सावरकर आणि भाषाशुद्धी

    26-May-2018
Total Views |
 

 
सदर लेखात हिंदुहृदयसूर्य विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘भाषाशुद्धी’ या विषयाचे महत्त्व आणि आजच्या काळातील त्याची गरज ही गोष्ट अधोरेखित केली आहे. त्यात www.savarkarsmarak.com या संकेतस्थळावरून घेतलेल्या ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश आणि मराठी भाषाशुद्धी लेख’ या सावरकरलिखित पुस्तकांचे संदर्भ वापरले आहेत. वरील सगळीच पात्र काल्पनिक आहेत. आजच्या काळात भाषेची होणारी सरमिसळ, रोजच्या वापरात जी भाषा आपण बोलतो त्या भाषेत शक्य तोवर परकीय शब्द नसावेत/टाळावेत, हे विचार मुख्यत्वाने आणले आहेत. मित्रांशी या विषयाची चर्चा करताना त्यांच्याकडून भाषाशुद्धीची गरज काय असा प्रश्न आला म्हणून तो प्रश्नसुद्धा काही उतारे व तर्क यांच्या साहाय्याने सोडवायचा प्रयत्न केला आहे.
कालच आम्ही सगळे मित्र नवीन चित्रपट बघून आलो. आल्यावर चित्रपटावर चर्चा होतेच, ‘‘कसली भारी Acting रे त्याची, कसला त्याचा डान्स. ऍक्शनपण जबरदस्तच...” वगैरे वगैरे! सगळ्या मित्रांत सावरकर वाचणारा तसा मी एकटाच आणि त्यात दोन दिवस आधीच मी त्यांचे ‘भाषाशुद्धी’ विषयावरचे पुस्तक वाचावयास घेतले होते. ‘मराठी भाषाशुद्धी’ या विषयावर असणारे हे फारच प्रभावी पुस्तक आहे. मी आपलं माझ्या मतीने मित्रांना सांगितलं की, “तात्यारावांनी चित्रपट क्षेत्रात अनेक मराठी शब्द पर्याय म्हणून योजले आहेत. इंग्रजी शब्द वापरलेच पाहिजेत का?” त्याच विषयावरून मी माझ्या मित्रांना भाषाशुद्धीबद्दल सांगू लागलो.
 
मी : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक विषयात अभ्यासू लिखाण केलेलं आहे. त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. इतिहास असेल, हिंदुत्व असेल या अनेक विषयांना सावरकरांनी आपल्या पुस्तकांत प्रभावीपणे मांडलं आहे. त्यापैकीच त्यांनी मराठी भाषा व भाषेवर परकीय शब्दांचे वाढणारे वर्चस्व कसे कमी करावे, यावरसुद्धा दोन पुस्तकं लिहिली आहेत.
 
परीक्षित : अरे सावरकरांचे हे कार्य आम्ही नवीनच ऐकत आहोत, मराठी भाषेबाबत सावरकरांनी लिहिलंय हे ठाऊकच नव्हतं.
 
अभिजीत : हो रे, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे त्यांची विदेशी कापडाची होळी, परदेशात असलेले कार्य, मार्सेलिस जवळ मारलेली उडी, अंदमानचा कारावास इतकंच आम्हाला ठाऊक!
 
मी : अरे मराठी भाषा तर आहेच, पण त्यांनी त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळात रत्नागिरीमध्ये अस्पृश्य लोकांसाठीदेखील भरीव कार्य केले, एवढंच काय तर पतित पावन मंदिर उभे करून, सगळ्या जातीधर्माच्या लोकांना बोलावून एकत्र जेवायला बसवलं.
 
परीक्षित : खरंच सावरकर म्हणजे फारच थोर व्यक्ती!’
 
मी : मी भाषाशुद्धीबद्दलच एक गंमत सांगतो, मुंबईत महापौरपदाच्या निवडणुका झाल्या आणि महापौर निवडून आले. सावरकर त्यांना शुभेच्छापर पत्र लिहायला बसले. त्यावेळी ‘महापौर’ हा शब्द नव्हता. तेव्हा ‘मेयर’ म्हणत असत. सावरकरांनी ठरवलं की ‘मेयर’ या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द हवाच.
 
अभिजीत : अरे मग पुढे?
 
मी : सांगतो ना! सावरकरांनी काही दिवस विचार केला आणि ‘मेयर’ या शब्दाला प्रतिशब्द शोधला, तो म्हणजे महापौर!’
 
परीक्षित : अच्छा, म्हणजे ‘महापौर’ हा शब्द सावरकरांनी दिलाय तर!
 
