समाजक्रांतिकारक सावरकर आणि सद्यस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 

मी कोणाचा भाट होऊ इच्छित नाही, पण ज्या स्वातंत्र्यवीराने आपल्या अज्ञातवासाच्या अवघ्या सात वर्षांत ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली त्या, बॅ. सावरकरांचा किती गौरव करू, असे मला झाले आहे. त्यांनी चालविलेली ही सामाजिक क्रांतीची चळवळ पाहून, इतका प्रसन्न झालो आहे की, माझे अपुरे राहिलेले हेतू पुरवील तर हा निधड्या छातीचा वीर सावरकरच पुरवील असे मला वाटत आहे,” हे उद्गार आहेत दि. २५ फेब्रुवारी १९३३, ज्या दिवशी रत्नागिरीत जन्मजात अस्पृश्यतेचा पुतळा जाळला गेला, त्या दिवशीचे. हे उद्गार आहेत, ’डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे...
 
या सामाजिक सुधारणेची आवश्यकता स्वातंत्र्यवीर सावरकरांना ते अंदमानात जाण्याअगोदरपासून वाटू लागलेली होती. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली बालविधवा दु:स्थितीकथन’ ही कविता त्यांचे मन किती आधीपासूनच समाजसुधारणेच्या कार्याप्रती संवेदनशील होते, याचा दाखलाच आहे. भंग्यांबरोबर सहभोजन करण्याची प्रत्यक्ष सुधारणा त्यांनी अंदमानातच सुरू केलेली होती.
 
सावरकरांचे समाजक्रांतीकारक विचार व त्यानुसार त्यांनी घडवून आणलेले अचाट सुधारणाकार्य हे मानवतेच्या मूल्यांवर - एकता, समता, व बंधुता यावर आधारलेले तर होतेच, परंतु ते तितकेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक, सावरकरांच्या स्वतःच्या अशा विज्ञाननिष्ठ व तर्कशुद्ध विचारांवर आधारलेले होते आणि यासाठीच इतर समाजसुधारकांपेक्षा सावरकर वेगळे ठरतात.
 
‘जात्युच्छेदक निबंध’ लिहून, सावरकर चातुर्वर्ण्य व जातीपातीविषयीच्या तत्कालीन समजुतींवर विज्ञानाच्या मार्गाने कठोर प्रहार करतातच, परंतु त्या सर्व विचारांना इतिहासातील दाखल्यांची जोड देऊन, सोदाहरण ते लोकांना पटावेत अशा प्रकारे मांडतात. अनुवंशाने गुणविकासन होते, याचाच अर्थ सद्गुणांप्रमाणेच दुर्गुणविकसनसुद्धा होते, हा विचार मांडून, ते जातिभेदाविषयीच्या आनुवंशिक समजुती मिथ्या ठरवतात. हिंदूंच्या चारही वर्णांत संकर हा अगदी शास्त्रोक्तपणे इतिहासात होत आलेला आहे. “आमच्या शेकडो जाती संकरोत्पन्नच असून, त्या सर्वांमध्ये एकच रक्त खेळत आहे,” असे प्रतिपादन करून, स्वातंत्र्यवीर सावरकर समुच्चय हिंदूंमधल्या जातीभेदाच्या खुळचट कल्पनांना एका वाक्यात नष्ट करून टाकतात!
 
ही झाली विज्ञानवादी बाजू. “राष्ट्रहिताच्या दृष्टीनेसुद्धा सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले, तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही,” हे सावरकरांचे परखड मत होते. त्यामुळे हिंदू समाजातील जातीभेद, वर्णभेद, विषमताच खर्‍या अर्थाने हिंदुस्थानाच्या शत्रू आहेत हे त्यांनी हेरले. चार वर्णांच्या झालेल्या चार हजार जाती कशा नष्ट कराव्यात याची त्यांना चिंता होती. परंतु, जातीभेद नष्ट झालाच पाहिजे, आंतरजातीय विवाह झालेच पाहिजेत, अशा केवळ पोकळ घोषणा करून स्वस्थ बसतील ते सावरकर कसले! त्यांना हवी होती ती फक्त सुधारणा नव्हे, तर समाजक्रांती! त्यांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना ‘वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी’ या सप्त स्वदेशी बेड्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता! रत्नागिरीत १४ वर्षांच्या काळात तात्याराव सावरकरांनी केलेले समाजसुधारणा कार्य अफाट, विलक्षणरित्या लक्षवेधी व मुळातून अभ्यासावे असेच आहे. ते आता टप्प्याटप्प्याने पाहू.
 
