अर्थचिंतक सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अत्यंत व्यवहारी आणि उपयुक्ततावादी बुद्धिमत्तेचे. स्वदेशीबद्दलही ते प्रचंड आग्रही होते, कारण त्यामागील अर्थकारण ते नीट जाणून होते. तेव्हा, सावरकरांचा एक अर्थचिंतक म्हणून विविध पैलू उलगडणारा हा लेख...
पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये बांधलेल्या ’इंडिया हाऊस’ येथे भारतीय विद्यार्थी राहत होते. पं. वर्मा हे कर्मठ गृहस्थ होते. इंग्लंडला गेले तरी परधर्मीयांच्या हातचे अन्न ते घेत नसत. आर्य समाजाचे संस्कार त्यांच्यावर होते. ते स्वतः हाताने स्वयंपाक करून खात असत. अशात भारतातून शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन एक विद्यार्थी लंडनला पोहोचला.त्या विद्यार्थ्याने पं. वर्मा यांचे मन वळविले. ‘हे ब्रिटिश लोक आपल्याकडे येऊन आपल्याला गुलामासारखे वागवितात. आपण त्यांच्याकडून येथे कामे करून घ्यावीत. त्या निमित्ताने ते आपल्यासाठी रांधतील, आपली भांडी घासतील. त्या निमित्ताने का होईना, आपण मालक बनू,’ अशा आशयाचा युक्तिवाद करून त्या विद्यार्थ्याने पं. वर्मांचे मन वळविले आणि ते पाश्चात्त्य व्यक्तींच्या हातचे अन्न ग्रहण करण्यास तयार झाले.
 
तो विद्यार्थी होता, पुढे जाऊन ‘स्वातंत्र्यवीर’ या पदवीला पोहोचलेला प्रतिभावान व तेजस्वी विनायक दामोदर सावरकर. ही आठवण स्वतः सावरकरांनीच उत्तर काळात नोंदविली आहे. परंतु, त्यातून दिसून येते ती सावरकरांची व्यवहारी बुद्धी. ’निर्वाहः प्रतिपन्नेषु’ (परिस्थिती येईल, त्याप्रमाणे त्या परिस्थितीचा वापर करून घेणे) हे त्यांच्या आयुष्याचे सूत्र होते. कठोर प्रतिकूलतेतूनही आपल्याला लाभ होईल, असा मार्ग कसा काढायचा, यात सावरकर वाक्बगार होते. त्यांच्या प्रसिद्ध अशा गाईवरील निबंधांतूनही हीच व्यवहारी बुद्धी प्रकर्षाने दिसून येते अन् हीच व्यवहारी व उपयुक्ततावादी बुद्धी त्यांच्या आर्थिक विचारांतून दिसून येते.
 
खरे तर ‘अर्थचिंतक सावरकर’ या पैलूवर आपण काहीसा अन्यायच केला आहे. ‘सावरकर’ नावाच्या देवतेभोवती देशभक्ती, समाजसुधारणा, राष्ट्रचिंतन, हिंदुत्ववाद आणि विज्ञाननिष्ठा यांची मखरे आपण सजवून ठेवली आहेत. पण, त्या मखरांच्या मागे आर्थिक विचार करणार्‍या सावरकरांची मूर्ती झाकोळली जाते. वस्तुतः सावरकरांनी भारताला केवळ ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा विचार केला नाही, तर मुक्त झाल्यानंतर भारताची वाटचाल कशी होणार, याचाही सूक्ष्म आराखडा त्यांच्याकडे तयार होता. अंदमानात तुरुंगात असतानाही त्यांनी कैद्यांना साक्षरतेचे आणि अर्थशास्त्राचे धडे दिले होते, ते याच भविष्यवेधी भूमिकेतून.
 
