प्रेमकवी सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 

 
आपल्यापैकी अनेकांनी ‘प्रेमकवी’ आणि ‘सावरकर’ हे दोन शब्द शीर्षकात वाचून काहीसा आश्चर्याचा धक्काही बसला असेल. पण, सावरकर साहित्यावर सखोल नजर फिरवली असता सावरकर केवळ कठोर नव्हते तर तेवढेच मृदू, कोमल स्वभावाचे होते, हे प्रकर्षाने जाणवते. तेव्हा, या लेखात उलगडलेली प्रेमाची सावरकरी परिभाषा...
सकाळीच तू तोडित असता जाई जुईच्या फुलां
माडीवरुनी सुंदर कन्ये, पाहियलें मी तुला
उंचविता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी
कुरळ केश रुळताती गोरट्या मानेवरी सुटूनी
 
या ओळी वाचल्या तर आपल्या मनात शंकासुद्धा येणार नाही की या ओळी सावरकरांच्या आहेत. सशस्त्र क्रांतीच्या युद्धात स्वतःला समिधेप्रमाणे झोकून देणारे सावरकर प्रेमकविता रचू शकतील असं कुणालाही वाटलं नसणार. एकीकडे ‘आत्मबल’ या कवितेत सावरकर लिहितात-
 
अट्टहास करित जगी धर्मधारणी
मृत्युशीच गाठ घालुनी मी घुसे रणी
अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो
भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो
 
असं असूनही सावरकर उत्कृष्ट प्रेमकविता रचू शकतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मला वाटतं सावरकर हे मुळातंच संवेदनशील व रसिक कवी होते. परिस्थितीमुळे ते सशस्त्र क्रांतिकारक झाले. म्हणूनच एखाद्या उद्यानाकडे जावे तसे सावरकर अंदमानाकडे गेले व अंदमानाच्या भयाण कारागृहातही त्यांची रसिकता सजीव राहिली. वरील ‘तनुवेल’ नावाची कविता त्यांनी अंदमानच्या कारागृहात रचली आहे. पण, कविता लिहायला सावरकरांना कधीच ‘मूड’ची गरज भासली नाही. ते शीघ्रकवी होते. कुठल्याही प्रसंगावर ते सहज कविता रचत. बालवयात गाण्याच्या भेंड्या खेळताना ते स्वरचित ओव्या जागच्या जागी रचून म्हणत व सर्वांना पराभूत करत. ‘शृंगार’ हा मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यांनी शृंगारिक कविता रचल्या.
 
कामव्याकुल शंभु लागला भिल्लिणीचे पाठी
पुराणीच ही कथा, कथीनची मी कुठला खोटी.
नाचत निसटे माया भिल्लिण तोही तिजमागे
कामव्याकुल, आकाशाच्या अंगणात लागे
टपकत संचितवीर्य प्रभुचे बिंदु बिंदु गेले
तयांचि तारे म्हणूनी ज्योतिषी भले भले चकले
 
‘तारकांस पाहून’ या कवितेतील या शृंगारिक ओळी आहेत, पण त्यात अश्लीलता कुठेच नाही. ‘मोपल्यांचे बंड’ या कादंबरीत एका ठिकाणी स्त्री-पुरुषांच्या प्रणयाचे वर्णन अतिशय सात्विकपणे करताना सावरकर लिहितात, “संकटाच्या आघाताने पिचलेल्या तिच्या हृदयास इतक्या भयंकर संकटानंतर कुरवाळणार्‍या ममत्वाचा तो स्पर्श, ते प्रेमळ कुरवाळणे सहन झाले नाही. वेडी ती स्त्रियांची जात, तिने आपले तोंड वर केले, दामू माझा... ती लाजली, पण शब्द सोडलेली वाक्ये वाचण्याचा प्रेमाचा पुरातन अभ्यास आहे. दामूने तिची हनुवटी वर केली. “लक्षीबाई, भिऊ नका मी तुमचाच आहे,” असे म्हणत त्या हिंदुवीर युवकाने त्या हिंदू कन्यकेचा मुका घेतला आणि त्या मुक्याबरोबर तिचे जीवनही चोखून टाकिले.” किती सुंदर नि सात्विक शब्दात सावरकरांनी प्रणयदृष्याचे वर्णन केले आहे. असे वर्णन सर्वांनाच करता येत नाही. बर्‍याचदा प्रणयदृष्ये रंगवताना किंचित अश्लीलता व चावटपणा नावाचे अतिरेकी लेखणीत शिरकाव करण्याचा धोका अधिक असतो, पण सावरकरांनी आपली लेखणी तलवारीसारखी चालवली असल्यामुळे कुठलेही ‘अतिरेकी’ नि ‘निरुपयोगी’ शब्द त्यांना भिऊन असायचे व त्यांच्या आसपासही फिरकण्यास धजावायचे नाहीत. एकदा आचार्य अत्रे आणि प्रा. फडके यांच्यात प्रचंड वादविवाद झाले. तेव्हा फडके म्हणाले, “अत्रे नेहमी फडकेंच्या साहित्यावर टीका करताना म्हणतात की, त्यात अश्लील, बीभत्स प्रसंग रंगविलेले आहेत. पण, ते सावरकरांच्या साहित्यातील तशा वर्णनाच्या वाटेला जात नाही.” त्यावर अत्रे म्हणाले, “फडके यांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या वाचकाला आपणही असा बलात्कार करावा असे वाटू लागते. पण, सावरकरांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या बलात्कार करणार्‍याला चाबकाने झोडपावे, त्याला कठोर शिक्षा करावी असे वाटू लागते.” मला वाटते हाच खरा भेद आहे सावरकरांच्या लिखाणात व अन्य लेखकांच्या लिखाणात.
 
