सहा सोनेरी पाने व हिंदुत्व ग्रंथाचे महत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
हिंदूंना आत्मभान देण्यासाठी आणि त्यांच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा इतिहास समीक्षक ससंदर्भ ग्रंथ आपल्या तर्कशुद्ध दृष्टिकोनातून सावरकरांनी उतार वयात लिहिला. ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहिताना आपली पुराणे ज्ञानाचे, कर्तृत्वाचे, ऐश्वर्याच्या इतिहासाचे, साहित्याचे प्रचंड मोठे भांडार असूनदेखील ती निर्भेळ इतिहास नसल्याचे मान्य करून, पुराणमत बाजूला ठेवून भारतीय आणि पाश्चिमात्य प्राच्यविद्येच्या उपलब्ध पुराव्यांच्या मर्यादेनुसार भारताचा इतिहास बुद्धकाळापासून ठामपणे सांगता येतो.
 
सांस्कृतिकदृष्ट्या एकात्म पावलेला समाज जेव्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय होतो, तेव्हा राष्ट्र निर्माण होते. ‘आम्ही इतिहासापासून एक आहोत आणि भविष्यातदेखील एक राहू!’ ही भावना म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना होय. राष्ट्र किंवा राष्ट्रीयत्वाच्या एकसमान धाग्यात इतिहासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही राष्ट्रीयत्वाची भावना समाजाच्या एकत्व किंवा एकसमान असणारे घटक हे जितके जुळतील तितके राष्ट्रीयत्व प्रबळ होत जाते.
 
इंग्रजांचा अंमल या देशात सुरू होताच, त्यांच्या राजकीय सोयीसाठी भारतीय लोकांमध्ये असणारी एकत्वाची भावना विभागण्यासाठी, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करण्यासाठी, अनेक विकृत विधाने भारतीय इतिहासात करून शाळा-महाविद्यालयांमधून दोन-तीन पिढ्यांकडून त्या विकृत लिखाणाची पारायणामागे पारायणे करून घेतली की व्यवहारात परकीयच काय स्वकीयसुद्धा चलनी नाण्याप्रमाणे चालवू लागतात. त्याचा प्रतिकार फक्त राष्ट्राभिमानाने नव्हे, तर ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीने आवश्यक आहे, अशी भूमिका स्वा. सावरकर ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ या ग्रंथारंभीच घेतात. त्यांची ही भूमिका अगदी रास्त होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वानदेखील “हिंदूंचा इतिहास म्हणजे अखंड पराभवांची मालिका होय,” असे म्हणाले होते. तेव्हा त्यांच्या या मिथक विधानाला स्वा. सावरकरांनी ‘विजयशील हिंदुराष्ट्र’ नावाचा लेख लिहून, प्रत्युत्तर दिले होते. अर्थात, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे. इतिहासाविषयक समाजाचे अज्ञान आणि मिथकांमुळे समाजस्वास्थ्यावर कसा विपरीत परिणाम होतो, हे आपण कोरेगाव-भीमाच्या दंगलीने अनुभवले आहेच. हिंदूंना आत्मभान देण्यासाठी आणि त्यांच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा इतिहास समीक्षक ससंदर्भ ग्रंथ आपल्या तर्कशुद्ध दृष्टिकोनातून सावरकरांनी उतार वयात लिहिला. ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहिताना आपली पुराणे ज्ञानाचे, कर्तृत्वाचे, ऐश्वर्याच्या इतिहासाचे, साहित्याचे प्रचंड मोठे भांडार असूनदेखील ती निर्भेळ इतिहास नसल्याचे मान्य करून, पुराणमत बाजूला ठेवून भारतीय आणि पाश्चिमात्य प्राच्यविद्येच्या उपलब्ध पुराव्यांच्या मर्यादेनुसार भारताचा इतिहास बुद्धकाळापासून ठामपणे सांगता येतो. ज्या कालखंडास भारतीय साधनांबरोबर चिनी प्रवासी व ग्रीक साधनांतून पाठिंबा मिळतो, तो काळ चंद्रगुप्ताच्या कालखंडाच्या मागे-पुढे सुरू होतो. ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात त्या आशयासाठी काही मापदंड ठरवले आहेत. सावरकर परकीय आक्रमणाच्या टाचेखालून राष्ट्रास स्वतंत्र करणार्‍या, राष्ट्रास पुनरुज्जीवित करणार्‍या, विजयशील पुरुषांचा वृत्तांत ज्या कालखंडात येतो, त्या कालखंडास ‘सोनेरी पान’ म्हणतात.
 
