सावरकरांच्या लोकविलक्षण व्यक्तित्वछटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
साधारणपणे व्यक्तीची कार्यतत्परता तिला मिळणाऱ्या यशापयशावर अवलंबून असते. यश उत्साह भरते, तर अपयश व्यक्तीला उदास, निरुत्साही करते हा मानसशास्त्रीय नियम आहे. या नियमाला अपवाद ठरावे असे सावरकरांचे व्यक्तित्व. सदासर्वदा उपेक्षा, अवहेलना, प्रतारणा व विद्वेष यात वावरणारे तरीही कार्यमग्न, प्रसन्न, प्रफुल्लित असणारे देवदुर्लभ व्यक्तित्व स्वा. सावरकरांना लाभले होते. असे देवदुर्लभ व्यक्तित्व लाभलेल्या व्यक्तीच्या व्यक्तित्वछटा कशा असाव्यात हे शोधण्याचा प्रयास प्रस्तुत लेखात करणार आहे.

 
‘परा अहं प्रधान स्वप्रतिमा’
फ्रॉईडने व्यक्तित्वाची रचना मांडताना ‘वासना,’ ‘अहं’ व ‘परा अहं’ अशी त्रिमितीय केली. वासनेला त्याने व्यक्तित्वाचा मूलस्त्रोत मानलेले आहे, तर ‘परा अहं’ला नैतिक अंग मानलेले आहे. ‘वासना’ व ‘परा अहं’ यात सारखा संघर्ष होत असतो, हे त्याने प्रतिपादन केलेले आहे. जगातील कोणत्याही व्यक्तीत हीच रचना व हाच संघर्ष पाहायला मिळतो. गांधींचे सत्याचे प्रयोग जर पाहिले, तर फ्रॉईडच्या याच सत्याचा प्रत्यय येईल.
 
मनोविश्लेषणाच्या या दृष्टीतून विचार करता सावरकरांची स्व-प्रतिमा ‘परा अहं’ प्रधानत्व दर्शविते. ‘परा अहं’ म्हणजे व्यक्तित्वाचे नैतिक होय. यात नैसर्गिक वासनांपेक्षा सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय अर्थात नैतिक विचारांचे प्राबल्य असते. त्यामुळेच असेल त्यांच्या आत्मचरित्रांत कोठेही कामवासनेची चर्चा आढळत नाही.
 
सावरकरांच्या आत्मवृत्ताचा कोणताही भाग वाचा, पूर्वपीठिका, भगूर, नाशिक, शत्रूच्या शिबिरात वा जन्मठेप, तुम्हाला कामवासना नावालाही आढळणार नाही. याउलट गांधींचे सत्याचे प्रयोग वाचा, म्हणजे सावरकरांच्या आत्मवृत्ताचे वेगळेपण चटकन ध्यानात येईल. पित्याच्या अंतिम समयी रतिक्रीडारत गांधी अन् विवाह एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाहणारे सावरकर! त्यामुळेच असे सावरकर अभिमानाने सांगतात-
 
केले स्वयें दहन यौवन देहभोगा (१-७७ )
सावरकरांचे चरित्रकार शि. ल. करंदीकरांनी सावरकरांसोबत लंडनला असणार्‍या बॅ. ज्ञानचंद वर्मांना विचारले, “लंडनमध्ये सावरकरांची कोणी प्रेयसी होती का?” यावर ज्ञानचंद वर्मा तात्काळ उत्तरले, “If Savarkar had any sweet heart, his Country was the only sweet heart he had. (२-२६३)'' सावरकरांसोबत सतत वावरणार्‍या वर्माजींची ही पावती पुरेशी बोलकी आहे- “यापुढे जाऊन, माझी मैत्री म्हटली की तिचा मुख्य कटाक्ष माझ्या मतांचा प्रचार हाच किंवा माझा मित्र म्हटला की, स्वदेशी वस्तू वापरणारा, स्वदेशाभिमानांत रंगलेला ही सावरकरांची विधाने त्यांच्या ‘परा अहं’ प्रधान व्यक्तित्वाचीच साक्ष देतात. (३-७०-७३)
 
“स्वभावाचा अपशकुनी कल अर्थात जीवन तत्त्वज्ञान.
माझ्या स्वभावाचा तेव्हापासूनच जो एक अशुभाकांक्षी दूरदर्शीपणाचा विक्षिप्त व अपशकुनी कल असे, पण तो अशुभाशीच संतत झगडणे दैवी आलेल्या माझ्या आयुष्यास आजवर फारच उपयोगी पडला. (३।९४)”
 
