सावरकर आणि संस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 

 

’मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ च्याहीपुढे जाऊन, मरावे परी विचाररूपी उरावे, असा आदर्श निर्माण करणार्‍या व्यक्तींची आपल्या महन्मंगल मातृभूमीत वानवा नाही. पण मृत्यूनंतर नव्हेच, जिवंत असतानाही ज्यांचे जीवन चरित्र आख्यायिकाच आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन, आज समाजकार्य देशसेवा करणार्‍या संस्था आहेत. त्या संस्था सावरकरांचे विचार जगतात आणि त्या जगण्यावर कित्येक सकारात्मक विचारांचे अनुबंध फुलतात. महाराष्ट्रातील शेकडो संस्थांपैकी काही संस्थांचा घेतलेला वेध
 
सूर्यासही तेज द्यावे
मृत्यूसही जगण्याचे बळ द्यावे
जगणे मरणे दोन
घडीच्या डावामध्ये
शाश्वत मूल्यविचारांच्या
कर्तृत्वाचे देणे द्यावे
 
मानवी शाश्वत मूल्यांच्या प्रेरणेने कर्तृत्वाचे देणे लाभण्यासाठी काय हवे? आदर्श हवेत, प्रेरणी हवी, बळ हवे, विश्वास हवा, त्याग हवा.. या यादीत आणखी बरेच काही येईल, पण एका वाक्यात जर यादीची सांगता करायची झाली, तर इतकेच म्हणू शकतो, की शाश्वत मूल्यविचारांच्या कर्तृत्वाचे देणे लाभायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी बांधलेली कर्मपूजा ही मूल्याधिष्ठित कर्तृत्व असू शकते, नव्हे आहेच. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन, काम करणार्‍या संस्था या कथनाची सार्थकता सत्यता ठसवतात. कलियुग सत्युगाच्या वार्ता न करताही आजकालचे वास्तव पाहिले, तर स्वार्थाव्यतिरिक्त सारे शून्य असेच वास्तव सर्वत्र आहे. त्याला सेवाभावी संस्थात्मक जीवनही अपवाद नाही. पैसा, प्रतिष्ठा, पद, लोकप्रियता, अधिकार यांसाठी सेवाभावी संस्थांची निर्मिती होताना सर्रास दिसते. सेवा का करायची? तर मेवा मिळवण्यासाठी. सेवेच्या मुखवट्याआड कृष्णकृत्य किंवा असामाजिक तत्त्वांचा उदोउदो करायचा. देशकल्याण, समाजकल्याणाला विरोध करायचा, हे कारस्थान संस्था करताना दिसतात. या सर्व पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर काम करणार्‍या संस्थेचे निःस्वार्थी काम प्रभावीपणे आपला ठसा उमटवते.
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर
थोर व्यक्तीचा मृत्यू झाला, शारीरिक जीवन संपले, की तिचे विचार संपले असे होत नाही. थोर व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्या व्यक्तीचे विचार कर्तृत्व चिरंतन स्मृतीत राहते. नव्हे ती समाजाची गरजच असते. आपल्या ध्येयशील आयुष्याचा आत्मार्पण स्वातंत्रयवीर सावरकरांनी २६ फेब्रुवारी १९६६ रोजी प्रायोपवेशनाने आत्मार्पण केले, पण मृत्यूनंतरही स्वा. सावरकरांच्या विचारांनी त्यांच्या अनुयायांना एकत्र केले. या अनुयायांनी सावरकारांच्या विचारांना अजरामर ठेवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. या स्मारकाच्या माध्यमातून देशभर सावरकारांच्या विचारांनुसार कार्य करणारी एकमेव केंद्रीय संस्था स्थापन करण्याचाही विचार होता. स्मारकाच्या स्थापनेसाठी मुंबई महानगर पालिकेने शिवाजी पार्क येथे ६६५०चौमी जागा नाममात्र भाडेपट्टीवर दिली. असंख्य व्यक्ती आणि संस्थांच्या अविरत प्रयत्नांमुळे स्मारकाने आकार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाबद्दल माहिती देताना, मंदाकिनी भट म्हणतात समाजामध्ये राष्ट्रीय विचारांचे जागरण व्हावे. समाज सबल व्हावा, हे सबलीकरण केवळ शारीरिक बाह्य नसून, आत्मिकदृष्ट्यासुद्धा समाज बलवान व्हावा म्हणून स्मारकामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकांचे उपक्रम पाहिले की मंदाकिनी भट यांच्या बोलण्यातली सत्यता पटते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आधुनिक वैज्ञानिक सबलतेचा पुरस्कार केला. सावरकरांच्या या विचारांचे समाजावर अधिराज्य व्हावे यासाठी स्मारकांमध्ये लष्करीकरण, एअर रायफल शूटिंग, मार्शल आर्टस्, पर्वतारोहण, टे्रकिंग, बॉक्सिंग शिकविले जाते. मुष्टियुद्ध, धनुर्धारी प्रशिक्षण, सावरकर मुक्तमंच हेसुद्धा उपक्रम सुरू आहेत, या शारीरिक सुदृढीकरणाच्या उपक्रमाबरोबरच कला प्रांताचेही प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये राष्ट्रीय गीत मंच आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू करण्यात आले. सावरकर म्हणजे ज्ञानाचे अखंड अग्निहोत्र. आजसारखे संगणकयुग, मोबाईलयुग त्यांच्या काळी नव्हते बरं. पण सावरकारंच्या ज्ञानाच्या कक्षा आणि त्या ज्ञानाला अनुलक्षून, त्यांनी दिलेले संदर्भ हे सगळे थक्क करणारे आहे. स्वा. सावरकरांच्या ज्ञानयोगाला आदांजली अर्पित स्मारकामध्ये प्रख्यात संदर्भ ग्रंथालय आणि वाचन कक्षही आहे. या स्मारकामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची रायफल रेंजची निर्मिती, सुसज्ज व अद्ययावत सभागृहाची निर्मिती, थ्रीडी वॉल मॅपिंग तंत्रावरील स्वातंत्र्यवीर भव्य ’शो’ची निर्मिती, सौर ऊर्जेवरील स्मारकाने प्रकल्प साकारले आहेत. हे सगळे का? तर बदलत्या आधुनिक युगाचे जे काही सकारात्मक तंत्र आहे. ते समजणे आणि उपयोगात आणणे हे सावरकरांच्या विचारांचे सार होय. सावरकारांनी तंत्र-यंत्र विज्ञानाला विरोध केला नाही. सावरकर म्हणत यंत्रामुळे बेकारी निर्माण होत नाही, तर विषमतेमुळे बेकारी निर्माण होते. त्यामुळे सावरकर राष्ट्रीय स्मारकात अत्याधुनिक विज्ञानाची कास धरून देशाच्या संरक्षणात्मक नीतीबाबतही कार्यक्रम केले जातात. स्मारकाच्या आगामी काळातील काही योजना आहेत. त्यामध्ये क्रांतिकारकांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित राष्ट्रीय स्मृती संग्रहालय, अंदमान प्रतिकृतीची उभारणी करणे हे उपक्रम आहेत.
 
सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे काम दशदिशा व्यापते. जागतिकीकरणाच्या युगात सावरकरांचे महान विचार जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचावेत, यासाठी स्मारकाने ’सावरकर स्मारक डॉट कॉम’ या संकेतस्थळाची निर्मिती केली. या संकेतस्थळावर सावरकरांच्या मराठी व इंग्रजी साहित्यातील ग्रंथ निःशुल्क उपलब्ध करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांचे साहित्य १२ भारतीय भाषांमध्ये, तसेच ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. वेबसाईटवरून मोफत साहित्य पुरवले जाते. इतकेच काय केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरील सकारात्मक विश्लेषण दरवर्षी दुसर्‍या दिवशी नियमितपणे जाहीर कार्यक्रमातून केले जाते.
 
सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे काम पाहिले की आश्चर्य वाटते. एका संस्थेने एका व्यक्तीच्या विचारांवर किती काम करावे? अर्थात ती व्यक्ती ही एकमेवाद्वितीय असे स्वा. सावरकर आहेत म्हणा. पण काहीही असो, स्वा. सावरकरांच्या विचारांना समाजमनामध्ये पेरणारी प्रेरणादायी संस्था म्हणून सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे नाव अग्रणी घ्यायला हवे.
 
सावरकर प्रत्येक क्षणी काय विचार करत, त्यानुसार काय कृती करत, यावर स्मारकाचे पदाधिकारीही जीवनक्रम अनुसरण्याचा प्रयत्न करत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नोटाबंदी आणि धसई गाव. नोटाबंदीनंतर जगबुडी झाली की काय? अशा आवेशात प्रसारमाध्यमांनी कल्लोळ केला. कुठे कुठे नोटाबंदीचा थोडा फटका बसला नाही, असे नाही, पण नोटाबंदीमुळे अर्थकारणच कोलमडेल. शहरांचं सोडा, गावखेड्यातले लोक काय करतील?’ असा वाद माजला. याच पार्श्वभूमीवर धसई गावात पूर्णतः यशस्वी नोटाबंदी झाली. गावाचे आर्थिकदृष्ट्या पूर्णतः आधुनिकीकरण झाले. हीसुद्धा एक क्रांतीच होती. ही आधुनिक क्रांती कशी झाली? तर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने यात सहभाग घेतला. स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर यांनी या कामी पुढाकार घेतला. धसई गाव व परिसरातील अन्य गावांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले. ही प्रक्रिया आजदेखील सुरु असून, आजूबाजूची 35 हून अधिक खेडी रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या उपक्रमातून आदिवासी विभागातील पहिली स्वयंचलित बँकही सुरू झाली आहे. अर्थात रोखमुक्त गावांची संकल्पना यशस्वी करण्याची धमक सावरकरप्रेमी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकच दाखवू शकतात हे ही खरेच.
स्वा. सावरकर दर्शन प्रतिष्ठान
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा या हेतूने या संस्थेची स्थापना १९८५ साली झाली. सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनी स्थापना केली. सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सध्याचे अध्यक्ष दादा इदाते आहेत. प्रतिष्ठानसंदर्भात माहिती देताना संस्थेचे उत्तम पवार म्हणतात, ”भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचा इतिहास नवीन पिढीसमोर यावा, या हेतूने वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचा विचार करण्यात आला होता. या चित्रपटाचा व्यावसायिक हेतू नव्हता. तसेच हा चित्रपट दर्जेदारही बनवायचा होता, त्यामुळे लागणारा सर्व निधी सर्वसामान्यांकडून देणगी स्वरूपात जमा करण्याचे ठरले. यासाठी सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्थेची नोंदणी करण्यात आली. चित्रपटाने रजत महोत्सव साजरा केला. तत्कालीन पंतप्रधान मा. वाजपेयी यांनी मंत्रिमंडळासाठी एक विशेष प्रदर्शनही केले होते. या चित्रपटाची वाढती मागणी लक्षात घेऊन, याच्या हिंदी डीव्हीडी बनवण्यात आल्या. याचे प्रकाशन मा. लालकृष्ण आडवाणी यांनी