सावरकर म्हणतात, “नाटकात संसार कसा करावा हे दाखवावे. मानवी जीवन दाखवण्यापेक्षा मानवी जीवनाचे आदर्श दाखवावे.” आपल्या लेखणीने जगातील पिढी वाया जाऊ नये, अशी त्यांची दिव्य इच्छा आहे व असा उपदेश ते सर्व साहित्यिकांना करतात. इथे एक प्रसंग सांगतो. भा. कृ. केळकर हे सरकारी नोकर होते. ते यशवंतरावांच्या विश्वासातले होते, पण तरीही ते सावरकरवादी होते. त्यांची अनेकदा सावरकरांशी भेट व्हायची. एकदा ते सावरकरांना म्हणाले, “तात्याराव, तुम्ही अंदमानात होता. तिथे अनेक कैदी तुम्हाला भेटले. वेगवेगळे गुन्हे केलेले असे हे कैदी. अनेकांशी तुमचे संबंधसुद्धा आले आहेत. मग तुम्ही त्या कैद्यांची व्यक्तिचित्रणे का लिहित नाहीत? कोणत्याही लेखकाला असे विविध प्रकारची माणसे सहज भेटत नाहीत. या बाबतीत तर तुम्ही भाग्यवानच आहात. मग तुम्ही त्यांची व्यक्तिचित्रणे लिहायला हवीत.” सावरकर म्हणाले, “त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटून काय होणार आहे?” त्यावर केळकर उत्तरले, “अहो, किती तरी मोठे काम होईल. केवढे तरी मोठे साहित्य निर्माण होईल. लोकांना विविध प्रकारच्या माणसांची ओळख होईल. गुन्हेगारी जगताची माहिती मिळेल. रसिकांचं मनोरंजन होईल.” यावर सावरकर खाडकन पण आदरयुक्त स्वरात म्हणाले, “केळकर, माझा जन्म लोकांचे मनोरंजन करण्यासाठी झालेला नाही.” या प्रसंगावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की, सावरकर कोणत्या उद्देशाने लिहिते झाले होते. ते उत्तम प्रेमकवी होतेच, परंतु केवळ मनोरंजन करुन, त्यांना रसिकांना संतुष्ट करायचे नव्हते, तर त्यांना विचार मांडायचा होता. आपण जी चळवळ सुरु केली आहे, ती चळवळ लेखनाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचविता येते, याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी ‘संन्यस्त खड्ग’ लिहिले, म्हणून त्यांनी ‘संगीत उःशाप’ लिहिले, म्हणून त्यांनी ‘उत्तरक्रिया’ लिहिले. ते विशिष्ट ध्येयाने पेटून उठले होते. ते एक प्रचारक होते. पण, लोकांचे प्रबोधन करताना मनोरंजनाची बाजू कमी पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. आपण ‘मोपल्यांचे बंड’ ही कादंबरी वाचतो तेव्हा त्यांना काय सांगायचे आहे? कोणते विचार मांडायचे आहेत? ते विचार आपल्यापर्यंत पोहोचतातच, पण त्यातून मनोरंजन सुद्धा होते. मनोरंजनाला बगल देऊन, साहित्य निर्माण होऊ शकत नाही.
 
