राष्ट्रीय साहित्यिक स्वा. सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
 
हे मातृभूमी.
लेखांप्रति विषय तूंचि अनन्य झाला!
-स्वा. वि. दा. सावरकर
 
स्वातंत्र्यवीर सावरकर महान क्रांतिकारक होते, हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ होते, त्याचबरोबर एक महान साहित्यिकही होते. चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, नाटक, लेख, निबंध, काव्य असे अनेक प्रकार त्यांनी आपल्या साहित्यात समर्थपणे हाताळले. एक प्रतिभावंत कवी म्हणून पाहिले असता आरती, फटके, पोवाडे, भावगीत, नाट्यगीत, त्याचप्रमाणे ‘गोमांतक’ आणि ‘कमला’सारखे खंडकाव्य रचली आहेत. परंतु, सावरकरांचे संपूर्ण जीवन, त्यांची कृती ही राष्ट्राला अर्पित होती. त्याचप्रमाणे त्यांचं संपूर्ण लेखन साहित्य हे राष्ट्रहितासाठी लोकांना मार्गदर्शन करणारे आहे. त्यांच्या लेखनाचा विषय नेहमीच राष्ट्रहिताच्या पक्षात असल्यानेच स्वा. सावरकर राष्ट्रीय साहित्यिक आहेत.
 
आपल्या लेखन साहित्यातून सैनिकीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, जात्युच्छेदन, विज्ञाननिष्ठा यांसारखे राष्ट्राला हितकारक असणारे विषय त्यांनी सतत मांडले. सैनिकीकरण अत्याधुनिक शस्त्राने सुसज्ज असलेला भारत त्यांना अपेक्षित होता. ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकात भगवान बुद्ध जेव्हा शाक्य सेनापती विक्रम सिंहास म्हणतात की, “मला केवळ ४५ वर्षे साथ द्या, तसे झाले तर या जगातून शस्त्रयुग समाप्त होऊन, शांतियुग स्थापित झालेले दिसेल.” त्यावर शाक्य सेनापती विक्रम सिंह म्हणतात की, “देव करो आणि तुमचे म्हणणे खरे ठरो. परंतु, मनुष्यच मनुष्याचा शत्रू आहे! पंचवीस वर्षेच काय पंचवीसशे वर्षांनंतरही या पृथ्वीवर शस्त्रयुगाचे सामर्थ्य दिसून येईल, बळी तो कान पिळी हेच चित्र दिसून येईल.” आजही स्वा.सावरकरांच्या लेखणीतून साकार झालेल्या विक्रम सिंह या पात्राचे हे वाक्य सत्य ठरते. पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांच्या सीमा आपल्या भारत देशाला लागून असून, पाकिस्तान रोज शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असताना आणि चीनसारखा शेजारी अरुणाचल प्रदेश बळकवण्यासाठी खटपट करत असताना, आज आपला हिंदुस्थान पाक आणि चीनवर नियंत्रण ठेवत आहे, तो केवळ आपल्या प्रचंड सैन्य शक्तीमुळे आणि शस्त्र प्राबल्यामुळेच. ‘गोमांतक’ काव्याच्या उत्तरार्धात त्यांनी आधुनिक भारताची स्थिती कशी असेल, याविषयी मतं मांडली होती. “भारताला विशाल सागर किनारा लाभलेला आहे. अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटं भारतीय सैन्याचे सामुद्रिक आणि वैमानिक नाकी बनतील,” हे विधान त्यांनी त्यात केले आहे.
 
जात्युच्छेदक निबंधात स्वा. सावरकरांनी जन्मजात पोथीनिष्ठ जातीभेदांवर टीका केली आहे. जातीभेदाचे उच्चाटन करून, सर्व हिंदूंना एक करणारी नवीन उपयोगी समाजव्यवस्था निर्माण करणे ही त्यांची विचारसरणी होती. ‘हिंदू संघटन’ हे हिंदुस्थानाला बलाढ्य बनविण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, यावर ते ठाम होते. अंधश्रद्धा निर्मूलन कथांमध्ये तात्यारावांनी मनुष्याच्या समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राच्या हिताआड येणार्‍या जुन्या खुळचट चालीरीतींवर ताशेरे ओढले आहेत.
 
आज हिंदुस्थानने खगोलशास्त्रात खूप मोठी प्रगती केली आहे. ‘इस्रो’ने तयार केलेली शेकडो याने आज अंतराळात भ्रमण करत आहेत. ही प्रगती अचाट आहे. राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विल्यम हे अंतराळभ्रमण केलेले अंतराळवीर आहेत. आता या सगळ्यांचा स्वा. सावरकरांशी संबंध काय, तर पाहूयात सप्तर्षी कविता. जाऊयात काव्य प्रतिभाशक्तीच्या दुनियेत...
 
नुकतीच दोन काळ्यापाण्याची शिक्षा झालेला क्रांतिकारक मुंबईच्या डोंगरीच्या कारागृहात. हातापायात बेड्या. त्याच वेळी अवकाशात नजर गेली तर सप्तर्षी तार्‍यांचे दर्शन झाले. त्या सप्तर्षी दिसताच त्यांच्यातील प्रतिभाशक्ती जागी झाली आणि मनाच्या वेगाने ते त्या सप्तर्षींपर्यंत पोहोचून, त्यांना प्रश्न विचारू लागले, “आमचा सूर्य जसा त्याच्या ग्रहांना प्रकाश देऊन, अंधार दूर करतो, तसे आपण कोणत्या ग्रहांना प्रकाश पुरविता? आम्हा पृथ्वीवासी लोकांना जशी विद्युत शास्त्राची माहिती आहे, तशी माहिती तुमच्या तिथल्या जीवसृष्टीला आहे का? तुम्ही तुमच्या एक ग्रहावरून दुसर्‍या ग्रहावर जाण्यासाठी विमानांचा उपयोग करता का?”
 