येथे सावरकर तेव्हापासून ज्याविषयी म्हणतात तो प्रसंग १८९९चा. त्यावेळी सावरकर जेमतेम सोळा वर्षांचे होते. भगूरमध्ये प्लेगने थैमान घातले होते. त्यांच्या दोनेक जीवलग मित्रांच्या घराचे प्लेगमुळे स्मशान झालेले. सावरकरांची आईसुद्धा १८९२ साली महामारीतच वारली होती. सावरकरांच्या शेजार्‍याला प्लेग झाला होता. रात्रीच्या वेळी त्याच्या मरणाचे कण्ह ते ऐकत बसले होते. त्यावेळी त्यांच्या मनांत आपल्या घरी प्लेग होऊन मोठा भाऊ वारला तर? अण्णा वारले तर? मीच वारलो तर? अशा एक ना अनेक अशुभ विचारांनी थैमान घातले. पण, अशुभ म्हणून त्यांना न झटकता वास्तव गृहीत धरुन सावरकर मनांतच पुढच्या योजना करु लागले.
 
दुर्दैवाने मनातील विचार प्रत्यक्षांत उतरले. आईच्या मृत्यूनंतर आईवडील दोन्ही झालेल्या अण्णांना प्लेग झाला. केवळ विशीत असलेला मोठा भाऊ गावी गेलेला, त्यातच अकरा वर्षांच्या लहान भावालाही प्लेगची लागण झाली. या भीषण प्रसंगांतही ते न तुटता उभे राहिले. जणू काही आपल्या “माझ्या स्वभावाचा लहानपणापासून हाच विशेष की संकट येताच माझें मन दगडासारखें होऊन, उलट एक प्रकारचे कर्तृत्वाचे अवसान चढें (३।९६ )” या वक्तव्याची साक्षच ते देतात.
 
येथे हे ध्यानांत ठेवायला हवे की, वर वर्णिलेला ‘अपशकुनी कल’ म्हणजे ‘प्रतिकूल तेच घडणार’ची मानसिक सिद्धता होय. बालपणातील या अनुभवातून विकसित जीवन-तत्त्वज्ञान मांडताना सावरकर लिहितात - “ज्यांचा ज्यांचा सर्वतोपरी असहाय अशा कालात, देशात वा परिस्थितीत जन्म झाला असेल आणि तरीही त्या परिस्थितीशी झुंज खेळून तिला चीत करुन, कोण्या नवयुगाची, ज्यांना पाहावयाची असेल, त्यांना त्यांना प्रतिकूल तेंच बहुधा घडेल, हे गृहीत धरुन त्यास तोंड देऊ, या नियमाचे हे हलाहल प्यायलेच पाहिजे. (६ ।१७ -१८)”
 
वरवर पाहता नकारात्मकता दर्शविणारा हा विचार त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार दर्शवितो. पण, ‘जे घडेल त्यास तोंड देऊ’ हा विचार अदम्य सकारात्मकतेचा निदर्शक आहे. सावरकरांचा हा अपशकुनी कल त्यांना इतर सर्व महापुरुषांपासून अधिकच उठावदार बनविता झाला.
 
सावरकरांची मनोधारणा ‘अच्छे दिन की आस नही’
एखाद्या कामात एखादी व्यक्ती उतरते ती आपल्या वकूबाप्रमाणे आपल्याला काहीतरी मिळावे अशी आस मनात बाळगून, आपल्याला ‘अच्छे दिन’ यावेत असे तिला वाटत असते.
 
सावरकरांची मनोधारणाच लोकविलक्षण होती. अनेक ठिकाणी त्यांनी ती व्यक्त केली आहे. मृत्युंजय दिनाच्या सत्कार प्रसंगी दिलेल्या उत्तरात त्यांनी ती स्पष्टपणे व नेमक्या शब्दात मांडलेली दिसते. “अगदी आरंभापासून आमची अशी धारणा होती की, आम्ही दिवस चांगला पाहायला काही जन्माला आलेलो नाही. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य पाहायला जन्मलेलो नाही. त्या स्वातंत्र्यासाठी लढत लढत मरायला जन्मलो आहोत. (७।२८)”
 
हे वरपांगी बोलणे नव्हते, तर मनोरचनेचा अंतःस्थ गाभा होता. जी व्यक्ती केवळ लढत लढत मरण्यासाठी जन्मली, तिचा जीवनाकडे जीवनातील सुखदुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच इतरांहून निश्चितच वेगळा असणार.
 
