हिंदू जगताचे सैनिकीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 

 
 
 
राष्ट्राच्या रक्षणासाठी देवाचा धावा करत बसण्यापेक्षा आणि अहिंसेची, सहिष्णुतेची जपमाळ ओढत बसण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन मनगटातील शक्ती एकवटून शत्रूवर तुटून पडणारा आणि विजयाचे गीत गाणारा तरुणवर्ग सावरकरांना निर्माण करायचा होता. यासाठीच त्यांनी देशस्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्याची कठोर शपथ घेतली आणि सैनिकीकरण हा त्यातील एक महत्त्वपूर्ण घटक होता.
 
सावरकर १९५३ मध्ये पुण्याच्या नारद मंदिरात केलेल्या एका भाषणात म्हणतात की, “वेद हे आपल्या राष्ट्राचे पहिले स्वातंत्र्यगीत आहे.” या त्यांच्या म्हणण्याचा आपण नेमका अर्थ जाणून घेतला पाहिजे. “राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल आणि राष्ट्राच्या शत्रूंपासून, समाजकंटकांपासून समाजाचे रक्षण करायचे असेल तर शक्तीची उपासना आणि शस्त्रबळाला पर्याय नाही,” असे आपले वेदही सांगतात. यजुर्वेदातल्या नवव्या अध्यायात म्हटले आहे, ‘वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः’, शक्ती आणि सामर्थ्य राष्ट्राचा कणा आहे. कारण, शक्तीच्या अभावी माणसाला आत्मरक्षण करता येणार नाही आणि सामर्थ्याच्या अभावी राष्ट्राचे संरक्षण करणे अशक्य होऊन बसते. आपल्या मायभूमीचे नाव, तिचा गौरव दशदिशांपर्यंत वाढवायचा असेल तर सामर्थ्याला पर्याय नाही. राष्ट्राचे सामर्थ्य तेव्हाच प्रकट होतं, जेव्हा त्या देशातील जनता राष्ट्रासाठी सर्व समर्पण करण्यास सिद्ध असते. वेदही याबाबत सांगताना म्हणतात, “राष्ट्राच्या रक्षणासाठी बाहूंमध्ये प्रचंड बळ असलेली, उत्तम कार्य करणारी आणि पराक्रमाने युक्त अशी प्रजा असली पाहिजे. राष्ट्राच्या रक्षणासाठी क्षात्रतेजाने तळपणारे वीर, श्रेष्ठ लढवय्ये, अपरिमित शौर्य गाजविणारे आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारे वीर्यवान उपजावेत,” अशी प्रार्थना वेदांनी केली आहे. “राष्ट्राच्या उत्कर्षासाठी जीवापाड धडपड करणारे नेतेगण सदैव जागृत असले पाहिजेत. त्याचबरोबर बळाची, शक्तीची उपासना करणारे राष्ट्रच ऊर्जितावस्थेला जाते,” असे आपले वेद सांगतात.
 
यासाठीच सावरकरांनी ’वेद राष्ट्राचे स्वातंत्र्यगीत आहेत,’ असे म्हटले असावे. समाजाने परकीय आक्रमणापासून जागरूक असलेच पाहिजे. शक्तीच्या बळावर परकीय आक्रमकांना पराभूत करता आले पाहिजे. त्यासाठी संपूर्ण समाज हा दुर्बलतेपासून मुक्त असला पाहिजे, सामर्थ्यसंपन्न असला पाहिजे आणि निर्भयही असला पाहिजे. आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील शूरवीरांचे, बलवानांचे तत्त्वज्ञान, त्यांची युद्धनीती, त्यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि तेजस्विता यांचे संस्कार आपल्या भावी पिढ्यांवर सातत्याने करत राहाणे, हे महान राष्ट्रीय कार्य आहे. त्याचबरोबर संयम, धैर्य हेच खरे सामर्थ्य आहे, हे विसरून चालणार नाही. सावरकर म्हणतात, “शस्त्राचाराचा पाया न्याय, नीतीचा आणि धर्माचा असेल तर शौर्याला सीमा राहात नाही. याउलट शस्त्राचाराचा पाया अन्याय, अधर्माचा असेल तर क्रौर्याला सीमा राहात नाही.” ‘इसिस’च्या कारवाया, दहशतवाद्यांच्या कारवाया, नक्षलवाद्यांच्या कारवाया आपल्याला क्रौर्याची प्रचिती आणून देतात.
 