केले. हा चित्रपट पुढे गुजराती भाषेत डब करण्यात आला. याचे प्रकाशन मा. नरेंद्र मोदी यांनी केले. मराठीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर वीर सावरकर हा चित्रपट दोनदा प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला आजही मागणी आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी विचारांचा प्रसार व्हावा म्हणून अनेक उपक्रम केले जातात. उदाहरणार्थ स्वा. सावरकर स्मृती आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते. सावरकरांच्या विचारांवर महाविद्यालयीन तरुणांना बोलते करावे, त्यांनी आपापसात चर्चा करावी व सर्व चर्चेचा समारोप या क्षेत्रातील विचारवंतांच्या मार्गदर्शनाने व्हावा, याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
राष्ट्रवाद अध्ययन प्रमाणपत्र अभ्यासक्रम -
आज आपण नेहमी राष्ट्रवाद हा शब्द ऐकतो, नेहमीच्या बोलण्यात आपण वापरतही असतो, पण भारतीय राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय? असा प्रश्न आला, तर त्याचे नेमके स्वरूप आपणाला विशद करता येत नाही. भारतातील विविध धर्मांची राष्ट्रवादाची भूमिका काय आहे? भारताबरोबरच इतरही देशांतला राष्ट्रवाद कसा आहे? राष्ट्रवादाचे जागतिक प्रणेते, भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची राष्ट्रवादाची नेमकी भूमिका या यासारख्या अनेक विषयांचा अभ्यास या तीन दिवसीय निवासी वर्गात केला जातो, हा वर्ग राज्यशास्राचे विद्यार्थी/प्राध्यापक/संशोधक/अभ्यासक यांच्यासाठी आहे.
 
अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन -
स्वा. सावरकरांनी साहित्याचे विविध प्रकार हाताळले आहेत. केवळ देशभक्ती, समाजहित व धर्मसुधारणा या विषयांवर हे विविधांगी सहा हजार पानांचे हे साहित्य आहे. या साहित्याच्या विविध पैलूंवर बर्‍याच जणांनी बरेच संशोधन ही केले आहे. काही संस्था यावर साहित्य संमेलन भरवत असतात. या उपक्रमाला एकसूत्रीपणा यावा व याला देशपातळीवर एक वैचारिक उंची मिळावी यासाठी ’सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ने यात सहआयोजक म्हणून सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. आजवर सोलापूर, बडोदा, हैद्राबाद, रत्नागिरी, ठाणे या ठिकाणी ही संमेलने पार पडली आहेत.
 
पतीतपावन मंदिर अमृत महोत्सव २००७
सावरकरांनी आपल्या रत्नागिरी वास्तव्यात सामाजिक सुधारणांचे खूप प्रयत्न केले. सर्व हिंदू धर्मीयांना मुक्तद्वार असलेले मंदिर असावे, या हेतूने पतीतपावन या मंदिराची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन अस्पृश्यांना पूजेचा मान देण्यात आला. ही संपूर्ण भारतासाठी क्रांतिकारक घटना होती. या ऐतिहासिक मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा पतीतपावन मंदिर समिती बरोबर उत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण दहा दिवस या निमित्ताने निरनिराळे उपक्रम योजण्यात आले होते. अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मोहनजी भागवत आवर्जून आले होते.
 
इतिहासाच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा
भारताचा इतिहास हा गौरवशाली विजयाचा आहे, पण प्रचलित शिक्षण व्यवस्थेत यावर फार लक्ष दिले नाही. सावरकरांनी ही धारणा बदलावी, म्हणून सहा सोनेरी पाने हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातील प्रकरणांचा समावेश क्रमिक पुस्तकात नाही, आजच्या इतिहासाच्या शिक्षकांना याचा परिचय करून देण्यासाठी प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक मोडक यांनी कार्यशाळेचे प्रारूप बनवले आहे. यानुसार ’भारतीय इतिहास संकलन समिती’ व प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाच्या शिक्षक/प्राध्यापक/अभ्यासक यांकरिता या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नियमितपणे करण्यात येते.
 