अंधार्‍या तुरुंगात बेड्यांनी जखडून पडलेला सावरकरांनी शेकडो सहस्त्र प्रकाशवर्षं दूर असलेल्या सप्तर्षींर्यंत मनाने पोहोचून, मनुष्याला न सुटलेले प्रश्न विचारले आहेत. ही कविता तात्याराव सावरकरांनी १९११ ला लिहिली होती. त्याकाळी विमानांचा केवळ शोध लागला होता. विमानांचा वेगही जास्त नव्हता. पण, सावरकरांनी या कवितेत प्रकाशाच्या गतीने धावणार्‍या विमानांची कल्पना केली आहे.
 
सावरकर म्हणतात, “आज मला हे तुमचे किरण दिसत आहे, ते शेकडो सहस्त्र वर्षे आधी निघाले आहे. त्याचप्रमाणे आमच्या सूर्याची शेकडो वर्षे आधी निघालेली किरणे अजून तुमच्यापर्यंत पोहोचली नसतील. तसेच आमच्याकडे घडलेल्या घटनांची किरणे ही सप्तर्षींपर्यंत पोहोचली नसतील. झाशीची राणी कशी लढली? सम्राट अशोकाने आपल्या भावांना मारले ते खरे का? येशू ख्रिस्त सुळावरून उतरून कुठे गेला? पृथ्वीची जडणघडण कशी झाली? असे अनेक प्रश्न आहेत, त्यांची खरी उत्तरं आपल्याजवळ नाहीत. जुन्या काळात लिहिलेल्या लेखांतून काय ती आपल्याला उत्तरं मिळतात. पण, त्या लेखांतही विरोधाभास दिसून येतो. त्यातील खरे काय किंवा खोटे काय हे कसे समजणार?”
 
‘सप्तर्षी’ काव्यात पुढे या प्रश्नांना उत्तर देताना सावरकर म्हणतात की, “प्रकाशापेक्षाही अधिक गती असलेल्या विमानाने सप्तर्षींकडे जावे. आपण सप्तर्षींपर्यंत पोहोचू तोपर्यंत वर दिलेल्या घटनांची किरणे तिथपर्यंत पोहोचलीही नसतील. ती अंतराळात मध्येच कुठे तरी असतील. तोपर्यंत तेथे पोहोचून, तेथे असलेल्या प्रगत मनुष्य वस्तीच्या अतिप्रगत दुर्बिणीतून शेकडो सहस्र वर्षांआधी पृथ्वीवर घडलेल्या घटना त्या यंत्रातून पाहू शकू.”
 
‘सप्तर्षी’ कवितेत सावरकरांनी या गूढ विश्वाच्या अनेक गुपितांविषयी प्रश्न विचारले आहेत. आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. मानवाने बनविलेले रॉकेट अंतराळात झेप घेत आहे. शास्त्रज्ञ उपग्रहाच्या (satellite) साहाय्याने विश्वाचे रहस्य शोधत आहेत. पण, १०८ वर्षांपूर्वी सावरकरांनी काव्याद्वारे केलेली कल्पना अद्भुत आहे. कोणी म्हणेल की, ‘सप्तर्षी’ हे एक काव्य आहे? परंतु, भारतानेही खगोलशास्त्रात प्रगती करावी, भारतीय वैज्ञानिकांनी ही उंच भरारी घ्यावी, असे स्वा. सावरकरांचे मत असेल. ‘क्ष किरण’ पुस्तकातील लेखात सावरकर म्हणतात, “जर आपल्याला युरोपीय राष्ट्रांशी स्पर्धा करायची असेल, तर युवकांनी जुनी खुळचट व्रते सोडून दिली पाहिजेत. एखादे पुस्तक काही म्हणते, म्हणून ते योग्य आहे, असे न मानता त्या पुस्तकात जो सिद्धांत आहे, किंवा नियम आहे, तो नियम आजच्या परिस्थितीला अनुकूल आहे का ते पाहावे. जर तो आजच्या काळात आचरणात आणण्यासाठी योग्य नसेल, तर त्यात बदल करा आणि तो ग्रंथ आपल्या पूर्वजांनी त्या काळात केलेल्या प्रगतीचा पुरावा म्हणून त्यास वंदन करा, परंतु अनुकरण मात्र आधुनिक विज्ञानाच्या कसोटीत जे बसते, प्रयोगांनी सिद्ध होते, बुद्धिप्रामाण्यवादात बसते, त्याचेच करा. अद्ययावत व्हा, म्हणजेच ‘up to date' बना. बुद्धिप्रामाण्यवादी बना, बुद्धीला शरण जा!” असे सावरकर केवळ सांगत नाही राहिले तर तसे जीवन ते आयुष्यभर जगले सुद्धा. त्यांचं लेखन, काव्य आणि आचरण यात सूत्रबद्धता आहे. समग्र सावरकर साहित्य देशभरात पोहोचून, त्यांनी मांडलेले राष्ट्रीय विचार जनमानसात रुजवणे, हे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणे हेच स्वातंत्र्यवीरांना खरेखुरे अभिवाद ठरेल!
 
वंदे मातरम
 
 
 
 
 
 
 
- तन्मय पाटील  (8850505942)
 
@@AUTHORINFO_V1@@