एखादे काम हाती घेतले की, त्यात सर्वस्वी स्वतःच्या प्रयत्नांना झोकून द्यायचे व ते कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करूनच दाखवायचे, ही सावरकरांची शैली होती. परंतु, ‘सुधारणा म्हणजे अल्पमत, रूढी म्हणजे बहुमत’ म्हणूनच त्यांनी ‘अकरणात्मंदकरणं श्रेय:’ या धोरणानुसार समाजसुधारणेसाठी वार्षिक, द्विवार्षिक व पंचवार्षिक कार्यक्रम आखलेले होते. हे नियोजनपूर्वरीत्या यशस्वी करून, दाखवलेले कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समाजकारणाचे फार मोठे वैशिष्ट्य आहे.
 
सावरकरांनी हिंदू समाजात ज्या ज्या क्षेत्रांत अस्पृश्यता पाळली जाई, त्यांना अनुक्रम दिला होता.
१. नागरी अधिकारांचे क्षेत्र
२. धार्मिक अधिकारांचे क्षेत्र
३. घरगुती व खाजगी क्षेत्र
४. मानसिक क्षेत्र.
 
पण, रत्नागिरीतली १९२४ ची स्थिती सावरकरांनीच सांगितल्याप्रमाणे, “महारांच्या सावलीचा विटाळ” खरोखरीच मानीत. महार शिवला तर “सचैल” म्हणजे कपड्यांसकटसुद्धा स्नान करणारे हजारो लोक असत. कर्मठ ब्राह्मणांच्या घरी “महार” हा शब्दसुद्धा उच्चारणे अशुभ समजून, ‘बाहेरचा’ म्हणत. चांभार, महार, भंगी यांची आपसांतही तशीच कडक अस्पृश्यता. कोणी कोणाला शिवणार नाही.... ‘महार,’ ‘चांभार,’ ‘भंगी’ ही नावे स्पृश्य लोकांमध्ये ‘शिवी’ म्हणून वापरली जात.
 
या अशा जातीभेदाने ग्रासून सोडलेल्या भयाण परिस्थितीत सावरकरांनी १९२४ साली समाजक्रांतीची सूत्रे हाती घेतली व १९३३ साली विठ्ठल रामजी शिंद्यांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युदिन साजरा केला!
 
हे सुधारणेचे कार्यक्रम मुख्यतः रत्नागिरी हिंदू सभेच्या माध्यमातून व ‘अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ’, ‘तरुण हिंदू मंडळ’, ’अखिल हिंदू महिला मंडळ’ या संघटनांतून पार पाडले जात.
 
वरील अनुक्रमाप्रमाणे सुरुवात सार्वजनिक क्षेत्रांतून केली गेली. परंतु, महार-चांभारादिक अस्पृश्यांना गावात आणून, थेट भजनी मंडळात बसविणे ही एक अशक्यप्रायच गोष्ट होती. त्यामुळे आधी असे कार्यक्रम पूर्वास्पृश्यांच्या वस्तीत झाले. जेव्हा सावरकर व स्वयंसेवक मंडळी महार-चांभारवाड्यात जात, तेव्हा ते लोक घराबाहेरच येत नसत. कित्येक महार-चांभारांना ‘बामणावाण्यांनी’ त्यांच्या वाड्यात यावे याचा तिटकारा वाटे! भजनास जी अस्पृश्य मंडळी येत, त्यांतील काही घरी गेल्यावर स्नान करत व मगच घरातील इतर लोकांना शिवीत अशी माहिती खुद्द सावरकरांनीच लिहून ठेवलेली आहे! पण, मंदगतीने विटाळ ढिलावत गेला. नवीन रूढी पडू लागली.
 
आता अस्पृश्यांना थेट गावात आणून भजने, व्याख्याने व हळदीकुंकू कार्यक्रम आखण्यात येऊ लागले. पण, १९२५ सालच्या चैत्रात शिरगावी झालेल्या पहिल्या हळदीकुंकवात तर अस्पृश्य स्त्रियांस स्वहस्ते कुंकू लावण्यास बळेबळे पाच स्पृश्य स्त्रिया तयार झाल्या. पण, त्यांना कुंकू लावण्यास महार अन् भंगी स्त्रिया आपले कपाळ देईनात! शेवटी कसेबसे कुंकू लावण्यात आले, ओट्या भरण्यात आल्या. ज्यांनी कुंकू लावले त्या स्पृश्य स्त्रिया या महारिणी व भंगिणींच्या स्पर्शाने विटाळल्यामुळे तडक स्नानासाठी घरी गेल्या. हे पाहून, कोणालाही समाजक्रांतीचे हे अप्रिय काम सोडून द्यावे असेच वाटले असते. परंतु, पराकोटीच्या जिद्दीने स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या स्वयंसेवकांनी हे काम चालूच ठेवले.
 