देशासाठी दुःख-संकटे या तर आनंदवार्ता...
सावरकर लंडनमध्ये असताना त्यांच्या मोठ्या भावाला क्रांतिवीर बाबाराव सावरकरांना जन्मठेप झाली, लहान भावालाही तुरुंगवासाची शिक्षा मिळाली, घरादारावर संकट कोसळले अशा आशयाचे पत्र वहिनींनी त्यांना पाठवले. हे पत्र वाचताना कोणालाही पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटेल, अतीव दुःख वाटेल पण २६ वर्षीय विनायकाला हे सारे वाचून आनंद वाटला. कारण हे सारे देशासाठी होते म्हणून तर ते वहिनींना लिहितात,
 
धन्यधन्य अपुला वंश।
सुनिश्चये ईश्वरी अंश।
श्रीरामसेवापुण्यलेश,
आपुल्या भाग्यी लाधला॥ (१.७४ )
 
देशासाठी कोसळनाऱ्या दुःख-संकटांना सावरकर रामसेवा समजतात व जाणीव करुन देतात की, महत्कार्य करायचे असेल, तर महासंकटे झेलण्याची ताकद बाळगावी लागते. तुम्ही यश मिळविले, पद-प्रतिष्ठा मिळविली तर ती सामान्यांना आवडतात. पण, तुम्ही देव-देश-धर्मासाठी संकटे हसत हसत झेललीत, तरच ती संतांना पसंत पडतात. म्हणूनच वहिनींना ते लिहितात-
 
“ऐसे वर्तन पाहिजे केले की जे पसंत पडेल संतांना। (१.७४ )
 
विरोधाचा स्वीकार
 
देशासाठी, धर्मासाठी काही करणाऱ्यांना असे वाटत असते की, आपण काहीतरी चांगले काम करत आहोत. मग आपल्याला परमेश्वराने साथ दिली पाहिजे. त्यांना जर कष्ट भोगावे लागले वा यातना मिळाल्या तर वाटते, आम्ही इतके चांगले असताना देव आमच्याशी असा का वागतो? याची अनेक उदाहरणे देता येतील. पण, सध्या ठळक उदाहरण योगी अरविंदांचे. अलीपूरच्या तुरुंगातून सुटल्यावर उत्तरापाडा येथे दिलेल्या व्याख्यानात योगी अरविंद म्हणतात, “जेव्हा मी अलीपुरच्या तुरुंगात पोहोचलो, तेव्हा मला वाटले मी चांगले काम करत असताना देवाने मला तुरुंगात कसे काय पाठवले?”
 
अरविंदांसारख्या योग्याला पडणारा प्रश्न पन्नास वर्षांची जन्मठेप भोगणार्‍या सावरकरांना कधीच पडला नाही. उलट वेळोवेळी ते सांगत, ”ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध बंड करण्याचा आम्हाला अधिकार, त्याप्रमाणे आम्हाला पकडण्याचा त्यांनाही अधिकार आहे.”
 
सावरकरांना जेव्हा मार्सेलिसच्या उडीनंतर पकडण्यात आले तेव्हा संतापून, त्यांना मारण्यासाठी उठलेल्या पोलिसांना त्यांना मारण्याची धमकी दिली. थोड्या वेळाने सावरकर त्यांना म्हणाले, “मला पकडण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे, तसाच पळून जाण्याचा प्रयत्न करण्याचा मलासुद्धा अधिकार आहे. तुम्ही तुमचे काम केलेत, मी माझे केले.”
 
हीच बाब सामाजिक सुधारणांबाबत ते दाखवतात. ते म्हणत, ”जसा सुधारणा करण्याचा सुधारकाला अधिकार आहे, तसाच विरोध करण्याचा सनातन्यांना अधिकार आहे. त्यांच्या विरोधाला जो पुरून उरेल तो सुधारकांचा सुधारक ठरेल.” ही बाब त्यांचा विरोधकांबाबतचा उदार दृष्टिकोन दाखवते, तशीच त्यांची उदासीनतेवर मात करण्याची कार्यशैलीही दाखवते.
 