व्याख्याने/परिसंवाद: भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात त्याच बरोबर सावरकर विचारांच्या संदर्भात दिन विशेषांच्या निमित्ताने निरनिराळ्या विषयांवर व्याख्याने व परिसंवाद यांचे नियमित आयोजन होत असते.
स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
सावरकरांच्या आत्मार्पणानंतरच्या काळात सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा बाळाराव सावरकर यांनी पुढाकार घेऊन, सावरकरांच्या तेजस्वी आणि राष्ट्रोद्धारक साहित्याच्या माध्यमातून अभिजात निरपेक्ष देशभक्तीचा वारसा भावी पिढ्यांना मिळत राहावा, त्याचा प्रसार आणि प्रचार सातत्याने अखंड होत राहावा, या मुख्य उद्देशाने प्रेरित असलेल्या संस्थेची स्थापना व्हावी, अशा विचारांची संकल्पना बैठकीत सादर केली. त्यानंतर पुढल्या वर्षीच 10 एप्रिल 1967 च्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी ‘सावरकर सदन’मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई’ या संस्थेची स्थापना झाली. या बैठकीस रा. म. आठवले, अंनत काणेकर, दत्तप्रसन्न काटदरे, अप्पा कासार, प्रा. व. दि. कुलकर्णी, के. वि. घारपुरे, दि. वि. गोखले, विद्याधर गोखले, शं. द. गोखले, ज. द. जोगळेकर, पुण्याचे शंकरराव तथा मामा दाते, सुधीर फडके, प्रा. सं. ग. मालशे आदी विचारवंत आणि सावरकरप्रेमी मंडळी उपस्थित होती. बैठकीत रा. म. आठवले यांनी वरील संस्था स्थापन व्हावी, असा ठराव मांडला आणि संस्थेच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. हे मुंबईचे सावरकर साहित्य अभ्यास मंडळ नित्यनेमाने सावरकर साहित्य संमेलन भरवते.
 
सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले सांगतात की, ”युवकांमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि सावरकर साहित्याचा व्यासंग निर्माण व्हावा; म्हणून मंडळातर्फे विद्यालयीन आणि महाविद्यालयीन स्तरावर वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेणे, पाठांतर, हस्ताक्षर, कथाकथन अशा प्रकारच्या स्पर्धा मुलांसाठी आयोजित करणे, तसेच स्नेहशिबिरे कार्यशाळा, परिसंवाद यांसारखे उपक्रम राबवणे, या गोष्टी मंडळाच्या उद्देशानुसार होतच असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे वर्ष १९८३-८४ पासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन’ हा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाने चालू केला. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध गावा-शहरांत २९ संमेलने संपन्न झाली आहेत. संमेलनाच्या निमित्ताने साहित्यक्षेत्रातील नामवंत व्यासंगी आणि विचारवंत मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र येत असतात. सावरकर यांचे तेजस्वी आणि ओजस्वी विचार, तत्त्वज्ञान अन् साहित्य यांचा प्रचार-प्रसार अधिक जोमाने व्हावा, यासाठी २१ मार्च २००४ या दिवशी ‘धर्मभास्कर’ मासिकाचे संस्थापक आणि संपादक कै. अवधूतशास्त्री यांच्या शुभहस्ते मंडळाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर’ या मासिकाचा शुभारंभ केला. या अंकाच्या संपादनाचे दायित्व मी गेली १४ वर्षे पार पाडत आहे.
 
सावरकर साहित्य अभ्यास मंडळाने येणार्‍या कालावधीत एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. मंडळाच्या वतीने ‘सावरकर विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या सावरकर यांच्या चरित्रपर व्याख्यानाचे शाळाशाळांतून आयोजन केले जाते. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्था शाळांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा आणि दोन चरित्रग्रंथ देण्याचा अभिनव उपक्रम राबवत आहे. सावरकरांचे विचार शाळाशाळांमधील विद्यार्थ्यांपर्यत पोहोचावेत हाच यामागचा उद्देश. सावरकरांची प्रतिमा शाळेच्या प्रवेशद्वार किंवा मुख्य ठिकाणी लावावी हा आग्रहही संस्था शाळेला करते. सावरकर अतुलनीय क्रांतिकारी देशभक्त होतेच, पण त्यांचे साहित्यक्षेत्रातले योगदानही भव्यच आहे. त्यांच्या शब्दांत भावनांचे सागर सहज उसळत. त्यांच्या शब्दांनी निर्माण केलेल्या साहित्याने देशातच नव्हे, तर विदेशातही भारतीय युवकांच्या नसानसांमध्ये देशप्रेम जागृत केले होते. अशा साहित्यिक सावरकरांच्या साहित्याचा संदर्भ नावातच घेऊन, काम करणारी ही संस्था. संस्थेच्या शंकर गोखले यांच्याशी संवाद साधला असताना, सावरकर प्रेम, सावरकरांचे विचार तळागाळात पोहोचावे यासाठीची तळमळ शब्दाशब्दांत जाणवत होती. हेच प्रेम, हीच तळमळ घेऊन, स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ काम करत आहे.
 