१९२६ साली मकरसंक्रांतीनिमित्त झालेल्या हळदीकुंकू समारंभात सात-आठशे स्त्रिया होत्या! ही एवढी आश्चर्यकारक प्रगती सावरकरांनी अवघ्या एका वर्षात करून दाखविली! त्यानंतर १९२८ सालच्या गणेशोत्सवातील हळदीकुंकू समारंभात तर स्पृश्य स्त्रियांची पूर्वास्पृश्य स्त्रियांना हळदीकुंकू लावण्यात इतकी चढाओढ लागली की अक्षरशः कुंकूवाचे करंडे पुरेनात! एका करंड्यावर पाच-पाच, सहा-सहा स्त्रियांनी आपले काम भागवून घेतले! रत्नागिरीसारख्या पुराणप्रिय नगरीत १९२५ सालच्या पहिल्या हळदीकुंकूवावेळी कपाळ मिळेना, ते १९२८ साली करंडा मिळेना एवढी प्रगती करणे, ही काही फावल्या वेळात करण्याइतकी सोपी गोष्ट नाही, ही बाब जाणकारांच्या एव्हाना लक्षात आलीच असेल.
 
तदनंतर त्यांनी पूर्वास्पृश्यांचे नागरी अधिकारविषयक आंदोलन हाती घेतले. त्यातलेच एक म्हणजे विद्यार्थ्यांच्या शाळा. सावरकरांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे रत्नागिरीच्या शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. साऱ्या जिल्ह्यांत शाळाशाळांमधून अस्पृश्य मुले कुठे गडग्याच्या, कुंपणाच्या भिंतीपाशी, उघड्यावर दडपलेली. त्यांच्या पाट्यापेन्सिलीस मास्तरही शिवीत नसत. काही मास्तर त्या मुलांस मारावयाचे तरी छडी फेकून मारीत! ....एकही शाळा सरमिसळ नसे.
 
जिथे देशाचे भवितव्य घडणार, त्या ठिकाणीच अस्पृश्यतेचे बीजारोपण हे लहानपणापासूनच मुलांच्या मनात होत असे. म्हणून मुलांना सरमिसळ बसवण्याची सुधारणा अतिशय मूलगामी आहे, ही सावरकरांची धारणा होती व त्यांनी जाणीवपूर्वक हे आंदोलन हाती घेतले. त्यानुसार १९२५ पासून १९२८ सालापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे शाळांपैकी १२० शाळांतून मुले सरमिसळ बसविली जाऊ लागली. परंतु, या कामीही सुधारकपक्षाला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. साठ-सत्तर गावांत तर संप, विरोध, मारामार्‍या, जाळपोळही झाले! हृदयपरिवर्तनाच्या मार्गाला मर्यादा असल्याने शंभर टक्के यश मिळविण्यासाठी म्हणून स्कूल बोर्डाच्या जनुभाऊ लिमये यांच्याकरवी रत्नागिरीच्या सर्व शाळांतून अस्पृश्यता न पाळण्याचा आदेश दि. २. ऑगस्ट १९२८ रोजी सावरकरांनी काढून घेतला.
 
तरीही ज्या पूर्वास्पृश्य मुलांसाठी जीवाचा आटापिटा करून, सावरकरांनी हे साध्य करून घेतले, त्यांच्या पालकांस पैसे देऊन, पाट्या-पेन्सिली, कपडे फुकट देऊन, बळेबळे पोरे बसवावी, तरी त्यांनी गुंगारा द्यावा, पण हळूहळू स्थिती पालटू लागली.
 
