सावरकर संशोधन कार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 

 
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे विविध पैलू असलेले रोमहर्षक व्यक्तिमत्त्व. त्यामुळे अनेक भक्तिभावयुक्त किंवा राजकीय द्वेषाने लिहिलेले लेख आणि पुस्तकेही वाचावयास मिळाली. संघावर अभ्यास करताना मुंबईतील सावरकर सदनामधील १९२४ ते १९५० या कालखंडातील हजारो कागदपत्रे बाळाराव सावरकरांनी मला बघण्यास दिली. यातून ब्रिटिश सरकारला सावरकर कसे दिसले हे कुतूहल मनात निर्माण झाले. लंडनच्या मुकुंद सोनपाटकींच्या पत्रामुळे शिकागो विद्यापीठातील ‘Ban Political Literature in India’ च्या ‘microfilm’ मधून हजारो पानांतून स्कॉटलंड यार्डने जप्त केलेले वीर सावरकरांचे ‘Choose Oh Indian Princess’ हे निवेदन मिळाले. ते सुधीर फडके यांनी सावरकर ‘Souvenir’ मध्ये चार भाषांत प्रसिद्ध केले. बाबूजींच्या आग्रहामुळे ‘Gelic ­merica’ चे जुने अंक कोठे आहेत, हे शोधण्यात काही काळ गेला. सावरकरांनी त्यात लिखाण केले अशी नोंद सावरकर चरित्रात वाचली होती. सुदैवाने ‘Appeal to Children of Islam,’ 'Khalsa and Philosophy of Secret Society' असे सावरकरांचे लेख Notre Dame University, South Bend, Indiana येथे मिळाले.
 
या पार्श्वभूमीवर savarkar.org प्रणेते डॉ. श्रीरंग गोडबोलेंनी २०१० ला ब्रिटिश अभिलेखागारामधील सावरकरविषयक सरकारी गुप्त कागदपत्र बघण्यास सांगितली. बोस्टन निवासी अभ्यासू अनुरूपा सिनार यांच्या अभ्यासू, कष्टाळू व प्रेमळ प्रोत्साहनामुळे लंडनमधील इंडिया लायब्ररी, ब्रिटिश अभिलेखागार व वर्तमानपत्रांच्या ग्रंथालयातून दहा हजार पाने इतका अप्रकाशित मजकूर मिळाला. (यात सावरकर बंधूंविषयी Confidential Records, एम्डेन पाणबुडी पाठवून, अंदमानातील तुरुंगातील सावरकर मुक्तीची योजना आखणार्‍या जर्मन सैनिकी अधिकार्‍यांची माहिती, तसेच मार्टिन या नावाने मानवेंद्र रॉय यांचे अंदमानातील राजबंदी मुक्ततेचा फसलेला प्रयत्न, १८५७ चे स्वातंत्र्यसमर ग्रंथाची पहिली जप्त प्रत, सावरकरांच्या हेग खटल्याशी संबंधित कागदपत्र, आंतरराष्ट्रीय पंडित श्यामजी कृष्णा वर्मा, इंग्लंडमधील भारत भवन म्हणजे इंडिया हाऊस क्रांतिकारक इत्यादी कागदपत्रे होती.)
 
पॅरिसमध्ये फ्रेंच वृत्तपत्रातील एक हजार पाने मिळाली. त्याव्यतिरिक्त जर्मन भाषेत शंभर पाने उपलब्ध झाली. पुढे दोन वर्षे २०११ आणि २०१२ (चार-पाच महिन्यांची भारत यात्रा) मुंबईतील महाराष्ट्र अभिलेखागारातून १९४४ सालापर्यंत १६ हजार पानी गृहखात्याचा गुप्त अहवाल मिळाला. त्यात तिन्ही सावरकर बंधू, माई सावरकरांनी ब्रिटिश अधिकार्‍यांना लिहिलेली पत्रे, सावरकरांच्या नाटकाचा इंग्लिश अनुवाद व स्वा. सावरकरांविषयी- “He is the most dangerous person. We cannot trust him,” असा टीकात्मक पण अचूक जाणीव असणारा ब्रिटिश शेरा सापडला. (डॉक्टर य. दि. फडके यांनी १९३७ पर्यंत सावरकर कागदपत्रांची नोंद लिहिली आहे.)
 