युरोपीय देश ज्याला ‘जगज्जेता’ म्हणतात, असा सिकंदर! त्याला भारताचा फक्त सीमावर्ती भाग जिंकता आला होता. त्यावर ‘JIN’ म्हणजे ‘गव्हर्नर’ नेमलेले होते. भारतात सिकंदराला प्रखर विरोध झालेला. त्याने जिंकलेल्या भागांवर विजय मिळवत, त्याचा ’क्षत्रप’ असलेल्या सेल्यूकस आदी ग्रीकांची धूळधाण उडवणार्‍या पहिल्या चंद्रगुप्ताच्या कालखंडास पहिले ‘सोनेरी पान’ वाहिले आहे. सावरकर दुसरे ‘सोनेरी पान’ अयोध्येपर्यंत ठाण मांडलेल्या मिन्यांडर उर्फ मिलिंदाचा पराभव करणार्‍या पुष्यमित्र शुंगाला अर्पण करतात. आपल्या आख्यायिका आणि लोकगीतांत अजरामर झालेला, शक आणि कुशाणांचा पराभव करुन, देशावर वैभव, संपन्नता आणि संतोषाचा कळस चढवणार्‍या सम्राट विक्रमादित्य म्हणजे चंद्रगुप्त दुसर्‍याच्या राजमुद्रेने अंकित झालेले इतिहासाचे पान हे तिसरे ‘सोनेरी पान’ आहे. सम्राट विक्रमादित्य इतका क्वचितच एखादा राजा लोकप्रिय होतो. आपण पंचांगामध्ये जे ’संवत’ वापरतो ते ‘विक्रमसंवत’ हे नाव देऊन, त्यांच्या अखिल भारतीय पराक्रमाचा गौरव करण्यासाठी राष्ट्रपरिचित केला. सार्‍या युरोपीय देशांनी ज्यांची धास्ती घेतली, चीनने ज्यांच्या भीतीने जगप्रसिद्ध भिंत बांधली आणि ती भिंत बांधूनदेखील चीनबरोबरच रशिया, रोमन साम्राज्याची दाणादाण उडवणार्‍या हूणांचा पराभव कुमारगुप्त व त्याच्यानंतर त्याचा पुत्र स्कंदगुप्ताने केला. परंतु, त्यानंतर गादी बळकावून सम्राट झालेला पुरगुप्त याच्या दुबळेपणामुळे हूणांनी उज्जैनपर्यंत धडक मारून राज्य केले. त्यांचा नि:पात राजा यशोधर्म्याने पराक्रमपूर्वक केला. स्वा.सावरकर चौथे ‘सोनेरी पान’ म्हणून हूणान्तक राजा यशोधर्माच्या कारकिर्दीचा उल्लेख करतात. पाचव्या ‘सोनेरी पाना’चे दोन भाग आहेत. त्यात एकूण अठरा प्रकरणांत यथार्थपणे सविस्तर विश्लेषण केले आहे. हिंदूंच्या सद्गुणविकृती, आत्मघातकी प्रवृत्तीवर नेमके भाष्य करत, हिंदू-मुस्लिमांच्या दशशतक महायुद्धाचा शेवट मुस्लीम सत्तेच्या ठिकर्‍या उडवत, अटकेपार भगवा रोवणार्‍या मराठ्यांचा इतिहास म्हणजे पाचवे ‘सोनेरी पान’ होय. ब्रिटिशांच्या हातून भारत स्वतंत्र झाला, ते भारतीय इतिहासाचे पान सहावे होय. खंडित का होईना, पण तीन तृतीयांश भारत सलगपणे स्वतंत्र झाला याचे श्रेय सावरकर क्रांतिकारकांबरोबरच अहिंसक आंदोलक पक्षांनादेखील देतात. हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या पाकिस्तान निर्मितीच्या प्रखर विरोधाला पूर्ण यश आले नसले, तरी संपूर्ण पंजाब आणि बंगाल पाकिस्तानात समाविष्ट न होता मुस्लिमबहुल भाग पाकिस्तानात, तर उर्वरित भाग भारतात राहिला. अर्थात, “पाकिस्तान म्हणजे आपल्या पूर्वजांच्या सद्गुणविकृती, आत्मघातकी प्रवृत्ती, शुद्धिबंदीसारख्या सामाजिक आणि धार्मिक महापापांचा परिपाक आहे,” असे सावरकर आवर्जून सांगतात.
 