त्याचप्रमाणे डोंबिवलीमध्येही सावरकर अभ्यास मंडळ कार्यरत आहे. सावरकर अभ्यास मंडळ, डोंबिवली (ठाणे जिल्हा) याची स्थापना सावरकर प्रेमी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने सन २००० साली केली. सावरकरांच्या वाङ्मयाचा व त्यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून, त्यांच्या विचारांचा राष्ट्रावर प्रभाव पडावा व आपले राष्ट्र सावरकर विचारांच्या प्रेरणेतून परमवैभवाला गेले पाहिजे. या पवित्र हेतूने हे अभ्यास मंडळ स्थापण्यात आले. त्यातूनच सन २००० या सालापासून सावरकरांवर विशेष अभ्यास करणार्‍या व त्याप्रमाणे आचरण करणार्‍या व्यक्तीचा वीर सावरकर सेवा पुरस्कार देऊन, सत्कार करते. महाराष्ट्राबाहेर कलकत्त्यातदेखील ’वीर सावरकर फाऊंडेशन’ नावाची संस्थाही नियमितपणे वीर सावरकर पुरस्कार देते.
 
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट
. आसेतुहिमाचल देशाला बांधून ठेवणारे सूत्र कोणते? तर ते आहे आपली राष्ट्रीय अस्मिता. या राष्ट्रीय अस्मितेला चेतना देणारे जर काही आहे तर ते आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांचे बलिदान. जात-धर्म-प्रांत या पलीकडे जाऊन, भारतमातेसाठी त्यांनी केलेला त्याग होय. या त्यागाची गाथा समाजाच्या मनात ऐक्याची ज्योत जागवू शकते. हा विचार सावरकरांनी अनेक विधानांतून प्रकट केला होता. ’सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातून हा विचार ठायी ठायी प्रकट होतो. या विचारांना स्मरूनच जणू चंद्रकांत शहासने यांची ’कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’ काम करते. ’कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’चे काम राष्ट्राय स्वाहा ’इदं न मम’ या विचारमूल्याला अग्रेसर मानून काम करते. आपले जे आहे ते सर्व राष्ट्रासाठी समर्पित आहे, या भावनेने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टने अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यापैकी एक विशेष म्हणजे दहा हजार क्रांतिकारकांचा देशभक्तकोश निर्माण केला. ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने म्हणतात, ”वंदे मातरम, देशासाठी अहर्निश त्याग करणार्‍या क्रांतिकारकांची माहिती समाजासमोर यावी, त्याद्वारे प्रेरणा घेऊन, समाजात देशभक्तीची जाज्ज्वल्य भावना जागृत व्हावी यासाठी ३६ वर्षे अभ्यास केला. त्यातूनच हजार क्रांतिकारकांचा देशक्तकोश तयार झाला.” शब्दातीत. एखादा विषय घेऊन, त्या झपाटलेपणाने ध्येये विकसित करणारे तसे दुर्मिळच. ’नेक्स्ट जनरेशन’च्या युगात सर्व जग एकच खेडे झाले असताना, भारतीय तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्वाला जागृत असणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टने एकशे सहा दिवस राष्ट्रभक्ती प्रसार अभियान राबविले. या अभियानांतर्गत ट्रस्टने पाच लाख विद्यार्थ्यांशी संपर्क केला. याच वेळी सावरकरांच्या क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित असलेल्या ३७ पुस्तकांचे प्रकाशन केले गेले. ही पुस्तके विनामुल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली गेली. समाजाच्या सर्वच स्तरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार पोहोचावेत हाच या मागचा उद्देश.
 
संस्थेच्या माध्यमातून क्रांतिकारकांची ओळख विद्यार्थ्यांना करून, देण्यासाठी क्रांतिकारकांच्या छायाचित्राचे प्रदर्शन लावण्यात येते. साधारपणे एक हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. संस्था व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवित आहे. व्यसनांचे दुष्परिणाम सांगणार्‍या विविध स्पर्धा आयोजित करण्यता येतात. याचबरोबर एड्सविरोधी अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबीर, सैनिकांच्या परिवारांशी गाठीभेटी असे कार्यक्रम केले जातात. संस्थेच्या माध्यमातून अंदमानाला २०१० मध्ये आणि नाशिक भगूरला २०१६ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण वर्षानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन आयोजित केले होते. यावर ट्रस्टचे अध्यक्ष शहासने यांचे म्हणणे आहे की, स्वातंत्र्सवीर विनायक दामोदर सावरकर व गणेश दामोदर सावरकर यांची अंदमानच्या कारागृहातून १९२१ साली मुक्तता झाली. कारागृहाच्या दरवाजातून बाहेर आल्यावर त्यांनी भारतवर्षाला उद्देशून अजरामर स्वगत म्हटले,
 