मी : अरे इतकंच काय, आपल्या रोजच्या वापरातले अनेक मराठी शब्द आपण सावरकरांच्या कृपेने वापरत असतो.
 
अभिजित : अरे पण आता भाषाशुद्धीची काय गरज? आता तर आपण शुद्ध मराठी बोलतोच ना?
 
मी : तू बोललेल्या वाक्यात ‘गरज’ हा शब्द मराठी नाहीये.
 
अभिजित : काय सांगतोस? पण आपण तर हा शब्द नेहमीच....
 
मी : म्हणून तर भाषाशुद्धी निकडीची आहे
 
परीक्षित : नेमकं कसं पण? मराठी भाषेत कित्तीतरी भाषांमधून शब्द आले आहेत, संस्कृत असतील, हिंदी असतील, फारसी असतील! मग सगळेच शब्द वापरणे बंद करावे की काय?
 
मी : अरे तसं नाही रे, सावरकर म्हणतात भाषाशुद्धी ही परकीय शब्दाचे असणारे स्वामित्व नष्ट करणे होय. संस्कृत आणि हिंदी काय परकीय भाषा नव्हेत?
 
अभिजीत : अरे पण मला काही हे पटत नाही, दोन किंवा तीन भाषा जिथे सर्रास वापरल्या जातात, तिथे अशी सरमिसळ झाल्याशिवाय राहील काय?
 
मी : शिवाय या शब्दाला मराठी प्रतिशब्द व्यतिरिक्त असा आहे!
 
परीक्षित : पण रोजच्या वापरात असणारे परकीय शब्द सोडून, हे शब्द आठवणीने वापरत राहणे, हे जरा कठीण काम दिसते, म्हणजे पटकन सुचायला तर हवे ना!
 
मी : सवय लागेपर्यंत कुठलीही गोष्ट अवघड वाटणारच, थोडी सवय करावीच लागणार तेव्हा जमेल.
 
 
अभिजीत : हो, खरंच मराठी भाषाशुद्धीचा आग्रह किमान आपण तरी धरलाच पाहिजे.
 
मी : आपल्या रोजच्या वापरात कितीतरी असे शब्द आहेत, जे आपण मराठी म्हणून वापरतो पण ते मूळचे परकीय भाषेतले आहेत किंवा त्या भाषांमधून रूढ झालेत.
 
अभिजित : पण, आपण या विषयावर कसे आलो? या ‘मुव्ही’च्या विषयावरून आलो. हो ना?
 
परीक्षित : हो! शुभमला अचानक आपले इंग्रजी शब्द खटकले ना म्हणून!
 
मी : तसं नाही, खटकले म्हणून नव्हे. मी दोन-चार दिवस आधीच सावरकरांचे भाषाशुद्धीच्या विषयाशी निगडीत पुस्तक वाचले. त्यात चित्रपट क्षेत्रात असणार्‍या अनेक गोष्टींना सावरकरांनी पर्यायी मराठी प्रतिशब्द दिलेले आहेत.
 
 
अभिजीत : सावरकरांचे मराठी भाषेबद्दल एवढे कार्य अगदीच अपरिचित होते.
 
मी : गंमत तर पुढे आहे, भालजी पेंढारकर नाव ऐकलंय का तुम्ही?
 
परीक्षित : मोठे डायरेक्टर होते म्हणे मराठी सिनेमाचे
 
मी : बरोबर! ‘स्टुडिओचे आत्मवृत्त’ या पुस्तकात एक प्रसंग लिहिलाय, तो तर अगदी ऐकण्यासारखा आहे.
 
अभिजित : सांग की मग!
 
मी : हं, एकदा काहीतरी निमित्ताने सावरकर त्यांच्या स्टुडिओमध्ये गेले होते. स्टुडिओ बघत असताना प्रत्येक कक्षावर त्यांना ‘डायरेक्टर’, ‘प्रोड्युसर’, ‘असिस्टंट डायरेक्टर’, ‘कोरिओग्राफर’, ‘फोटोग्राफर’ अशा पाट्या लावलेल्या दिसल्या.
 
परीक्षित : अच्छा, मग?
 
मी : मग काय? सावरकरांना हे चांगलंच खटकलं, त्यांनी त्वरित त्याला पर्यायी मराठी शब्द शोधून काढले.
 
मी : आपण आज जे ‘निर्देशक’, ‘दिग्दर्शक’, ‘नृत्य दिग्दर्शक’, ‘छायाचित्रण’ हे शब्द वापरतो, हे तात्यारावांचंच देणं!
 