साहित्य हे राष्ट्राचे उपांग असून, ज्या राष्ट्राचे साहित्य दुबळे आणि खुरटे असते, ते राष्ट्रही दुबळे आणि खुरटेच असते, अशी स्वा. सावरकरांची धारणा होती. साहित्य हे समाजाला मंगल ध्येयाकडे प्रवृत्त करण्याचे साधन आहे. साहित्यकलेने प्राप्त परिस्थितीतील कर्तव्य ओळखून, राष्ट्राच्या उत्थानार्थ व राष्ट्रसंरक्षणार्थ सारी शक्ती वेचली पाहिजे, असा आग्रह सावरकरांचा होता. निवडलेला विषय, त्या विषयाभोवती निर्माण केलेला आशय आणि त्या आशयाला लावलेला तर्कशुद्ध, समर्पक, समर्थक अर्थ हे सावरकरांच्या लेखणीचे वैशिष्ट्य होते. ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ स्वा. सावरकरांनी वयाच्या शेवटच्या टप्प्यावर असताना लिहिला होता. त्यामुळे त्यांना स्वत:ला तळटीपा आणि संदर्भग्रंथाची यादी देता आली नाही, परंतु ही उणीव सावरकर अभ्यासक कै. श्री. त्र्यं. गोडबोले यांनी ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद असलेले ’Six Glorious Epochs Of Indian History’ ग्रंथात भरून काढली. ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ हिंदूंच्या विजयशील गौरवपूर्ण इतिहासाची ओळख करुन देणारी आणि हिंदूंमध्ये स्वाभिमान निर्माण करुन देणारी गाथा आहे.
 
संस्कृती म्हणजे समाजात माणसाने वावरताना आपल्या वर्तनविषयक ठराविक नीतिमूल्य, आदर्श आणि मानक यांचा असणारा संच असतो किंवा मानवी मनाचा अविष्कार होय. ज्या वेळी आपण भारतीय संस्कृती म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती संस्कृती म्हणजे ‘हिंदू संस्कृती’ होय. राजकीयदृष्ट्या ‘हिंदू’ची सर्वमान्य अशी व्याख्या नव्हती. आपली संख्या वाढवून राज्यव्यवस्था आपल्या ताब्यात घ्यावी असला प्रकार ख्रिस्तपूर्व भारताला अज्ञात होता. जसे भारतात शक, कुशाण, हूण आदी भारतात/भारतीय संस्कृतीत सरमिसळ होऊन गेले, तसे मुस्लीम किंवा ख्रिश्चन समाज होऊ शकला नाही. त्यामुळे हिंदुराष्ट्रवाद सांगताना ‘हिंदुत्व’ म्हणजे काय याची सर्वमान्य व्याख्या करणे आवश्यक होते. लोकमान्य टिळक आदी लोकांनी तसे प्रयत्न केले, पण त्या व्याख्येत काही ना काही दोष होते. ‘वेदप्रामाण्य मानणारे म्हणजे हिंदू’ अशी व्याख्या लोकमान्य टिळकांनी केली. पण, भारतात असे अनेक घटक आहेत जे वेद मानत नाहीत. त्यामुळे ते लोकमान्यांच्या ‘हिंदू’ व्याख्येतून वगळले जात. राजकीय सुसंगत, सुसंघटित आणि प्रभावीपणे सर्वमान्य ‘हिंदू’ची व्याख्या सूत्ररूपात बांधण्याचे श्रेय स्वा. सावरकरांना जाते. ‘हिंदुत्व’ नावाच्या ग्रंथात त्यांनी ती सविस्तरपणे मांडली आहे.
 
