिंदुराष्ट्रात संसदेच्या आत धर्म, जात, वंश यावरून कसलाही भेदभाव राहणार नव्हता, मुस्लीम बांधवांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रांत आरक्षण मिळणार होते. जोवर मानवतेच्या आड येत नाही, त्या हद्दीपर्यंत त्यांचा धर्म पाळण्याची संस्कृती जोपासण्याची मुभा त्यांना राहणार होती. सर्वच धर्माच्या लोकांनी विज्ञाननिष्ठ बनावे, भारताला प्रगतीकडे न्यावे, भारत सबळ झाला की त्याने अन्य राष्ट्रांना मानवतेचे धडे द्यावेत आणि संपूर्ण पृथ्वीचे मानव्याचे स्वराज्य बनवावे, अशीच कल्पना सावराकरांनी ‘हिंदुत्व’ या ग्रंथात मांडलेली आहे. पण, त्यांनी इस्लाममधील अमानवीय गोष्टींना केलेला विरोध हा जातीयवाद मानण्यात आला. हिंदू जेते मुस्लीम जेत्यांप्रमाणे का वागले नाहीत, ही हिंदू भगिनींच्या मनात आलेली प्रतिशोधाची भावना कागदावर उतरवल्याने ती सावरकरांच्याच मनातली भावना आहे, असा विरोधकांद्वारे सपाटून प्रचार करण्यात आला. या सर्व गदारोळात सावरकरांचे मूळ मानवतावादी विचार हेतुपुरस्सर झाकोळून टाकले गेले आहेत. वस्तुत: हिंदू व मुसलमान हे भेदच नष्ट झाले पाहिजेत, असा सावरकरांचा आग्रह होता. (समग्र सावरकर साहित्य खंड १- पृष्ठ ३४६)
 
“केवळ मानवताच नव्हे, तर भूतदया हेच हिंदुराष्ट्राचे ब्रीद आहे,” असे सावरकरांनी म्हटलेय. (हिंदू सभा प्रतिवृत्त, भाग १- पृष्ठ २)
 
“रुढीच्या कातडीवर जमलेली मनाची किल्मिषता प्रेमाने दूर करण्यात आली,” (पृष्ठ ११) असे सावरकरांच्या सामाजिक कार्याचे वर्णन करण्यात आले आहे.
 
‘सर्व भूत हिते रति:’ हे हिंदू धर्माचे ध्येय आहे. परधर्माचा हिंदू धर्म कधीही द्वेष करीत नाही, असे म्हणून दसर्‍याच्या दिवशी सावरकरांनी परधर्मीयांना सोने वाटलेले आहे. (पृष्ठ १४)
 
“सर्व धर्मीयांशी प्रेमाने वागण्याचा उपदेश सावरकरांनी आम्हाला दिला आहे,” असे १९२६च्या हिंदू सभा प्रतिवृत्तात नमूद आहे. (पृष्ठ ३७)
 
आपल्याला मानधन म्हणून मिळालेले धन सावरकरांनी अनेक बुडत्या कंपन्यांत गुंतविले. त्या कंपन्या बुडणार आहेत याची त्यांना कल्पनाही होती, परंतु तरुणांच्या उद्योजक वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तसे केले. (सावरकरांशी सुखसंवाद, पृष्ठ २९)
 
रत्नागिरीत असताना त्यांनी अनेक गरीबांना व दलितांना स्वत: आर्थिक भार सोसून व्यवसाय चालू करण्यास मदत केल्याचे आढळून येते.
 
अशी एक ना अनेक उदाहरणे घेऊन सावरकरांचा मानवतावाद आपल्याला समजून घेता येतो. एका समाजाच्या हिताचा बळी देऊन दुसर्‍या समाजाचे फालतू लांगूलचालन करण्याचा भोंगळ मानवतावाद मात्र त्यांना मान्य नव्हता. ते एकाच वेळी सर्वच समाजांचे हित व्हावे या मताचे होते.
 
लढा ब्रिटिशांविरुद्ध असला तरी तो तात्त्विक होता. त्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दल द्वेष नव्हता. ब्रिटिशांच्या अंगच्या अनेक गुणांचे ते प्रशंसक होते.
 
शेवटी नरहर कुरुंदकरांच्या शब्दात, सर्वत्र शांतता-सृजनता असावी, माणसांनी प्रेमाने वागावे असेच त्यांना वाटे. ‘संन्यस्त खड्ग’ नाटकातील त्यांचा नायक भगवान बुद्धाला म्हणतो, “तथागत, हिंसा मलाही आवडत नाही. प्रेमाने प्रेम वाढावे, विचारवंतांनी विचार करावा, सांसारिकांनी संसार करावा, आयांनी मुले खेळवावीत, शेतकर्‍यांनी धान्ये पिकवावीत. सर्वांशी प्रेमाने वागावे, असेच मलाही वाटते. शांतीचा भव्य संदेश देणारा महात्मा माझ्या भूमीत जन्मावा याचा मला अभिमान आहे.”
 
एकंदरीत सर्व मानवांचे मिळून, एकच स्वराज्य व सुराज्य असावे असे त्यांना वाटे, पण ते येण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने आधी स्वत:च्या पायावर उभे राहावे असे त्यांचे मत होते व त्यासाठी ते या राष्ट्राला स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करीत होते.
 
 
 
 
 
 - डॉ. मेजर मधुसूदन चेरेकर  (९४२३७७६८०२)
 
@@AUTHORINFO_V1@@