निःस्वार्थ निरपेक्ष समर्पण
देशासाठी निरपेक्ष, विनाअट सर्वस्व समर्पण करायला हवे, अशी सावरकरांची धारणा होती. दिल्लीत एक मुस्लीम कृष्णभक्त होती. ती नेहमी म्हणायची, “भगवान श्रीकृष्णाची मूर्ती केवळ स्वतःच्या चितेच्याच प्रकाशात दिसते.” तिचे ते बोल सावरकरांच्याही परिचयाचे होते. श्रीकृष्णाच्या मूर्तिदर्शनासाठी एकाची चिता पुरेशी ठरत असेल, पण स्वातंत्र्यकृष्णमूर्तीसाठी सकुटुंब, सपरिवार, सर्वस्वाची चिता पेटवावी लागते. तीच सावरकरांनी पेटविली होती. याची नोंद करताना ते त्या स्वातंत्र्यदेवीला सांगतात-
 
त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता
दावानलात वहिनी नवपुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठबंधू
केला हवी परमकारुण पुण्यसिंधू
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला
त्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला (१ .७८ )
हा इतका सहकुटुंब त्याग आपण का केला याचे स्पष्टीकरण देताना सावरकर सांगतात,
“हे मातृभू! आम्ही असो परिपूर्ण-हेतू
दीप्तानलात निज-मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि आम्ही ठरलो कृतार्थ (१ ।७८ )”
स्वार्थ जाळण्याची सावरकरीय भावनाच त्यांच्यात अदम्य व निरपेक्ष उत्साहाचे सामर्थ्य भरते.
स्वतःविषयी व स्वकुटुंबाविषयीची निर्ममता
 
मातृभूमीच्या विरहाने सावरकर ढसढसा रडले, अशी निरंजन पालांची साक्ष आहे. सावरकरांच्या कोणत्याही काव्यात वा लेखात मातृभूमीच्या दास्याविषयीची प्रचंड चीड नि अतीव दुःख उत्कटतेने भरलेले आढळते. मातृभूमीविषयी अतीव करुण असणारे सावरकर
 
स्वतःविषयी, स्वतःच्या कुटुंबाविषयी निर्मम, निष्करुण वाटतात. माईंच्या निधनावेळची त्यांची भूमिका निर्ममच वाटते.
 
देशाचे भवितव्य चांगले व्हावे याचा ध्यास घेणारे सावरकर मुलामुलींच्या, भावी पिढ्यांच्या तरतुदीचा विचार करताना आढळत नाहीत. इतकेच कशाला, स्वतःसाठीच्या सुख-सुविधांचीही सावरकरांना गरज वाटत नव्हती.
 
एकदा श्रीनिवास शास्त्री सावरकर सदनात आले होते. सावरकरांचे घर पाहून त्यांनी आश्चर्याने विचारले, “सावरकरजी, तुम्ही अशा घरात राहता?” यावर आपल्या घराकडे पाहत, एका राष्ट्रीय दर्जाचा व पक्षाचा हा नेता निर्विकारपणे उत्तरला, ”का? काय झाले? अंदमानपेक्षा तर चांगलेच आहे.” या उत्तरात कोठेही मुलामा नव्हता, ‘मी गरीबासारखा राहतो,’ ही फुशारकी नव्हती, तर स्वतःविषयी असणारा निर्मम भावच अधिक होता.
 
स्तुती-निंदेविषयी उदासीनता
भारताचा वा हिंदुमात्रांच्या गौरवाविषयी सावरकर नेहमीच जागरुक असत. पण, स्वगौरवाविषयी उदासीन होते. देवळातील देवसुद्धा निंदा स्तुतीला भुलतो, पण सावरकर यापासून फार दूर होते.
 
सावरकर डोंगरीच्या तुरुंगात असताना एक गृहस्थ सावरकरांना भेटायला आले. त्यांनी सावरकरांना म्हटले, ”तिकडे युरोपात तुमची तुलना वुल्फटोन, एमेट व मॅझिनीशी केली जात आहे, तुमचा हुतात्मा म्हणून गौरव केला जात आहे आणि इकडे भारतातील वृत्तपत्रे तुमचा उल्लेख ‘रास्कल’ असा करत आहेत. यावर सावरकर उत्तरले, ”एवढेच ना? मग ठीकच झाले! युरोपात ते ‘हुतात्मा’ म्हणाले, हे ‘अधम’ म्हणाले.” त्या दोन्ही आत्यंतिक निंदास्तुतीचा अनायासेच परस्पर छेद जाऊन, माझे मूळ मूल्य जसेच्या तसे अबाधित उरले! (६ ।२३ )
 
त्यांची हीच व्यक्तित्वछटा समाज सुधारणाविषक कामातसुद्धा जाणवते. सावरकर स्पष्टपणे म्हणतात, ‘वरं जनहितं ध्येयं, केवला न जनस्तुतिः।’ ते याच न्यायाने होय.
 