आसिंधुसिंधुपर्यन्ता, यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥
 
म्हणजे, सिंधू नदीपासून ते सिंधू सागरापर्यंत पसरलेली भारतभूमी ही ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे तो ‘हिंदू’ होय, अशी स्वा. सावरकरांनी ‘हिंदू’ची व्याख्या केलेली आहे. ही व्याख्या धार्मिक नसून ती सामाजिक, राजकीय आणि ऐहिक स्वरूपाची आहे. आपल्या ’हिंदुत्व’ ग्रंथात ‘हिंदू’ या शब्दाविषयी प्रचलित असलेले गैरसमज आपल्या ऐतिहासिक साधनांनी तर्कशुद्ध समर्पक युक्तिवादाने त्यांनी खोडून काढले आहेत. तसेच ‘हिंदू’ हा शब्द सिंधूनदीच्या ‘सिंधू’ या नावावरून झालेला अपभ्रंश आहे, असे समर्थपणे ते दाखवून देतात. आपल्या या व्याख्येचे स्पष्टीकरण देताना एखाद्याला हिंदुत्वात समाविष्ट करताना कसोटी लावली पाहिजे, त्याची लक्षणे कोणती याचा सविस्तरपणे उहापोह केलेला आहे.
 
हिंदू धर्म म्हणजे हिंदुत्व नसून फक्त हिंदुत्वाचे एक अंग आहे. येथे ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, हिंदुत्वाची व्याख्या ही नागरिकत्वाची नसून राष्ट्रीयत्वाची आहे. एक समान इतिहास, एक समान परंपरा, एक समान साहित्य, एक समान जाणीव आणि एकत्र राहण्याची परंपरा हे राष्ट्रीयत्व सिद्ध करणारे घटक हिंदुत्वात येतात. पितृभूमी म्हणजे फक्त आपले आई-वडील या भूमीत जन्मले असे नसून, ज्या भूमीत प्राचीन काळापासून परंपरेने, जातीय आणि पूर्वज वसत आहेत, ती भूमी म्हणजे पितृभूमी होय. नागरिकत्व बदलता येतं, तसं पितृभूमी बदलता येत नाही. पण, हिंदुत्वाच्या कक्षेत समाविष्ट होण्यासाठी फक्त पितृभूमी आवश्यक नसून, पुण्यभूमी देखील असली पाहिजे. पुण्यभूमी म्हणजे जो ज्या धर्मात/पंथात आहे किंवा त्याचा उपासक आहे, त्याचे मूळ, त्याचे धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान, त्याचे उपदेशकर्ते, त्याचे स्मृतिकार, त्या धर्माचे ऋषी अथवा प्रेषित यांच्या निवासामुळे ज्याला धार्मिक पुण्य लाभले, अशी भूमी म्हणजे म्हणजे पुण्यभूमी होय. ज्यांची पुण्यभूमी म्हणजे थोडक्यात ज्यांचा धर्म दुसर्‍या देशात उदय पावला त्याची पुण्यभूमीही परदेशीच असणार. उदा. ज्यू किंवा ख्रिश्चनांसाठी पॅलेस्टाईन, मुस्लिमांसाठी अरेबिया पुण्यभूमी होय. ज्यांची धार्मिक मनोभूमिका परदेशी आहे, त्यांचा समावेश हिंदुत्वामध्ये होत नाही. जैन, बौद्ध, शीख यांसारखे भारतात ज्या धर्म अथवा संप्रदायांचा उदय झाला, त्यांची पुण्यभूमी ही भारतभूमीच आहे. त्यांची धार्मिक कल्पना, त्यांचे संस्थापक, त्यांची तीर्थक्षेत्रे आणि त्यांचे पूर्वज सांस्कृतिक परंपरेने भारताचे असल्याने तेदेखील हिंदुत्वात येतात. दुसर्‍या एखाद्या देशाचा नागरिक धर्माने भारतातल्या उदय पावलेल्या धर्माचा/हिंदू धर्माचा अनुयायी असला, तरी ते फक्त धार्मिक दृष्टीने नाते असेल राष्ट्रीय दृष्टीने नाही, कारण तो ज्या देशाचा असेल त्याचे पितर, त्याची पितृभूमी किंवा त्याचे पूर्वज हे इतिहास परंपरेने पूर्णतः भिन्न आहेत. तेव्हा आपण हेदेखील समजून घेतले पाहिजे की, सावरकर हिंदुत्वात मुस्लीम किंवा ख्रिश्चन यांना वगळत नसून, ‘हिंदू कोण’ इतकेच भाष्य करून त्याची लक्षणे स्पष्ट करतात. भारतीय घटनेनेसुद्धा हिंदू-कोडबिल वापरून, अप्रत्यक्षपणे सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येवर शिक्कामोर्तब केलं, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एखाद्या व्यक्तीचे सर्व सत्व जसे ‘मी’ या जाणिवांत असते, तसे देशाच्या जाणिवेतला ‘मी’ म्हणजे ‘हिंदू’ या शब्दाच्या जाणिवेत आहे. त्यामुळे हिंदू हे एक हिंदुराष्ट्र आहे. हा हिंदुराष्ट्रवाद मांडताना हे मानवतावादी मार्गावरील एक पाऊल आहे अशी भूमिका सावरकर घेतात.
 