परीक्षित : ए भारीच रे, म्हणजे किती अभ्यास असेल त्यांचा मराठी भाषेचा!
मी : खरंच रे, आजच्या काळात तर फार फार महत्त्व आहे याला, म्हणजे बघ ना इंग्रजी मधल्या' ‘I love you' ला १४३ करणारी पिढी, त्यांना मराठी भाषेविषयी कसली आत्मीयता राहणार रे? म्हणजे तुम्ही आम्ही तरी शाळेत चांगल्या शिक्षकांकडून मराठी शिकलो म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व तरी वाटतं. हेच तू कोण्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलाला जाऊन सांगितलं तर त्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो.
 
अभिजीत : माध्यम कुठले का असेना, मातृभाषा सगळीकडेच परिपूर्ण यावी असा हट्ट हवाच!
 
अभिजित : विषय न संपणाराच आहे, पण दुर्दैवाने मला नाही थांबता येणार, बहुतेक ३० तारखेला परीक्षा सुरू होतील.
 
मी : हं चुकतंय बर अभि, अरे सावरकरांच्या थोरल्या बंधूंनी म्हणजे बाबाराव सावरकरांनी ‘दिनांक’ हा शब्द दिलाय, ‘तारीख’ हा शब्द मराठी नाही. दिनाचा अंक म्हणजे दिनांक! सोपंय नाही का?
  
अभिजित : ‘दिनांक’ शब्द माहीत होता, पण ‘तारीख’ मराठी नाही हे आजच कळलं, बरंय तुम्ही बोला मी निघतो.
 
परीक्षित : खरंच बोललास तू, इंग्रजी माध्यमातील मुलांना तर मराठीचा लवलेशही नाही उरलाय! सावरकरांची दूरदृष्टी बघता त्याकाळी त्यांनी केलेलं कार्य खऱ्या अर्थाने आजही महत्त्वाचं आहे. इंग्रजीमुळे मराठीचे हाल कुत्रंही विचारणार नाही आहे काही दिवसांनी!
 
मी : अरे इंग्रजीला नको कारणीभूत धरूस, सावरकरांनी एक फार उत्कृष्ट मुद्दा त्यांच्या लेखात मांडला आहे. स्वतः सावरकरसुद्धा इंग्रजी जाणत होते, पण म्हणून त्यांनी मराठी, इंग्रजी किंवा इतर भाषांची सरमिसळ नाही होऊ दिली. ते म्हणतात की, “सगळ्या भाषांचे शब्द आपण आपल्या भाषेत वापरले, तर आपला शब्दकोश धेडगुजरी होईल. आपल्या भाषेत असणारे अनेक प्रतिशब्द आपणच विसरून जाऊ.”
 
परीक्षित : मला एक प्रश्न पडला आहे पण!
 
मी : बोल की,
 
परीक्षित : भाषाशुद्धीची गरज काय आहे पण? भाषा म्हणजे खरे तर संवादाचे माध्यम असते, माझं म्हणणं तुला कळलं की झालं ना काम? मग शुद्धीच महत्त्व काय?
 
मी : असं वाटणं बरोबर आहे, पण याचं उत्तर मी देण्यापेक्षा माझ्या फोनमध्ये सावरकरांनी लिहिलेले भाषाशुद्धीचे पुस्तक आहे, ते वाचून दाखवतो, त्यातले शब्द माझ्या सांगण्यापेक्षा प्रभावी असतील.
 
परीक्षित : अरे वा, म्हणजे माझं शंकासमाधान स्वतः तात्याराव करणार तर!
 
मी : तसंच समज!
 