”एक देव, एक देश, एक आशा॥
एक जाती, एक जीव, एक आशा॥”
ही भावना प्रत्येक भारतीयाच्या हृदयात उमलायला हवी. यासाठी शक्य तितके कार्य ’कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’ करते. निष्काम कर्मयोगातून प्रखर राष्ट्रवादाचा प्रसार व पुरस्कार करणे हे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे अंतिम ध्येय आहे. ’कर्नाळा ट्रस्ट’च्या कामासाठी किती तरी सावरकरप्रेमी जमीन देण्याची तयारी दर्शवितात, पण कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या सर्वाला स्वच्छ नकार देते. कुणाचाही एक रुपया न घेता, देशसेवेचे व्रत निभावता आले पाहिजे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी पुणे
पुण्याच्या निगडीमधले ’स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळा’चे काम ही असेच विशेष. संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देताना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सचिव भास्कर रिकामे याांनी सविस्तर माहिती दिली की, १९८३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाची निगडी प्राधिकरणामध्ये स्थापना करण्यात आली. राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रसेवा हे ब्रीदवाक्य घेऊन, संस्थेने या शहराची सांस्कृतिक नगरी अशी ओळख निर्माण करण्यासाठी व सुसंस्कृत असा समाज घडवण्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. यांपैकी छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला, रवींद्रनाथ सार्वजनिक ग्रंथालय, निसर्गमित्र विभाग व स्वतंत्र महिला विभाग यासारखे उपक्रम आज या शहरामध्ये दीपस्तंभासारखे काम करीत आहेत. अनेक संस्थांना प्रेरणादायी ठरत आहेत. ’किर्लोस्कर वसुंधरा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आयोजित करून, पर्यावरण विषयक जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. विनामूल्य योगवर्ग, शिबिरांचे आयोजन केले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळा’च्या उपक्रमाची सविस्तर माहिती अशी-
 
रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय:- १९८३ मध्ये सावरकर मंडळाची स्थापन झाल्यानंतर लगेच फक्त दोनशे पुस्तकांच्या सहाय्याने सुरु केलेल्या ग्रंथालयात आज पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त इंग्रजी व मराठी भाषेतील ग्रंथसंपदा वाचकांसाठी उपलब्ध आहे. सरासरी अडीच हजारांपेक्षा जास्त वाचक याचा नियमित लाभ घेत आहेत. मुलांसाठी वर्षभर सवलतीच्या दरात तर मे महिन्यामध्ये संपूर्ण मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. स्पर्धापरीक्षा व संदर्भ ग्रंथ विभाग, स्वतंत्र बाल व महिला विभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी २० पेक्षा जास्त वर्तमानपत्र असलेले मोफत वाचनालय, मान्यवर लेखकांची व्याख्याने, पुस्तकदिनानिमित्त सरस्वती पूजन, तिळगूळ सभारंभ यासारखे उपक्रम राबविले जातात. वाचन संस्कृती वाढावी यासाठी दरवर्षी दोन ग्रंथालयांना पुस्तके, कपाट इ. च्या स्वरूपात भरीव मदत केली जाते. संपूर्ण संगणकीकृत अशा या ग्रंथालायाचा साडेतीन हजारांपेक्षा जास्त सभासद नियमित लाभ घेत आहेत.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग :- १९८३ मध्ये सुरु झालेला महिला विभाग स्वतंत्रपणे अनेक उपक्रम राबवित आहे. आपली संस्कृती जपण्यासाठी व हा वारसा भावी पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी मंगळागौर, चैत्रागौर, संक्रात, हळदीकुंकू, महाभोंडला, वसुबारस, यासारखे पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. जागतिक महिलादिनाचे निमित्त साधून, विशेष नैपुण्य संपादन करणार्‍या व त्याचा उपयोग समाजासाठी करणार्‍या महिलांचा आवर्जून गौरव केला जातो. विभागाच्या वतीने दानपत्र योजना राबविली जाते. यातून जमा होणारा निधी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी केला जातो. राजगुरुनगर येथील वनवासी विद्यार्थी वसतिगृहात सुविधा पुरविल्या जातात. पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या व पारंपरिक पद्धतीने आकाशकंदील बनविणे अशा स्वरूपाच्या कार्यशाळा, संस्कार शिबिरे इत्यादींचे आयोजन केले जाते.
 
छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला :- १९८५ मध्ये ’स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळा’ने मे महिन्यातील पाच दिवसाची छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला आज पिंपरी चिंचवड शहराचा मानबिंदू ठरली आहे. आज अखेर शेती, शास्त्र, आरोग्य, अवकाश, संशोधन, व्यवसाय मार्गदर्शन, समाजकारण अशा विषयावरील २२५ पेक्षा जास्त व्याख्याने झाली आहेत.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार :- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने राष्ट्रभक्ती, समाजाचे संघटन, सेवा, सरंक्षण आणि संघर्ष या क्षेत्रात भरीव काम करीत असलेल्या संस्थांचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार (रुपये एक लाख) व स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार (रुपये ५१,०००) देऊन, गौरव केला जातो.
 
निसर्ग मित्र विभाग- पर्यावरण रक्षण व जनजागृतीसाठी निसर्गामित्र विभाग २००८ पासून कार्यरत आहे. विद्यार्थिदशेतच मुलांमध्ये आपला इतिहास, आपली संस्कृती व पर्यावरण विषयक आवड निर्माण व्हावी यासाठी किल्ले व गड्कोट दर्शन, निसर्ग दर्शन सहली, किल्ले बनवा स्पर्धा, निबंध स्पर्धा, पर्यावरण विषयक व्याख्याने व कार्यशाळांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सव संपल्यानंतर पवना नदीतून प्लास्टर ऑफ पैरीसच्या हजारो मुर्त्या बाहेर काढून महानगरपालिकेकडे सुपूर्त केल्या जातात.
 
हरित घोरावडेश्वर प्रकल्प - देहूरोड जवळील घोरवडेश्वर डोंगरावर सन २००९ पासून अखंडितपणे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम करीत आहे. आज या ठिकाणी स्थानिक प्रजातींची ८००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. या डोंगरावर व परिसरातील नागरिकांसाठी मोफत झाडे पुरविण्यासाठी देहूरोड येथे रोपवाटिका निर्माण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. या रोपवाटीकेतील झाडे देहूगाव ते निगडी या रस्त्याच्या बाजूने पालखी मार्गावर लावण्यात येणार आहेत. दहा हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची रोपवाटिका तयार केली असून ही रोपे मोफत वितरीत केली जातात.
 
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - एन. डी.ए. व अन्य संरक्षण दलात प्रवेशासाठी आवश्यक असणार्‍या विविध परीक्षांसाठी अत्यल्प दरात व काहींसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन मार्गदर्शन केले जाते.
 
संस्कृती संवर्धन व विकास महासंघ - पिंपरी चिंचवड शहरातील विविध संस्था, मंडळे यांचे एकत्रीकरण करून सामुदायिक कार्यक्रम , विधायक गणेशोत्सव, ई. कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
ग्रामविकास प्रकल्प :- ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत मौजे पिंपरी , ता. खेड जि. पुणे येथे सन २०१४ पासून विविध प्रकल्प सुरू केले आहेत. सुरवातीला एक ग्रंथालय सुरु केले त्यानंतर येथील युवक व ग्रामस्थांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण , जलसंधारण, काम चालू आहे. आगामी काळात रोपवाटिका निर्मिती, महिला सबलीकरण , विविध प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत.
 