१९३५ अखेरीस तात्यारावांना या आंदोलनात शंभर टक्के यश मिळाल्याचे आढळते. फुल्यांनीदेखील शाळेत संमिश्र बसवण्याची मागणी केलेली नव्हती. त्यांच्या निधनानंतर ३५ वर्षांनी सावरकरांनी शाळेत मुले संमिश्र बसवण्याचे आंदोलन उभारले व सनातनी, शिक्षक व स्कूल बोर्ड या सर्वांविरुद्धचा लढा यशस्वीही करून दाखविला, परंतु या कामाची हवी तेवढी दखल दुर्दैवाने पुरोगामी विचारवंतांकडून घेतली गेलेली नाही.
 
या कार्यासोबतच त्यांनी अस्पृश्यांच्या बँड-पथकाद्वारे पूर्वास्पृश्यांना व्यवसाय मिळवून देणे, थेट लग्नादिक समारंभाचे अस्पृश्यता निवारण मंडपात रूपांतर करणे व मुस्लीम बँडपथकाला शह देणे असे तिन्ही हेतू साध्य करून दाखविले.
 
 
आता पुढचा प्रश्न होता तो पूर्वास्पृश्यांच्या गृहप्रवेशाचा. त्यानुसार १९२६ साली रत्नागिरीत अज्ञेयवादी सावरकरांनी राष्ट्रहितासाठी सत्यनारायणाला रत्नागिरीत “पूर्वास्पृश्यांस अहिंदू घरांत येतो तिथपर्यंत तरी येऊ देणारे ५० घरधनी निघतील... तर हे सत्यनारायणा, तुझा एक सत्यनारायण आम्ही रत्नागिरीकर करू!” असा चक्क असा राष्ट्रीय नवस घातला! एकीकडे ’जो देव नौका बुडवतो त्याला आधी नौका बुडविल्याबद्दल शिक्षा नको का?’ असे विचार लिहिणारे सावरकर राष्ट्रहित जाणून या प्रकारच्या धार्मिक श्रद्धांचा किती मुत्सद्दीने उपयोग करीत हे यातून स्पष्ट होते.
 
ठरल्या कार्यक्रमाप्रमाणे १९२७ सालच्या आरंभी सुरू झालेले गृहप्रवेश आंदोलनही त्याच सालच्या दसर्‍यापर्यंत ७५ टक्के एवढे यशस्वी झाले! पहिली दोन वर्षे अनेकांनी घालून-पाडून बोलल्यानंतर, अंगणातूनच परतवून लावल्यानंतर शेवटी १९३० पर्यंत अनेकांनी पूर्वास्पृश्यांना माडीवर नेऊन, पानसुपारी केली. शेकडा ९० लोकांनी अहिंदू येतात तिथपर्यंत अस्पृश्यांस नेले.
 
यानंतर अस्पृश्यतेचा जन्मच मुळी ज्या पावित्र्याच्या कल्पनांतून झाला होता, त्या कल्पनांचा कळस असणार्‍या देवाच्या पावित्र्यतेस स्पृश्यांच्या दृष्टीने भंग करण्याचे अप्रिय काम, कोणताही कायदा बाजूने नसताना सावरकरांना करायचे होते. परंतु, इतर उपक्रमांप्रमाणेच इथेही त्यांनी मोठ्या हुशारीने थेट मंदिरप्रवेश न करवता, गणेशोत्सवाच्या मार्गाने मंदिरप्रवेश आंदोलनाच्या पूर्वतयारीचा श्रीगणेशा केला. १९२४ साली सर्वप्रथम नाशिकमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सावरकरांनी अग्रस्थानचा मान दिला तो महारबंधूंच्या गणपतीला! दुसरा मान काठेवारी मेहतरांना व तिसरा मान धनगर बंधूंना देण्यात आला. त्यावेळच्या नाशिकच्या ’स्वातंत्र्य’ पत्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य, लहान-थोर असा काहीएक भेदाभेद न ठेवता, आपण एक ‘हिंदू’ या एकाच भावनेने जो तो अगदी तन्मय झालेला. पहिल्याच धडाक्यात सावरकरांनी अस्पृश्यतेच्या कंबरेत बडगा लगावला. आज सर्व हिंदुस्थानभर झाला नसेल, असला अस्पृश्यतेचा खून प्रत्यक्ष दिवसाढवळ्या राजरोस त्यांनी रस्त्यावर करून दाखविला. याचे नाव सामर्थ्य! अनेक कर्मठांनासुद्धा उत्तर सुचेना! असा वृत्तांत आला होता.
 