ज्या तारकांस पाहून या कवितेत सावरकर शृंगारिक वर्णन करतात, त्याच कवितेत सीता अपहरणाच्या प्रसंगाचे वर्णन करताना ते लिहितात-
 
दशाननें पळवूनी जानकी नभपथे नेली
अश्रुबिंदु जे देवी टपटप ढाळित त्या काली
तेचि राहिले असे चकाकत जाणो दिव्यबले
तयांचि तारे म्हणूनी ज्योतिषी भले भले चकले
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना ते एकाच कवितेत करतात, हेसुद्धा त्यांचे वैशिष्ट्य आहे. सावरकर हे शब्दांचे दास नव्हते, तर अर्थांचे प्रभू होते. फार कमी जणांना ही विद्या प्राप्त असते. सावरकर एका अर्थी महाकवीच होते. महाकवितेची जी लक्षणे सांगितलेली आहेत ती तांत्रिक आहेत, बाह्य आहेत. पण, महाकविता रचण्यासाठी महाकवीची प्रतिभा हवी. ती प्रतिभा सावरकरांकडे होती. म्हणूनच त्यांची प्रत्येक कविता महाकविता आहे असेच वाटते. ‘संन्यस्त खड्ग’मधील त्यांचे हे गीत पाहा-
 
शत जन्म शोधिताना, शत आर्ति व्यर्थ झाल्या॥
शत सूर्य मालिकांच्या, दीपावली विझाल्या॥
तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी॥
सुख साधना युगांची, सिद्धीस अंती गाठी॥
हा हाय जो न जाई, मिठी घालु मी उठोनी॥
क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी॥
 
हे प्रेमगीत. यात प्रेम आहे, पण विरह सुद्धा आहे. आताचा कवी आपली भावना व्यक्त करण्यासाठी काय लिहिल? ‘प्रिये! जगू कसा तुझ्याविना मी राणी गं...’ किंवा ‘ओ प्रिया प्रिया, क्यों भूला दिया...’ पण, हा महाकवी काय म्हणतो? ‘शत जन्म शोधिताना, शत आर्ति व्यर्थ झाल्या॥ शत सूर्य मालिकांच्या, दीपावली विझाल्या॥’ कवी ब्रह्मांडचे विराट रुप दाखवतो. शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, असं कवी म्हणतो. पण, एका सूर्यमालिकेचे चित्र आपण डोळ्यांपुढे आणतो नि आपण थकून जातो. कवी तर सहज म्हणतोय शतसूर्यमालिका. काय प्रतिभा आहे. ‘तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची, सिद्धीस अंती गाठी. तो क्षण आला.’ भेटीचा क्षण आला. त्यासाठी सावरकर काय म्हणतात? ‘सुख साधना युगांची, सिद्धीस अंती गाठी.’ विरह किंवा प्रतीक्षा दाखवण्यासाठी सावरकरांनी किती समर्पक शब्द लिहिले आहेत. ‘शतजन्म,’ ‘शतआर्ति,’ ‘शतसूर्यमालिका,’ ‘युग’ या शब्दांतून कवीची व्याकुळता कळते. ‘हा हाय जो न जाई, मिठी घालु मी उठोनी, क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी.’ अर्थात, तो क्षण आला जेव्हा मी प्रियतमेला मिठी मारणार, पण तो क्षणही क्षणात निघून गेला. ही सावरकरांची प्रतिभा आहे. त्यांनी वापरलेले शब्द जड आहेत, सहज कळत नाही, परंतु त्यांनी ते शब्द जाणीवपूर्वक वापरले आहेत. कोणत्याही प्रकारचे परकीय शब्द आपल्या मराठी लेखनात आढळू नये अशी त्यांची धारणा होती. व्यक्तिगत संवाद साधतानासुद्धा जर कुणी अमराठी शब्द उच्चारले, तर लगेच त्याला थांबवून, “या शब्दासाठी (प्रतिशब्द सुचवित) हा शब्द योग्य आहे ना? होय होय योग्यच आहे,” असे म्हणत. स्वदेशात परकीय सत्ता त्यांना नको होती, तसेच स्वभाषेत परकीय शब्द त्यांना नको होते. म्हणून बर्‍याचदा आपल्याला त्यांचे शब्द समजायला जड वाटतात. त्या काळी आणि आताच्या काळीसुद्धा सावकरांवर टीका होत असते की त्यांची भाषा दुर्बोध आहे. इथे मला असे सांगावेसे वाटते की, ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील भगवद्गीता लोकांना कळावी म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. आता तर आपल्याला ज्ञानेश्वरीसुद्धा कळत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर दुर्बोध लिहायचे का? कवीची प्रतिभा कुणाला कळली नाही, तर तो दोष कवीचा नाही. त्याचप्रकारे सावरकरी साहित्य कुणाला कळले नाही, तर दोष सावरकरांचा नाही. मुळात काही लोक मुद्दाम सावरकरी भाषा समजून घेत नाहीत. कारण, त्यांना समजून घ्यायचे नसते, तर त्यांना केवळ टीका करायची असते. पण, सावरकरांची प्रतिभा जाणणारे त्या काळीही अनेक होते आणि आताच्या काळीही अनेक आहेत. सावरकरी साहित्य हे असे साहित्य आहे, ज्याचा शासकीय स्तरावर प्रचार झाला नाही. पण, सर्वसामान्य माणसांनी ते जीवित ठेवले. हीच सावरकरी साहित्याची महती आहे.
 