सावरकरांनी ‘सत्याग्रहा’पेक्षा ‘शस्त्राग्राही’ धोरणाचा पुरस्कार केलेला आहे. यामागचे सावरकरांचे धोरण आपण जाणून घेतले पाहिजे. सावरकरांनी सशस्त्र क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. यामागे त्यांना प्रेरणा देणारे शिवराय होते. त्याचबरोबर श्रीराम आणि श्रीकृष्ण हे सावरकरांचे आदर्श होते.
 
तस्माद् युद्धस्व भारत, क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप, तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः।
 
गीतेतल्या या आणि अशा वचनांनी सावरकरांना शस्त्राचाराची प्रेरणा दिली. आपल्यावर सातत्याने परकीय आक्रमकांनी जे आक्रमण केले ते हाती शस्त्र घेऊनच. जगातले देश शस्त्रसज्ज असतील आणि शस्त्रबळावर ते अन्य देशांना आपले गुलाम बनविणार असतील, तर त्यांच्या या साम्राज्यविस्ताराच्या अन्यायकारक प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी आपल्याला दुर्बल राहून चालणार नाही. आपल्या राष्ट्राला सन्मानाने जगायचे असेल आणि पारतंत्र्याच्या अंधारातून मुक्त होऊन, स्वातंत्र्याच्या तेजात न्हाऊन निघायचे असेल, तर सिंहासारखा पराक्रमी असलेल्या नृसिंह अवताराचीच उपासना केली पाहिजे, हे सावरकरांनी जाणले होते. राष्ट्राच्या रक्षणासाठी देवाचा धावा करत बसण्यापेक्षा आणि अहिंसेची, सहिष्णुतेची जपमाळ ओढत बसण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन मनगटातील शक्ती एकवटून शत्रूवर तुटून पडणारा आणि विजयाचे गीत गाणारा तरुणवर्ग सावरकरांना निर्माण करायचा होता. यासाठीच त्यांनी देशस्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्याची कठोर शपथ घेतली. त्या मार्गावरून वाटचाल करताना त्यांना अंदमानात भयंकर शिक्षांना सामोरे जावे लागले. पण, त्याची तमा न बाळगता त्यांनी आपले कार्य तसेच चालू ठेवले.
 
पहिल्या महायुद्धाच्या काळात सावरकर अंदमानात होते. जागतिक युद्धासारखी घटना परतंत्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्वचितच निर्माण होते. या संधीचा आपल्याला लाभ घेता येत नाही. यामुळे सावरकरांचे मन खट्टू झाले. पण, त्यानंतर पुनश्च युरोपात दुसर्‍या जागतिक युद्धाचे ढग जमू लागले. हिटलर आणि मुसोलिनी यांच्यात युती झाली. वर्ष १९३८ च्या मार्चमध्ये जर्मनीने ऑस्ट्रिया गिळंकृत केला, तर ऑक्टोबर मध्ये झेकोस्लोव्हाकियाचा सुडेटन प्रांत बळकावला. हिटलरच्या या दंडेलीला आळा घालण्यासाठी जगातील राष्ट्रे एकवटली आणि आता दुसरे महायुद्ध अटळ झाले. ही घटना घडली, त्यावेळी सावरकर मुक्त होते. या जागतिक राजकारणाचा अन्वयार्थ लावून सावरकरांनी म्हटले, “हिंदुस्थानच्या हिताच्या दृष्टीने हे दुसरे महायुद्ध होणे आवश्यक आहे. हिंदुस्थानमध्ये येण्याचा मुख्य मार्ग भूमध्य समुद्र आहे. मागच्या महायुद्धात दुर्बळ असलेला इटली आता प्रबळ आहे. इंग्लंडचा मार्ग तो रोखून धरू शकतो. तसं झालं, तर इंग्लंडच्या नाड्या आखडतील. इंग्लंडला हिंदुस्थानशी संबंध ठेवणे आणि तिथे आपले साम्राज्य टिकविणे कठीण जाईल. पूर्वेकडचा विचार केला तर जपान आता प्रबळ झाला आहे. दोन तासांत जपानची लढाऊ विमाने कोलकात्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे इंग्रजांच्या हिंदुस्थानमधल्या साम्राज्याला धोका निर्माण झाला आहे. इंग्रज आपला क्रमांक एकचा शत्रू आहे. ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ या न्यायाने आपल्या हिताच्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे.”
 