मी : ऐक तर, सावरकरांच्या पुस्तकातील हा उतारा किती मार्मिक आहे -
 
“आपल्यातील जुन्या शब्दांनी शक्य तितके काम भागवावे, या म्हणण्यावर पुष्कळदा असे विचारण्यात येते की, ‘उपानह,’ ‘जोडा’ इत्यादी जुने शब्द असतानाही ‘शू’ हा शब्द वापरण्यात हानी कोणती? त्याने शब्दसंपत्ती वाढते. पण याच दृष्टीने पाहिले तर मग आजकाल इंग्रजी शिकलेले लोकं शिष्टपणाची भाषा समजून, ‘वाईफ सिक आहे’ म्हणून जे पाहुण्यास सांगतात तेही क्षम्यच म्हणावे लागेल. कारण पत्नी, अर्धांगिनी, बायको, मंडळी, कुटुंब इत्यादी वाटेल तितके संस्कृत-प्राकृत शब्द मराठीत असताही तो कुटुंबास ‘वाईफ’ म्हणून जे नवे नाव देतो, त्याने तदर्थक शब्दसंपत्ती वाढते असेच म्हणले पाहिजे. इतकेच शब्दास काय पण ‘बाप,’ ‘पिता,’ ‘वडील,’ ‘जनक’ इत्यादी शब्दास सोडून, ‘फादरनी गेस्टना रिसिव्ह केले’ म्हणून सांगणारी पोरेही ‘फादर,’ ‘मदर,’ ‘सिस्टर’ इत्यादी शब्द भाषेत आणून मराठीची शब्दसंपत्ती वाढविण्याचे महत्कार्य करीत आहेत असे म्हणावे लागेल. असले दिग्विजय करून, तो कारभार जर आपण एखाद्या रघुप्रमाणे आपल्या भाषेच्या भांडारात ओतू लागलो, तर त्याने शब्दसंपत्ती वाढेल. परंतु, तो शब्दरत्नाकर आपल्या भाषेचा न राहता, जगाच्या भाषेचा एक नवा डेढगुजरी शब्दकोश की काय तो होईल. केवळ शब्दसंपत्ती वाढविण्याकरिता म्हणून आपले जुने शब्द भाषेत घुसू देणे वा घुसलेले शब्द टिकू देणे, चुकीचे आणि भाषेच्या प्रकृतीस आणि स्वाभिमानास हानिकारक आहे.”
 
परीक्षित : भारीच रे, म्हणजे भाषेचा स्वाभिमान आणि भाषेची प्रकृती या दोन्ही गोष्टींचा विचार करून लिहिलंय.
 
मी : अरे सावरकरांचे साहित्य असेच आहे सुंदर, त्यात भाषेचे प्रेम आणि स्वाभिमान सतत दिसून येतो.
 
परीक्षित : मला पण हे पुस्तक आता वाचावंसं वाटतंय.
 
मी : अजून या पुस्तकात सावरकरांनी एक महत्त्वाची गोष्ट लिहिली आहे, जी आजच्या काळात तंतोतंत लागू होते. त्यांनी लिहिलंय की दोन वर्षे विदेशात शिकून आलेले विद्यार्थी, “आता मराठी लिहिण्या-वाचण्याची सवय राहिली नाही,” असे म्हणतात. आज तर विदेशात जाणार्‍या लोकांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. हेसुद्धा भाषेच्या हिताला हानिकारक आहे.
 
परीक्षित : अरे हे तर बोलूच नकोस, आताच मागच्या आठवड्यात झालेली गोष्ट आहे, मी आणि माझ्या भावाचा लहान मुलगा आम्ही खेळत होतो, फक्त सहा वर्षांचा आहे तो! त्याला इंग्रजी शाळेत टाकलंय, खेळता खेळता कुठूनतरी शाळेवर विषय आला म्हणून मी त्याला ‘44’ लिहून दाखव म्हटलं!
 
मी : मग?
 
परीक्षित : “मला शिकवलं नाही शाळेत,” असं म्हणाला तो. मग शेवटी त्याला ‘फॉर्टी फोर’ लिही म्हटलं तेव्हा चटकन लिहून दाखवलं.
 
मी : खरंच रे, मराठीची अशी होणारी अवनती फारच वाईट आहे. आता वयाच्या सहाव्या वर्षांपासून ज्यांना असं शिक्षण मिळतंय, त्यांच्याकडून मराठी भाषेचे कार्य करण्याची काय अपेक्षा ठेवावी?
 
परीक्षित : नाहीतर काय, पण या बाबतीत सावरकर मात्र खरोखर द्रष्टे निघाले, काही महापुरुषांना दूरदृष्टी असते, त्यांना समाजाची वर्तमान स्थिती बघून पुढे काय होईल याचा अचूक अंदाज बांधता येतो. त्याचं उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर!
 
मी : सावरकरांची दूरदृष्टी फक्त भाषेपुरती नाही, त्यांनी तर सैनिकी शिक्षण अनिवार्य करणे, प्रगत सैन्यदल उभे करणे वगैरे गोष्टीसुद्धा आपल्या भाषणांतून नित्य सांगितल्या आहेत.
 
पुष्कराज : Hi, what’s up? काय करताय तुम्ही इकडे, क्लासला नाही गेलात का?
 
परीक्षित : बघ रे, किती शब्द घुसवले इंग्रजीचे याने?
 
पुष्कराज : म्हणजे काय रे? कसले शब्द? काय बोलताय तुम्ही?
 
