डोंबिवलीमधील नेतिवली टेकडीवर दरड कोसळण्याचा धोका कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |

  

 

डोंबिवली : दिवसागणिक धोकादायक बनत चालेल्या नेतिवली टेकडीकडे केडीएमसीचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. टेकडीवरील माती खचून दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने या ठिकाणचे शेकडो कुटुंबीय वर्षानुवर्षे भीतीच्या सावटाखाली वास्तव्य करीत आहेत. 

कल्याण-शीळ रस्त्याने जाताना नेतिवली टेकडीवरील घरे दृष्टीस पडतात. टेकडीवर आणि टेकडीच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर वसाहत वाढली आहे, सुमारे हजारांच्या आसपास कुटुंबे या ठिकाणी वास्तव्याला आहेत. या टेकडीवरील काही घरे १९७२ पासूनची आहेत. पायथ्यापर्यंत असलेली घरे हळूहळू टेकडीच्या माथ्यापर्यंत पोहोचली आहेत. बहुतांश घरे तळ अधिक एक मजला अशा स्वरूपाची आहेत. मात्र, पावसाळ्यात डोंगरावरील माती ही भुसभुशीत होत असल्याने टेकडीवरील दगड पायथ्याशी असलेल्या घरांवर कोसळतात. नेतिवली टेकडीच्या परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी या टेकडीवरील रहिवाशांना जीव मुठीत घेऊनच राहावे लागते. संपूर्ण परिसराचा आढावा घेता नेतिवलीबरोबरच कचोरे टेकडी परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या टेकडीचा बहुतांश भाग वनक्षेत्राच्या अधिपत्याखाली येतो. दरड कोसळण्याच्या घटना पाहता या टेकडीवर काही वर्षांपूर्वी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते, मात्र ते काही ठिकाणी अर्धवट स्थितीत झाल्याने धोका कायम राहिला आहे. या टेकडीवर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. हे कारणदेखील दुर्घटनांना खतपाणी घालत आहे. 

घडलेल्या दुर्घटनांचा आढावा घेता २००९ रोजी दरड कोसळून एका मुलाला जीव गमवावा लागला होता. २०११ रोजी तिघांचा मृत्यू तर जण जखमी झाले होते. पावसाळ्यापूर्वी मार्चमध्ये जय भवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते. मात्र, अनेकदा झालेल्या अपघातानंतरही यातून कोणीही धडा घेतलेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने शेकडो कुटुंबीयांच्या मनात भीतीने कायम घर केले आहे. पावसाळा आल्यावर रहिवाशांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावणे, हा पालिकेचा नित्याचाच कार्यक्रम. टेकडीवरील आणि पायथ्याशी असलेली घरे अनधिकृत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ही घरे बांधल्यानंतर प्रशासन कुठे होते?, असा संतप्त सवाल यानिमित्त रहिवासी उपस्थित करत आहेत. ग्रामपंचायत काळापासून या नेतिवली टेकडीवर घरे आहेत. ही टेकडी झोपडपट्टी म्हणून जाहीर करण्यासाठी १९९६ रोजी महासभेत एक ठरावही करण्यात आला होता. ही जागा केंद्र सरकारची असल्याने हा ठराव केंद्रकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पालिकेतर्फे संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, ते मध्येच सोडून देण्यात आले. निधी मंजूर होऊनही भिंतीचे काम करण्यात आले नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, तर कचोरे टेकडी या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून येत्या वर्षात हे काम केले जाईल, असे भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी सांगितले. 

राजकारण्यांमधल्या बकासुरामुळे ही अवस्था

गेल्या कित्येक वर्षांपासून आमची परिस्थिती बदलत नाही, त्याचे कारण येथील राजकारणी आहेत. त्यांच्यातल्या भ्रष्टाचाराच्या बकासुरामुळे नेतिवली टेकडीची ही दुरवस्था झाली असल्याचे मत तेथे राहणार्‍या मनोज वाघमारे यांनी व्यक्त केले.

 
 
रोशनी खोत 
@@AUTHORINFO_V1@@