सावरकर या संधीचा उपयोग आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी करू पाहात होते. सावरकरांनी या युद्धाबाबत हिंदू महासभेच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. हिंदुस्थान स्वयंपूर्ण व्हावा आणि हिंदी सैन्याच्या अद्ययावत यांत्रिकीकरणासाठी लागणार्‍या शस्त्रांकरिता हिंदुस्थानला अगतिकपणे परराष्ट्रांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी यांत्रिकीकरणावर आपण जोर दिला पाहिजे.
 
सावरकरांचे हे धोरण न कळल्यामुळे गांधींनी सावरकरांच्या सैनिकीकरणाला आणि यांत्रिकीकरणाला विरोध केला. राष्ट्रहिताच्या दृष्टीने सावरकरांनी दुसर्‍या महायुद्धाकडे पाहिले आणि काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या त्या अशा-
 
१. हिंदूंना आपण स्वातंत्र्यासाठी लढतो आहोत, असे वाटावे म्हणून इंग्रज सरकारने ‘डोमिनियन स्टेटस’ हिंदुस्थानला ताबडतोब द्यावा.
 
२. जी नवीन राज्यघटना लगेच कार्यवाहीत येईल, ती दरडोई एकमत या तत्त्वावर आधरित असावी. फक्त दलित वर्गालाच विशेष संरक्षण द्यावे.
 
३. कोणाच्याही अधिकारांनी दुसर्‍यांच्या अधिकारांवर आक्रमण होणार नाही, अशाप्रकारे धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक अधिकार सांभाळले जावेत.
 
४. पूर्वीचा लढाऊ आणि अलढाऊ असा भेद काढून टाकून, सैन्यात सर्वांची भरती करावी. तसेच भूदल, नौदल आणि वायूदल हे अद्ययावत करण्यात यावे.
 
५. जेथे हिंदुस्थानच्या संरक्षणाचा प्रश्न येत नाही, अशा परदेशी रणांगणावर भारतीय सैन्याचा वापर करण्यात येऊ नये.
सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणावर काहींनी प्रश्न उपस्थित केला तो असा, अशा परिस्थितीत सशस्त्र क्रांती शक्य आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना सावरकर म्हणाले, “आपल्यावर राज्य करणारे राष्ट्र जीवनमरणाच्या संघर्षात गुंतलेले असताना गुलाम असलेल्या राष्ट्रासमोर सशस्त्र बंड करणे हा पहिला आणि एकमेव मार्ग असतो. आपल्या समाजाची आजची संघटित आणि विस्कळीत स्थिती पाहाता इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड करणे शक्य नाही.”
 
सावरकरांच्या या उत्तरावर पुढचा प्रश्न विचारण्यात आला, मग आपल्यासमोर कोणता मार्ग आता उरला आहे? या प्रश्नाला उत्तर देताना सावरकर म्हणाले, “आपल्या समाजाच्या सैनिकीकरणाला आणि औद्योगिकीकरणाला साहाय्य होणार्‍या सर्व युद्धकार्यात आपण शत-प्रतिशत सहभाग घेतला पाहिजे; कारण अशा प्रकारची संधी गेल्या पन्नास वर्षांत आपल्याला मिळाली नव्हती आणि कितीही पोकळ निषेध आणि मागण्या आपण केल्या असत्या तरी येणार्‍या पन्नास वर्षांत ती आपल्याला मिळाली नसती.”
 
सैन्यदलाची वाढ तसेच औद्योगिकीकरणाला चालना देण्याचं काम इंग्रज सरकार आपल्या भल्यासाठी करत नाही तर त्यांच्यावर युद्धाचा प्रसंग आल्यामुळे त्या युद्धाला साहाय्यभूत ठरावे यासाठीच ते करत आहेत. आपल्या लाभासाठी आपण त्यात सहभाग घेतला पाहिजे. सावरकरांच्या या धोरणामुळे हिंदुस्थानच्या सैन्यदलात हिंदूंची संख्या वाढू लागली. पूर्वी हिंदुस्थानच्या सैन्यात मुसलमानांची संख्या ७५% होती, परंतु सावरकरांच्या या प्रयत्नामुळे सैन्यदलात हिंदूंची संख्या ७०% झाली आणि मुसलमानांची संख्या ३०% झाली. नौदलात हिंदूंची अधिक भरती झाली पाहिजे, अशी मागणी सावरकरांनी केली. त्याचबरोबर काही पथकांचे अधिकारी हिंदू झाले पाहिजेत, असा आग्रह धरला. परिणामी, हिंदूंना सैन्याची दारे भरतीसाठी मोकळी झाली. त्यांना उत्तम प्रकारचे प्रशिक्षण लाभले.
 