कोणत्याही एका वळणावर न थांबता त्या वळणावरच्या सर्वच दिशांना कवेत घेऊन, कार्याची व्याप्ती वाढविणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आदर्शच म्हणायला हवे.
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा मंडळ, विलेपार्ले, मुंबई
मुंबईमधील विलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राचे कामही विशेष उल्लेखनीय. स्वा. सावरकर ज्या समाजहिताचा विचार करायचे त्या हितासाठी सदैव धडपडणारी ही संस्था. समाजजागृती, आरोग्यसंपन्नता, संस्कृतिशील वारशाची जपणूक यासंबंधी ही संस्था काम करते. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राच्या नागेश आयरे यांनी संस्थेबद्दल सांगताना माहिती दिली की १९८८ साली कै. रामचंद्र गणेश बर्वे उर्प रामभाऊ बर्वे, कै. सुशीलाताई भाटवडेकर व नवीनभाई शाह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राची स्थापना केली. त्यामार्फत अ‍ॅक्युप्रेशर शिक्षण शिबिरे सुरू केली. यातून अ‍ॅक्युप्रेशर थेरपिस्ट तयार होऊन, रूग्णांना विविध रोगांवर अ‍ॅक्युप्रेशर उपचार मोफत मिळावेत हा हेतू. या सेवेचा लाभ आजही हजारो रूग्ण घेत आहेत. आज संस्थेची अद्ययावत वास्तू आहे. या वास्तूचा विनियोग शुद्धपणे समाज उत्थानासाठीच केला जातो. बलोपसाना व्हावी म्हणून केंद्राची परिपूर्ण व्यायामशाळा आहे. त्या त्या विषयांतील तज्ज्ञांमार्फत योगाचे निरनिराळे प्रकार, स्केटिंग, कराटे, तायक्वांडो, कबड्डी, टेबलटेलनिस वगैरे खेळांचे तंत्रशुद्ध शिक्षण इथे दिले जाते. दर महिन्याच्या दोन रविवारी रसिकांसाठी शास्त्रीय संगीत तालवादनाच्या मैफिली विनामूल्य भरवल्या जातात. संगीत स्पर्धाही दरवर्षी घेतल्या जातात. सावरकर सेवा केंद्राची काही कामे ही खरेच सावरकरांच्या जीवनचरित्राला मानवंदना देणारी आहेत. सेवाकेंद्राने अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारून, सावरकारांबद्दल पार्लेकरांच्या भावना प्रकट केल्या. याशिवाय सावरकरांना अंदमानात ज्या कोठडीत बंदिस्त केले होेते, तेथे कैद्याच्या वेशातील सावरकर भिंतीवर ’कमला’ काव्य लिहीत आहेत, असे तैलचित्र तेथे सेवाकेंद्रातर्फे लावण्यात आले. युवांमध्ये जागतिक स्तरावर शौर्यपूजा व्हावी यासाठी सेवाकेंद्राने एक वेगळाच उपक्रम हाती घेतला. सावरकरांच्या प्रसिद्ध मार्सेलिस बंदरावरच्या उडीला ८ जुलै २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सेवा केंद्राने अडीचशे सावरकरभक्तांची मार्सेलीस बंदरावर अभिनव यात्रा काढली. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांनी या यात्रेत सहभाग घेतला होता. याचबरोबर सेवा केंद्रातर्फे स्वा. सावरकर जयंती, राष्ट्रीय सण, सर्वच थोरांच्या जयंती, उत्सव, वर्षसहल, दीपावली स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. हेतू हाच की समाजाचे एकत्रीकरण व्हावे. जातीपातींच्या किंवा इतरही अनेक विषमतेच्या भिंती पाडून, लोकांनी एकत्र येऊन, एक समाज एक देश म्हणून काम करावे.
अर्थात स्वा. सावरकरांच्या नावाने शेकडो मंडळे, वाचनालये, प्रतिष्ठान, दर्शन, तत्त्वज्ञान कार्यरत आहेत. त्यापैकी जागेअभावी या सहा संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. हे काही लपलेले नाही, की स्वतंत्र भारतातल्या काही राजकारण्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी स्वा. सावरकरांच्या अतुलनीय देशप्रेमाला, अजरामर शौर्याला आणि त्यागाला दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण सूर्याला झाकून ठेवता येते? त्यांनी काहीही केले, तरी स्वा. सावरकरांच्या विचारांची, कर्तृत्वाची थोरवी जनमानसात सहस्र रेशमी बंध घेऊन उमलतच गेली. हे ओघानेच आले की सावरकरांच्या विचारांवर किंवा नाव घेऊन, काम करणार्‍या संस्थांना या काळात काय दिव्यांना सामोरे जावे लागले असेल याची कल्पना न केलेलीच बरी, पण कशाचीही तमा न बाळगता, सावरकरी विचारांवर काम करणार्‍या सर्वच संस्था स्वा. सावरकरांच्या निर्भयतेचा, साधनशुचितेचा, प्रखर देशभक्तीचा वारसा खर्‍या अर्थाने राबवत आहेत. देशभक्तीसाठी सर्वात मोठा लागणारा गुण कोणता, तर प्रसिद्धी त्यागणे हा स्वा. सावरकरांचा विचार आहे. या विचारांवर जवळ जवळ सर्वच सावरकरविचारांवर आधारित असलेल्या संस्था कार्यरत आहेत. सत्य कधी लपत नसते आणि धूर्त राजकारणी, सत्तांध कितीही मगू्रर आणि लबाड असले, तरी स्वा. सावरकरांच्या बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञाननिष्ठ प्रखर देशभक्तीला डावलू शकलेच नाहीत. हो त्यांनी क्षुल्लक प्रयत्न केले की स्वा. सावरकरांचे तैलचित्र इथून तिथून हटवणे, पण त्यांना समजच नव्हती, की सावरकर तैलचित्रात आणि पुतळ्यात नाहीत. सावरकर जीवंत आहेत, त्यांच्या विचारांमधून आणि त्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित असलेल्या अगणित अनुयायांमध्ये. त्या अनुयायांनी निर्मिलेल्या सेवाकार्यांमध्ये. सावरकरांनी निर्मिलेल्या महाकाव्याने, ग्रंथाने कितीतरी देशभक्तांच्या मनात क्रांतीचे स्फुल्लिंग फुलले. ही क्रांती स्वातंत्र्यपूर्व काळात मातृभूच्या स्वातंत्र्यापुरतीच सीमित राहिली नाही. ती क्रांती स्वातंत्र्योत्तर काळात संस्थात्मक रूपात होत आहे. स्वा. सावरकरांच्या शब्दांत या सेवाभावी संस्थेचे कार्य वर्णायचे म्हंटले तर असे...
की घेतले व्रत न हे अंधतेने
लुब्ध-प्रकाश-इतिहास निसर्गमाने
जे दिव्यदाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करी हे सतीचे
 
 
  
- योगिता साळवी (9594969638)
 
@@AUTHORINFO_V1@@