मी : अरे तुझ्या मराठीत किती भेसळ झालीय इंग्रजीची, तेही महाराष्ट्रात राहून! आम्ही आता भाषाशुद्धीविषयी बोलत होतो, ते पण सावरकरांनी केलेल्या कामाबद्दल! तेवढ्यात तुम्ही आलात आणि इंग्रजी आणि मराठी एकत्र बोलू लागलात!
 
पुष्कराज : अरे असं होय, पण भाषा वगैरे बघायचे दिवस गेले रे आता, तुम्हाला कोण समजावणार बाबा?
 
परीक्षित : चूप रे आता, झालंय आमचं बोलून सगळं.
 
मी : अरे मी काय सांगत होतो, आपल्या दैनंदिन भाषेत असणार्‍या परकीय शब्दांविषयीसुद्धा सांगणे तेवढेच गरजेचे आहे. आपल्या रोजच्या शब्दात वापरला जाणारा ‘तयार’ हा शब्दसुद्धा मराठी नाही. त्यासाठी ‘सिद्ध’ किंवा ‘सज्ज’ असा प्रतिशब्द आहे. तरीही आपण नेहमीच ‘तयार’ हा शब्द वापरत असतो.
 
परीक्षित : मराठी राजांची ‘शाहिरी’ हा शब्दसुद्धा आपण मराठी म्हणून वापरतो, ‘शाहीर’ हा शब्द ‘शायर’ या शब्दापासून आलेला असल्यामुळे ‘शाहिरी’ हा शब्द मराठी नाहीच.
 
पुष्कराज : अरे माझ्याही एका प्रश्नाच उत्तर द्या मग!
 
परीक्षित : विचार की...
 
मी : हो हो, विचार.
 
पुष्कराज : अरे मराठी भाषेची शुद्धी वगैरे प्रकरण ठीक आहे, पण कितीतरी लोक आता सर्रास इंग्रजीमिश्रित मराठी बोलतात, म्हणजे कॉलेजात तर हे कायमच बघत आलोय मी, मग भाषाशुद्धीच हे प्रकरण त्यांना कसे पटवून द्यावे?
 
मी : हे खर आहे, आज आपल्याला सगळ्यात जास्त गरज त्याचीच तर आहे. अवघड जरी असले तरी अशक्य नाही वाटत. कारण, महाविद्यालय म्हणायची सवय आधी लागली पाहिजे.
 
परीक्षित : हो, आपणच ‘कॉलेज’ म्हणतो मग कसे होईल? त्याचबरोबर सावरकरांच्या या विचाराचा प्रसार पण झाला पाहिजे.
 
मी : मी जे पुस्तक वाचलं त्यातले हे शब्द आहेत, म्हणजे सावरकर इंग्रजी जाणत होते, मराठी जाणत होते, उर्दूही येत होतं, पण त्यांनी त्या पुस्तकात या ओळी लिहिल्या आहेत, त्या अनुकरणीय आहेत! विलायतेत असतानाही की जेथे एक-दोन वर्षे राहून, परत येताच ‘आपली मातृभाषाच मी विसरलो’ म्हणून म्हणणे एक प्रौढीचे लक्षण समजले जात असे तेथेही- आमच्या संस्थेतील सर्व हिंदी, पंजाबी, बंगाली, तामिळ इत्यादी सदस्यांचा परिपाठ असे की, आपसात हिंदी बोलत असताही व्यर्थ इंग्रजी शब्द ज्याच्या तोंडून निघेल त्यास त्या दिवशीच्या चहास मुकावे लागे! या पूर्व वयातील परिपाठाचा परिणाम आमच्या पिढीवर जो झाला तो नित्याचाच झाला. यावरून आपल्या भाषेचा स्वाभिमान लक्षात घेऊन, अनुकरण करण्यासारखे नाही का?
 
पुष्कराज : हो, आपण आपल्या भाषेचा स्वाभिमान बाळगावा, भाषेची प्रकृती सांभाळावी हेच खरं आणि महत्त्वाचं. आपण करायला हवं ते काम भाषेचं; किमान आपल्या संपर्कात असणार्‍या व्यक्तींना तरी आपण प्रवृत्त करू शकतो.
 
मी : मी तर थोडंसं सांगितलं, खरे म्हणजे आपण भाषाशुद्धीविषयी असणारे सावरकरांचे पुस्तक वाचले पाहिजे.
 
पुष्कराज : बरोबर व इतरांनाही वाचायला द्यायला हवे.
 
 
 
 
 
- शुभम क्षीरसागर (9545751519)
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.