सावरकरांच्या औद्योगिकीकरणाच्या धोरणामुळे आपल्या देशात युद्ध साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. सहस्त्रावधी तंत्रविशारद, कारागीर यांना बंदुका, रणगाडे, दारूगोळा अशा निर्मितीचे ज्ञान प्राप्त झाले. शस्त्रास्त्रनिर्मिती करणार्‍या यंत्राचे ज्ञान मिळाले. अनिच्छेने इंग्रज सरकारने वालचंद हिराचंद यांना बेझ वाड्यापाशी भारतीय भांडवलावर गोदी बांधण्यास अनुमती दिली. बंगळुरुमध्ये विमाननिर्मितीचा कारखाना काढण्यास इंग्रज सरकारला अनुमती देण्यावाचून पर्याय उरला नाही.
 
असा बदल घडण्यामागचे कारण सांगताना सावरकर म्हणतात, “इजिप्तपासून ऑस्ट्रेलियापर्यंत इंग्रजांचे साम्राज्य पसरले आहे. त्याचे सैनिकी केंद्र हिंदुस्थान आहे. या युद्धकाळात पूर्वेकडच्या साम्राज्याचा पश्चिमेकडच्या साम्राज्याशी असलेला संबंध तुटला, तर लढाईसाठी लागणारी सर्व युद्धसामग्री हिंदुस्थानमधून मिळाली पाहिजे, यासाठीच सर्व प्रकारच्या उद्योगांच्या निर्मितीसाठी अनुमती देण्यावाचून ब्रिटिश सरकारकडे अन्य मार्ग उरला नाही. ब्रिटिश सरकारशी सहकार्य करणे हा मूर्खपणा आहे, हा दुबळेपणा आहे, अशी टीका करणे योग्य नाही. कारण, सोन्यासारखी आलेली ही संधी दवडून त्याकडे पाठ फिरवणे हाच मूर्खपणा आहे,” असे सांगून सावरकर पुढे म्हणतात, ”आपल्या देशातल्या दहा लाख लोकांना सैन्यात आणि युद्ध कारखान्यात नोकरी मिळणार आहे. त्याचबरोबर लक्षावधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटणार आहे. शेतकरीवर्गाच्या पाठीवरील वजन थोडे कमी होणार आहे.”
 
हिंदुस्थानच्या सैन्याचे महत्त्व कसे वाढले?, हे सांगताना सावरकर म्हणतात, “पूर्वीच्या युरोपीय युद्धात इंग्लंड हिंदुस्थानवर अवलंबून राहू इच्छित नव्हते. पण, जपानकडून बंगालच्या उपसागरात आक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे इंग्रजांना त्यांच्या युद्धनीतीत बदल करणे अपरिहार्य ठरले. जपानबरोबर लढण्यासाठी हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात सैन्यदल उभे करण्याची नितांत आवश्यकता इंग्लंडला भासली. परिणामी, इंग्लंडला हिंदुस्थानवर अवलंबून राहावे लागले. याच परिस्थितीचा लाभ घेऊन आपण आपले सैन्यबळ आणि शस्त्रबळ वाढवणे हे महत्त्वाचे आहे.”
 
वर्ष १९५४. सावरकर म्हणाले, ”ज्या दिवशी आपले भारतीय लोकसत्ताक महाराज्य स्थापित झाले, त्याच दिवसापासून आपले भौमिक, सामुद्रिक आणि वैमानिक शस्त्रबल वाढविण्याचे आणि ते अद्ययावत आयुधांनी सुसज्ज करण्याचे कार्य तत्काळ हाती घ्यायला हवे होते. पण, गेली सोन्यासारखी सहा वर्षे आपण फुकट घालवली. नीरा केंद्रापासून ते वनमहोत्सवापर्यंत इतर वाटेल त्या सापेक्षतः अगदी दुय्यम महत्त्वाच्या असणार्‍या रिकाम्या उलाढालीतच काळ दवडला. तशा गोष्टीचाही काही उपयोग असतो, जसा घरात लहान मुलांपुरता भातुकलीचाही उपयोग असतो. पण, एक महाराज्य हाती येताच त्याच्याभोवती शत्रूंचा गराडा पडला आहे, हे दिसताच प्रथमतः सर्व लक्ष त्या महाराज्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक अशा शस्त्रबळाची सिद्धता करण्यावरच केंद्रित करायला हवे होते. पण, तेवढेच कर्तव्य आम्ही जवळजवळ प्रतिज्ञापूर्वक टाळले.”
 