तदनंतरच्या सुधारणा १९२५ च्या गणेशोत्सवातला पूर्वास्पृश्यांचा मेळा, १९२७ सालचा मिश्रहिंदुमेळा व १९२८चा अखिल हिंदू मेळा या होत. १९२८ साली तर रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराच्या पायरीवर उभे राहून शिवू भंगी याने ‘उ:शाप’ मधील चोखामेळ्याची भजने म्हटली. भंग्याने भजने म्हणावीत व ब्राह्मणांनी टाळ्या वाजवाव्यात ही त्यावेळी अफाट क्रांती होती.
 
मंदिरप्रवेशाच्या या आंदोलनाचा भाग म्हणून, जुन्या मंदिरांत अस्पृश्यांच्या प्रवेशाचे प्रयत्न तर चालूच होते, मात्र याचाच एक भाग म्हणून श्रीमंत भागोजीशेट कीर यांना सावरकरांनी सर्व हिंदूंकरिता एक स्वतंत्र मंदिर बांधावे, अशी सूचना केली. हेच ते ‘पतीतपावन’! ’हे मंदिर पूर्वास्पृश्यांसकट सकल हिंदूंसाठी आहे,’ हीच सावरकरांची स्पष्ट भूमिका होती. या मंदिरात सावरकरांनी स्वतःची ‘नवी अखिल हिंदुस्मृती’ राबविली. यानुसार वेदोक्तबंदी तर तुटणार होतीच, परंतु ‘पूजा करता येईल, तो पुरोहित’ ही त्यांची व्याख्या असल्यामुळे व्यवसायबंदी मोडून ब्राह्मणशाहीही नष्ट होणार होती आणि यासाठीच सावरकर ‘पतित पावन’ मंदिराचा साधन म्हणून उपयोग करत होते.
 
या पतित पावन मंदिराने इतिहास घडवला. शिवू भंग्याला कीर्तन करायला लावून, त्याच्या पायांवर ब्राह्मणादिकांनी डोके ठेवण्याच्या घटनेची दखल तर ३० सप्टेंबर १९३१ च्या ‘द टाईम्स ऑफ इंडिया’नेही घेतली होती. दि. २६ एप्रिल १९३१ रोजी रत्नागिरीला भरलेल्या ‘रत्नागिरी जिल्हा सोमवंशीय महार परिषदे’च्या जाहिरातेतील या बोलक्या काव्यपंक्ती:
 
जे भक्तांचे कैवारी!
बाबा आंबेडकर, सावरकर, कीर!
तेच आम्हा साह्यकारी!
त्यांनी रत्नागिरीतच आम्हा दाविली पंढरी!
म्हणे गंगाराम समस्त जाती!
पतितपावनाची लागली भक्ती!
आता सोडा सगळी भ्रांती!
 
१९२९ सालच्या अखेरीस सावरकरांनी रोटीबंदी तोडण्याचे आंदोलन हाती घेतले. तरुणांचे पहिले सहभोजन पार पडले. सर्वजातीय शंभर तरुणांनी सहोपहार केला. १९३० ला ‘तरुण हिंदू मंडळाच्या’ वाढदिवसानिमित पहिले प्रकट सहभोजन झाले. या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तरुणांना घ्यायला लावलेला संकल्प ‘टाईम्स’ने या शब्दांत मांडला - “आजपासून जाती-जातीची उच्चनीचता मी मानणार नाही. कोणत्याही जातीच्या हिंदूबरोबर मी सहभोजन करेन. जन्म वा कर्म यांनी ठरणारी माझी जात न सांगता स्वतःला केवळ ‘हिंदू’च म्हणवून घेईन.”
 
यानंतर २१ सप्टेंबर १९३१ रोजी पहिले स्त्रियांचे सहभोजन ’पतित पावना’त संपन्न झाले. ब्राह्मण ते भंगी अशा एकूण ७५ स्त्रिया सहभोजनात सहभागी झाल्या होत्या. या प्रथम सहभोजनानंतर १९३६ पर्यंत सहभोजनी स्त्रियांची संख्या चारशेपर्यंत वाढली होती.
 
रोटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने सावरकरांनी काळाच्या पुढे टाकलेले पाऊल म्हणजे ‘अखिल हिंदू उपहारगृह’. पतित पावनाच्या आवारात १ मे १९३३ साली हे उपहारगृह देणगी व उसने पैसे घेऊन उघडले. हे उपहारगृह चालवणार्‍या दोन तरुणांपैकी एक तरुण महार होता.
 
