क्रांतिकारकांचे मुकुटमणी - स्वातंत्र्यवीर सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 

क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे, १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला आणि जणू सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. दामोदरपंत सावरकर यांचं कुटुंब म्हणजे क्रांतिकारकांची खाणच. विनायक दामोदर सावरकरांसह त्यांचे थोरले बंधू बाबाराव अन धाकटे बंधू नारायणराव यांनीही भारताच्या स्वातंत्र्यासाठी सारं आयुष्य पणाला लावलं. सावरकरांचे माध्यमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात तर, पुढील शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. एवढं करुन सावरकर थांबले नाहीत. श्यामजी कृष्णा वर्मा यांनी घोषित केलेल्या शिवाजी शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी लंडन येथे बॅरिस्टर पदवी संपादित केली. तेथेच सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषेत पुस्तक लिहिले. या पुस्तकातूनच त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा मिळाली. इतकेच नव्हे तर, युवकांनी पुढे सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. कडवे राष्ट्रभक्त, सच्चे समाजसेवक, प्रतिभावंत साहित्यिक, जहाल पत्रकार, ख्यातनाम कवी, अंधश्रद्धेचे कट्टर विरोधक, हिंदुत्व तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या वीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली.
‘मारिता मारिता मरे तो झुंजेन’ अशी शपथ घेऊन, भारतीय युवकांसह त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यानंतर स्वदेशीचा फटका व स्वतंत्रतेचं स्तोत्र या काव्यरचना करुन, लोकांना स्वदेशी व स्वतंत्रता यांचे महत्त्व पटवून दिले. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची मुर्हूतमेढ करण्याच्या उद्देशाने १ जानेवारी, १९०० रोजी नाशिक येथे देशभक्त युवकांचा ‘मित्रमेळा’ ही संघटना स्थापन केली. त्याचप्रमाणे १९०४ मध्ये निवडक क्रांतिकारींची ‘अभिनव भारत’ ही संघटना स्थापित केली. ब्रिटनमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रांतिविश्वात सावरकरांना ‘प्रिन्स ऑफ रेव्होल्युशनरीज्’ असा नामोल्लेख करून, गौरविण्यात आले. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या आणि युवकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्येात पेटविणार्‍या वीर सावरकरांना आचार्य अत्रे यांनी ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी दिली. भारतीय जनमानसात स्वतंत्र भारताची प्रतिमा उभी राहावी, या उद्देशाने सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘मॅझिनी’ व ‘माझी जन्मठेप’ ही पुस्तके लिहिली. तसेच फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड, अमेरिका, जपान येथील क्रांतिकारी संघटनांशी सबंध प्रस्थापित करून, त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी परदेशातील अनिवासी भारतीयांची मदत घेतली. दुसर्‍या बाजूने ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून देशांतर्गत स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यात आली. सावरकरांनी लिहिलेल्या देशभक्तीपर ग्रंथांचा क्रांतिकारक भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी आपल्या स्वातंत्र्य मोहिमेस बळ देण्यासाठी वापर केला. त्यामुळेच सावरकरांना क्रांतिवीरांचे ‘मुकुटमणी’ म्हणून भूषविले जाते.
 
स्वातंत्र्य लढ्यादरम्यान पुणे व मुंबई येथे प्लेगची साथ पसरली असता, ब्रिटीश सैनिकांनी भारतीय प्लेगग्रस्त रुग्णांच्या घरात घुसून, त्यांच्यावर अत्याचार केले. त्यामुळे क्रांतिकारी युवकांमध्ये संतापाची लाट पसरली. ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या हेतूने चाफेकर बंधूंनी पुण्यात ब्रिटीश कमिशनर रँड व आयर्स्ट यांचा वध केला. तसेच क्रांतिवीर कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांनी नाशिक येथे तत्कालिन कलेक्टर जॅक्सन याला ठार मारले. इतकेच नव्हे तर, क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने गोळ्या झाडून, ऍन्ड्र्यू फ्रेझर या जुलमी अधिकार्‍याला यमसदनी पाठविले. बंगालमध्ये खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी बंगालच्या फाळणीविरुद्ध उठाव करून, फोर्टवर बॉम्बहल्ला केला. अशाप्रकारे एका पाठोपाठ एक सशस्त्र हल्ल्यांमुळे ब्रिटीश सरकार पार हादरून गेले. देशांतर्गत अराजकता पसरविणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे, लोकांना चिथविणे, ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध बंड करणे या गंभीर आरोपांखाली वीर सावरकरांना अखेर अटक होऊन, त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. सावरकरांना इंग्लडहून सागरीमार्गे मुंबईत नेताना १ जुलै, १९१० रोजी मोरिया बोटीतून मोठ्या शिताफीने फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर उडी घेऊन ते पसार झाले. सावरकरांची ही उडी पुढे त्रिखंडात प्रचंड गाजली. तथापि कालांतराने ब्रिटीश व फ्रेंच पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांना अटक केली. आणि त्यांना विविध गुन्ह्यांखाली ५० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यातील १० वर्षे त्यांनी अंदमानच्या बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली.
 
परंतु सावरकरांना सुनावलेल्या जुलमी व अन्यायी शिक्षेविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उठल्याने २ मे, १९२१ रोजी ब्रिटीश सरकारने भयभीत होऊन, त्यांची सुटका केली. खरंतर, १९२१ पर्यंतचा कालखंड हा ‘सावरकर पर्व’ म्हणूनच संबोधला जातो. या कालखंडात मदनलाल धिंग्रा, कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना फाशी देण्यात आली. तर अनेक क्रांतिकारकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ १४ मे, १९५३ रोजी नाशिक येथे सावरकरांच्या हस्ते अभिनव भारत मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेम व निस्सीम देशभक्तीचं प्रतीक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘जयोस्तुते’ हे स्वातंत्र्यतेचे स्तोत्र आजही आम्हा भारतीयांना प्रेरणादायी आहे. वीर सावरकरांना जयंतीनिमित्त मराठमोळ्या भूमीपुत्रांचा मानाचा मुजरा.
 
 
जय हिंद - जय महाराष्ट्र!
 
 
 
प्रसाद ठाकूर
सहा. जनसंपर्क अधिकारी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका,
कल्याण,
कार्यालय : 0251- 2206590 / 0251-2203621 विस्तार 132

 
@@AUTHORINFO_V1@@