वास्तविक अर्थचिंतक सावरकरांवर असा अन्याय व्हायला नको. ब्रिटिश साम्राज्याचे आणि देशभक्तांचे लक्ष त्यांनी आपल्याकडे आकर्षून घेतले तेच मुळी स्वदेशीच्या जागरणातून. पुण्यातील लाकडी पुलाजवळ त्यांनी पेटविलेली परदेशी कापडांची होळी अनेकांमध्ये देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित करून गेली. ही होळी हे कशाचे द्योतक होते? येथील कच्च्या मालाची लूट करून परदेशी कापडे येथील लोकांना विकून साम्राज्याची धन होत आहे, हा विचार त्यातून देण्यात आला होता अन् सावरकर यावेळी केवळ विद्यार्थीदशेत होते, हे लक्षात घ्यायला हवे. हाच धागा त्यांनी पुढे कायम ठेवला आहे. आधुनिक विचार, राष्ट्रवाद आणि उपयुक्तता यांचा मिलाफ त्यांच्या विचारांत आढळतो.
 
आपण यंत्रांचे स्वागत केले पाहिजे. हे यंत्रयुग आहे.हस्तकलेला त्यांची स्वतःची जागा असेल आणि त्यांना उत्तेजनही देण्यात येईल. परंतु, राष्ट्रपातळीवरचे उत्पादन हे यंत्रांद्वारे आणि शक्य तेवढ्या अधिक पातळीवर होईल, असा विचार त्यांनी भावी स्वदेशी राजवटीबद्दल मांडला होता. याच विचारांचा अवलंब करून चीनने आज जागतिक पातळीवर आघाडी घेतल्याचे आपण पाहतो. ते म्हणत, ‘’मी जे सांगतो, ते ५० वर्षांनी पटेल. तोपर्यंत थांबण्याची माझी तयारी आहे.” आज त्या वाक्याची प्रचिती येते.
 
स्वा. सावरकरांच्या वरपांगी एकांतिक वाटणार्‍या विचारांमध्येही परिस्थितीचे अचूक वाचन आणि भावी घडामोडींचा बिनचूक वेध होता. उदाहरणार्थ, १९४० च्या दरम्यान युरोपात दुसर्‍या महायुद्धाला तोंड फुटले, तेव्हा स्वयंमन्य विचारवंत व पुढाऱ्यांनी मानवतावादाचे गोडवे गाण्यास सुरुवात केली. तेव्हा हे महायुद्ध म्हणजे भारतासाठी इष्टापत्ती असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. ब्रिटिशांनी १७५७ साली प्लासीची लढाई जिंकली आणि तेव्हापासून त्यांनी या देशाचे केवळ शोषण केले. या देशात त्यांनी एकही मोठा उद्योग आणला नाही. मात्र, आता युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना आता उद्योग काढणे भाग पडेल, हे त्यांनी ओळखले. तेव्हा हिंदूंनी जमेल तसे या कारखान्यांमध्ये प्रवेश घ्यावा, शक्य तेवढी कौशल्ये आत्मसात करावीत, असा सल्ला त्यांनी दिला. हिंदी सैन्याला उपयुक्त अशा यंत्रसामुग्रीसाठी परदेशांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी हिंदुस्थान सरकारने हिंदी कारखानदारांना विमाने, मोटारी नि युद्धाची अद्ययावत शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी उपाय योजावे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली होती. मुंबईतील कारखाना संस्कृती आणि स्वतंत्र भारतातील अवजड उद्योगांची उभारणी यामागची पार्श्वभूमीही होती. कामगार चळवळीच्या गतवैभवाबद्दल गळे काढणाऱ्यांना याची कितपत माहिती असते?
 