१९४५ ते १९६५ पर्यंतची सरकारी कागदपत्रे बघण्याची अनुमती मिळण्यास दोन भेटीत आठ महिने लागले. सरकारी नोकरशाहीचा दु:खी अनुभव मिळाला. तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे शेवटी अनुमती मिळाली. १९३७ चे रास बिहारी बसूंनी सावरकरांना पाठविलेले, पण जप्त केलेले पत्र मुंबई CID कर्मचार्‍यांनी ‘जुने’ म्हणून छायाप्रत घेण्यास अनुमती दिली नाही, तर हॅन्ड हेल्ड स्कॅनरने स्कॅन करण्यास नकाराचे कारण १९७० च्या GR मध्ये हॅन्ड हेल्ड स्कॅनरचे नाव नाही. (हॅन्ड हेल्ड स्कॅनरचा शोध नंतरचा ही आमचीच चूक.) तरी स्वतंत्र भारतातील सावरकर गुप्त अहवालाची साडेआठशे पाने नोंद आहे. २०१३ ला सावरकर, मादाम कामा, पं. श्यामजी कृष्ण वर्मांविषयीचा रशियन लेख मिळाला.
 
जॉन हॉपकिन विद्यापीठातले डॉ. वॉल्टर अँडरसन आणि माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचे नवे पुस्तक या दसर्‍यापर्यंत प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई गुप्त वार्ता विभाग, मध्य प्रदेश अभिलेखागार, सावरकरांचा १९६१ ND­A भेटीनंतरचा रिपोर्ट, १९३९ ला कोलकाता एन. सी. चॅटर्जीच्या घरी झालेली सावरकर-नेपाळ नरेश भेट याविषयी गुप्त पोलीस माहिती गोळा करणार आहे.
 
यावर्षी २०१८ ला जानेवारीत पुणे येथे जागतिक मराठी परिषेदत पॅरिसचे पुष्कर मोरे भेटले होते. १९१२ साली फ्रेंच लेखक Pierre Khorat यांनी फ्रेंच भाषेत सावरकर चरित्र लिहिलेले अशी नोंद इंदुलाल याज्ञिक यांनी पंडित श्यामजी कृष्ण वर्मांच्या लिहिलेल्या चरित्रात सापडते. पण, मला भाषेच्या अडचणीमुळे ते अजूनपर्यंत मिळू शकले नाही. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मूळ पुण्याचे, पण सध्या कामानिमित्त फ्रान्सला राहणारे पुष्कर मोरे यांनी Prof. Brigitte Barberon यांच्या साहाय्याने खोरात यांचे फ्रेंच भाषेतील दोन लेख शोधून काढले. एका लेखात सावरकरांच्या मार्सेलिसच्या जगप्रसिद्ध उडीचा उल्लेख आहे व दुसर्‍या लेखात भारतातील स्वातंत्र्य चळवळ, लोकमान्य टिळकांचे योगदान याविषयी माहिती आहे. खोरात यांनी लिहिलेले सावरकर चरित्र मिळेल अशी आशा करूयात.
 
कोलकाता येथील सावरकर व नेपाळनरेश भेटीविषयी गुप्त पोलीस अहवाल मिळण्यासाठी व सावरकर यांची १९६१ ची राष्ट्रीय सरंक्षक प्रबोधिनी (ND­A) भेटीविषयी प्रमुखाने पाठविलेला अहवाल मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटी मिळविण्यासाठी दिल्लीतील परिचित मराठी भाजप प्रतिष्ठित मान्यवरांनी साहाय्य केले नाही याचे दुःख होते. केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्री यांची सूचनापत्रे मिळाली तर काम सुलभ होणार आहे. सावरकर म्हणजे अनेक अडचणी, अनेक त्रास असे असले, तरी सावरकरप्रेमी भाजप सरकारने साहाय्य करावे, अशी विनंती आहे. हे काम मी वयाच्या ७५ व्या वर्षी savarkar.org व सावरकर प्रतिष्ठानसाठी मानधन न घेता करीत आहे. लंडन संशोधनासाठी पाच हजार आठशे डॉलर्स खर्च आला. मी अमेरिकेतून फक्त तीन हजार आठशे डॉलर्स जमवू शकलो.
 
हे सावरकर संशोधन कार्य म्हणजे मी माझ्याकडून समाज, राष्ट्र व सावरकर ऋण फेडण्याचा छोटा नम्र प्रयत्न समजतो.
 
 
 
 
- श्रीधर दामले, शिकागो, अमेरिका 
 
@@AUTHORINFO_V1@@