या हिंदूंच्या राष्ट्र किंवा राष्ट्रीयत्वाच्या भावनेत इतिहासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘ज्या ज्ञान शाखेत भूतकाळापासून मानवी जीवनाच्या समग्र वाटचालीवर परिणाम करणार्‍या घटकांचा अभ्यास साधार, ससंदर्भ केला जातो, त्याला ‘इतिहास’ म्हणतात आणि या अभ्यासाचे त्याचे तर्कशुद्ध अर्थ, मथितार्थ काढून, विश्लेषण करून त्याची समीक्षादेखील इतिहास विषयात केली जाते. हे आपण शालेय जीवनात अभ्यासलेलं आहेच. इतिहास जसा व्यक्तिगत असतो तसा तो राष्ट्रीयदेखील असतो. इतिहास म्हणजे स्मृती होय. या उपलब्ध स्मृतीच्या आधारे त्याला केंद्रबिंदू मानून किंबहुना त्याच्याच उजेडात समाज कृती करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इतिहास माहीत नसणे म्हणजे स्मृतिभ्रंश असल्याप्रमाणे आहे. एक राष्ट्र म्हणून उभे राहताना त्याच्या पाठीमागे एक गौरवशाली इतिहास असणे आणि त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण, या गौरवशाली राष्ट्रीय इतिहासातून राष्ट्राला जाणिवा, ध्येय, प्रेरणा, अस्मिता, स्वाभिमान आदी प्राप्त होतात. प्रसिद्ध इतिहासकार G. P. Gooch आपल्या ’Nationalism' या ग्रंथात म्हणतात- ‘‘एकच राजकीय पूर्वचरित्र, एकच राष्ट्रीय इतिहास, त्या इतिहासातून घेतलेला आठवणींचा एकच ठेवा आणि त्याच भूतकालीन घटनांबद्दल वाटत असलेला सामुदायिक अभिमान आणि अवमान, आनंद आणि विषाद हे राष्ट्रीयत्वाचे सर्वाधिक प्रबळ घटक आहेत.”
 
सावरकरांच्या एकूण साहित्याचा विचार केल्यास निष्ठा हा सर्वस्वी महत्त्वाचा भाग आहे. प्रथम स्वातंत्र्यनिष्ठा, सामाजिक धोरणांवरही हिंदुत्वनिष्ठेचा प्रभाव दिसून येतो. ‘संगीत उ:शाप’ नाटकात जातीभेदाच्या संदर्भात हिंदूनिष्ठेचे दर्शन होते, तर ‘उत्तरक्रिया’ नाटकात हिंदूंच्या विशाल राजकारणाचे विषय मांडतात. निवडलेला विषय, त्या विषयाभोवती निर्माण केलेला आशय आणि त्या आशयाला लावलेला तर्कशुद्ध, समर्पक आणि समर्थक अर्थ हे सावरकरांच्या लेखणीचे वैशिष्ट्य होते.
 
 
 
 
 
- सागर विलास शिंदे (9764346553)
 
@@AUTHORINFO_V1@@