‘हिंदू राष्ट्राचे औद्योगिकीकरण’ हा सावरकरांचा महत्त्वाचा ध्यास होता. त्यांच्या घोषित उद्दिष्टांपैकी ते एक होते. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून १९४० साली केलेल्या त्यांच्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की, ”हिंदू महासभा सत्तेवर आली तर काही महत्त्वाचे उद्योग व निर्मिती कारखाने यांचे राष्ट्रीयकरण करण्यात येईल. परंतु, राष्ट्रीय सरकारला ते परवडले तरच आणि खासगी उद्योगांपेक्षा ते अधिक नफ्यात चालवता आले तरच! स्वातंत्र्याच्या तीन-चार दशकांनंतर अनेक सरकारी उद्योग ज्या प्रमाणात पांढरे हत्ती बनले, त्यांच्यात निर्गुंतवणूक करावी लागली, त्या पार्श्वभूमीवर हा विचार काळापुढे जाणारा आणि अधिक परिस्थितीयोग्य नव्हता का? इतक्यावर न थांबता राष्ट्रीय उद्योगांचे परदेशी स्पर्धकांपासून संरक्षण करण्यासाठी सरकारने सर्व प्रकारची पावले उचलावीत,” अशी मागणीही त्यांनी केली होती.
 
सावरकरांची व्यवहारी बुद्धी आणि यंत्रप्रेम शेतीक्षेत्रालाही पारखे नव्हते. मोठ्या शेतीक्षेत्रावर आणि शास्त्रीय पद्धतीने यंत्रांद्वारे शेती कशी करावी, हे शेतकर्‍यांना शिकविण्यासाठी सरकारने शेतजमिनी ताब्यात घेऊन सरकारी लागवड सुरू करावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला होता. त्याचप्रमाणे ‘शेतमालक’ व ‘शेतमजूर’ या दोघांमध्ये कृत्रिम भेद करण्यालाही त्यांचा विरोध होता. भूस्वामी आणि श्रमिक हे दोघेही हिंदूच आहेत. त्यामुळे हिंदू-महासभा दोघांच्या हिताचे न्याय्य ते संरक्षण करील, असे त्यांनी १९३८ साली प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
हे झाले सैद्धांतिक मांडणीबद्दल. पण, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी याच तत्त्वांचा अवलंब करून दाखविला. ‘बोले तैसा चाले’ या म्हणीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तात्याराव सावरकर. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘स्वदेशीचा फटका’ (‘फटका’ म्हणजे काव्याचा एक प्रकार) रचला होता. त्यांच्या स्वदेशीबाबतच्या आंदोलनाचा उल्लेख वर आलाच आहे. स्वदेशीचा आपला आग्रह त्यांनी कधीही सोडला नाही. रत्नागिरी येथे ते १९२५ मध्ये स्थानबद्ध होते. त्यावेळी रत्नागिरी हिंदूसभेचा मेळा ‘विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वापरा,’ असा प्रचार करत सर्वत्र फिरत असे. तेव्हा सावरकरांनी त्यांच्यासाठी ‘दीपावलीचे लक्ष्मीपूजन’ या गीताची रचना केली होती. या गीतातील ओळी होत्या -
 
देशी तेल, देशी साबू, देशी वस्त्राने ।
देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने॥
स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनि जरी मंगल वेळ ।
गजान्त लक्ष्मी हिंदु-हिंदुच्या दारी डोलेल॥
 
‘जिंगल’ हा शब्द आज प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळतो. स्वा. सावरकरांच्या या गीताला ’स्वदेशीची जिंगल’ म्हणायला काय हरकत आहे?
 
रत्नागिरीत स्थानबद्ध असतानाही सावरकरांनी अन्य कार्यांबरोबरच ‘स्वदेशी’वरही लक्ष केंद्रित केले होते. एक प्रश्नावली करून आणि स्वयंसेवक पाठवून (आजच्या भाषेत ‘मार्केट सर्व्हे’) घरोघरी कोणत्या परदेशी वस्तू वापरल्या जातात, याची माहिती त्यांनी गोळा केली.
 