सावरकरांची काव्यशक्ती पाहून नाशिकमधील शीघ्रकवी बळवंतराव पारख म्हणाले होते की, “मुला, तुझ्या अंगभूत तेजामुळे तुझ्यातील काव्यशक्ती जळून जाईल अशी भीती मला वाटते.” एका अर्थाने त्यांची भीती खरी ठरली. कारण, ‘सावरकर’ म्हटले की आपल्याला ‘जयोस्तुते’ व ‘सागरा प्राण तळमळला’ ही दोन काव्ये प्रामुख्याने आठवतात. त्यांनी लिहिलेली खंडकाव्ये, भावगीते आठवत नाहीत. “सावरकर हे मराठीतील उत्कृष्ट प्रेमकवी आहेत,” असे शंकर वैद्यांनी लिहिले आहे. तरीसुद्धा त्यांचे जवळचे मित्र बॅ. असफअली म्हणतात, “सावरकरांचे व्यक्तिमत्व देखणे व धीरोदात्त होते. ते प्रतिभाशाली होते. वक्तृत्वसंपन्न होते, साहसी होते, पराक्रमी होते. यांपैकी एखादा जरी गुण कुणाच्याही अंगात आढळला, तर जगातील कोणतीही लावण्यश्रीमंत ललना त्याच्या सुखासाठी आपल्या कोमल शरीराची शय्या करायला आतूर असती. पण, सावरकरांचे चित्त अशा उन्मादक प्रलोभनांना बळी पडले नाही, if at all their was any sweetheart in his life, that was his motherland only.” त्यांना मातृभूमीचे वेड लागले होते, हे वेड त्यांनी सुखासीन झालेल्या मदनलाल धिंग्रालाही लावले व त्यांच्या सहवासात आलेल्या सहकार्‍यांनाही लावले. सावरकरांचे आयुष्य इंग्रजांशी दोन हात करण्यातच गेले. असे असतानाही ते हाडाचे रसिक व कवी होते. त्यांना फुलांचे वेड होते. प्रायोपवेशन करुन मृत्यूशय्येवर पडलेले असतानाही शेवटची भेट घ्यायला आलेल्या आपल्या मुलीपाशी तिच्या उद्यानातील फुलवेंलींची चौकशी त्यांनी केली.
 
एकदा दिल्लीच्या हिंदू महासभा भवनाच्या उद्यानात वि. घ. देशपांडे व पु. भा. भावे रात्री १२ नंतर गप्पा मारत बसले होते. तेव्हा त्यांना एक आकृती दिसली. ती आकृती उद्यानातील फुलझाडांना कुरवाळीत होती. भावे व देशपांडे आकृतीच्या जवळ गेले तर पाहतात काय? ती आकृती दुसरी कुणी नसून, स्वतः सावरकर होते. भाव्यांना आश्चर्य वाटले की, दिवसभर थकून भागून दमलेले सावरकर मध्यरात्री फुलांशी हितगुज करीत होते. सावरकर अगदी मृदू हृदयाचे होते. सत्याग्रही त्यांच्यावर टीका करताना ‘मारो काटो का पंथ’ असे म्हणत होते, परंतु सावरकर खर्‍या अर्थाने मृदू मनाचे होते.
 