या प्रकारच्या बेड्या जवळ जवळ तुटल्यानंतर तोडायला सर्वांत कठीण होती ती बेटीबंदीची बेडी, परंतु बेटीबंदीची ही बेडी तोडताना वधुवरांचे आपापसातील प्रेम, आचारविचारांचे जुळणे, राहणीमान, शिक्षण, वय असे अनेक मुद्दे लक्षात घ्यावे लागतात आणि ही बेटीबंदीची बेडी तोडताना सावरकरांनी तोच विवेक ठेवून, काही आंतरजातीय लग्नेही लावून दिली आहेत.
 
मात्र, या सर्व समाजसुधारणा करताना सावरकरांनी समाजातील कोणाही विरुद्ध आकस ठेवून, कुठलेही काम केले नाही. हा समाज आपलाच आहे, या समाजातील सनातनी लोकही आपलेच आहेत; त्यांच्याच हितासाठी ही सुधारणा करायची आहे, याचा विसर सुधारकाने कधीही पडू देऊ नये, अशी स्पष्ट ताकीद त्यांनी दिलेली होती. आजच्या काळात, जिथे समाजसुधारणा करताना विरोधीपक्षाला खाऊ की गिळू केले जाते तिथे तात्यारावांचा हा विचार सर्वथा अनुकरणीय आहे.
 
परवाच आलेल्या बातमीनुसार, कानपुरात एका भागवत कथेत आरतीची थाळी घेऊन जात असणार्‍या एका दलित दाम्पत्याला अडवण्यात आले. आरतीची थाळी फेकून देण्यात आली व धक्काबुक्की करून जातीवाचक अपशब्दही बोलण्यात आले. या दलित दाम्पत्याने पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रारही नोंदवली. मात्र, अजूनही मोकाट फिरत असणार्‍या आरोपींविरुद्ध कार्यवाही न झाल्यास, ‘आम्ही इस्लाम कबूल करू’ अशी चेतावनीच त्यांनी दिली आहे. ‘जेव्हा इतर हिंदूधर्मीय आम्हाला हिंदूच मानत नाहीत, तेव्हा इस्लाम कबूल करण्यात काय वाईट,’ असे त्यांना वाटते. भारतातील जातीभेदाची ही भीषण परिस्थिती २०१८ साली पाहता, “१९२७ सालीच ब्राह्मणहो, क्षत्रियहो, हे सात कोटी आपल्या धर्माचे आणि रक्ताचे भाऊ आज देवाची पूजा करावयास म्हणून आत येऊ द्या अशी करूण प्रार्थना करीत आहेत! न्यायासाठी, प्रेमासाठी त्यांना आत घ्या! आज ते तुमच्या देवाचे भजन करावयाचा सत्याग्रह करू पाहत आहेत, पण उद्या दुष्ट म्लेंच्छांच्या पाखंडास बळी पडून, ते देवाचे भंजन करण्याचा शस्त्राग्रह करण्यास सिद्ध होतील, हे ध्यानात धरा!” असे सांगणारे विनायक दामोदर सावरकर किती समकालीन आहेत हे जाणवते आणि “मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका,” असे म्हणणार्‍या सावरकरांच्या जात्युच्छेदक विचारांची हिंदू समाजाला आजही गरज आहे, आजही परधर्माच्या पंजात फसून, त्यांनी नरकात पडू नये म्हणून तरी त्यांस देवदर्शन घडू द्या,” असे म्हणणारे सावरकर पुन्हा एकदा जन्माला यावेत असे वाटावे, हीच हिंदू समाजाची खरी चिंतनीय स्थिती आहे.
 
तरीही, सावरकरांचाच वारसा सातत्याने चालू ठेवत, सुधारणेच्या गणपतीपुढे तुम्ही अवघे पाच आणि भविष्यकाळ सहावा हे त्यांचे सूत्र पदोपदी लक्षात ठेवत हिंदूंना संघटित करण्याची नितांत गरज आहे; अन्यथा “सामाजिक क्रांतीचा आधारस्तंभ असणारा समाज हा एकजिनसी बनला नाही तर राजकीय क्रांती विफल होऊन, पारतंत्र्याच्या शृंखला पुन्हा पायात पडतात हा अनुभव पूर्वी आलेलाच आहे,” असे तात्याराव सावरकरांनी सांगून ठेवलेलेच आहे.
 
 
 
 
- वैष्णवी सतीश सोनारीकर  (8830141594)
 
@@AUTHORINFO_V1@@