सावरकरांच्या या विचारांचा मागोवा घेणे आणि तशी कृती करणे आपल्याला अगत्याचे वाटले. ते १९६२ च्या चीनच्या आक्रमणाने आपण मार खाल्ला तेव्हा. १९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात आपल्याला शस्त्राचार करावाच लागला. अहिंसेची जपमाळ ओढत शस्त्राचाराचा धिक्कार करून चालणार नाही, याची प्रचिती आली. साध्या बंदुकांची जागा एके ४७,५७ अशा आधुनिक शस्त्रांनी घेतली. आपण अणुबॉम्ब बनवला. त्याची चाचणी साऱ्या जगाला अंधारात ठेवून आपण करू शकलो, हा सावरकरांच्या विचारांचा आणि सैनिकीकरणाचाच विजय आहे. २६ नोव्हेंबर, २००८ मध्ये कसाबने मुंबई शहरावर आपल्या ९ साथीदारांसह जो हल्ला केला आणि रक्तपात घडवला, त्याला वेसण घालण्यासाठी आपले कमांडोच उपयोगी पडले. अहिंसा आणि सहिष्णुता याचा अतिरेक झाल्यामुळेच दहशतवाद, नक्षलवाद यांच्या कारवायांना ऊत आला आहे. पाकिस्तानने तर अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले आहे. हे लक्षात घेतल्यावर शत्रूने आक्रमण करण्यापूर्वीच त्याच्यावर तुटून पडावे, हा सावरकरांचा विचार किती यथार्थ आहे, त्याची प्रचिती येते.
 
अत्यंत अद्ययावत अशी आयुधे आपल्याकडे निर्माण झाली पाहिजेत, असे सावरकरांचे म्हणणे होते. त्याप्रमाणे आपण विविध प्रकारची मिसाईल्स बनवली. डॉ. ए. पी. जे. कलाम यांना आपण ‘मिसाईल मॅन’ म्हणूनच संबोधतो. आपण तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे आपण मोठी झेप घेतली आहे. वर्ष २०१६ च्या जूनमध्ये ‘सुखोई’ विमान आणि ’ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र यांचा तांत्रिक मिलाफ घडविण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. ‘सुखोई ३०’ हे लढाऊ विमान आहे. या विमानाच्या पोटात ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने हव्या त्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेले ‘ब्राह्मोस’ हे क्षेपणास्त्र आपण यशस्वीपणे बसवू शकलो आहोत. ‘सुखोई’ या विमानाचे वैशिष्ट्य असे की, ते एका झेपेत तीन हजार किमी.चा पल्ला गाठू शकते आणि या विमानावर बसवलेले ‘ब्राह्मोस’ हे क्षेपणास्त्र ३३०० किमी. अंतरावर असलेल्या लक्ष्याला नेमकेपणाने टिपू शकते. ‘ब्राह्मोस’ या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य असे की, हे क्षेपणास्त्र आपण युद्धनौकेवरून हवेत, पाणबुडीतून हवेत आणि ‘सुखोई’ विमानातून जमिनीवर असे सर्व बाजूंनी प्रक्षेपित करू शकतो. त्यामुळे जगातल्या प्रभावी देशांच्या गटात आपण प्रवेश केला आहे. अन्य देशांनाही आपण हे तंत्रज्ञान देऊ शकतो.
 
वर्ष २०१६ च्या २६ डिसेंबरला आपण ‘अग्नि-५’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पाच हजार किमी. अंतरावरचे लक्ष वेधण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. या क्षेपणास्त्रामुळे चीनही आपल्या विरोधात कोणतीही आगळीक करण्यापूर्वी विचार करेल. आपण सातत्याने अद्ययावत आयुधांच्या बाबतीत सुसज्जता बाळगत आलो आहोत. त्याचे उदाहरण ’अग्नि-1’ ची प्रतिरोधक क्षमता ७०० कि.मी. होती, ‘अग्नि-२’ ची प्रतिरोध क्षमता दोन हजार कि.मी., ‘अग्नि-३ व ४’ ची प्रतिरोध क्षमता २५०० ते ३५०० किमी. आहे आणि आता ‘अग्नि-५’ ची प्रतिरोध क्षमता पाच हजार किमी. आहे. अशाप्रकारे आपण शस्त्रास्त्रांच्या संबंधात अधिकाधिक प्रगत होत जात आहोत. (मोडक, डॉ. अशोक. स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात, कॉन्टिनेंटल प्रकाशन)
 