ते अहिंसकच होते, पण राष्ट्राचे रक्षण शस्त्राने होते यावर त्यांची निष्ठा होती आणि जे सत्यही आहे. शिवाजी महाराज औरंगजेबासमोर उपोषणाला बसले असते, तर आज महाराष्ट्राला इतिहास लाभला नसता. म्हणून सावरकरांना ‘हिंसक’ म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. ते सशस्त्र क्रांतिकारक जरी असले, तरी समाजासाठी आणि वैयक्तिक जीवनात अत्यंत मृदू मनाचे व्यक्ती होते. त्यांच्या प्रेमकविता आणि इतर साहित्य वाचताना आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. आता हेच पाहा. ‘काळे पाणी’ या कादंबरीत आई आणि वयात आलेल्या मुलीचे संबंध स्पष्ट करताना ते लिहितात, “तिच्या एकुलत्या एका मुलीचे लडिवाळ शब्द ऐकताच रमाबाईंना वात्सल्याचे इतके भरते आले की, एखाद्या पित्या लेकरासारखे तिच्या लेकराचे मुके घेण्यासाठी रमाबाईंचे ओठ फुरफुरले. पण, आईचे प्रेम जितके उत्कट असते तितकेच वयात येऊ लागलेल्या मुलीशी वागताना ते संकोचीही असते. मालतीच्या गालाला अगदी लागत आलेले आपले तोंड मागे घेऊन, तिच्या आईने त्या वयात येऊ लागलेल्या लेकीच्या वदनाला दोन्ही हातात क्षणभर दाबून धरले आणि हळूच मागे सारीत मालतीला आश्वासिले.” काय सुंदर वर्णन केले आहे आई नि मुलीच्या प्रेमसंबंधांचे. आपली मुलगी वयात आलेली असल्यामुळे तिला न दुखावता तिच्याशी शिष्टाईने वागले पाहिजे, याची जाणीव सावरकर आपल्याला करुन देतात. त्यांनी ठाण्याच्या कारागृहात सप्तर्षी काव्य रचायला सुरुवात केली. हे जगातलं उत्कृष्ट काव्य आहे, असं समीक्षकांचं मत आहे. स्वा. सावरकरांचे काव्य एखाद्या उत्तुंग मनोर्‍याप्रमाणे वाटते. “दूरवर पसरलेल्या उजाड प्रदेशांत विस्कळीत पडलेल्या जीर्णभग्न अवशेषांमध्ये, मागील काळाचा हा भव्य प्रतिनिधी पुढील काळाच्या उदरांतील गोष्टी आपल्या अतुल शैलीने जनमनावर बिंबवीत अद्भुतपणे उभा आहे,” असे ना. ग. जोशींनी लिहिले आहे. सावरकरांचा अधिकार काय होता, हे सांगण्यासाठी एक प्रसंग सांगतो. रियासतकार गोविंदराव सरदेसाई एकदा मुंबईच्या घरात सावरकरांना भेटायला आले. रियासतकारांना पाहून सावरकर त्यांच्या पाया पडले, त्यांना नमस्कार केला. तेव्हा रियासतकारांनी विचारलं, “अहो तुम्ही माझ्या पाया का पडत आहात?” सावरकर म्हणाले, “तुम्ही इतका मोठा इतिहास लिहून ठेवला आहे. येणार्‍या पिढीला तुमच्यामुळे मार्गदर्शन होणार आहे. तुम्ही थोर आहात. म्हणून मी तुमच्या पाया पडलो.” यावर रियासतकार म्हणाले, “अहो तात्याराव, जो इतिहास घडला तो मी लिहिला, पण तुम्ही तर इतिहास घडवला आहे. म्हणून मीच तुमच्या पाया पडायला हवं.” हा सावरकरांचा अधिकार आहे, ही सावरकरांची मान्यता आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही या प्रेमकवीची, या महाकवीची सिद्धता आहे.
 
सावरकर हे खर्‍या अर्थाने प्रेमवीर व प्रेमकवी होते, पण त्यांचे प्रेम केविलवाणे नव्हते. त्यांचे प्रेम भिल्लासारखे होते, बाणावरती खोचलेले म्हणून मातीमध्ये उगवून मेघापर्यंत पोहोचलेले होते. त्यामुळेच त्यांच्या तलवारीसारख्या धारदार लेखणीतून फुलांचा वर्षाव होतो. सावरकर करुण स्वरात मातृभूमीविषयी आपल्या मनात असलेली प्रेमभावना व्यक्त करताना म्हणतात,
 
हे मातृभूमि, तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले
तुतेंची अर्पिली नवकविता रसाला
लेखाप्रती विषय तुचि अनन्य झाला
 
 
 
 
 
 
 
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री  (9967796254)
 
@@AUTHORINFO_V1@@