विरोधाभासातून व्यक्त होणारी विलक्षण उत्कटता
 
सावरकर एकाच वेळी दोन अत्यंत टोकाच्या उपमा मांडून, त्यातील एक अगदी तळाची बाजू उचलत व दुसरी उंचीची बाजू नाकारत आपली अनन्य निष्ठा व्यक्त करतात. सागरास काव्यात ते गातात,
 
प्रासाद इथे भव्य परी मज भारी।
आईची झोपडी प्यारी।
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनीचा । (१ .७२ )
 
बघा, एका बाजूला राजप्रासाद आहे, राज्य आहे व दुसर्‍या बाजूला वनवास व झोपडी आहे. सावरकर राजप्रासादापेक्षा आईच्या वनातील वनवास सुखद मानतात. ही निव्वळ कविकल्पना नाही, तर उत्कट निष्ठाच आहे.
 
हिंदुत्वावरची निष्ठा व्यक्त करताना सावरकर
 
‘उःशाप’मध्ये एका पात्राच्या तोंडून वदतात - “इंद्रपद जरी माझ्याकडे चालून येत असले, तरी पहिला अहिंदू म्हणून जगण्यापेक्षा, शेवटचा हिंदू म्हणून मी मरण पत्करेन.”
 
पहिला अहिंदू म्हणजे हिंदू नसण्याने काय नुकसान होते हे ज्यावेळी ठाऊकही नाही, त्यावेळी इंद्रपद लाभत असणे हे एक सुखद टोक तर दुसर्‍या बाजूला थेट शेवटचा हिंदू आणि इंद्रपद तर सोडाच! जगण्याचाही अधिकार नाही, मरण हाच पर्याय! त्यावेळीही सावरकर मरणाची देणगी देणारे हिंदूपण स्वीकारतात, इंद्रपद देणारे लाजिरवाणे अहिंदूपण नाकारतात. जर कोणी अशी भूमिका घेऊन जगत असेल, तर त्याला यशापयशाची कोण पर्वा वाटणार?
 
ध्येय अनन्यता
सावरकरांच्या व्यक्तित्वछटेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते ध्येयरूप बनून जात. त्यांचे तेरा लक्ष व सहा हजार पृष्ठांत विस्तारलेले साहित्य बघा. त्यांचा लेख देशासाठी, त्यांची कविता देशाची चिंता करणारी, त्यांचे वक्तृत्व देशासाठी, नाटक देशासाठी, पत्रकारिता देशासाठी, इतकेच कशाला त्यांचे आत्मवृत्तही देशासाठीच! इतकी अनन्यता अपवादानेच कोणात आढळेल. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या ध्येयाशी एकरुप होते, तेव्हा ती तद्रुपच होते. त्यामुळेच महान क्रांतिकारक बचनेश त्रिपाठी सावरकरांना ‘राष्ट्रोपरी’ अर्थात राष्ट्ररुप मानतात. (४ .१६ )तर आचार्य अत्रे सावरकरांना ‘जन्मजात देशभक्त’ संबोधतात.
 
सावरकरांच्या या व्यक्तित्वछटांव्यतिरिक्त राष्ट्रीय स्वार्थ, सद्गुणविकृती, सूड, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण उपयोगात आणायची सवय(११ . १०९ ) इत्यादी अनेक बाबीसुद्धा व्यक्तित्वछटांत अंतर्भूत करण्यास प्रत्यवाय नसावा. या त्यांच्या व्यक्तित्व धाटणीमुळेच मार्सेलिसला पकडले गेल्यावर, पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर, गांधीहत्येच्या खटल्यात गोवले गेल्यावर, स्वतंत्र भारत सरकारने सूडबुद्धीने तीन वेळा अटकेत टाकल्यावरसुद्धा सावरकररूपी हिमालय डगमगला नाही. परक्यांनी केली नसेल इतकी हेटाळणी, अवहेलना स्वकीयांनी केली, तरीही हा धैर्यमेरू चळला नाही व आज तर अधिकच जोमाने उभा आहे तो याच त्याच्या लोकविलक्षण व्यक्तित्वछटांमुळे होय.
 
(लेखक मनोचिकित्सक व ‘दशग्रंथी सावरकर’ या पीएचडीतुल्य सन्मानपत्राने सन्मानित आहे)
 
 
 
 
- डॉ. नीरज देव  (9860003002)
 
@@AUTHORINFO_V1@@