केवळ अद्ययावत शस्त्रास्त्र निर्माण करून भागणार नाही तर दहशतवाद, नक्षलवाद आणि ‘इसिस’च्या कारवायांना कायमचा पायबंद घालण्यासाठी ठोस आणि तातडीचे उपाय करणे आवश्यक आहे. मुळात आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस कोणीही करता कामा नये, एवढा दरारा आपल्याला निर्माण करावाच लागेल. आपल्या देशातल्या नागरिकांना क्रूरपणे मारण्याचे धाडस कोणीही करता कामा नये. पाकिस्तान तर आपल्या सैनिकांना क्रूरपणे ठार मारते. काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्‍या लोकांवर आपण अजूनही कडक कारवाई केली नाही. सैन्यदलावर अश्लाघ्य आरोप केले जाऊन सैन्याची बदनामी करण्याचे काम चालूच आहे. दुर्दैवाचा भाग असा की, सैन्याची बदनामी करण्याचे काम आपल्याच देशातील सुशिक्षित नागरिक करत आहेत. हे थांबविणे अत्यंत आवश्यक आहे. नुकत्याच इराकमधून बेपत्ता झालेल्या ३९ हिंदुस्थानी नागरिकांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अशा हत्या होऊ नयेत म्हणूनही काही गोष्टींची आवश्यकता आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी अन्य देशांमध्ये असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यासाठी ते म्हणतात, “इव्हॅल्युएशन प्लॅनची आवश्यकता आहे. ज्या देशातील नागरिकांसाठी असलेली सुरक्षाव्यवस्था चोख नाही, अशा देशात जाणार्‍या हिंदुस्थानच्या नागरिकांसाठी सरकारने एक नियमावली करावी. ती त्या देशातल्या नोकरी देणार्‍या कंपन्यांना आणि त्या कंपनीत नोकरी करू पाहाणार्‍या नागरिकांना बंधनकारक असेल. तसेच त्या देशातल्या भारतीय दूतावासाकडे त्यांची नोंदणी केलेली असली पाहिजे. त्यांचे संपर्क क्रमांकही दूतावासाकडे हवेत. धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यावर अशा क्षेत्रात भारतीय लोक किती आहेत, याचा अचूक अंदाज दूतावासाला घेता आला पाहिजे.”
 
“त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणारी आपली मिलिटरी अटॅच असली पाहिजे, म्हणजेच सर्व देशांमधील भारतीय दूतावासात लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक करणे अपरिहार्य असावे. म्हणजे धोकादायक परिस्थितीत आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ‘इव्हॅल्युएशन प्लॅन’ आणि नागरिकांची सुटका याबाबतची सुयोग्य योजना व त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.”
 
सावरकर सांगतात त्याप्रमाणे आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सैनिकी शिक्षण सक्तीचे असले पाहिजे. याचे विविध लाभ आहेत.
 
१. देशाचा प्रत्येक नागरिक शारीरिकदृष्ट्या बलवान होईल.
 
२. लढाऊ वृत्ती निर्माण होईल.
 
३. आक्रमणाला प्रत्याक्रमणाची सहज प्रवृत्ती त्याच्यात निर्माण होईल.
 
४. शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण प्राप्त झाल्यामुळे वेळ येताच राष्ट्रासाठी नागरिकही लढू शकतील.
 
५. सैनिकी दृष्टी प्राप्त झाल्यामुळे समाजकंटक, देशद्रोही यांच्या हालचालींकडे चटकन लक्ष वेधले जाईल.
 
६. हेरगिरीचे शिक्षण आपोआप प्राप्त होईल.
 
हे आणि असे अनेक लाभ राष्ट्ररक्षणासाठी होतील. इस्रायलप्रमाणे आपले राष्ट्रही आपल्यावर होणार्‍या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यास समर्थ ठरेल. तसे जेव्हा घडेल तेव्हाच सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या आणि शस्त्राचाराच्या चळवळीचा खरा विजय झाला, असे आपल्याला म्हणता येईल.
 
 
 
- दुर्गेश परुळेकर (9833106812)
 
@@AUTHORINFO_V1@@