काही जणांना इच्छा असूनही स्वदेशी वस्तू कोठे मिळतात, हे माहीत नसते. त्यामुळे त्या वस्तू विकत घेतल्या जाणार नाहीत, हे त्यांनी ओळखले होते. रत्नागिरी शहरात कोणत्या दुकानात कोणत्या स्वदेशी वस्तू उपलब्ध आहेत, या सामान्य वाटणाऱ्या विषयावर त्यांनी एक लेखच लिहिला होता. ‘तरुणपणी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ लिहिणारा अन् ‘जयोस्तुते’ हे स्वतंत्रतादेवीचे स्तोत्र रचणारा मी, असले लेख कुठे लिहित बसू?’ असा विचार त्यांनी केला नाही.
 
याच रत्नागिरीत स्वा. सावरकर स्वतः स्वदेशी वस्तूंची हातगाडी फिरवित, तसेच स्वदेशी वस्तू दुकानांत ठेवण्यासाठी दुकानदारांचे मनही वळवित. या संबंधीची त्यांची दृष्टी कशी होती? एका आठवणीतून हे दिसून येते. ती अशी - “तात्या स्वदेशी वस्तू वापरण्यासंबंधी आग्रह धरत असत. त्यांच्या प्रेरणेवरूनच आम्ही रत्नागिरीच्या प्राथमिक शाळेत स्वदेशी भांडार चालविले होते. भांडारासाठी खात्रीच्या स्वदेशी वस्तू तात्याच खटपट करून आम्हाला मिळवून देत असत. स्वदेशी भांडाराच्या उलाढालीत एका महिन्यात तर केवळ दोन रुपये नफा मिळाला. हे आम्ही तात्यांना जरा निराशेने सांगितल्यावर तात्या म्हणाले, ”तुम्ही इतका स्वदेशीसाठी आटापिटा केला नसतात तर हे दोन रुपयेसुद्धा परदेशस्थांनाच मिळाले असते. त्याऐवजी तेवढे दोन रुपयेच का असेनात, पण हे तुम्ही आपल्यातच ठेवलेत, हेही काही कमी नाही, अशी आठवण ताई दातार यांनी सांगितली आहे.” (सावरकर यांच्या आठवणी, मालक-अधिकारी प्रकाशन, १९६२).
 
थोडक्यात म्हणजे ‘अद्ययावत,’ ‘उपयुक्त’ आणि ‘राष्ट्रीय’ या तीन शब्दांच्या घागरीत सावरकरांच्या विचारांचा सागर सामावू शकतो. लेखाच्या सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे ‘उपयुक्तततावाद’ हा त्यांचा स्थायीभाव होता. या संदर्भात १९४१ साली त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकातील मजकूर जाता-जाता पाहण्यासारखा आहे. सावरकरांना अनेक ठिकाणांहून भाषणासाठी निमंत्रणे येत होती. या भाषणांच्या निमंत्रणाला सावरकरांनी एक सार्वजनिक उत्तर तयार करून ठेवले होते. हे पत्रक १६ ऑगस्ट १९४१ रोजी काढण्यात आले होते. त्यात ते म्हणतात, ”भाषणाची सर्वच निमंत्रणे स्वीकारणे मला शक्य होणार नाही. दुसरे असे की, काहीतरी अल्पस्वल्प का होईना, परंतु विधायक कार्य घडत नसताही नुसती व्याख्यानेच देत राहण्याचा मला खरोखरीच वीट आला आहे. यासाठी मुंबईतील जे गणेशोत्सव मंडळ हिंदू राष्ट्रीय निधीला किंवा सामान्यतः हिंदू संघटना कार्यास साहाय्य म्हणून निदान शंभर रुपये तरी देईल आणि माझे व्याख्यान हा सार्वजनिक कार्यक्रम असल्याने त्या व्याख्यानाच्या स्थानी सर्व हिंदूंना स्पृश्य-अस्पृश्य हा भेद न मानता प्रवेश मिळतो की नाही, हे अजमावण्यासाठी माझ्यासमवेत असणार्‍या अस्पृश्य बांधवांनाही जेथे प्रवेश असेल, त्याच ठिकाणी काय ती मी भाषणे देईन.”
 
 
 
देविदास देशपांडे  (8796752107)
 
@@AUTHORINFO_V1@@